Home महामुंबई पोद्दार मिलमध्ये म्हाडाचा वाटा नाही

पोद्दार मिलमध्ये म्हाडाचा वाटा नाही

1

भारत मिलसोबत पोद्दार मिलचा वाटा असताना जाहिरातीत केवळ भारत मिलचे नाव देण्यात आल्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मुंबई- भारत मिलसोबत पोद्दार मिलचा वाटा असताना जाहिरातीत केवळ भारत मिलचे नाव देण्यात आल्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोद्दार मिलमध्ये म्हाडाचा वाटा नसल्याचे महानगरपालिकेद्वारे म्हाडाला स्पष्ट करण्यात आले आहे.

पोद्दार मिल आणि भारत मिल यांच्या संयुक्तिक विकास अभिन्यासाबाबतच्या उपलब्ध अभिलेखानुसार भारत मिलकरिता म्हाडाला १९३८.१२ चौ.मी. क्षेत्रफळ हस्तांतरित करण्यात आले असून पोद्दार मिलचे क्षेत्रफळ निरंक असल्याचे महानगरपालिकेद्वारे म्हाडाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे म्हाडाद्वारे काढण्यात येणा-या दुस-या टप्प्याच्या सोडतीत केवळ भारत मिलच्या जागेवरील घरांचा समावेश असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

म्हाडाद्वारे दुस-या टप्प्यातील सहा गिरण्यांच्या जागेवरील २ हजार ६३४ घरांच्या सोडत प्रक्रियेबाबत घोषणा करण्यात आली आहे. गिरणीचे नाव, गिरणीनुसार उपलब्ध घरांची संख्या आणि अर्जदारांची संख्या या संबंधीचा तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच सहा गिरण्यांमधील कामगार, वारसांची प्राप्त माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या तपशिलानुसार भारत मिल येथे १८८ घरांचे बांधकाम करण्यात येत आहे. या जागेसाठी १ हजार ७१२ उपलब्ध अर्जाची संख्या आहे. भारत मिल आणि पोद्दार मिलचे एकत्रीकरण करण्यात आले होते. पण म्हाडाच्या जाहिरातीत केवळ भारत मिलचे नाव देण्यात आल्याने पोद्दार मिलच्या वाटयाबाबत गिरणी कामगारांनी शंका उपस्थित केली होती.

याबाबत म्हाडा अधिका-यांना विचारले असता, भारत आणि पोद्दार मिलच्या जागेबाबत महानगरपालिकेकडे गेल्यावर्षीच पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही पाठपुरावा केला गेला नाही. येत्या काही दिवसात लॉटरी काढण्यात येणार असल्याने पोद्दार मिलबाबत चौकशी करण्याबाबत म्हाडाद्वारे गेल्या आठवडयात पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला.

पोद्दार मिलच्या जागेबाबत निश्चितता झाल्यास आवश्यक दुरुस्ती केली जाईल, असे अधिका-यांद्वारे सांगण्यात आले होते. पोद्दार मिलच्या जागेसंदर्भात महानगरपालिकेद्वारे म्हाडाला स्पष्टीकरण देण्यात आले असून म्हाडाला पोद्दार मिलकरिताचे हस्तांतर करण्याचे क्षेत्रफळ निरंक असल्याचे म्हणजेच पोद्दार मिलमध्ये म्हाडाचा वाटा नसल्याचे सांगण्यात आले आहे.

1 COMMENT

Leave a Reply to Pravin Vitthal Patil Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version