Home एक्सक्लूसीव्ह ‘केईएम’मध्ये यापुढे सर्व वैद्यकीय चाचण्या

‘केईएम’मध्ये यापुढे सर्व वैद्यकीय चाचण्या

1

केईएम रुग्णालयात यापुढे रुग्णांबाबतच्या वैद्यकीय चाचण्या खासगी प्रयोगशाळेत पाठवणा-या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

मुंबई – केईएम रुग्णालयात यापुढे रुग्णांबाबतच्या वैद्यकीय चाचण्या खासगी प्रयोगशाळेत पाठवणा-या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या चाचण्या रुग्णालयात उपलब्ध आहेत, त्या चाचण्यांकरिता रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत पाठवणा-या डॉक्टरांवर कारवाई केली जाणार आहे.

पहिल्यांदाच अशा प्रकारची कठोर भूमिका घेण्यात आली असल्याचे रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. पारकर यांनी सांगितले. केईएममध्ये येणा-या रुग्णांना वैद्यकीय चाचण्या नेमक्या कुठे केल्या जातात, याबाबतची माहिती नसते. परिणामी रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांचा सल्ला घेऊन चाचण्याकरिता खासगी प्रयोगशाळेत जातात. त्यांना खासगी प्रयोगशाळेत तिप्पट रक्कम मोजावी लागते.

विशेष म्हणजे रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागाचे डॉ. खंडेलवाल यांच्या विरोधात रुग्णांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्वाची दखल घेऊन यापुढे रुग्णांना वैद्यकीय चाचण्याकरिता खासगी प्रयोगशाळेत पाठवूच नये, असा पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.

याबाबत बुधवारी परिपत्रकही काढण्यात आले आहे. जे डॉक्टर रुग्णांना वैद्यकीय तपासण्यांकरता खासगी प्रयोगशाळेत पाठवतील, अशा डॉक्टरांवरच कारवाई केली जाईल. रुग्णालय प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाचे पालन करणे हे सर्व डॉक्टरांचे आद्य कर्तव्य असणार आहे, असे डॉ. पारकर यांनी सांगितले.

रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत वैद्यकीय चाचण्यांकरता पाठवल्यास त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात. तक्रारीची दखल घेऊन तत्काळ डॉक्टरवर कारवाई केली जाईल. क्वचितच रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांकरता माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात पाठवले जाते. मध्यवर्ती प्रयोगशाळेत बहुतांश वैद्यकीय चाचण्या केल्या जातात.

दरम्यान, डॉ. खंडेलवाल यांच्या विरोधात चौकशी सुरू असल्याने त्यांचा पदभार डॉ. मोहंती यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच डॉ. खंडेलवाल प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही रुग्ण स्वत:हून माहिती देण्याकरता पुढे येत असल्याचेही डॉ. पारकर यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

Leave a Reply to prashant Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version