Home कोलाज कुणीही हिरावू न शकणारी संपत्ती

कुणीही हिरावू न शकणारी संपत्ती

1

पुढील खोलीत डोकावलो आणि जडवत तिथेच उभा राहिलो. समोरच खुर्चीवर स्वत: बिसमिल्लाखाँ बसले होते. चेह-यावर वार्धक्याचा थकवा. तब्येतही बरी नसावी. त्या खोलीत अगदी एकटे बसलेल्या खाँसाहेबांकडे, स्वप्नातही विचार केला नव्हता इतक्या जवळून मी टक लावून पाहत होतो. एका अनामिक ओढीनं मी पुढे झालो, क्षणाचाही वेळ न घालवता त्यांच्या पायावर अक्षरश: लोटांगण घातलं. अत्यानंदानं माझे डोळे पाणावले. माझ्या अनपेक्षित कृतीनं ते गांगरून गेले असावेत. त्यांनी मला दूर लोटलं.

इंदूरस्थ सुप्रसिद्ध गायिका शोभा चौधरी आणि मी, रंगमंचावर एक आगळावेगळा प्रयोग सादर करायचो. जुन्या नाटकांतील नाटयगीतं शोभाजी अप्रतिम गायच्या. दोन गीतांमध्ये मी कथाकथनात्मक निवेदन करायचो. सहा-आठ मिनिटाचं त्यांचं गाणं आणि मधे चार-पाच मिनिटांची माझी लघुत्तम कथा, जोडीला कविता, एखादा किस्सा किंवा पुढील गीताबद्दल भूमिका बांधणारं हे निवेदन दोन तासांच्या या कार्यक्रमाचा आलेख तयार करताना शोभाजींच्या सुरांना माझ्या शब्दांचं ओझं होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली होती. शोभाजींनी स्वत: हवेहवेसे बदल करून माझ्याकडून एक आदर्श आलेख तयार करून घेतला होता.

एका शनिवारी माझ्या आतेभावाच्या ओळखीनं आमचा एक प्रयोग कल्याणला ठरला. प्रख्यात संगीतज्ज्ञ पंडित चंद्रकांत वझे यांच्या संगीत मंडळाच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने आम्ही हा प्रयोग सादर केला. श्रोते रसिक होते. शोभाजींची नाटयगीतं तर त्यांनी उचलून धरलीच, पण माझ्या निवेदनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे पंडित वझ्यांनी मंचावर येऊन शोभाजींच्या पाठीवर हात फिरवला, माझं कौतुक केलं. मोठय़ा समाधानात आम्ही मंचावरून उतरलो.
कार्यक्रमानंतर चहापानाला जमलेल्या मंडळींतून एकाने विचारलं,
‘‘उद्या येता का बिस्मिल्लाखानची शहनाई ऐकायला?’’
‘‘उद्या?’’ मी अक्षरश: किंचाळलो, ‘‘कुठे आहे कार्यक्रम?’’
‘‘षण्मुखानंदला, सकाळी करेक्ट दहा वाजता.’’
‘‘पण वेळेवर तिकीट मिळेल का?’’
‘‘काय तुम्ही तारेसाहेब? आमच्यासारखे संगीताचे सेवक असताना तुम्हाला तिकीट लागतंय होय? उद्या बरोबर साडेनऊला तिथे पोहोचून कुणालाही नाना पाटील विचारा. दोन मिनिटांत आत नेऊन बसवतो तुम्हाला.’’
‘‘ठीक आहे, मी आतेभावाला विचारून सांगतो.’’
‘‘आता कुणाला काही विचारू नका अन् सांगू नका. दहा ते बारा मस्त सनई ऐका. साडेबाराला माटुंगा स्टेशनला या. एक दक्षिण भारतीय खाणावळ आहे स्टेशनाबाहेर. तिथला अण्णाही दोस्त आहे आपला. दाबून रसम, सांबार-भात ओरपा आणि मग या नाना पाटीलला आठवा.’’
खाँसाहेबांची सनई अन् पाठोपाठ थेट दक्षिण भारतीय सांबार भात? मी तरंगतच आतेभावाच्या घरी पोहोचलो. जेवताना पुढील दिवसांचा कार्यक्रम सांगितला. चंदूभाऊ बोलला, ‘‘बघ रे बाबा, कोण हा नाना पाटील, कल्याणला नवीनच राहायला आलाय. आम्ही कुणी फारसं ओळखत नाही त्याला.’’
‘‘ठीक आहे यार, खुर्चीवर नाही तर सतरंजीवर, लादीवर बिस्मिल्लाखानची शहनाई प्रत्यक्ष ऐकायला तर मिळेल.’’

षण्मुखानंदला सकाळी साडेनऊनला पोहोचायचं म्हणजे कल्याणहून आठच्या आत निघणं गरजेचं होतं. रविवारी सायंकाळी शोभाजींच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम पुण्याला असल्याने त्यांनी रात्रीच ‘मला सकाळी लवकर उठवू नकोस. पुरेशी झोप झाली नाही तर आवाजावर परिणाम होतो’, अशी तंबी दिल्याने मी एकटाच निघालो. लोकलने कल्याण ते माटुंगा, पुढे टॅक्सी असं मजल-दरमजल करत नऊ चाळीसला घामाघूम होत हॉलवर पोहोचलो. भरपूर गर्दी होती. बाहेर बोर्डावर खाँसाहेबांचं, सनई वाजवीत असलेलं मोठं पोर्टेट आणि.. आणि मी वेडाच झालो आनंदानं.

शेजारी किशन महाराजांचं चित्र. खाली वळणदार सोनेरी अक्षरांत दोघांची नावं. आज बिस्मिल्लाखान आणि किशन महाराज बरोबर ऐकायला मिळणार? माझ्या नशिबावर माझाच विश्वास बसेना. मग मी अजिबात वेळ घालवला नाही. दारावर उभ्या माणसाला ‘नाना पाटील कुठे भेटतील?’ विचारलं. त्याने खांदे उडवले. मी मागे वळलो. सुटातील एक व्यक्ती घाईघाईनं इकडे तिकडे फिरत होती, त्यांना मी नाना पाटलांबद्दल मराठीत विचारलं, तर त्यांनी मला, ‘उस ऑफिस मे पूछो’ असा सल्ला राष्ट्रभाषेत दिला. तो सल्ला शिरोधार्थ मानत मी ऑफिसमध्ये ‘का हो, नाना पाटील इथंच भेटतात ना?’ असं अजीजीनं विचारलं, तर पोट पुढे आलेल्या एका माणसानं उद्धटपणे ‘आय डोन्ट नो, आस्क समबडी एल्स’ असं आंतरराष्ट्रीय भाषेत दटावलं. ‘महाराष्ट्राच्या राजधानीत, मराठी बोलणा-याला अशीच उद्धट वागणूक दिली जाते’, अशी निश्चित खूणगाठ मी त्या क्षणाला मनाशी बांधली. वेळ टळत होती आणि नाना पाटील नावाचा एक धूर्त माणूस, ‘जणू जन्मालाच आला नाही’ असा दडून बसला होता.
दहा वाजले आणि माझा धीर सुटला. कुणा मंत्र्याची वाट पाहत असल्याने कार्यक्रम सुरू झाला नव्हता, पण हॉल तुडुंब भरलेला दिसत होता. आता वेळ घालवणं मूर्खपणाचं होतं. मी एखादं तिकीट मिळू शकतं का हे शोधू लागलो, तर कुणीतरी मला तिकिटाचे तीन हजार रुपये सांगितले. ऐकूनच मी निराश झालो.
खाँसाहेबांचा मी किती जरी कट्टर चहेता असलो तरी हा आकडा मला परवडणारा नव्हता. शेवटी नाईलाज म्हणून नाना पाटलांच्या शोधात मी हॉलच्या डावीकडून हळूहळू स्टेजच्या मागे गेलो.

एका ग्रीनरूममध्ये डोकावून पाहिलं तर दोन-चार मंडळी चहा पीत उभी होती. त्यात नाना पाटील नव्हता. पुढील खोलीत डोकावलो आणि जडवत तिथेच उभा राहिलो. समोरच खुर्चीवर स्वत: बिसमिल्लाखाँ बसले होते. चेह-यावर वार्धक्याचा थकवा. तब्येतही बरी नसावी. त्या खोलीत अगदी एकटे बसलेल्या खाँसाहेबांकडे, स्वप्नातही विचार केला नव्हता इतक्या जवळून मी टक लावून पाहत होतो. एका अनामिक ओढीनं मी पुढे झालो, क्षणाचाही वेळ न घालवता त्यांच्या पायावर अक्षरश: लोटांगण घातलं. अत्यानंदानं माझे डोळे पाणावले. माझ्या अनपेक्षित कृतीनं ते गांगरून गेले असावेत. त्यांनी मला दूर लोटलं.
‘‘दूर हटो, हटो मेरे पैर पकडने के लिये मै कोई खुदा हँू?’’ त्यांचा नाराज स्वर मला जाणवला. मी डोळे पुसले. त्यांच्या पायाशी बसत अत्यंत आदराने म्हणालो,
‘‘उस्तादजी, खुदा तो नही, मगर आप खुदा से कम भी नही.’’
‘‘लाहौल बिलाकुवत, काय माणूस आहे? कुणी आत येऊ दिलं तुला?’’
‘‘किस्मत खींच लायी. आपल्याला भेटायची तमन्ना कितीतरी वर्षापासूनच उराशी बाळगून होतो. आज आपल्या चरणांना स्पर्श केला. साता जन्माची पुण्याई कामास आल्याचं जाणवलं.’’
‘‘बहुत बातुनी लगते हो.’’ त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आलं. ‘‘कुठून आलास?’’
‘‘इंदूरहून.’’
‘‘मुंबई फिरायला आलास?’’
‘‘जवळच माझा कार्यक्रम.. नाही नाही फिरायलाच आलो.’’ मी शब्द फिरवले. त्यांच्यासमोर माझ्या कार्यक्रमाबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं होतं.
‘‘आपका इंदौर बडे कलाकारों का शहर है भाई, कुमारजींच्या आग्रहावरून आलो होतो. खूप पूर्वी.’’
‘‘हो मला वाटतं पंधरा वर्षे झाली असावीत. मी आहे साक्षीदार त्या मैफलीचा.’’
‘‘फार व्यवस्थित आहेत लोक तुमच्या इंदूरचे. इस बंबई मे तो लाहौल बिलाकुवत, एक मिनिस्टर के पिछे मुझ जैसे बुढे को लटका रखा है.’’
‘‘आते ही होंगे’’ मी सावरलं. मुंबईकरता काही वाकडं ऐकून घेणा-यांपैकी मी नव्हतो.
‘‘उस्तादजी, आज तुमच्याबरोबर किशन महाराज म्हणजे पर्वणीच आम्हाला.’’
‘‘तो आला म्हणून तर आलो मी. बनारस मे तो एक हिंदू किसी मुसलमान की संगत कर रहा होता तो दंगे भडक जाते भाई.’’
‘‘खाँसाब, वर्षोनुवर्ष तुमच्या सनईच्या सुरांनी जाग आलीय आमच्या पिढीला. आकाशवाणीवरील तुमची सनई ऐकू आल्याशिवाय सूर्यही चढायचा नाही क्षितिजावर.’’
‘‘हा. इन रेडियोवालोंने तो मुझे मुर्गा बना रखा है. अलसुबह सुबह बांग देना पडती है.’ ते खळखळून हसले. वातावरण मोकळं झालं. पाच-सात मिनिटं इतर गप्पा झाल्या. दोन कार्यकर्ते तेवढयात खाँसाहेबांना न्यायला आत आले. हात जोडून त्यांना स्टेजवर चलण्याची विनंती करू लागले. बसलेल्या खुर्चीवर जोर देत, उभं राहायचा खाँसाहेबांनी प्रयत्न केला. मी पटकन उठलो, त्यांना आधार दिला. एक हात त्यांनी माझ्या खांद्यावर ठेवला, व्यवस्थित उभे राहून कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले,
‘‘ये हमारे खास महेमान है, माझ्या समोर यांना व्यवस्थित जागा द्या, संपूर्ण वेळ हे मला नजरेसमोर दिसले पाहिजेत.’’

खाँसाहेबांच्या स्पर्शात अन् स्नेहात न्हात, त्यांच्या स्वागतातील टाळ्यांच्या कडकडाटांत षण्मुखानंदच्या त्या रसिक श्रोतूवर्गासमोर मी त्यांना स्टेजवर आणून सोडलं. पहिल्या रांगेत सोफ्यावर बसून, दीड-पावणे दोन तास स्वरांच्या स्नेहल धारेत मी चिंब चिंब भिजत होतो. शब्दांत न मावणारा आनंद हृदयात साठवत मी हॉलबाहेर पडलो.आजही हे सगळं आठवतं, तेव्हा माझ्या नशिबाच्या मलाच अभिमान वाटतो. आयुष्यभर साथ देणारा खाँसाहेबांचा स्पर्श आणि हृदयात जपून ठेवलेले त्यांच्या सनईचे सूर ही कुणीही हिरावू न शकणारी संपत्ती आज माझ्याजवळ साठवलेली आहे.

1 COMMENT

  1. लेख खूप आवडला. तुम्ही षण्मुखानंद ला जाने हि तुमची भाग्यरेखा होती.
    साक्षात देवाचा तुमच्यावर हात होता. म्हणूनच तुम्हाला तो सोनेरी क्षण अन्भावायला मिळाला.

Leave a Reply to Rahul Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version