आजोळचे दिवस

1

अलीकडे कोकण परिसरात विशेषत: मालवणी मुलखात समुद्रकिनारी उघडलेल्या ब-याच रिसॉर्ट्सना ‘मामाचा वाडा’, ‘माझे आजोळ’,‘आजी-आजोबांच्या घरात’ अशी आकर्षक नावे दिलेली आहेत! तेथे मालवणी पद्धतीचे लज्जतदार जेवण, कोकणातील आजोळाचे आभास निर्माण करणारी कौलारू घरे, हिरव्यागार शेणाने सारविलेली अंगणे आणि उंच उंच झोपाळे आदी सर्व काही कृत्रिमरित्या सजवलेले असूनही त्याच्यातील तो सहवास, त्या मुलांना आजोळचा आनंद किती देतो? हा तर प्रश्नच आहे! अगदी तीन-चार दिवसाच्या निवासाची महागडी बिले देऊनही तेथील ‘आजोळचे दिवस’ मुलांच्या अंत:करणात घरही करू शकणार नाहीत आणि आजोळची संकल्पनाही त्यांना पटवून देऊ शकणार नाहीत. पण त्याला त्या बिचा-या पालकांचाही इलाज नाही! अलीकडे मुलांच्या आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या आजोळचे मामा-मामीदेखील नोकरीला? त्यामुळे प्रश्न असा पडतो की ‘‘त्या मुलांना कोण दाखविणार असे ‘आजोळचे दिवस’.. ?’’ की जे आम्ही उपभोगले आणि ‘अत्तराची कुपी, म्हणूनही अजूनही जपून ठेवलेत, अगदी हृदयाच्या गाभा-यात !

आता एकविसाव्या शतकात पालक आपापल्या लाडक्या मुलांना त्यांच्या त्यांच्या मगदुराप्रमाणे ‘मुल मागेल ती वस्तू घेऊन देऊ शकतात! अगदी महागडया इलेक्ट्रॉनिक खेळण्यापासून ते चांगल्या कपंनीच्या उत्तमोत्तम मोबाईलपर्यंत! आणि याला कारणही तसेच, पालकांची वाढत चाललेली ‘क्रयशक्ती’, दोघा-तिघांचंच मर्यादित कुटुंब! त्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा, जवळच्या नातेसंबंधाचा अभाव, त्यामुळे वैतागलेल्या लाडक्या मुलांना आजचे पालक अगदी ‘अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा’ही विकत घेऊन देऊ शकतील! मात्र आजच्या मुलाने जरी हट्टाने मागितले तरी ‘आजोळच्या दिवसांचे सुख’ हे पालक आपल्या मुलांना कदापिही देऊ शकणार नाहीत! की ज्या आजोळच्या दिवसांचे ‘स्वर्गीय सुख’ माझ्या पिढीच्या अनेकांनी अनुभवले, अगदी मनमुराद!!

अलीकडे कोकण परिसरात विशेषत: मालवणी मुलखात समुद्रकिनारी उघडलेल्या ब-याच रिसॉर्ट्सना ‘मामाचा वाडा’, ‘माझे आजोळ’,‘आजी-आजोबांच्या घरात’ अशी आकर्षक नावे दिलेली आहेत! तेथे मालवणी पद्धतीचे लज्जतदार जेवण, कोकणातील आजोळचे आभास निर्माण करणारी कौलारू घरे, हिरव्यागार शेणाने सारविलेली अंगणे आणि उंच उंच झोपाळे आदी सर्वकाही कृत्रिमरित्या सजवलेले असूनही त्याच्यातील तो सहवास, त्या मुलांना आजोळचा आनंद किती देतो? हा तर प्रश्नच आहे! अगदी तीन-चार दिवसाच्या निवासाची महागडी बिले देऊनही तेथील ‘आजोळचे दिवस’ मुलांच्या अंत:करणात घरही करू शकणार नाहीत आणि आजोळची संकल्पनाही त्यांना पटवून देऊ शकणार नाहीत. पण त्याला त्या बिचा-या पालकांचाही इलाज नाही! अलीकडे मुलांच्या आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या आजोळचे मामा-मामीदेखील नोकरीला? त्यामुळे प्रश्न असा पडतो की ‘‘त्या मुलांना कोण दाखविणार असे ‘आजोळचे दिवस’..?’’ की जे आम्ही उपभोगले आणि ‘अत्तराची कुपी, म्हणूनही अजूनही जपून ठेवलेत, अगदी
हृदयाच्या गाभा-यात !

तसे माझे आजोळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात ‘परुळे’ गावात! चांगल्या बत्तीस वाडय़ांचा तो मोठा गाव! (आता त्या गावात छोटया छोटया ग्रुप ग्रामपंचायती होऊन तो गाव सात-आठ गावात विभागला गेला आहे) या गावात ‘नमस’ या वाडीत ‘सिताराम विष्णू सामंत’ ऊर्फ तातू नमस्कर यांचे घर हेच माझे आजोळ! या नमस वाडीवर इनमीन फक्त पाचच बामणांची घरे! ती देखील सर्व सामंतांचीच! नमसवाडीतील सामंत म्हणून परिसरात त्या सामंतांना ‘नमस्कर सामंत’ म्हणायचे. ‘तातू नमस्कर’ हे माझे मोठे मामा. त्या गावातील त्या परिसरातील आणि त्या काळातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्त्व! अगदी परुळे हायस्कूलच्या जडणघडणीपासून गावात, एस. टी. सुरू करेपर्यंत आणि जिल्ह्याच्या राजकारणापासून स्थानिक सहकारी सोसायटीच्या राजकारणापर्यंत त्याचा सहभाग हा ‘सिंहाचाच वाटा’ असायचा. त्या काळी परुळे गावातील प्रमुख तीन-चार व्यक्तीत अगदी अग्रक्रमाने घ्यावे असे नाव म्हणजे ‘तातू नमस्कर’!

अशा ‘दणदणीत आजोळी’ आमच्या आजोळच्या सहवासातील दिवस देखील तसेच दणदणीत गेले! माझे वडील गोव्यात म्हापसा येथे शिक्षक म्हणून नोकरीला! आई आणि आम्ही पाच भावंडे आच-यात कायमस्वरूपी वास्तव्यास! इतर कुठेही जाणे-येणे नाही. त्यामुळे दिवाळीची आणि मे महिन्याची सुट्टी कधी पडते आणि कधी एकदा आम्ही आजोळ गाठतो असे आम्हाला व्हायचे. आमच्या सोबत आजोळी येणारी आमच्या मावशींची मुले असायची. वालावलीच्या मावशीचा मुलगा, देवबागच्या मावशीची मुले, मुंबईच्या दोन मावशींची मुले असा सर्व परिवार आमच्या आजोळी जमायचा. अगदी स्नेहमेळा जणू दरवर्षीचाच!!

माझे आजोबा ‘कै. विष्णू सिताराम सामंत’ यांची मुंबईला पेढी होती. तीही एका गुजराती ‘रसिकलाल’ नावाच्या व्यापा-यासोबत ‘रसिकलाल-विष्णू’ या दोघांच्या संयुक्त नावाने त्या पेढीचा कारभार चालायचा म्हणे. पण ते सुख मी काही बघितले नाही, कारण माझ्या आजोळी माझा जन्म आणि माझ्या आजोबांचे निधन एकाच (सुमुहूर्तावर?) झाले. त्यामुळे पूर्वीच्या कथा या सर्व आईकडूनच ऐकलेल्या अगदी सांगोवांगी!

आजोबांच्या मृत्यूनंतर माझा तातामामांकडून तो ‘पेढीचा राज्यशकट’ काही पुढे चालू शकला नाही. तो त्या व्यापारात कधी रमलाच नाही. नाही म्हणायला त्याने कोणत्या तरी सिने कंपनीत थोडे दिवस सहकारी म्हणून उमेदवारी केली आणि त्याच जोरावर तो आम्हाला सिनेमाच्या, शूटिंगच्या गप्पा सांगायचा. ब्रह्मचारी पिक्र,
मा. विनायक, मीनाक्षी यांचा अभिनय आणि ‘यमुना जळी खेळ खेळू कन्हया का लाजता’ या प्रसंगाच्या शूटिंगच्या कथा रंगवून सांगायचा! या लघुउद्योगानंतर तो गावीच आला.

तेथेच रमला, अगदी अखेपर्यंत! आमचे भाग्य दुसरे काय? तर माझ्या आजोळी माझा तातामामा (कै. सिताराम विष्णू सामंत) माझी मामी, त्यांची दोन मुले, माझी विधवा आजी (ती देखील माझ्या आईची सख्खी चुलती) माझे चुलत मामा भाऊमामा (सदानंद सामंत) असा परिवार असायचा! माझे दुसरे एक मामा, भाईमामा (रमाकांत सामंत) हे कायम वास्तव्यास मुंबईत असायचे. त्यांचे त्यावेळी परुळे येथे येणे जरा कमीच. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा सहवास आम्हाला त्यावेळी अल्पच लाभायचा!

देवबागची ताईमावशी आणि तिची मुले, वालावलीची बाईमावशी आणि तिचा मुलगा, मुंबईची लीलामावशी, विमामावशी यांच्याही मुलांचा परिवार कधीकधी मे महिन्यात ‘नमस’ मुक्कामी आमच्यासोबत असायचा. पण आम्हा आच-याच्या भावंडांचा मुक्काम मात्र त्याकाळी कायम मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीत ‘नमस’ येथे ठरलेलाच!
‘‘आजोळी जाण्यासाठी ‘झुकझुक करणारी आणि धुरांच्या रेषा हवेत सोडणारी आगगाडी’ काही त्यावेळी नव्हती!

आम्ही चालत चालतच मालवण, तेथून सव्‍‌र्हिस मोटारने देवबाग आणि देवबागच्या ताई मावशीकडे (आप्पा आजगावकर आणि कंपनी) मुक्काम करून होडीने ‘नमशीला’ जायचो! नमशीला आजोळ आमची वाटच बघत असायचं! अस्सल मालवणी बोलणारा, पण चांदोमामापेक्षाही मनाने शीतल, असा माझा तातामामा, आईपेक्षा कितीतरी पटीने प्रेमळ वाटणारी माझी मामी, चुलत असूनही चुलत अशी कधीही न वाटलेली आणि जिच्या हाताला ‘अमृताची पैजा जिंकण्याची चव’ होती अशी माझी माई आजी, कमी बोलणारा; पण हृदयापासून प्रेम करणारा आणि अविवाहित राहून आजोळसाठी कष्ट उपसणारा असा माझा भाऊमामा तसेच मोठया मामाची दोन मुले, दादा आणि नयन. या सहा माणसांच्या बारा डोळयातून आमचे आजोळ जणू आमची वाट बघत आहे असेच आम्हाला वाटायचे.

आजोळी आमच्या छोटया कंपनीचाच मुक्काम असायचा. घरची वडील माणसे आम्हाला आजोळी सोडून आपापल्या घरी परतायची. त्याकाळी नमशीला जमणा-या दहा-पंधरा मुलांच्या दंग्याला माझे आजोळ कधी कंटाळले नाही. मामीची माया, तातामामा आणि भाऊमामांचा आवश्यक असेल तेव्हा धाक, माईआजीच्या सूचक सूचना आणि अगदी चोवीस तास ‘खाव जाव घर तुम्हारा’ असे मोकळे वातावरण! त्यामुळे आजोळचे वास्तव्य आम्हाला अधिकच स्वर्गीय वाटायचे.

चालत-चालत, सव्‍‌र्हिस मोटारीने, होडीतून असा तिहेरी प्रवास करून आम्ही संध्याकाळी आजोळी पोहोचायचो. हात-पाय धुऊन सगळी चौकशी झाल्यावर, सगळय़ांचे सामूहिक स्नान खालच्या विहिरीवर व्हायचे! माझ्या मामाचे घर मोठे चौसोपी होते!

अगदी ‘वाडा चिरेबंदी’ टाईप! आजोबांनीच ते बांधले होते. दोन्ही मामांनी नारळाची बाग आणि गावचा शेती व्यवसाय करून त्यात भर घातली. घराच्या खालच्या परडयात माडाचे बन आणि तेथेच आमची आंघोळीची विहीर! बाजूलाच पाण्याने भरलेली डोणी! अगदी चिरेबंदी आणि ऐस-पैस बांधलेली! तीच आमची सर्वाची आंघोळीची डोणी!
त्या विहिरीजवळ तातामामा सगळय़ांच्या डोक्यावर हातलाठीने दोन-दोन कोळंबी पाणी घालून आमची ‘सामूहिक आंघोळ’ उरकायचा. त्यानंतर कसेबसे अंग पुसून, दंगा मस्ती करत आम्ही वरच्या पडवीत यायचो. तेथे मामी आमची वाटच बघत असायची. ती आमची ओली डोकी पुन्हा सुक्या टॉवेलने खसखशीत पुसून काढायची.

प्रवासात कुठे पायाला जखम झाली असेल तर ‘पंडित रंजन’ नावाचे मलम लावायची. त्या मलमाने आमच्या सर्व वेदना दूर व्हायच्या. त्या मलमात काय गुण होता हे मला ठाऊक नाही. पण मामीच्या बोटांचा प्रेमळ स्पर्श आमचा शिणवा दूर घालवायचा! त्या काळी ‘पंडित रंजन’ नावाचे मलम माझ्या आजोळी ‘रोग अनेक उपाय एक’ या उक्तीप्रमाणे सर्वच वेदनांवरती वापरले जायचे. मी मोठा झाल्यावर त्याची सर्व केमिस्ट आणि ड्रगिस्टकडे चौकशी केली, पण मला ते कुठेच आढळले नाही.

मामी आमची डोकी पुसते न पुसते तोपर्यंत माईआजीने माजघरात हापूस आंब्याची रास कापून घातलेली असायची. त्यांचे वाटे केलेले असायचे, आंब्यांना तोटा नसायचा, मात्र अधाशासारखे खात-खात आम्हीच दमून जायचो. ती गिरण चालू असतानाच तातामामा, माईआजी, मामी, भाऊमामा मध्ये मध्ये प्रश्न विचारून आमच्या घरची खुशाली घ्यायचे. ‘‘बाया कसा आसा?’’ आप्पा काय म्हणतत? नवीन घेतलेली म्हैस दूध देता काय?’’ आदी एक ना अनेक! भल्या मोठया आडाळयावर कापून फोडीत रूपांतरीत होणारे रसरशीत हापूस आंबे आणि आमचा चालू असलेला गिरणीचा पट्टा यात त्यांचे ते ‘खुशालीचे प्रश्न’ आम्हाला नकोसेच वाटायचे! दादा व नयन ही मामे भावंडे आणि आम्ही सर्वाच्या दंगामस्तीला जी त्यावेळेपासून सुरुवात व्हायची ती महिन्याभरानंतर पुन्हा घरी येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालू असायची.

तिन्ही सांज होताच सर्वाचीच एकत्र पर्वजा व्हायची! माझ्या आजोळी तबला, पेटी, झांज आदी संगीताचे साहित्य होते. मामा सगळय़ांना घेऊन भजनाला बसायचा. आज भाचवंडे आल्यामुळे तो भजनात जास्तच रंग भरायचा. सप्तसूर लावून आणि नाकातून वेगळा आवाज काढत भजन सुरू करायचा. ‘वसुदे वसुतं देवं’पासून सुरू झालेले त्याचे भजन फारच लांबायचे. आमचे सारे लक्ष मात्र भजनापेक्षा मामीने नैवेद्याला ठेवलेले काजूगर, कापेगरे आणि सुके खोबरे यांच्याकडेच जास्त असायचे.

जेवणानंतर पत्त्यांचा डाव रंगायचा. मामा सगळय़ांना घेऊन आमच्या सोबत ‘झब्बू’ खेळायचा! मी पत्त्याच्या पानांची सहज अदलाबदल करत असे म्हणून माझ्यावर बारीक लक्ष ठेवायचा. एवढा मोठा आमचा तालेवार, तातामामा, आम्हा छोटया भाचवंडांसोबत झब्बू खेळतो आहे हे दृश्यही साठ वर्षापूर्वी अगदी फोटो काढून ठेवण्यासारखे असायचे; पण त्याकाळी आमच्याकडे कॅमेराच नव्हता. कॅमेरा असला असता तर ते फोटोही आज खराब झाले असते. पण ‘मनाच्या कॅमे-यात बंद केलेले ते दृश्य’ आम्हा भाचवंडांच्या हृदयात अजूनही चिरंतन आहे. लाईफ लाँग..!

पत्त्यांचा डाव झाल्यानंतर जेवणे व्हायची. स्वयंपाकाचा आणि रणरणत्या चुलीचा ताबा माझ्या आजोळी माईआजीकडेच होता. तिच्या हाताला सुगरणीची चव होती. तिने केलेली ‘सुळयाची आमटी’, ‘कालवाचे झणझणीत’, ‘मुळयाची एकशिपी’ आदी पदार्थाची आठवण झाली तरी आजही तोंडाला पाणी सुटते! अशा माईआजीच्या झणझणीत जेवणावर ताव मारल्यावर आम्हा समस्त मामे-मावस भाचवंडांच्या पोटाच्या टिमकीच्या स्पर्धा लागायच्या! कुणाची पोटाची टिमकी जास्त वर आली, यात आम्ही भाव खायचो. ‘‘पेटून जेवणे अन् रेटून ते खाऽऽणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे.’’ असे काही व्हायचे.

रात्री मालवणी नटसम्राट ‘मच्छिंद्र कांबळीच्या’ मालवणी बोलीलाही लाजवेल असे आमच्या तातामामाचे लाजवाब ‘मालवणी कथाकथन’ ते ऐकत ऐकत मामीने घातलेल्या अंथरुणावर आम्ही भाचवंडे झोपी जायचो. आमच्या अंगावर घातलेल्या त्या रजईला, त्या गोधडीला चांगली उब असायची. कारण त्या सर्व गोधडया उत्कृष्ट हाती कटिंग करून फुलांपक्षांचे आकार देऊन ‘टाकाऊतून टिकाऊ’ कसे करता येतील याची सगळी काळजी घेऊनच मामीने शिवलेल्या असायच्या! म्हणून त्या गोधडीला आगळीच उब असायची. रात्री त्या गोधडया डोक्यावर घेऊन आम्ही गोधडीच्या आत जागे राहून कुजबुजत असू ‘आता झोपलात नाय तर एकेकाच्या ढुंगणांवर ख्वाट लाऊची लागतली माका’ या तातामामाच्या धमकीने समईच्या अंधरात आम्ही लगेच चिडीचूप होऊन झोपी जायचो.

सकाळी उशिरा तातामामाच्या ओरडण्यानेच आम्हाला जाग यायची. ‘‘आता उठतास का घालू एकेकाच्या ढुंगणावर लाथ, नव वाजान गेले.’’ या तातामामाच्या धमकीवजा मालवणी (सुमधुर) भूपाळीने आम्हाला जाग यायची. नंतर भाकरीला लावलेले घरगुती गाईचे रवाळ तूप, कधी कधी चून मसाला भाकरी असा चहा-भाकरीचा फक्कड नाष्टा व्हायचा. त्यानंतर ताता मामांसोबत परडयात काजू वेचणे,

आंबे काढणे, नारळ गोळा करणे आदी आमचे उद्योग! ते त्यांना नकोसे वाटत असत, कारण आमच्या आजोळी कामालाच दहा पंधरा गडी माणसे कायमचीच असल्याने आमचे त्यात लुडबुडणे ही तशी त्यांना अडचणच व्हायची. पण आमच्या दोन्ही मामांची त्याबाबत कधीच तक्रार नसायची. दुपारी कर्लीच्या नदीत यथेच्छ डुंबणे,
होडया चालविणे, कधी कधी कालवे, मुळे काढणे, त्यानंतर आंघोळ, पुन्हा आंब्यांचा फडशा, पुन्हा मामीचे पायाला मलम लावणे त्यांनतर मस्तपैकी लोणचे आणि आंबाडयाबरोबर उकडया पेजेवर येथेच्छ ताव. अन् पुन्हा टिमकी स्पर्धा! पुन्हा पत्त्याचे डाव! त्या मोठया वाडावजा घरात दिवसाढवळया आमचा दडाकूकू (लपाछपी) चालायचा. आमच्या आजोळी ज्या खोलीत आम्हा सर्व मामे-मावस अशा भावंडांचा जन्म झाला अशी एक काळोखाची खोली होती की जिला फक्त एकच छोटी खिडकी होती! ही आमची लपण्याची खास जागा असायची.

दंगा जर जास्तच झाला तर ताता मामा ओरडायचा. पण त्याचे ओरडणे ओठातून जास्त पोटातून कमी असायचे. कधी-कधी संध्याकाळी मामी आम्हाला जवळच्या देवळात असलेले मणेरीकरांचे किंवा अन्य बुवांचे सुश्राव्य कीर्तन किंवा पार्सेकर, कलेश्वरकर या दशावतारी मंडळाचे दहीकाले, देवबागला होणारी मच्छीमार मंडळाची नाटके आदी बघायला घेऊन जायची. माझ्या मामीला आधुनिकतेची ओढ त्याकाळी पुष्कळ होती. मला सर्व जण घरी ‘बंडू’ या टोपण नावाने संबोधित असत, असे असले तरीही माझी मामी मला ‘सुरेश’ म्हणायची! त्याचंच मला त्याकाळी फार अप्रूप वाटायचं. आणि म्हणूनच माझी मामी मला जास्त जवळची वाटायची.

मामीला तिच्या माहेरचे अगदी जवळचे असे कोणीही नव्हते. ती आपल्या मुलांवर जशी आणि जेवढी माया करायची, तेवढीच निरपेक्ष माया आम्हा भाचवंडांवर करायची! ती जिजाबाईसारखे आडवे कुंकू लावायची. तिची ती ‘चिरी’ तिच्या रूपवान चेह-यावर अधिकच खुलून दिसायची. आम्हा साऱ्यांचे कपडे स्वच्छ धुणे, फाटलेले कपडे ‘रफू’ करणे, त्यांना गादीखाली घालून परिटघडी करणे आदी कामे मामी अगदी सहजतेने करायची. आज माझा तातामामा, माझी मामी, माईआजी ही माणसे हयात नाहीत. ती हे जग सोडून केव्हाच दूरच्या प्रवासाला निघून गेली, परंतु त्यांनी दिलेल्या मायेने अजूनही डोळे पाणावून जातात. देवाने न मागता हे आम्हाला सारे दिलेले होते!

आज माझ्या आजोळी असलेले भाऊमामा, माझे मामेभाऊ (दादा नमस्कर) त्यांची पत्नी (रतन वहिनी) व मुले शिल्पा, प्रशांत आणि प्रिती या सर्वानाही या आजोळचा ओढीचा धागा अजूनही चिरंतन ठेवला आहे. आमच्या आजोळी मामांची शेतीची ठिकाणे वेगवेगळया भागात (बानाची वाडी, शिरडी, झरकुंबळ, कर्ली, तिनमाड, पाचमाड आदी) आम्ही तेथे गेल्यावर त्या-त्या ठिकाणात ब्राह्मण भोजने व्हायची. व्यक्तीश: माझ्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीत माझ्या आजोळचा, विशेषत: माझ्या तातामामाचा वाटा फार मोलाचा आणि महत्त्वाचा आहे.

आंब्यावर ताव मारणे, लपाछपी खेळणे, भेंडया लावणे, नदीत डुंबणे मामाबरोबर चुडीच्या प्रकाशात कर्ली नदीत कुल्र्या-मासे पकडणे, काजू, आंबे गोळा करणे, होडी चालविणे आदी आनंदात रंगलेल्या आमच्या बालपणीचा ‘मे’ महिना मृगाच्या चाहुलीने सात जूनला संपायचा! जड पावलांनी आम्ही सर्व आपआपल्या घरी परतायचो, पुन्हा पुढील येणा-या मे महिन्याची वाट पाहत आणि आजोळी केलेल्या गमती-जमती आठवत आणि मनात साठवत!

आज आमच्या तातामामाची सर्वच भाचवंडे पुरेपूर ‘ज्येष्ठ नागरिक’ झालेली आहेत. सर्वाचीच ‘साठी’ केव्हाच उलटून गेली आहे. मी देखील अलीकडेच एकसष्ट वर्षातून बासष्ठव्या वर्षात पदार्पण केले. अजूनही कधीकधी एकांतात असताना आजोळच्या आठवणींची तंद्री लागते. डोळे मिटतात, मन आजोळच्या उपभोगलेल्या स्वप्नरंजनात गुंग होऊन जाते आणि अचानक तातामामाचे ते शब्द कानी येतात.

‘‘अरे नव वाजान गेले, उठलास नाय तर एकेकाच्या ढुंगणावर ख्वाट मारतलंय’’ आणि त्या धक्क्याने मी पुन्हा दुर्दैवाने वर्तमानात येतो! डोळे ओलावतात..डोके जड होते..आणि कंठाशी आठवणींचा हुंदका दाटून येतो. तो काही काळ तेथेच थांबतो..!
असे होते आमचे आजोळचे दिवस..! साक्षात देवबाप्पालाही हेवा वाटावा असे..रम्य ते स्वर्गीय..!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version