Home Uncategorized शेळी करेल तुम्हाला मालामाल

शेळी करेल तुम्हाला मालामाल

3

बाजारात बोकडाच्या मटणाला मिळणारी किंमत शेतकरीवर्गाला आकर्षित करत आहे. सध्याच्या परिस्थितीचा साधारणपणे विचार केला असता शेळीपालन हा व्यवसाय इतर पशुपालन व्यवसायापेक्षा अधिक फायदेशीर आहे. 

बाजारात बोकडाच्या मटणाला मिळणारी किंमत शेतकरीवर्गाला आकर्षित करत आहे. सध्याच्या परिस्थितीचा साधारणपणे विचार केला असता शेळीपालन हा व्यवसाय इतर पशुपालन व्यवसायापेक्षा अधिक फायदेशीर आहे. शेतकरीवर्गाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनांत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे शेतकरी जोडधंदा करण्यास प्रवृत्त झालेला आहे.

शेळीपालन या व्यवसायास शास्त्रीय ज्ञानाची जोड दिल्यास हा व्यवसाय अधिक फायदेशीर होईल. त्यासाठी बंदिस्त जागेत शेळीपालन करणे महत्त्वाचे आहे. तसेच संकरित जाती पाळणे हे व्यापारी दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर होईल.

बंदिस्त शेळीपालनाचे फायदे
शेळी आकाराने लहान असल्यामुळे जागा कमी लागते. त्यामुळे जागेचा व बांधकामास खर्च कमी येतो. शेळी हा प्राणी कळपात राहत असल्यामुळे कळपाची वाढ झपाटय़ाने होते व लहान कळप घरातील स्त्रिया व मुले सहजपणे हाताळू शकतात. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो, शेळी हा प्राणी अत्यंत काटक प्राणी आहे व बंदिस्त जागेत शास्त्रीय पद्धतीने त्याचे संगोपन केल्यास रोगराईचे प्रमाण कमी होते.

औषधोपचारावरील खर्च कमी होतो. मरतुक कमी होते व त्याचमुळे फायद्यात वाढ होते. शेळय़ांसाठी कुठल्याही प्रकारचे किमती खाद्य लागत नाही. शेतातीलच काही टाकाऊ पदार्थापासून शेळीचे खाद्य तयार करता येते. त्यामुळे खाद्याचा खर्च कमी होतो, शेळय़ा चरायला सोडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. तसेच जंगलातील झाडेझुडूपे यांचे नुकसान होते. शेळीला जखमा व्हायची शक्यता वाढते. हे नुकसान शेळय़ा बंदिस्त जागेत ठेवल्यामुळे टाळता येते.

आपल्या देशामध्ये वेगवेगळय़ा भागात वेगवेगळय़ा प्रकारचे हवामान असल्यामुळे गोठा बांधण्याच्या ठिकाणी त्या त्या भागातील हवामानाला व गोठय़ातील वायू विसर्जनाचा विचार करून बांधकामाचे साहित्य निवडावे. बांधकाम करताना वापरासाठी स्थानिक व सर्वसाधारण उपलब्ध असलेल्या साहित्याची निवड करावी. शेतातील टाकाऊ पदार्थ, गव्हाचे किंवा भाताचे कांड, ज्वारी बाजरीचे कांड, सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे यांचा वापर करावा.

सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाश व पावसापासून संरक्षण होईल अशा प्रकारचे छप्पर निवडावे. गोठा हा पूर्व-पश्चिम दिशेत बांधावा. गोठय़ामध्ये शुद्ध हवा सतत खेळती राहावी. त्यामुळे गोठय़ातील उष्णता, कार्बन वायू, धूळ, आद्र्रता, गोठय़ाबाहेर पडण्यास मदत होते. म्हणूनच गोठा बांधताना त्यांच्या मध्यावर उंची जितकी जास्त ठेवता येईल तितकी ठेवावी. सर्वसाधारणपणे १५ ते १८ फूट उंची ठेवावी. शेळय़ांना सतत कोरडी जमीन उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच मलमूत्र स्वच्छ करता येण्याजोगी जमीन ठेवावी.

व्यायामासाठी शेळय़ांना सर्वसाधारणपणे तेवढय़ाच जागेची आवश्यकता असते. ही जागा गोठय़ाच्या एका बाहेरच्या बाजूला ठेवावी, त्यावर छप्पर बांधण्याची गरज नाही. सावलीसाठी मोठी झाडे लावावीत. खाद्य देण्यासाठी एका बाजूला लाकडी फळय़ांचा वापर करून गव्हाण तयार करावे. गव्हाणामध्ये शेळय़ा आत जाऊन खाद्याची नासाडी करू नये म्हणून आडव्या बांबूचा उपयोग करावा. दुस-या बाजूला जवळपास तीन फूट उंचीवर हिरवा चारा बांधावा. अशी व्यवस्था केल्यास शेळय़ांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे त्यांना
हिरवा चारा खायला मिळून त्यांना मानसिक समाधान लाभेल. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शक्यतो बाहेरील मोकळय़ा व्यायामाच्या जागेतच करावी. शक्यतो बोकड व करडे यांसाठी वेगळा गोठा बांधावा. बोकडाचा गोठा मुख्य गोठय़ापासून लांब अंतरावर बांधावा. त्यामुळे शेळीच्या दुधास येणारा विशिष्ट वास थांबवता येईल.

हिरवा चारा देण्यासाठी दुस-या पद्धतीनुसार जमिनीपासून तीन फुटांवर लाकडाचा उपयोग करून रॅक्स तयार कराव्यात. ओला चारा टाकण्यात यावा. त्या दोन इंचांमधून आतील चारा बाहेर डोकावेल व शेळय़ा दोन पायांवर उभ्या राहून चारा खातील अशा प्रकारचे लाकडी पिंजरे लावल्यानंतर शेळय़ांना त्यांच्या नैसर्गिक सवयीप्रमाणे खाद्य खाण्यास पोषक वातावरण निर्माण होईल.

जेथे मोकळी व कोरडी जमीन नसेल व हवेत आद्र्रता जास्त प्रमाणात असेल अशा ठिकाणी रेंज्ड प्लॅटफॉर्म पद्धती स्वीकारण्यात यावी. यामध्ये बंदिस्त जागेत जमिनीपासून तीन ते चार फूट उंचावर लाकडी प्लॅटफॉर्म तयार करावेत. हे लाकडी प्लॅटफॉर्म तयार करण्याकरता लाकडी पद्धतीची जोडणी करून माळा तयार करावा. दोन पट्टय़ांमध्ये एक ते दोन सेंटीमीटर अंतर ठेवावे. अशा माळय़ावर शेळय़ांचे संगोपन केल्यास लाकडी पट्टय़ांमधून मलमूत्र खाली पडेल व माळा कोरडा राहील.

या पद्धतीमुळे शेळय़ांच्या लेंडय़ा गोळा करून त्यांचा खतासाठी मोठय़ा प्रमाणात उपयोग करता येईल व त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळेल. बंदिस्त जागेमध्ये शेळय़ांची वेगवेगळय़ा प्रकारात ज्यामुळे शेळय़ांना वयोमानाप्रमाणे खाद्य देता येईल व खाद्याची नासाडी होणार नाही. शेळय़ा एकत्र ठेवल्यास लहान शेळय़ांना मोठय़ा शेळय़ा खाद्य खाऊ देत नाहीत, त्यामुळे त्यांची वाढ खुंटते व आपणास आर्थिक तोटा होतो. हा तोटा टाळला जाऊ शकतो.

सुधारित शास्त्रीय ज्ञानाने शेळीपालन केल्यास दुर्बल घटकांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल.ज्या मादी धष्टपुष्ट करडे देत असेल अशा माद्या निवडून बाजूला ठेवाव्यात. अशा माद्यांपासून जास्तीत जास्त करडे घेण्याचा प्रयत्न करावा. जी करडे धष्टपुष्ट असतील त्यांची वाढ जास्त होते व त्याचा फायदा होऊ शकतो. यातील करडे वेगळी ठेवावीत व प्रजननासाठी वापरावीत.

ज्या शेळय़ांनी अगोदरच्या वेतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त करडे दिली आहेत त्यांनाच शेळीपालनासाठी निवड करून पैदास करावी. बोकडांची मागणी ‘होळी’ व ‘बकरी ईद’ या सणांमध्ये जास्त असते. त्यावेळी बकरा जेवढा आकर्षक, धष्टपुष्ट व सुंदर असतो तेवढी मागणी व किंमत जास्त असते. शेळय़ा ७ ते १० महिन्यांच्या असताना माजावर येतात. परंतु मादीचे वय १४ ते १८ महिने व वजन २५ ते ३० किलो असताना पैदाशीसाठी वापर करावा. मार्च ते जून या काळात माद्या मुका माज दाखवतात. परंतु नर बरोबर असल्यास माज नीटपणे ओळखता येतो.
मोबाईल क्रमांक ९३२३६९९८८७.

3 COMMENTS

  1. मला शेळी पालन विषयी योग्य माहिती व कर्ज योजना विषयी माहिती मिळावी

Leave a Reply to yuvraj chavan Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version