Home महाराष्ट्र कोकण मेवा आच-याची एक तरी ‘डाळपस्वारी’ अनुभवावी

आच-याची एक तरी ‘डाळपस्वारी’ अनुभवावी

1

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आमच्या आचरे गावची ‘डाळपस्वारी’ संस्थानी थाटाची आणि अगदी आगळी-वेगळी अशीच असते. आचरे गावची रामनवमी, आचरे गावची गावपळण जशी बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध, तसाच आचरे गावच्या डाळपस्वारीचा नावलौकिकही सर्वत्र झालेला! ते डाळपस्वारीचे पाच दिवस आचरेवासीयांसाठी भावभक्तीने मंतरलेले असतात, सुगंधित झालेले असतात. आचरे गावची डाळपस्वारी  गुरुवार दिनांक ९ एप्रिल, चैत्र कृष्ण पंचमी ,शके १९३७ पासून सुरू होत आहे. या डाळपस्वारीच्या सोहळय़ाचे दर्शन घडविणारे हे शब्दचित्र..
‘‘ए ऽऽ गावकर वतनदार, कौलकरी माझो, नव्या काय सांगूचा नाय! ज्याप्रमाणे तुझे वाडवडील या पाषाणावर, या मांडणेवर, या गावात आणि या बारात जसे वागले, तसे आसलेले चार तुम्ही वागा, वागल्यावर अन्न, वस्त्र, निवारा मिळून कुटुंबाचे संरक्षण होईल आणि चाकरी माझ्या पाषाणाकडे राजी होयत, ’’ असे चक्क मालवणी बोली भाषेतून आपल्या ग्रामदेवतेचे, रामेश्वराच्या मांडणीचे तरंग आपल्याशी संवाद साधतात आणि क्षणार्धात आपले सर्व तन-मन रोमांचित होऊन जाते. तो परिणाम असतो ग्रामदेवतेच्या आशीर्वादाचा!

त्या एका अलौकिक आशीर्वादाने प्रत्येक आचरावासीयाला वर्तमानाची जाण येते! भविष्याची दिशा समजते! त्या आपुलकीच्या दोन शब्दात, आपल्या पूर्वजांबद्दल आदर, वाडवडिलांच्या सद्भावनांबद्दल जिव्हाळा, त्यांच्या प्रयत्नाबद्दल प्रेम, त्यांच्या ईश्वरनिष्ठतेबद्दलची आपुलकी, आपल्या तना-मनात हळूहळू भिनू लागते आणि सर्वाग रामेश्वर होते. ते तन-मन रोमांचित करणारे दिवस असतात, डाळपस्वारीचे.! आच-याच्या शाही डाळपस्वारीचे!

डाळपस्वारीच्या वेळी आमच्या रामेश्वराच्या ‘मांडणीसमोर’ आरती (तळी) ठेवून जे जे भक्त नतमस्तक होतात त्यांना देव अगदी अशाच प्रकारे चक्क त्याच्या कुटुंबाचे आडनाव घेऊन आपुलकीने हाक मारतो! चार आपुलकीचे शब्द सांगतो आणि आशीर्वाद देतो! काही वेळा ‘वतनदार’ या शब्दाऐवजी पेठकरी, कौलकरी, वृत्तीक असे मगदुरप्रमाणे शब्द बदलत असतात; पण अंतरीचा भाव मात्र तोच असतो. ते शब्द प्रत्येक ‘आचरेकर’ कानात साठवून ठेवतो! कारण प्रत्यक्षात ज्या रामेश्वर भक्तावर कठीण प्रसंगी निर्णय घेण्याची पाळी येते, त्या-त्या वेळी ‘‘वाडवडील जसे वागले तसे आसलेले चार तुम्ही वागा!’’ हा बावीस अक्षरी मंत्रच जणू त्यांची विचारबुद्धी चिरंतन जागृत ठेवतो!
अलीकडे सरकारची ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना रूढ होत चालली आहे. पण त्यापूर्वी किती तरी वर्षापूर्वीची ‘देव आपल्या दारी येतो, आपले दु:ख समजावून घेतो आणि आपल्याला धीर देतो ही संकल्पना. आज एकविसाव्या शतकात आपणाला ही कल्पना दिग्मूढ करून जाते! ‘डाळपस्वारी’ हा आगळा वेगळा प्रकार प्रामुख्याने दक्षिण कोकणात मालवणी भागातच पाहायला मिळतो.

कोकणातील देव, गावरहाटीप्रमाणे दरवर्षी अगर तीन वर्षातून एकदा आपापल्या शाही लवाजम्यासहित गावातील प्रत्येक वाडीवर (त्या-त्या भागातील प्रत्येक प्रमुख देवस्थानात) जातात. त्या-त्या देवस्थानचा ‘लाखभाग’ त्याला अर्पण करतात. यालाच ‘डाळप’ असे म्हणतात. ‘डाळप’ करण्यासाठी देवाची जी स्वारी निघते ती ‘डाळपस्वारी’!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आमच्या आचरे गावची ‘डाळपस्वारी’ संस्थानी थाटाची आणि अगदी आगळी-वेगळी अशीच असते. आचरे गावची रामनवमी, आचरे गावची गावपळण जशी बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध तसाच आचरे गावच्या डाळपस्वारीचा नावलौकिकही सर्वत्र झालेला! ते डाळपस्वारीचे पाच दिवस आचरेवासीयांसाठी भावभक्तीने मंतरलेले असतात, सुगंधित झालेले असतात.

डाळपस्वारीच्या वेळी संस्थान आचरे देवस्थानचे रामेश्वर, रवळनाथ, पावणाई, विठ्ठलाई आणि काळकाई देवांचे तरंग आपल्या शाही लवाजम्यासहित, ताशा- सनईच्या ताल सुरात, वाजत गाजत, छत्र, चामर, नौबत, रणशिंगे, निशाण, अब्दागिरे, भगवे बावटे यांच्या डौलात, मृदंगाच्या ठेक्यावर, झुलव्याच्या पावलावर समस्त गावच्या प्रजाजनांसमवेत वाडीवाडीवर डाळपस्वारीला प्रवेश करतात ना त्यावेळचे ते दृश्यच मुळी स्वर्गीय असते. काय त्या तरंगांची लोभस रूपे!. रामेश्वराचा आणि रवळनाथाचा पूर्ण चांदीचा, आशीर्वादाचा हात असलेला तरंग! पावणाई देवी आणि विठ्ठलाई देवी यांचे देखणे, हसरे, असे मातेच्या वात्सल्याचे तरंग आणि काळकाई देवीचा मुठीच्या आकारासारखा तटस्थ आणि धीरगंभीर तरंग! आणि त्या पाच तरंगाच्यामध्ये महत्त्वपूर्ण असा ‘बाराचा पूर्वस’ अशा मांडणीचा ज्यावेळी झुलवा सुरू होतो, त्यावेळी ते वातावरण वेगळय़ाच भावभक्तीने भरून गेलेले असते!

‘।। धीं ऽऽ त धीं न्ना धातिन्ना ऽऽ।। तिन्ना तिट तिन्ना ।।’ ही मृदंगावरची वाढत जाणारी थाप आणि त्या तालावर थिरकणारी तरंगांची पाऊले!! हे दृश्यच मुळी नयनांना स्वर्गीय भासते.

आचरे गावची ‘डाळपस्वारी’ बहुदा दर तीन वर्षानी येते. रामेश्वर देवाला कौल लावून संस्थान श्री देव रामेश्वराचे प्रमुख मानकरी मिराशी, कानविंदे, सुखटणकर आदी बारापाच बैठक घेऊन आणि येणा-या अडीअडचणींचा विचार करून डाळपस्वारीचे नियोजन करतात. संस्थानच्या राज ज्योतिषांना (सरजोशी) विचारून डाळपस्वारीचा मुहूर्त निश्चित केला जातो. बहुदा तो माघ शुद्ध पंचमीच्या जवळपासचा असतो. तो मुहूर्त चुकल्यास व काही अडचणी आल्यास पुढील महिन्यातील ‘पंचमी’ जवळचे मुहूर्त निश्चित केले असतात. डाळपस्वारीचा मुहूर्त आणि तारीख निश्चित झाल्यावर ती बातमी क्षणात मुंबईपर्यंत पोहोचते.

कोकणातील बहुसंख्य ग्रामस्थांची कुटुंबे नोकरी- धंद्यानिमित्त मुंबई व इतरत्र स्थायिक झालेली असतात. आपल्या वाडीवर देव कधी येणार या तारखेचा अंदाज बांधून रेल्वे, आराम बस, एस. टी. याची आरक्षणे होऊ लागतात. आपल्या ग्रामदेवतांचे तरंग, आपल्या इतर देवांसमवेत आपल्या वाडीवर आपल्या घरी, आपल्या दारी येत आहेत. या सुवार्तेनेच त्यांच्याही अंगात ‘डाळपस्वारी’ संचारते आणि त्यांचे पाय गावी वळतात.

आच-याच्या एकूण बारा वाडय़ा देऊळवाडी, वरची चावडी, भंडारवाडी, बौद्धवाडी, काझीवाडा, गाऊडवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्ले, नागोचीवाडी, पारवाडी, आणि डोंगरेवाडी! या बारा वाडीत ‘डोंगरेवाडी’ सोडून इतर वाडीत रामेश्वर देवस्थानची शाही डाळपस्वारी जाते. बहुधा पूर्वीच्या काळी ‘डोंगरेवाडी’ भागात माणसांचे वास्तव्य नसल्याने व तेथे संस्थान आचरेचे देवस्थान डाळपाचे स्थान नसल्यामुळे त्या ठिकाणी डाळपस्वारीसाठी देव जात नसावेत असे वाटते. तेथील भक्त पारवाडी व रामेश्वर मंदिर येथे आपल्या तळय़ा ठेवतात.

डाळपस्वारीचा मुहूर्त ठरल्यावर ज्या वाडीवर, ज्या रस्त्याने देवाचे आगमन होणार ते रस्ते श्रमदानाने डागडुजी केले जातात, स्वच्छ केले जातात. त्यासाठी गावकरी लोक सढळ हस्ते तनाची आणि धनाची देखील मदत करतात. आपले ग्रामदैवत, आपले ग्राम, त्यावरील प्रेम कित्येक लाखांची कामे श्रमदानाने करून जाते. रस्त्यावरून देव जाणार म्हणून कमानी, तोरणे उभारली जातात. रांगोळय़ांचे सडे पडतात. आसमंत धूप-दीपमय होऊन जातो. मलयगिरीचा चंदन गंध पायवाटांना देखील येतो की ज्या पायवाटांना देवांची पावले लागतात.

देवांसोबत आलेल्या भाविकांसाठी वाडीवाडीवर महाप्रसाद, चहापान, गूळ-पाणी आदींची व्यवस्था मोफत केली जाते. प्रामुख्याने बाग जामडुल, आचरे हिर्लेवाडी, आचरे पारवाडी येथे मोठय़ा प्रमाणावर भाविकांना महाप्रसाद तर असतोच; पण संपूर्ण डाळपस्वारीत दर अर्ध्या-अर्ध्या किलोमीटरवरही ‘खानपानाची’ सोय समस्त भाविकांसाठी विनामूल्य केली जाते. हे सर्व गावक-यांनी आपल्याच गावक-यांसाठी केलेले! माणसातच ‘देव’ मानला जातो तो हा असा.

देव डाळपस्वारीला निघण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ज्याला अक्षरश: संधिकाल म्हणतात, अगर मालवणी भाषेत ‘कातरवेळ’ असेही संबोधतात. अशा वेळी रामेश्वर देवस्थानचे ‘देवतरंग’ त्याच्या जवळच असलेल्या गणपती मंदिराच्या पुढील बाजूस जाऊन गावरहाटीप्रमाणे चौ-याऐंशी खेडय़ांचा अधिपती ‘बाराचा पूर्वस’ आणतात. त्या ठिकाणी एका कांबळय़ावर नारळ ठेवून गाऱ्हाणी होतात. त्यावेळचे वातावरण तर बरेच गंभीर आणि गूढ झालेले असते. मृदंगांची वाढत जाणारी थाप आणि अवसरांचे सुरू होणारे जाप (गाऱ्हाणी) यांनी थोरा मोठय़ांचा अंगलाही ‘कंप’ सुटू लागतो. पूर्वी आमच्या बालपणी घरातील वडीलधारी माणसे हा सोहळा पाहण्यास आम्ही घाबरू म्हणून आम्हाला नेणे टाळायचे. अलीकडे छोटय़ा मुलांची आणि स्त्रियांची हा सोहळा पाहतानाची वाढलेली गर्दी आणि खेचाखेची पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. असो, कालाय तस्मै नम:।

बाराचा पूर्वसाची घडी प्रथम मानाच्या मिराशी (वरर्शिलीच्या) मानक-याकडे दिली जाते. ती घडी तो घट्ट छातीशी धरून पाच तरंगातच विलीन होतो. तुतारी निनादित रणशिंगे फुंकली जातात. नौबत झडते, डंका दणाणू लागतो आणि पुन्हा झुलव्याचा पावलांवर एक अनामिक ओढीने देवाचे तरंग रामेश्वर मंदिराकडे प्रयाण करतात. रामेश्वर मंदिरात पूर्व रितीप्रमाणे सर्व गा-हाणी होऊन (त्याला मालवणी भाषेत ‘जापसाल’ असे म्हणतात) देवतरंग तेथेच मंदिरात स्थिरावतात,
त्या रात्रीपुरते!

दुस-या दिवसापासून डाळपस्वारीचा ख-या अर्थाने शुभारंभ! त्यावेळी गावातील सर्व अबालवृद्ध मंदिराकडे जमतात. मात्र बाराचा ‘पूर्वस’ मिराशी मानक-यांकडून घाडीवसाजवळ ‘गाऱ्हाणी’ होऊन हस्तांतरित करण्यात येतो आणि ख-या अर्थाने देवाच्या डाळपस्वारीला सुरुवात होते. त्यावेळी देव आपल्या गावातील सर्व प्रजाजनांसोबत डाळपस्वारीला निघतात. भाविक सर्व रस्ते रांगोळय़ांनी अलंकारीत करतात. ज्या रस्त्याने देवांचे तरंग जाणार आहेत. तेथे दुतर्फा दर्शन घेणा-या भविकांची गर्दी असते. प्रत्येक वाडीवर प्रत्येकाच्या देवाला ठेवायच्या आरती (ज्याला मालवणी भाषेत ‘तळी’ असे म्हणतात) त्या आरतीच्या जागा ठरलेल्या असतात. देवाचे तरंग वरीलप्रमाणे (मालवणी भाषेत आपल्या मानकरी भक्तासमवेत) संवाद साधतात आणि त्यांना आगळेच बळ देतात. सर्व गावात देवाची स्वारी फिरत असताना गिरावळ मंदिर, वरची चावडी, ब्राह्मण मंदिर, गाऊडवाडी, ब्राह्मण मंदिर हिर्लेवाडी आदी ठिकाणी देवांचा मुक्काम त्या गावातील मंदिरात असतो. आपल्या ग्रामदेवतांचे तरंग, शाही थाटाच्या मिरवणुकीचे वातावरणच आणि गावातील सर्व पाच ते सहा हजार स्त्री-पुरुष मुले, माणसे, देवाच्या स्वारीबरोबर अख्खा गाव फिरत आहेत हे आगळे वातावरणचा वेगळा बंधुभाव निर्माण करते.

या डाळपस्वारीतील फुरसाई मंदिरातील प्रमुख डाळप, गिरावळ मंदिराकडील नारळाची रास पोटाळण्याचा प्रसंग, जामडुलमधून पिरावाडीत देवतरंगांचे होडीतून आगमन शिवापूरच्या बांधावरून, माडाच्या झावळीच्या चुडीच्या प्रकाशात देव तरंगाचे त्वेषाने धावत जाऊन भक्तांना भेट देणे, तसेच ठिकठिकाणी देव तरंगांची आनंदी वृत्तीची झुलवा नृत्ये, ही केवळ प्रेक्षणीय नसून दर्शनीयही असतात.

अशा प्रकारे जवळजवळ पाच दिवस प्रत्येक वाडीतील देवस्थानांना भेटी देऊन शेवटच्या रात्री देवाचे तरंग आपल्या प्रजाजनांसोबत मूळ महास्थळी, रामेश्वराच्या पिंडीच्यादर्शनासाठी जातात. त्यावेळी रामेश्वराच्या प्रांगणातील पाषाणी पापडीवरील तरंगाच्या गतिमान फे-या, गोलाकार फिरणारी कमळाचा आकार घेणारी निळी लाल अशी तरंगाची पितांबरे, डोळय़ाची पारणी केव्हाच फेडून जातात. तरंगाच्या आणि पिंडीच्या गळा भेटीचा सोहळा तर मन हेलावून टाकतो. शेवटी श्रद्धा कशाला म्हणायचे आणि ‘अंधश्रद्धा’ म्हणजे काय? हा प्रश्न ज्यावेळी पडतो. त्यावेळी कुणाचेही आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषण न करता गाव विकासासाठी पायाभूत ठरणा-या ‘डाळपस्वारी’सारख्या पारंपरिक दैवी प्रथाही एकविसाव्या विज्ञान शतकातही प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटतात. त्याच भक्तांना धीर देतात. जगण्याचे बळ देतात.

आळंदीची ज्ञानेशाची पालखी आणि देहूची-तुकोबांची पालखी दर आषाढीला पंढरीला जाते. त्यांच्यासोबत ‘थवा वैष्णवांचा’ गात गात नाचत आपलं दु:ख विसरून स्वर्गीय सुखाच्या ओढीने चालत असतो. त्या वैष्णवांच्या चेह-यावरील समाधान आणि आपल्या देवतरंगासोबत सर्व सुख-दु:ख विसरून गावागावात जाणा-या आचरे गावच्या या शिवभक्तांचे मुखकमलावरील समाधान, शेवटी दोन्ही सारखेच!! म्हणूनच आचरे देवस्थानात ‘शैव-वैष्णवांचा’ मिलाफ! वेळोवेळी झालेला आढळतो. हे सर्व पाहण्याचे भाग्य डाळपस्वारीच्याच दिवसात लाभते.

त्या दिवसात देवांसमवेत प्रत्येक वाडीवर प्रत्येकाचे पाय लागतात. सुख-दु:खाची देवाण-घेवाण होते. श्री देव रामेश्वराची ‘अनामिक शक्ती’ भक्ताला आगळे चैतन्य देते. कारण या डाळपस्वारीत देवांचा देव असा रामेश्वर धवल अशा उच्च कैलासावरून पायी त्यांच्या प्रांगणात येऊन भक्तांना शक्ती देत असतो. शिलाच्या चंद्राचे दर्शन भक्तांना देत चारित्र्याचा मार्ग सांगत असतो. ज्ञानाची गंगा मस्तकी धारण करत. संसाराचे सुखामृत पाजत असतो यापेक्षा सुख-सुख ते काय? हा योगायोग दर तीन वर्षानी येतो. ‘त्रिनेत्र जटाधारी मस्तकी वाहती रे गंगा’ असे ज्याचे वर्णन करतात त्या श्री देव रामेश्वराचे आगळे-वेगळे दर्शन या डाळपस्वारीतच दिसते. म्हणूनच डाळपस्वारीचा तो स्वर्गीय सोहळा आणि रामेश्वराच्या भक्तांच्या प्रतीक्षेची आंतरीक ओढ तर ख-या अर्थाने कोणाला अनुभवायची असेल तर आचरे गावची..‘एक तरी ‘डाळपस्वारी’ अनुभवावीच’..


मुलखातले मोरपीस

नमस्कार मंडळी,

मंडळी, आमच्या मुलखात आता कसल्या भाषेचे कसले कसले सूर कानार पडाक लागले आसत. त्यात पुन्हा आमची भाषा आमका बोलाक लाज वाटता. आमच्या मालवणीचो झेंडो नटश्रेष्ठ मच्छिंद्र कांबळीने अटकेपार नेल्यानी याची गजाल तुमका काय सांगाक नको हा.? तुमी कामाची माणसा.. तुमच्या वांगडा बोलाच तर सवड काडूक व्हयी.. मंडळी पण आपल्या गडबडीच्या, धावपळीच्या वाटेवर खयसूनयं मालवणी शब्द कानावर पडलो की, आमच्या मुलखातलो माणूस थबकाकच व्हयो! क्षणभर थांबाक व्हयो.?आमचो मुलुख अतरंगी..?ह्या जसा खरा हा तसाच आमचो मुलुख अनेक रत्नांनी भरलेलो हा. या मुलखातले बोल आजच्या पिढीक कितीसे माहिती हत..??आजची पिढी इंग्रजी शाळेत शिकणारी, गाव कसो आसा ह्यो पिक्चरातच बघणारी..?हकडेचे शब्द त्यांच्या कानावर पडले तरी ते फक्त ऐकत ऱ्हवतत.. त्यांका भाषा गोड वाटता. आपल्या मातीतली वाटता. पण बोलाक येत न्हाय.. आणि समजत सुद्धा नाय. अशा आजच्या पिढीक आपली मालवणी बोली समजाक व्हयी, मालवणीचो झेंडो फडकत -हवाकच व्हयो.

यासाठीच आजपासून कोकणमेव्यात तुमच्यासाठी झणझणीत आणि चमचमीत मालवणी मुलखातली, मालवणी ढंगातली काव्य कलाकृती.. प्रत्येक आठवडय़ाला तुमच्या भेटीला आणत आहोत. ही मालवणी समजून घ्यायला हवी म्हणून सोबतच त्याच शब्दातली मराठी कलाकृती देत आहोत.

कवी दादा मडकईकर म्हणजे मालवणी कवितांची मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचा आबोलेचो वळेसार हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांची रचना आज आपल्यासाठी..


माजो गाव

देवळा फाटला तळा सारयल्ला खळा
वाकडी तिकडे न्हय निडुंगाची वय
दर्याची लाट मळ्ळली वाट
म्हातारी आजी भाजलेले काजी
आडसारा ताजी गरमागरम भजी
म्हंजे माजो गाव म्हंजे माजो खेडेगाव ॥१॥

काळी काळी होडी माडाची माडी
खटारी गाडी बैलाची जोडी
गवताची कुडी भाताची मुडी
मळय़ातलो मांगर बैल मस्त बांगर
म्हंजे माजो गाव म्हंजे माजो खेडेगाव॥२॥

तरंगा आणि अवसार आबोलेचो वळेसार
भजन आणि बारी नाटक दशावतारी
सातेरी रवळनाथ बेताळ भुतनाथ
ढोल आणि ताशे भात आनी माशे
म्हंजे माजो गाव म्हंजे माजो खेडेगाव॥३॥

पिंपळाचो पार न्हय हिरवी गार
न्हयतलो जुवो बगळय़ांचो थवो
खार खार वारो काजीसो सोरो
फणस रसाळ कापो शेणाचो थापो
डोंगरावैलो सडा म्हशी फाटलो रेडो
म्हंजे माजो गाव म्हंजे माजो खेडेगाव॥४॥
           (राग : केदार)


माझा खेडेगाव

सारवलेले अंगण-देवळामागील तलाव
वेडी वाकडी नदी-निवडुंगाचे कुंपण
दर्याची लाट-मळलेली वाट
म्हातारी आजी-भाजलेले काजू
शहाळी ताजी-गरमागरम भजी
म्हणजे माझा गाव माझा खेडे गाव॥१॥

तेरेखोलची खाडी-उलांडय़ाची होडी
माशाची उडी-माडाची वाडी
खटारी गाडी-आंगणेवाडी
कुडय़ाची विडी-आजोबांची गुडगुडी
म्हणजे माझा गाव माझा खेडेगाव ॥२॥

शेतातला मांगर-बैल मस्त बांगर
तरंगे आणि अवसर-आबोलीचा वळेसर
नाटक दशावतारी-भजन डबलबारी
ढोल आणि ताशे-भात आणि माशे
म्हणजे माझा गाव माझा खेडे गाव॥३॥

पिंपळाचा पार-नदि हिरवी गार
नदीतली बेट-बगळय़ांचा थवा
खार खार वारा-काजूची फेणी
फणस रसाळ कापा-शेणाचा थापा
डोंगरावरील सडा-म्हैशी मागील रेडा
म्हणजे माझा गाव माझा खेडे गाव॥४॥
-दादा मडकईकर

1 COMMENT

Leave a Reply to Prasad sukhathankar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version