Home टॉप स्टोरी ..मग मुख्यमंत्री युती कशी करणार?

..मग मुख्यमंत्री युती कशी करणार?

2

भाजपाचे सोमैय्या- शेलार शिवसेनेवर रोज भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना कोणत्या पारदर्शकतेच्या आधारावर मुख्यमंत्री युती करणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

मुंबई- पारदर्शकतेच्या आधारावर शिवसेनेशी युती करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि तिकडे भाजपाचे किरीट सोमैय्या आणि आशिष शेलार शिवसेनेवर रोज भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतात. असे असताना कोणत्या पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. महापालिकेत एकत्र सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपाच्या अकार्यक्षम कारभारामुळेच मुंबईची अवस्था अत्यंत हालाखीची झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई महापालिकेसह १० महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आयबीएन लोकमत’ वृत्त वाहिनीने नारायण राणे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत सडेतोडपणे आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकतेच्या आधारावर शिवसेनेसोबत युतीची बोलणी सुरू होऊ शकतात, असे म्हटले आहे. एकीकडे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या शिवसेनेवर रोज भ्रष्टाचाराचे आरोप करतात. मग कोणती पारदर्शकता मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे. ती नसेल तर कशी युती करणार? एकीकडे मुख्यमंत्री युतीबद्दल बोलतात आणि दुसरीकडे पुन्हा आपल्या पक्षाच्या लोकांना निवडणुका जिंकण्यासाठी मावळ्यांप्रमाणे काम करा, असे सांगतात. त्याबद्दल राणे म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवरायांच्या मावळ्यांचा एक अंशही पहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांना फक्त भाजपाचे सदस्य म्हणणे योग्य ठरेल. तसेच शिवसैनिकांमधलाही ‘सैनिक’ शब्द काढून टाकला पाहिजे. त्यांना फक्त सदस्य म्हणावे, असा टोला राणे यांनी लगावला.

आज निवडणुका झाल्यास महाराष्ट्र आणि भारत भाजपामुक्त होईल

मोठमोठी आश्वासने देऊन केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आले. मात्र त्यातील एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. त्यामुळे आजच्या घडीला जर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर राज्य आणि देश भाजपामुक्त होईल, अशा शब्दांत राणे यांनी भाजपाचे वस्त्रहरण केले.

ठाणे येथे झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला काँग्रेसमुक्त करण्यासाठी युती हवी आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा केली होती. मात्र त्यांना ते शक्य झालेले नाही. या उलट त्यांनी लोकांची जी फसवणूक केली आहे. ती पाहता आता जर निवडणुका झाल्या तर राज्यातील आणि केंद्रातील सत्ता भाजपाला गमवावी लागेल, असा टोला लगावून खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिकेवर महात्मा गांधींच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याबद्दल राणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले की, महात्मा गांधी आपल्या कार्याने, त्यागाने महान झाले आहेत. गांधीजी खादी वापरत होते. नरेंद्र मोदी ११ लाख रुपयांचा सूट वापरतात. खादी घालत नाहीत. त्यामुळे गांधींचा फोटो हटवून स्वत:चा फोटा छापण्याची पंतप्रधानांची कृती अत्यंत निषेधार्ह आहे.

2 COMMENTS

  1. त्याची काळजी नारायणराव तुम्ही करू नका तुम्ही तुमची कशी होत नाही त्याकडे लक्ष्य द्या उगाच कुठेतरी नाक खुपसू नका

  2. नारायणराव शिवसेना व भाजप युती कशी होईल त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही कॉग्रेस राष्ट्रवादी कशी होईल ते पहा कारण तुमच्याच पक्षातील निरुपम व अशोक चव्हाणांना युती नको आहे. त्यामुळे आधी आपल्या घरात पहा स्थिर आहे ना नाहीतर दिस-याच पाहताना स्वतः:च कोसळायचे

Leave a Reply to prekshk Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version