Home कोलाज ऐसा महिमा प्रेमाचा

ऐसा महिमा प्रेमाचा

2

माणसांना एकमेकांविषयी, इतर प्राण्यांविषयी, वस्तूविषयी, एखाद्या विषयाबद्दल वाटणारी आस्था, ओढ, आपलेपणा, माया या भावना म्हणजे प्रेम!

माणसांना एकमेकांविषयी, इतर प्राण्यांविषयी, वस्तूविषयी, एखाद्या विषयाबद्दल वाटणारी आस्था, ओढ, आपलेपणा, माया या भावना म्हणजे प्रेम! प्रेमाची अगदी सोपी व्याख्या अशी करता येईल.  अगदी लहान असल्यापासून प्रेमाची विविध रूपं, विविध छटा आपण बघत असतो. कुशीत घेतलेल्या बाळाकडे मायेनं बघणारी आई, त्याचे लाड करणारी आजी, राग आला तरी तो आवरणारे आजोबा अशा प्रेमाच्या छटा छोटय़ा बाळालाही समजतात. एकमेकांची वाट बघणारे, एकमेकांच्या साथीनं प्रवास करणारे, मदत करणारे प्राणी पक्षी आपण निसर्गात बघतो. हे विविध प्रकारे व्यक्त झालेलं इतरांबद्दल, जोडीदाराबद्दलच, पिलांविषयीचं त्यांचं प्रेमच.

थोडक्यात प्रेम ही सजीव प्राण्यांची नसर्गिक गोष्ट आहे. प्रेम शब्दाशिवायही समजत. स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम, नजरेतून व्यक्त होणारं प्रेम आपल्याला माहिती आहे. इतर प्राण्यांपेक्षा अधिक प्रगत मेंदू असलेल्या मानवाला तर ते बोलण्यातून, लेखनातूनही व्यक्त करता येतं. अगदी छोटय़ा छोटय़ा कृतीतूनही प्रेमाची भावना व्यक्त करता येते, पण प्रेम व्यक्त करणं, त्या प्रेमाच्या बदल्यात काही अपेक्षा बाळगणं, प्रेमात काही गोष्टी गृहित धरणं अशा बारीकसारीक गोष्टी या प्रेमातच सामावलेल्या असतात. त्यांचा परिणाम मात्र मोठा असू शकतो, नकारात्मकही असू शकतो. म्हणूनच प्रेमाची व्याख्या वरवर अगदी सोपी वाटत असली तरी त्यात व्यक्त झालेल्या भावनांमुळे, त्या भावनेच्या भरात होणा-या अनेक कृत्यांमुळे प्रेम काही सोपं आहे, असं म्हणणार कुणी दिसत नाही. प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतंच तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, याची जाणीव वास्तवात वावरणा-या मनात असते. प्रेमाच्या व्याख्येत त्यामुळे जरा क्लिष्टता आली आहे.

दोन व्यक्तींना एकमेकांविषयी वाटणारे शारीर पातळीवरचे आकर्षण हेसुद्धा प्रेमच. जगाचा इतिहास पाहिला तर अनेक युद्धे, सत्तापालट, दंगली अशा अनेक दु:ख देणा-या वा विनाशकारी घटनांच्या मुळाशी प्रेम ही भावना होती असं जाणवेल. या सदरातून प्रेमाच्या विविध छटा, विविध अर्थ, विविध रूपं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भूकंप, वेळ वा थंडी मोजतात तसं भावना मोजण्याकरता कुठलंच एकक नाही, पण मोजता येत नाही म्हणून प्रेमाचं अस्तित्व नाकारता येत नाही. इतर प्राण्यांसारखंच माणसाच्या विशिष्ट प्रकारच्या वागण्याच्या मुळाशी प्रेम ही भावना असते, असं आढळलं आहे. इतर कोणत्याही भावनेप्रमाणे प्रेमाच्या तीव्रतेचा फक्त अंदाज करता येतो. मग एखाद्या व्यक्तीचं प्रेम जास्त आहे वा कमी आहे हे कसं ठरतं? त्याला काही नियम आहेत का? थोडक्यात सांगायचं तर वजनदार व्यक्तीचे वा खूप उंच व्यक्तीने केलेलं प्रेमही खूप असेल असासुद्धा नियम नाही! प्रेम या एका भावनेतून काही अनुभव येतात, काही कृती घडतात. कधीकधी कुणाचा राग येतो. कधी एखादीचा मत्सर वाटतो. काही वेळा एखाद्या घटनेचं जास्त दु:ख वाटत राहतं. थोडक्यात माझं अमूक एका व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून मला काही इतर व्यक्तीचा राग वा मत्सर वाटू लागतो. हा राग वा मत्सर ही स्वतंत्र भावना म्हणून मी त्याकड पाहत नाही. उलट प्रेम सफल होणार नाही, या शंकेतून ते जन्म घेतात असा विचार माझ्या डोक्यात घर करतो. त्यात थोडं तथ्य आहेच. म्हणजे माझ्याकडून घडलेली त्यापुढील एखादी चुकीची कृती की फक्त राग वा मत्सर यामुळे नाही तर प्रामुख्याने प्रेमामुळे घडली असं म्हणता येईल. प्रेम ही भावना मुळाशी धरून आपण इतर दूषित भावनांनी डवरलेला वृक्ष वाढवत नेत असतो, हे कधी मनात येत का? सोप्या प्रेमातली गुंतागुंत याच कारणाने वाढली आहे, यात शंका नाही.

या गुंतागुंतीचा एक पदर आहे-तो म्हणजे किती प्रेम आहे, ते कमी आहे की जास्त आहे याचा निर्णय!   कोणत्याही एककात प्रेम मोजता येत नाही मग दुस-या कुणाला ते कमी आहे की जास्त आहे ते कसं ठरवता येतं? ते त्यानं का ठरवायचं? ते माणसागणिक वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  एखाद्या माणसाची उंची सहा फूट असेल तर ती कोणत्याही देशात सहा फूटच राहील. उंची कुणीही मोजली तरी त्याची उंची कायम राहील. जे प्रेम अशा एककात मोजताच येत नाही त्याचा आधार कसा घ्यायचा? मोजता न येणारं प्रेम कमी-जास्त होत असं घडण शक्य आहे का?  प्रेम हे एक फिलिंग आहे! ते फिलिंग त्या त्या व्यक्तीकरता लागू अथवा गरलागू आहे. त्याचा अंदाज दुसरी व्यक्ती बांधू शकते, पण तो बरोबर येईलच याची खात्री नाही. म्हणूनच लागणारे पुरावे वा कृती यावर जास्त भर द्यावा लागेल. त्या आहेत प्रेमाच्या गोष्टी!

प्रेम असा शब्द मनात आला की प्रश्नांची कारंजी उडतात!  काळ बदलला तसं प्रेम बदललं आहे का? आधुनिक प्रेम आणि ऐतिहसिक प्रेम वेगळं आहे का? समोर असलेलं प्रेम आपल्याला ओळखता आलं नाही, असं होऊ शकत का? कितीदा प्रेमात पडता येतं?  सोपी व्याख्या असलेलं प्रेम करणं मात्र सोपं काम नाही, असं का बरं म्हणायचं? एकमेकांवर जीवापाड प्रेम करणा-या दोन व्यक्तींना कधी तुमचं प्रेम आहे, यावर माझा विश्वास नाही असं वाक्य तुम्ही ऐकवलं आहे का? प्रेमामुळे माणसं अधिक स्वार्थी होतात का, प्रेमानं एखाद्याचं आयुष्य उजळून निघत असं तुम्हाला वाटत का? अशा अनेक प्रश्नाची उत्तरं आपण प्रेमाच्या विविध गोष्टींतून शोधू या!

2 COMMENTS

Leave a Reply to Shubhangi bhargave Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version