Home कोलाज यशवंतराव म्हणाले, ‘मित्रा, खरं बोलू की खोटं’..

यशवंतराव म्हणाले, ‘मित्रा, खरं बोलू की खोटं’..

1

‘अखंड महाराष्ट्रात विदर्भाचा विकास झाला नाही’ असे स्वतंत्र विदर्भवादी एक मुख्य कारण देतात, हे कारण फसवे आहे. अखंड महाराष्ट्राने विदर्भासाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर ५५ वर्षापैकी १५ वर्ष विदर्भाकडे मुख्यमंत्रीपद होते. १९६२ ते १९६३ डिसेंबर कन्नमवार, १९६३ ते १९७५ वसंतराव नाईक, ९१ ते ९३ सुधाकरराव नाईक आणि ऑक्टोबर २०१४ ते आतापर्यंत फडणवीस. ही सगळी र्वष मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे.

५० वर्षात अर्थमंत्रीपद जास्तीत जास्त विदर्भाकडे. वीजमंत्री विदर्भाचा, पाटबंधारेमंत्री विदर्भाकडे, उद्योगमंत्रीपद विदर्भाकडे, ग्रामविकास मंत्रीपद विदर्भाकडे, महसूलमंत्रीपद सुद्धा विदर्भाकडे होते. ही सगळी महत्त्वाची खाती विदर्भाकडे होती, असं असूनही विदर्भाचा विकास का झाला नाही? याचा शोध उर्वरित महाराष्ट्राने घ्यायचा की विदर्भातल्या नेत्यांनी.

विदर्भ मागे राहिला अशी ओरड कोण करीत आहे? आणि ओरड करणा-यांनी विदर्भाच्या विकासात नेमके काय केले? एक तरी कारखाना त्यांना धड चालवता आला का? आठवण जरा जुनी आहे, म्हणजे बरोबर ३६ वर्षापूर्वी?महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण औरंगाबादहून नांदेड येथे जाणार होते. त्यांच्यासोबत वसंतदादा पाटील होते, मी त्या दिवसांत औरंगाबाद लोकमत आवृत्तीच्या तयारीसाठी औरंगाबादमध्ये होतो.

यशवंतराव ‘सुभेदारी’वर आहेत, असं कळलं. भेटायला गेलो. ते म्हणाले, ‘पत्रकार मित्रा नांदेडला येतोस का? शामराव कदमांचा सत्कार आहे, गप्पा मारत जाऊ, वसंतदादा आहेतच.’ सकाळी नांदेडला निघालो. यशवंतराव साहेब आणि दादा मागे आणि पुढच्या सीटवर मी. विषयाला मीच सुरुवात केली. यशवंतरावांना म्हटलं, ‘यशवंतरावसाहेब एक प्रश्न विचारू का?’ ‘विचार ना’ ते म्हणाले, मी म्हटले, ‘विदर्भ-मराठवाडा मागे राहिला आणि पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला, असा आक्षेप घेतला जातोय, नेमकं खरं काय? आणि तुमचं मत काय!’ यशवंतराव म्हणाले, ‘मित्रा खरं बोलायचं की खोटं बोलायचं.’
मी म्हटले, ‘म्हणजे काय’ यशवंतराव म्हणाले, ‘तू माझं उत्तर छापणार असशील तर खोटं बोलतो, छापणार नसशील तर खरं बोलतो.’

मी म्हटलं साहेब, ‘मला विषय समजून घ्यायचा आहे,’ मग यशवंतराव खुलले आणि मग म्हणाले, ‘मित्रा मला तू सांग, विदर्भात २५ इंचांपेक्षा कधीतरी पाऊस कमी पडलाय का? विदर्भातली सलग काळीभोर जमीन, कापसाचं उदंड पीक, मग तेथील एकही सहकारी सूत गिरणी धड का चालू शकत नाही? पश्चिम महाराष्ट्रात कापसांचं बोंड नाही, तेथे सहकारी सूत गिरण्या उत्तम चालतात.

थोडंसं थांबून यशवंतराव म्हणाले, ‘इथे जागतिक कीर्तीचा संत्रा होतो. पण त्यावर प्रोसेस होते का? एक तरी प्रोसेसर कारखाना आहे का? तो कोणी करायचा? इथे महाराष्ट्रातली सर्वात जास्त वनसंपत्ती आहे. त्यावर आधारित उद्योग आहेत का? सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे, मग इथे उद्योग का होत नाही? तो कोणी काढायचा? मित्रा, एक गोष्ट लक्षात घे, सरकारपेक्षा सहकार हा अधिक प्रभावी आहे.

सरकार तोंडी लावण्यापुरतं असावं, पण मुख्य जेवण सहकार आहे. मला माफ कर, मी दोष देण्याकरिता सांगत नाही. पण हा चिंतनाचा विषय आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकारी कार्यकर्त्यांनी सहकाराची शक्ती समजून घेतली. विदर्भातल्या कार्यकर्त्यांना त्यात फार रस आहे, असं मला वाटत नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे.

यशवंतरावांच्या बोलण्यात हस्तक्षेप करून वसंतदादा म्हणाले, ‘साहेब, दोन-तीन लोक तिथे सहकारात आहेत, बापूराव देशमुख (वर्धा), नारायणराव काळे (आर्वी), बाबासाहेब केदार (नागपूर) यांनी सहकारात बरं काम केलेलं आहे.

दादांना पाठिंबा देत यशवंतराव म्हणाले, ‘दादा मान्य आहे, पण ते काम पुढच्या पिढीने पुढे नेलं का?

यशवंतराव आणखी बोलत होते, सांगत होते, ‘एक लक्षात घे, विकास हा खेचून आणायचा असतो, तुमच्या दारात पारिजातक असेल तरच त्याचा सडा पडेल त्याकरिता आधी पारिजातक दारात हवा आणि तो कार्यकर्त्यांनी लावायचा आहे. एवढी मोठी वैनगंगा सागरासारखी वाहते, त्या पाण्याचा उपयोग किती केला जातो? लिफ्ट एरिगेशन आहे का? या सगळया प्रश्नांभोवती विकास फिरत असतो.’

हे सगळं छापण्याकरिता तुला सांगितले नाही, असं बजावून यशवंतराव म्हणाले, सर्वच कटू सत्य राजकारण्यांना बोलता येत नाहीत. पण तुला विषय समजावून घ्यायचा होता म्हणून बोललो.

नांदेडपर्यंतच्या प्रवासात आणि परतीच्या प्रवासात वसंतदादा आणि यशवंतराव यांच्यासोबत छान चर्चा झाली. १९७२ दुष्काळात तासगावची द्राक्ष-द्राक्षाच्या मांडवाच्या वेलाला बर्फाचे खडे कापडाच्या पुरचुंडीत बांधून थेंब थेंब पाण्यावर द्राक्ष आम्ही कशी जगवली, तेही दादांनी सांगितले. ही दोन्ही माणसं महाराष्ट्राची फार मोठी माणसं होती. तो प्रवास छान झाला. पुढे नागपूरला लोकमतला संपादक म्हणून गेल्यानंतर लोकमतच्या पुरवणीत हा विषय उपस्थित केला आणि त्यात काही प्रश्न उपस्थित केले.

विदर्भातील सूत गिरण्यांचा विकास झपाटयाने व्हावा म्हणून त्यावेळच्या काँग्रेस सरकारने १ – ९ या तत्त्वावर भरपूर आर्थिक मदत केली. म्हणजे १ रुपया त्या सहकारी संस्थेने भरला तर ९ रुपये सरकार देणार, पण, दुर्दैवाने विदर्भातली एकही सूत गिरणी आज चालू शकलेली नाही. बाबूराव तिडके यांचा बापदेव सहकारी साखर कारखाना मोडून तोडून खाल्ला गेला. बाबासाहेब धाबेकरांचा बालाजी सहकारी साखर कारखाना असाच मोडून तोडून बंद पडला.

भंडा-यांचा रंभाड सहकारी साखर कारखाना धड चालू शकला नाही. शेरेकरांच्या कारखान्याची तीच अवस्था झाली. पुसदचा वसंत सहकारी कसा तरी चालू आहे. वणीची सहकारी तेल गिरणी कधीच बंद पडली आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कल्लप्पा आवाडे यांनी ती गिरणी चालवायला घेऊन फायद्यात काढून दाखवली. इचलकरंजीत कापसाचं बोंड होत नसताना आज वर्षानुवर्षे इचलकरंजीतली सूत गिरणी देशात क्रमांक तीनमध्ये आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील माणिकराव ठाकरे यांचा सहकारी साखर कारखाना बंद पडायला आला तेव्हा वारणानगरच्या विनय कोरे यांनी तो चालवायला घेतला आणि फायद्यात आणून दाखवला. आज भंडारा जिल्ह्यातला अशोक लेलँड बंद पडला, अशोक ऑईल मिल बंद पडली. महाराष्ट्राच्या सगळयात मोठया नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत ७० टक्के कारखाने बंद पडलेले आहेत.

मिहानची जाहिरात किती झाली, पण, मिहानने विदर्भाला काय दिले? गडकरी खासगी कारखाना फायद्यात आणू शकतात, मराठवाडयात मुंडेंचा बैद्यनाथ उत्तम चालतो, विलासरावांचा मांजरा आणि अमित देशमुख यांचा विकास हे कारखाने उत्तम चालतात. पश्चिम महाराष्ट्रात कापूस होत नसताना राजाराम बापू पाटील यांनी उभी केलेली सूत गिरणी जयंत पाटील यांनी कितीतरी मोठी केली.

जयंतरावांची गारमेंट फॅक्टरी विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी बघून घ्यावी, एकदा वारणानगर बघावे, इस्लामपूरचे जयंत पाटलांचे सहकार संकुल बघावे. पतंगराव कदम यांनी पलुस आणि कडेगाव परिसरात काय काय उभे केले हे एकदा कार्यकर्त्यांनी पाहून घ्यावे. अभयसिंग भोसले यांचा अजिंक्यतारा बघा. ९२ वर्षाचे असेपर्यंत १८ तास काम करणाऱ्या स्वर्गीय सारे पाटलांचा दत्त शिरोळ बघा, सुरेशबाबा भोसले यांचा कृष्णा बघा, त्यांचे वैद्यकीय संकुल बघा.. संगमनेरला भाऊसाहेब थोरातांनी जे उभं केलं आणि बाळासाहेब थोरातांनी वाढवलं तो सहकारी साखर कारखाना, ती सूत गिरणी, तो दूध प्रकल्प. दुष्काळी तालुक्याला त्यांनी नंदनवन केलं.

इंदापूर तालुका दुष्काळी पण शंकरराव बाजीराव पाटील आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी हा तालुका कुठच्या कुठे नेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची बारामती बघावी, जी बघायला राष्ट्रपती येतात. मती गुंग करणारी बारामती आहे. तिथे खूप काही शिकण्यासारखं आहे.

ज्या कार्यकर्त्यांना सहकारात काही ठोस काम करायचं आहे, त्यांनी हे बघून काम सुरू करावं आणि विदर्भातल्या अशा कार्यकर्त्यांनी विदर्भ का मागे पडला, याचं उत्तर शोधावं. कोणत्या विभागाला कमीपणा देण्याकरिता हा विषय मांडलेला नाही. पण विकासाचं सूत्र समजल्याशिवाय, कष्टातून काय उभ राहतं, हे माहीत करून घेतल्याशिवाय विकास होत नाही, हे समजण्याकरिता हा तपशील दिला आहे.
कळावे, लोभ असावा, राग नसावा.

1 COMMENT

  1. अप्रतिम लेख ….. जुनी आणि जाणकार राजकारणी समाजकारणी मंडळींना अभ्यास आहे … विकास आणि प्रगती त्याचे रक्तात आहे…. आदरणीय पवारसाहेब असो वा वसंतदादा पाटील फार मोठी आणि अभ्यासु लोकं… आता असे राजकारणी शोधूनही सापडणार नाहीत ….

Leave a Reply to nandkishor Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version