Monday, October 19, 2026

Shiv Sena Dasara Melava 2026: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार?

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विशेष उपक्रमांची घोषणा केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांनी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदत करावी, असे आवाहन पक्षाने केले आहे. शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा शिधा, महिलांना शिलाई मशीन आणि शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत देण्याचे उपक्रमही जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई: राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या या मेळाव्याला मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मात्र, दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत येण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण लावावे, अशी विशेष सूचना पक्षाने दिली आहे. गोरेगावच्या नेस्कोमधील दसऱ्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुष्काळाचे संकट पाहता यंदा कोणतीही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसून, थेट शिवसेना नेत्यांच्या भाषणाने मेळाव्याची सुरुवात होईल. या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा आणि मदत

संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, त्यांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक राज्यातील विविध भागांसाठी रवाना केले जातील. तसेच, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे शिवसैनिकांना एक राज्यव्यापी कार्यक्रम देणार आहेत.

महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या विवाहासाठी मदत

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे. तसेच, दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या या घोषणेनंतर स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठा पुढाकार घेतला असून, त्यांनी मदतीनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >