Pune Manache ganpati : पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे झाले विसर्जन
September 29, 2023 12:18 PM
पुणे : पुण्यात सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरुच असल्या तरी पाच मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन पार पडले आहे. कसब्याचा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती. तर तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या मानाच्या गणपतींचे गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत विसर्जन करण्यात आले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. मात्र त्याचा काहीही परिणाम होऊ न देता गणरायाच्या भक्तीत लीन होत पुणेकरांनी बाप्पाला निरोप दिला.
कसबा गणपती
सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. दुपारी ४:३५ वाजता विसर्जन झाले.
तांबडी जोगेश्वरी गणपती
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ५:१० वाजता विसर्जन झाले.
गुरुजी तालीम गणपती
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक दुपारी १२ वाजता सुरू झाली आणि सायंकाळी ५:५५ वाजता विसर्जन झाले.
तुळशीबाग गणपती
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक दुपारी १ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ६:३२ वाजता विसर्जन झाले.
केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक दुपारी २:१५ सुरू झाली, तर सायंकाळी ६:४५ वाजता विसर्जन झाले.