
बाहेर सर्वत्र दिव्यांची रोषणाई आहे, काहींनी पारंपारिक आकाश कंदील आणि पणत्या प्रकाशमान केल्या आहेत, ग्राहकाच्या स्वागतासाठी दुकानं ओळीने झगमगताहेत, जागोजागी रांगोळ्यांचा सडा पडला आहे, फटाक्यांनी आसमंत दणाणतो आहे, घरात फराळाच्या पदार्थांनी डब्यांची पोटं टम्म फुगली आहेत, पाडवा - भाऊबीजेची खरेदी होते आहे, कॉर्पोरेट जगात भेटींचे पेटारे इकडून तिकडे फिरताहेत... आणि तरीही काही कोपरे अंधारलेलेच आहेत! दिव्यांचा सण साजरा करताना या अंधाऱ्या कोपऱ्यांची जाणीव सदासर्वदा ठेवायला हवी. महाराष्ट्राचं तर यावर्षी ते कर्तव्यच आहे. निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र दुष्काळाने काळोखला आहे. राज्याचा त्यापेक्षाही मोठा भाग पाणीटंचाईच्या भीतीने आत्ताच शहरला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तर सगळीकडेच भीषण आहे. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करायची आहे...
मी अविवेकाची काजळी| फेडूनि विवेक दीप उजळी| तै योगिया पाहे दिवाळी| निरंतर||
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत दिवाळीतल्या दिव्याचा धर्म या भाषेत सांगितला आहे. विवेकरुपी दिव्याला आलेली अविचाराची काजळी झाडून दिवा प्रज्वलित होतो, तसा दिवा योगी ( ज्ञानी) व्यक्तीच्या हृदयात अखंड तेवत असतो. दिवाळीचा प्रकाशही तसाच निरंतर राहायला हवा. विवेकाचं महत्त्व सांगताना ज्ञानदेवानी काजळी झडलेल्या ज्योतीची दिलेली जाणीव आज घडीला आपल्या समाजात सर्वाधिक महत्त्वाची आहे. या दिवाळीत जो प्रकाश जन्माला येईल, तो अविवेकाचा अंधार दूर करणारा, समाजमनात निरंतर तेवणारा प्रकाश असावा, ही प्रार्थना यावर्षी सर्वाधिक समर्पक ठरेल...
आपल्या समाजात पांडित्याची कमी नाही. बोलक्या विद्वानांचा तर 'सुकाळू' आहे. जगद्गुरु संत तुकोबारायांनी ज्यांच्याविषयी 'बोले तैसा चाले| त्याची वंदीन पाऊले||' असं म्हटलं होतं, तशा व्यक्ती समाजात किती आहेत? त्यांचाही दुष्काळच आहे. समाजाचा सद्सद् विवेक जागृत होण्यासाठी अशा सदाचरणी व्यक्तींची आपल्याला तीव्र गरज आहे. ज्ञानदेवांनी भाविक आणि त्याचा ईश्वर यातलं द्वैत संपण्याच्या स्थितीचं वर्णन करताना दिवा आणि दिव्याच्या प्रकाशाचा जो दृष्टांत दिला आहे, त्याचा संदर्भ घेऊन ज्ञानेश्वरीतील ओवींतूनच सांगायचं, तर
दीपा आणि प्रकाशा| एकवींकीचा पाडु जैसा| तो माझां ठायी तैसा| मी तयामाजीं||
वाचा आणि कृती यात कमीत कमी अंतर असलेल्यांची संख्या समाजात जसजशी वाढेल, तसतसं समाजाचं नैतिक बळ वाढत जाईल. दंभ आणि परोपदेशी पांडित्याने लदबदलेल्या अशा वांझ दीपस्तंभांतला अंधार उघडा पडेल आणि सामाजिक व्यवहार पारदर्शी होतील, तेव्हांच समाजाची पावलं उज्वल भविष्याकडे पडू लागतील. त्या पावलांना प्रकाशाची आस लागेल...
दिवाळीतली रोषणाई, फटाक्यांची पर्यावरणस्नेही आतषबाजी, पंचपक्वानाची मेजवानी करावीच. अंतःकरण आनंदाने उजळण्यासाठी तेही आवश्यकच आहे. ते उजळलं नाही आणि अंधारंच राहिलं, तर अंधाराचंच साम्राज्य अधिक दाट होईल! म्हणून ज्यांना शक्य आहे, त्यांनी ते करावंच. फक्त ते करताना ज्यांचे हात अशा दिवाळीपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांची आठवण ठेवावी, एवढीच अपेक्षा. दुसऱ्याच्या आयुष्यातला अंध:कार मिटवण्याची जाणीव असेल, तरच या बाह्योपचारांपलिकडचा तुमच्या हृदयातला अंधकार नष्ट होईल. दिव्याचं बटन दाबलं, की प्रकाश पडतो. बाहेरचा अंधार मिटतो. आतल्या अंधाराचं काय? दिवाळी खरंतर त्यासाठी आहे. दिवाळीतले सगळे दिनविशेष याच संस्कारांचे आहेत. ते संस्कार झाले, तरच दिवाळी 'साजरी' झाली, असं म्हणता येईल. तुमची दिवाळी अशी संस्कारसंपृक्त, सार्थ; ज्ञानदेवांच्याच भाषेत 'दिपांच्या कोडी जैसे| एकची तेज सरिसे' - म्हणजे, दिवे कितीही असोत, त्यांच्या ज्योतीचे तेज समभावानेच भारलेले असते - हा साक्षात्कार देणारी ठरो, हीच मनःपूर्वक सदिच्छा...






