Home मजेत मस्त तंदुरुस्त पाठीच्या मणक्यांसाठी

पाठीच्या मणक्यांसाठी

1

पाठदुखी ही अतिशय सर्वसामान्य समस्या झाली आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही वयाची असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, स्थूल असो वा शिडशिडीत, या आजाराने त्रस्त असते.

पाठदुखी ही अतिशय सर्वसामान्य समस्या झाली आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही वयाची असो, स्त्री असो अथवा पुरुष असो, स्थूल असो वा शिडशिडीत, या आजाराने त्रस्त असते. पाठदुखी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यापेक्षाही शरीरात एखाद्या भागात अशा समस्या कशामुळे निर्माण होतात हे समजून घेणं गरजेचं आहे.

लहान लहान परंतु भक्कम अशा गोलाकार अस्थींचा मिळून मणका तयार होतो. याला पृष्ठवंश किंवा कशेरुक दंड असेही म्हणतात. त्या प्रत्येक लहान अस्थीला मणका किंवा कशेरूक असे नाव आहे. या लहान लहान अस्थी एकावर एका अशा बसवलेल्या असून, त्याची एक साखळीच बनल्यासारखी असते. या साखळीमुळे शरीराला मध्य रेषेत बळकट असा आधार मिळतो. दोन अस्थीच्या किंवा मणक्याच्या मध्ये कमी जास्त जाडीची उपस्थिचक्रं असल्यामुळे मणक्याला लवचीकपणा प्राप्त होतो आणि त्याची विशिष्ट मर्यादेपर्यंत हालचाल होऊ शकते. प्रत्येक मणक्याच्या मध्यभागी जी पोकळी असते, तिच्यामुळे कण्याच्या मध्यभागी असलेला मेरुरज्जू संरक्षित राहू शकतो.

पाठीचा कणा हा शरीराचा मुख्य आधार असतो. डोके, छाती, पोट, श्रोणी या सर्व विभागांचं वजन पाठीच्या कण्यावर पेललं जातं. कणा सरळ नसून त्याला मानेच्या भागात बहिर्गोल, वक्षीय भागात अंतर्गोल आणि कटिभागात पुन्हा बहिर्गोल असे बाक आलेले असतात. त्रिकास्थीमधील बाकही अंतर्गोल असून त्या अस्थीची आणि श्रोणीची मिळून श्रोणिगुहा तयार होते. उपास्थीचक्रामुळे कण्याला लवचिकपणा प्राप्त होऊन ताठ बसणं, बाजूला वळणं वगैरे प्रक्रिया क्रिया कण्याशी संबंध असलेल्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होऊ शकतात. मणक्याचं दुखणं सांधेदुखी, गर्भाशयाशी संबंधित आजार, मूत्रमार्गात अडचणी, पोटदुखी किंवा मानसिक समस्या ही पाठदुखी अथवा मणकेदुखीची कारणं होऊ शकतील.
सांधेदुखीचा विचार करता त्याची तीन प्रमुख कारणं आहेत ती पुढीलप्रमाणे-
»  बसण्याची चुकीची पद्धती
»  व्यायामाचा अभाव
»  मानसिक तणाव
या सगळ्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर खालील आसनांचा आधार घ्यावा.

मकरासन (मगरमुद्रा)
» पोटावर उताणं झोपा. तुमचं तोंड जमिनीच्या दिशेला असलं पाहिजे.
» पायात थोडं अंतर ठेवा. पायाचे अंगठे एकमेकांना जोडा
» हात दुमडून तळहात जमिनीवर येतील असे ठेवा. त्यावर डोकं ठेवा.
» या स्थितीत तीन ते पाच मिनिटं राहा.

शवासन (मृतावस्था)
» पाठीवर झोपून पाय मोकळे सोडा
» हात शरीराच्या बाजूला ठेवा तळहात वरच्या दिशेने येतील याची काळजी घ्या.
» डोळे मिटा आणि विश्रांती घ्या.
» डोक्यात कोणतेही विचार येऊ देऊ नका. नियमित श्वसन करा.
» या स्थितीत दहा मिनिटं पडून राहा.

भद्रासन (अढळमुद्रा)
» पाठीवर झोपा आणि डाव्या बाजूला वळा
» डावा हात दुमडून तो उशीप्रमाणे डोक्याखाली घ्या.
» एकावर एक पाय ठेवून शरीर एका सरळ रेषेत ठेवा.
» उजवा हात शरीरावरच ठेवा.
» डोळे बंद करून या स्थितीत पाच मिनिटं राहा
»हे आसन नियमित केल्याने मणक्याचं दुखणं नियंत्रित राहण्यास मदत होते.

हस्तपादासन (ओणवी मुद्रा)
» पाय एकमेकांना चिकटवून सरळ उभे राहा.
» हात डोक्याला चिकटवून सरळ वर करा.
» पुढच्या बाजूला जितकं शक्य होईल तितकं झुका.
» पुन्हा पूर्वावस्थेत या.

शलभासन (टोळ मुद्रा)
» पोटावर झोपा आणि हात तुमच्या शरीराच्या बाजूला ठेवा.
» गुडघे एका सरळ रेषेत ठेवा आणि उजवा पाय जितका वर उचलता येईल तितका वर उचलावा.
» या स्थितीत चार सेकंद राहा.
» हेच पुन्हा डाव्या पायासोबत करावे.
» त्यानंतर दोन्ही पाय एकत्र उचलावेत.
»प्रत्येक स्थिती दोन ते तीन वेळा करावी.

प्राणायाम -४
» पाठीवर झोपा.
» पाय गुडघ्यात दुमडा. पाय एकमेकांना जोडा आणि शरीराजवळ घ्या.
» एक हात तुमच्या पोटावर ठेवा.
» आता तुमच्या श्वासाचं निरीक्षण करा.
» श्वास घेऊन तीन सेकंद त्याच अवस्थेत राहा आणि श्वास सोडून पुन्हा तीन सेकंद त्याच स्थितीत राहा.
» लक्षात घ्या यात छातीची हालचाल होणार नाही, याची काळजी घ्या.

भुजंगासन (नागमुद्रा)
» पोटावर झोपा.
» हाताच्या साहाय्याने छातीपर्यंतचा शरीराचा भाग वर उचलून पाठीमागच्या बाजूला झुका.
» या स्थितीत काही वेळ राहा.
» पुन्हा पूर्ववत स्थितीत या.

प्राणायाम – ९
» सुखासन किंवा वज्रासनात बसावं.
» डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने दोन सेकंद श्वास घ्या.
» दोन्ही नाकपुडय़ा बंद करून चार सेकंद श्वास रोखून धरा.
» आता उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या.
» हीच क्रिया पाच ते सहा वेळा करावी.

योगमुद्रा
» सुखासनात बसावे.
» डावा हात मागे घेऊन तो उजव्या हाताने पकडावा (चित्रात दाखवल्याप्रमाणे).
» श्वास घेत खांदे मागे ओढा.
» पुढे झुका आणि डोकं उजव्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. हे जर तुम्हाला कठीण जात असेल तर डोकं जितकं खाली नेता येईल तितकं नेण्याचा प्रयत्न करावा.
» पुन्हा पूर्ववत या.
» हीच अवस्था डाव्या गुडघ्यावर आणि एकदा दोन्ही गुडघ्यांमध्ये टेकवण्याचा प्रयत्न करावा.

1 COMMENT

  1. नमस्कार सर,
    आपण दिलेल्या टिप्स मला खूप उपयुक्त वाटल्या.मणक्यांचे प्रोब्लेम याने बरेचसे नियन्त्रणात येतील असे वाटते.मी वरील असणे नियमित करेन. धन्यवाद.

Leave a Reply to कांबळे मंगेश रामचंद्र Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version