Home एक्सक्लूसीव्ह रस्त्यावरील चायनीज खाद्यपदार्थ होणार हद्दपार

रस्त्यावरील चायनीज खाद्यपदार्थ होणार हद्दपार

1

मुंबईत गल्लोगल्ली, नाक्यांवर तसेच शाळा परिसरात शाळकरी मुलांसह सर्वाचे आरोग्य बिघडवणा-या चायनीज भेळ आणि मन्च्युरियन पकोडा यांची सर्रास विक्री करणा-या चायनीज पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करून बंदी आणण्याची मागणी काँग्रेसने केली.

मुंबई- मुंबईत गल्लोगल्ली, नाक्यांवर तसेच शाळा परिसरात शाळकरी मुलांसह सर्वाचे आरोग्य बिघडवणा-या चायनीज भेळ आणि मन्च्युरियन पकोडा यांची सर्रास विक्री करणा-या चायनीज पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करून बंदी आणण्याची मागणी काँग्रेसने केली. यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन देताना, होय, चायनीज भेळ व मन्च्युरियन पकोडा विक्रेत्यांवर कारवाई केली जाणारच. ते यापुढे दिसणार नाहीत, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

मुंबई महापालिका आयुक्तपदी अजोय मेहता आल्यानंतर, फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक कडक झाली आहे. वर्षानुवर्षे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. पदपथावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवले जात आहे. पण रस्त्यांवर बसलेल्यांना हटवले जात नाही.

महापालिका आयुक्तांचा आदेश असल्याचे सांगत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांना पैसे पोहोच केलेल्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या नियमबाह्य कारवाईचा जाब काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईतील सर्व फेरीवाला संघटनेच्या पदाधिका-यांसह अजोय मेहता यांची भेट घेऊन विचारला.

या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाल्यांचा सव्‍‌र्हे करून त्यांचे पुनर्वसन केले जात नाही, तोपर्यंत कारवाई केली जाऊ नये. परंतु सध्या सरसकट सर्वावरच कारवाई केली जात असल्याची बाब निरुपम यांनी मांडली.

सव्‍‌र्हे पूर्ण करा आणि त्यानुसार परवाने द्या. मात्र तोपर्यंत कारवाई करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी टाऊन वेंडिंग कमिटीची बैठक आठ महिन्यांपासून झालेली नाही. तसेच या कमिटीमध्ये फेरीवाल्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची तक्रार फेरीवाल्यांनी मांडली.

या वेळी जे फेरीवाले वर्षानुवर्षे एकाच जागेवर फेरीचा व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नये. मात्र जे अनधिकृत फेरीवाले आहेत, त्यांच्यावर जरूर कारवाई केली जावी, असेही या वेळी निरुपम यांनी स्पष्ट केले. याबरोबरच अनधिकृत शिव वडा हातगाडी, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई केली जावी, असे त्यांनी सांगितले.

फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र हे न्यायालयाच्या आदेशानुसारच बनवले जात आहे. जे नागरिक राहत आहेत, त्यांना सेवा मिळावी म्हणून फेरीवाल्यांना कुठल्याही परिस्थितीत बसायला दिले जाणार आहे. परंतु या फेरीवाल्यांमुळे कुठल्याही भागातील शांतता भंग होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

न्यायालयाने जे आदेश आणि नियम बनवले आहेत, त्यापलीकडे जाऊन महापालिका काम करणार नाही. माणुसकी पाळली जाणार आहे. पण यामुळे न्यायालयाच्या आदेशांचे अवमूल्यन होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई केली जाईल. परंतु कुठे नियमाच्या बाहेर जाऊन कारवाई झाल्यास ही बाब महापालिकेच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून द्यावी.
– अजोय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका

1 COMMENT

  1. मुंबईत गल्लोगल्ली शाळा परिसरातील शाळकरी मुलांसह सर्वाचे आरोग्य बिघडवणा-या चायनीज पदार्थ विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करून बंदी आणावी .

Leave a Reply to Charudatta shinde Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version