Home कोलाज प्यार बिना चैन कहां रे!

प्यार बिना चैन कहां रे!

1

नवं वर्ष सुरू होत नाही तोच सगळीकडे दुकानातून, मॉलमध्ये, जाहिरातीत ‘व्हॅलेंन्टाईन डे’चे वेध लागलेले दिसतात. कोणताही महिना घ्या, आयुष्य अनेक इव्हेन्टने भरलेलं असतं. प्रत्येक घटनेचा एक ठराविक काळ असतो. तोच नियम आम्ही प्रेमालाही लावतो. आता प्रेमाकरता लिमिटेड वेळ असतो. कोणतीही गोष्ट मनात आली की पूर्ण झाली अशी आम्हाला सवय झाली आहे.

नवं वर्ष सुरू होत नाही तोच सगळीकडे दुकानातून, मॉलमध्ये, जाहिरातीत ‘व्हॅलेंन्टाईन डे’चे वेध लागलेले दिसतात. कोणताही महिना घ्या, आयुष्य अनेक इव्हेन्टने भरलेलं असतं. प्रत्येक घटनेचा एक ठराविक काळ असतो. तोच नियम आम्ही प्रेमालाही लावतो. आता प्रेमाकरता लिमिटेड वेळ असतो. कोणतीही गोष्ट मनात आली की पूर्ण झाली अशी आम्हाला सवय झाली आहे. आमची यशाची व्याख्या लवकरात लवकर यश मिळणं अशी आहे. त्यामुळे प्रेम मिळावं याकरता आम्ही एक-दोन र्वष, महिनाभर, काही दिवस तरी कसं थांबणार? एका व्यक्तीनं लगेच उत्तर द्यायचं आणि आम्ही चटकन पुढची कृती करायची, असं वेगवान जीवन आम्हाला हवंस आहे.

प्रेमाची वाट बघत ताटकळत असणारी माणसं आजही दिसतात, असं लिहिलं होतं. त्यावर अनेक वाचकांनी आता प्रेमाची वाट बघायला लोकांकडे फार वेळ नाही, असं ई-मेलमधून सुचवलं होतं. त्यात तथ्य आहेच. सगळं जसं झटपट होतं, तसंच प्रेमही झटपट झालं तर हवं आहे, असं मानणारी तरुणाई जास्त आहे, हे मला मान्य आहे. रोमियो-ज्युलिएट, हीर-रांझा असं अजरामर झालेलं, एकमेकांसाठी जीवाची किंमत मोजणारं प्रेम आम्हाला आदर्श वाटतं. आम्ही त्याचे गोडवे गातो. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या जमान्यातले आम्ही तसं प्रेम करणार नाही, तसं जगणं आम्हाला मान्य नाही. प्रेमात उगाच जीव द्यायचा कशाला? वा कुणाचा जीवही घ्यायचा का? याचं उत्तर नाही असंच आहे. प्रेम जगायला शिकवतं, प्रेम जगणं सुंदर करतं, हेच मनात ठेवू या. पण ५० वर्षापूर्वी म्हणजेच आजच्या पिढीच्या आजी-आजोबांच्या वेळी कसा काळ होता?

पिढी बदलली की प्रेमात बदल होतो का, या प्रश्नाचं उत्तर अनेक जण ‘हो’ असं देतात. त्यावेळी त्यांना प्रेम व्यक्त करणं आणि प्रेम यशस्वी झालं, असं मानणं या दोन्ही गोष्टीत बदल झाला आहे, असं म्हणायचं असतं. मॉíनग वॉकला जाणारी, बागेत निवांत बसून गप्पा मारणारी सत्तर-पंच्याहत्तर वर्षाची पिढी आणि आजची पंधरा सोळा वर्षाची पिढी यात प्रेम व्यक्त करणं, त्याकडे बघणं यात खूप बदल झाला आहे. हा बदल नेमका कसा आहे? प्रेम व्यक्त करून, त्या व्यक्तीशी लग्न करणं आणि आजीवन संसार करणं ही एका पिढीची सर्वसाधारण प्रेमाची व्याख्या. त्यात केवढा मोठा काळ सामावला आहे! वाट बघणं, त्या व्यक्तीबरोबर जन्म काढणं हे गृहीत धरलेलं होतं. प्रेम व्यक्त करणं जमलं नाही, प्रेमाची पूर्तता विवाहात झाली नाही तर एकटं राहणं हे मान्य होतं. त्या असफल प्रेमाविषयी फार काही बोलणं हे सुद्धा समाजमान्य नव्हतं. असफल प्रेमाचा आदर करणं आता हास्यास्पद. दोन पिढय़ांपूर्वी या प्रेमात असणारा कालावधी मोठा होता. एकनिष्ठता, दुस-या व्यक्तीचा विचार आणि तिच्याविषयी कळकळ जास्त काळ टिकणारी होती. आजच्या भाषेत सांगायचं तर आदर्शवाद होता!

कुढत आणि दु:खात जीवन जगता येत नाही, हे स्पष्टच आहे; पण प्रेमानं हिंसेचा मार्ग घ्यायची गरज असते का? बहुसंख्य लोक तो मार्ग घेत नाहीत. हक्काच्या वा जीवलग व्यक्तीशिवाय जगणंसुद्धा सगळ्यांना जमेल असं नाही. एकदा प्रेम असफल झालं तर आयुष्य संपत नाही, या विचारधारेतून त्यातून ‘ये नही तो और सही’ अशी मानसिकता येणार होतीच. पुढच्या पिढीत एका ठिकाणी प्रेमाचं जमत नाही का, आणखी प्रयत्न करा ही भावना आली. पण एक जमलं न जमलं की लगेच मोडतोड करणं वा सुडाची भावना हा मार्ग त्या पिढीनेही स्वीकारला नाही. आणखी एक पिढी पुढं गेली तसं आता प्रेमही वारंवार होतं, ते सफल आणि असफलही अनेकदा होतं असा प्रवाह दिसू लागला. लग्न झालं तरी ते तुटू शकतं, पुन्हा दुसरं प्रेमही चालू शकेल असं पहिला प्रेमविवाह करतानाच मान्य असतं. इथवर आपले विचार आले. किंबहुना विवाह हीच प्रेमाची पूर्तता नाही, हे जसं मान्य झालं तसं प्रेम एकावेळी अनेकांवर करता येतं असाही एक प्रवाह आता समाजात वाढलेला दिसतो आहे. त्याचा परिणाम असा की, त्याचबरोबर एकनिष्ठता या शब्दाभोवती असलेला कालावधी फारच कमी झाला आहे. एकनिष्ठतेत विश्वास असतो, एक सुरक्षा असते. आता एकनिष्ठ असणं गरजेचं नाही आणि प्रेमात असणारी अनिश्चितता मात्र कैक पटींनी वाढते आहे, हे चित्र मोठया प्रमाणात आहे.

सुदैवानं अजून प्रेम नको असं मात्र झालेलं नाही. फक्त जीवनमानानुसार ते बदललं आहे. आयुष्यात जितके जास्त बदल, जितका जास्त त्याचा वेग, तितके आयुष्य वेगवान असते. पण वेगाला सामोरे जाताना त्या आयुष्यात, जगण्यात स्थिरता वा सुरक्षितता याचं प्रमाण नक्कीच कमी होतं. दोन पिढया प्रेम मिळाले की आयुष्यातले स्थैर्य, सुरक्षितता प्राप्त झाली असं मानत होते. त्यात तथ्य होतं. पण आता प्रेम ही भावना आणि त्याभोवतीचा कालावधी याचं नातं खूपच वेगळं आहे. प्रेमामुळे स्थैर्य येईल, प्रेमामुळे सुरक्षिततेची भावना मनात वाढते त्याचं काय? आपली जीवलग व्यक्ती कोण, यातच अनिश्चितता असल्याने प्रेम ही भावनाच आता अगदी कमी काळ असते, ही वस्तुस्थिती आहे. आज एक प्रेम संपलं की दुस-याचा शोध, त्यातून येणारे तणाव, अनेक बदल याचा ससेमिरा मागे लागतो. इतकंच काय आमचं प्रेम असंच असेल असंही मानणारी तरुण पिढी वाढते आहे. त्यांचा प्रेमाचा शोध अखंड चालतो हेच खरं!

1 COMMENT

Leave a Reply to Shubhangi bhargave Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version