Home मजेत मस्त तंदुरुस्त दिवाळी फराळ आणि आरोग्य संबंध

दिवाळी फराळ आणि आरोग्य संबंध

1

दिवाळीचा फराळ चविष्ट खरा, परंतु त्यात आरोग्यदायी पदार्थाचा वापर नसेल तर असा फराळ आरोग्यासाठी नक्कीच चांगला नाही. तळलेले पदार्थ त्यातही ते मैदा-साखरेचे बनवलेले असतील तर हा फराळ खाऊन आरोग्य सुधारण्याऐवजी ते बिघडण्याचीच पाळी येईल. दिवाळी फराळाला आपल्याकडे कित्येक शतकांची परंपरा आहे, पण त्यावेळचा फराळ आरोग्यसंपन्न होता. आता बनवला जाणारा फराळ कितपत पौष्टिक आहे याचा विचार करूनच त्यावर ताव मारा.

दिवाळी हा जसा दिव्यांचा-रोषणाईचा सण आहे तसाच तो सुप्रसिद्ध आहे फराळासाठी! रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकारांचे, विविध रंगारूपांचे एकाहून एक सरस असे जिभेला लालसावणारे फराळाचे पदार्थ हे आपल्या दिवाळसणाचं वैशिष्टयच म्हणायला हवं. दिवाळी जवळ येऊ लागल्याचं समजतं ते घराघरांमधून दरवळणा-या, नाकाला असीम आनंद देणा-या रुचकर सुगंधांनी! मुळात दिवाळसण हा अश्विन महिन्यात येतो, जो निसर्गसौंदर्याच्या आविष्काराचा आणि धान्याच्या संपन्नतेचा काळ असतो. धान्य चांगलं उत्पन्न झाल्याने धनाचीही प्राप्ती होणार असते, एकंदरीतच या वेळी धनधान्याचा सुकाळ असतो. साहजिकच सगळीकडे आनंदीआनंद असतो. हे धान्य मिळवण्यासाठी ज्याला हे काबाडकष्ट करावे लागले तो शेतकरी या मागच्या चार महिन्यांतल्या पर्जन्यकाळामधील कृषिकामाने थकून गेलेला असतो आणि आता त्या कष्टाचा आनंद घेण्यासाठी आतुर झालेला असतो. ही आहे पार्श्वभूमी दिवाळसणामध्ये पौष्टिक गोडधोड खाण्याची. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही विचार करता हा विसर्गकाळ आहे. निसर्गात होणारे बदल शरीरबल वाढवण्यास पोषक ठरतात. निसर्गातील त्या सकारात्मक बदलांना पौष्टिक आहाराने अधिकच बलदायक बनवण्याचा सण म्हणजे दिवाळी, जो मुख्यत्वे थंडीमध्ये येतो. मुबलक अन्न उपलब्ध असताना शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा विचार मानवाने प्राण्यांच्या निरीक्षणातूनच केला असावा. अन्न उपलब्ध आहे तेव्हा शरीरामध्ये त्या अन्नाचा (तत्जन्य चरबीचा) पुरेसा साठा करून ठेवायचा, जेणेकरून नंतर उन्हाळ्यामध्ये अन्नाचे दुíभक्ष होईल, तेव्हा त्या साठवलेल्या चरबीच्या साठयावर शरीराला गुजराण करता येईल, हा त्या अतिमात्रेमध्ये पौष्टिक अन्नसेवनाचा मूळ हेतू, जो नसíगक अवस्थेमधील प्राण्यांनी आजही अवलंबलेला दिसतो. निसर्गावर संपूर्णत: अवलंबून असलेल्या, कृषीआधारित जीवन असलेल्या मानवालाही या संकटाचा सामना काही प्रमाणात करावा लागत होता व त्यातूनच दिवाळीसारख्या अधिक ऊर्जा पुरवणा-या पौष्टिक आहाराची सांगड दिवाळी फराळाशी घातली गेली, जेणेकरून पुढे येणारा ग्रीष्मातला उन्हाळा आणि वर्षातला पावसाळा या अन्नाचा सुकाळ नसणा-या व आरोग्य दुर्बल होणा-या काळामध्ये शरीर तगून राहावं.

‘शरीर निरोगी करणे’ या विचाराने या सण-उत्सवादी योजना आपल्या चतुर पूर्वजांनी केल्या आहेत. त्यामुळे दिवाळी हा पूर्वापार चालत आलेला सण आहे हे निश्चित. अनेक पौराणिक कथांवरून हे सिद्ध होतंच. पण दिवाळीच्या सणाचा इतिहास पुराणकाळाच्याही मागे जाऊन पोहोचतो. उपनिषदकाळामधील गृहसंस्कारातल्या ‘पार्वण, आश्वयुजी व आग्रयण’ या पाकयज्ञांचं एकीकरण व रूपांतर होऊन आपण ज्याला दीपावली म्हणतो, तो उत्सव अस्तित्वात आला असावा, असं प्रसिद्ध वेदाभ्यासक ‘ऋग्वेदी’ म्हणतात. या पाकयज्ञांमध्ये नवीन धान्याची खीर, नवीन भातांचे पोहे वा पोह्यांचा गोड पदार्थ अशी मिष्टान्नं बनवली जायची. प्रत्यक्षात आज आपण जो फराळ बनवतो, त्या फराळामधील विविध खाद्यपदार्थाचे उल्लेख ज्या क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल आदी पाकशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये सापडतात, ते साधारण अकराव्या शतकात रचलेले ग्रंथ आहेत. सुप्रसिद्ध जगप्रवासी आल्बेरुनीच्या अकराव्या शतकातील भारतदर्शनामध्ये दिवाळीमधील उत्सवाचं वर्णन आहेच, जे आपल्या दिवाळ फराळाची निदान एक वर्षाची परंपरा सिद्ध करतं. या प्राचीन ग्रंथांमध्ये दिवाळी फराळाला बनवले जाणारे खाद्यपदार्थ आहेत पुढीलप्रमाणे: अपूप (अप्पे/घारगे), शालिपूप (अनारसे), शंखपाला (शंकरपाळे), सम्पाव (सारोटी), मधुशीर्षक (खाजे), शष्कुली(करंजी), चणकपुरीका (बेसनाच्या तिखट पु-या),मुद्गलड्ड (मुगाचे लाडू), सेविका (शेवया), चक्रिका (चकली) वगरे-वगरे! या खाद्यपदार्थाची नुसती यादी वाचली तरी आपल्या आहारपरंपरेची संपन्नता ध्यानात येते आणि बर्गर-पिझ्झा अशा अर्धवट पदार्थाचं कौतुक करणा-यांची कीव येते. पाश्चात्त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे एक प्रदीर्घ आहार परंपरा आहे. दिवाळीचा फराळ हे त्या आहार परंपरेचं-पाककलेचं कौशल्य आहे, ते येरागबाळीचं काम नाही. तुमच्या विशीपंचविशीच्या सुनेला वळीदार खुसखुशीत करंज्या बनवता येतात का नाही, हा एक पाककौशल्याचा भाग होता. आपली पाककलेची परंपरा सुदृढ ठेवण्यामध्ये अशा प्रकारे दिवाळी फराळ मोठीच भूमिका बजावत होता. दुर्दैवाने आज नाही कोणाला त्या पाककलेचं सोयर, नाही ती आहार परंपरा जिवंत ठेवण्याचं सूतक!

सोळाव्या-सतराव्या शतकाच्या आसपास विविध प्रदेशांच्या सफरीवर व्यापाराच्या उद्देशाने निघणारे युरोपियन्स आपल्यासोबत जे पदार्थ घ्यायचे त्यातले प्रमुख पदार्थ म्हणजे पांढरी साखर, पांढरे पीठ (मैदा) व पॉलिश केलेला पांढरा तांदूळ. या गोड-दाणेदार-स्वच्छ साखरेची व मुलायम मैद्याची संपूर्ण जगाला हळूहळू अशी काही भुरळ पडली की, एकोणिसाव्या शतकापर्यंत मैद्याचे व साखरेचे पदार्थ खाणं ही केवळ श्रीमंतांची मिजास होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळामध्ये झालेल्या रोलरमिल्सच्या निर्मितीनंतर रिफाइंड साखर व मैदा मुबलक उपलब्ध होऊ लागला आणि विसाव्या शतकामध्ये त्याची एक मुख्य बाजारपेठ बनला भारत. मागच्या संपूर्ण शतकामध्ये दशकागणिक गुळाची जागा घेतली साखरेनं आणि तांदूळ-गहू-मूग आदी धान्यांची जागा घेतली मैद्यानं. मैदा व साखरेमुळे पदार्थ बनवणं सोपं झालं. ते अधिक आकर्षक दिसू लागले आणि खाताना तर असे खुसखुशीत लागत की जीभ एकदम तृप्त. मात्र चार इंची जीभ ही पाच फुटी देहाला नेहमीच अडचणीत आणते, तसंच इथेही घडलं. समाजातील ज्या सर्वोच्च स्तरातील धनिक लोकांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साखर व मैदा परवडत होता, त्यांच्यामध्येच मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्व संबंधित विकृती आदी आजार दिसू लागले. हे आजार श्रीमंतांचे आहेत, असं म्हणणा-या मध्यम व कनिष्ठ वर्गाकडेही मागच्या तीन-चार दशकांमध्ये थोडा पैसा वाढला आणि त्यांचंसुद्धा साखर व मैद्याचं सेवन वाढलं आणि साहजिकच दिवाळी फराळसुद्धा साखर आणि मैद्यापासून बनू लागला. मागील तीन-चार दशकांमध्ये आपल्या म्हणजे समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह-हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्व आदी विकारांमागे मैदा व साखर हे एक महत्त्वाचं कारण आहे, असं अनेक संशोधक छातीठोकपणे सांगत आहेत. आता बोला? त्यात पुन्हा आपण मागील काही वर्षामध्ये माव्याचे गोड पदार्थ बनवू लागलो आहोत. जो मावा चारपाचशे जोरबैठका मारणा-यांनी खावा, ही अपेक्षा असते. मग इतका जड पदार्थ असलेला मावा घरबैठया लोकांना कसा काय पचणार? जरी पचला तरी तो मधुमेह-हृदयरोग-स्थूलत्व आदी रोगांना आमंत्रण देणारच.

महत्त्वाचं म्हणजे वर सांगितलेल्या दिवाळीआधीचे काबाडकष्ट, केवळ थंडीमध्ये अन्नाची उपलब्धता, ग्रीष्म-वर्षामध्ये अन्नाचं दुíभक्ष आदी गोष्टी एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला लागू होतात का? अन्नाचा सुकाळ नाही, अशी परिस्थिती आपल्यावर येणार आहे का? अन्नाशिवाय राहावं लागणार नसेल तर कशाला हवा एवढा पौष्टिक आहार? नेहमीच मुबलक ऊर्जायुक्त अन्न सेवन करणा-या आपल्याला कशाला हवाय अतिऊर्जायुक्त आहार? सदासर्वदा सहज अन्न उपलब्ध असणा-या तुम्हा-आम्हाला कशाला हवा आहे, शरीरामध्ये चरबीचा साठा आहे का? अन्नाचं दुíभक्ष होणार आहे का? मग एवढया अतिमात्रेमध्ये-इतक्या अधिक ऊर्जेने ठासून भरलेला असा पौष्टिक आहार काय करेल? निश्चितच आजारांना आमंत्रण देईल. नव्हे देत आहेच! त्यामुळे मैदा-साखर या अनारोग्यकर पदार्थानी बनवलेल्या खाद्यपदार्थाची आपल्याला गरज आहे का, याचा विचार गंभीरतेने करण्याची वेळ आली आहे. एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला एवढया पौष्टिक आहाराची गरज नाही हे समजून या दिवाळी फराळामध्ये बदल व्हायला हवा. हल्ली फराळ बनवणं हे शहरी रहाटगाडयामध्ये कितपत शक्य होतं व किती घरांमध्ये फराळ बनतो, हा तसा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. तरीही आरोग्याला पोषक असा दिवाळी फराळ बनवायचा तर तो मैद्याशिवाय बनला पाहिजे. मैद्याऐवजी तांदूळ, नाचणी, गहू, मूग आदी धान्यांचा वापर करा. साखर तर अजिबात नको, त्याऐवजी अर्थातच गुळाचा वापर करा. होता होईतो तळलेले पदार्थसुद्धा नको आणि महत्त्वाचं म्हणजे हा फराळ कष्ट-परिश्रम करणा-यांसाठी आहे, हे विसरू नका. मुळात परिश्रम नाहीच, व्यायाम केलाच तर तो एसी जिममध्ये जाऊन, घाम न काढता केलेला व्यायाम कसा हो? व्यायाम नाहीच. तर भरपूर चाला. दिवसाला निदान ५००० पावलं तरी चाललं पाहिजे. तुमच्यातले अनेक जण दिवसाला एक००० पावलंसुद्धा चालत नसतील. त्यांनी कशाला खावा पौष्टिक दिवाळी फराळ? यानंतरही तुम्हाला भरपूर प्रमाणात दिवाळी फराळ खायचा असेलच तर घरात येऊ घातलेल्या आगंतुक आजारांची तयारी आत्तापासून सुरू करा. काय?

1 COMMENT

Leave a Reply to Rohit Nalavade Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version