Home मध्यंतर भन्नाट आडवाटेवरच आहुपे घाट

आडवाटेवरच आहुपे घाट

1

भीमाशंकर आणि माळशेज घाटाच्या सान्निध्यात आहुपे घाट हे नयनरम्य ठिकाण वसलं आहे. आडवाटेवरचं हे ठिकाण दुर्गम भागामध्ये मोडत असल्यामुळे तसं सामान्य लोकांना अपरिचित आहे. मात्र थोडी मेहनत करण्याची तयारी आणि निसर्गरम्य परिसरात भटकण्याची आवड असल्यास आडवाटेवरच्या या जागेला पावसाळ्यात भेट देण्यास काहीच हरकत नाही.

कल्याण-मुरबाड-खोपिवली या मार्गाने आहुपे घाटाच्या पायथ्याशी पोहोचता येतं. पायथ्यापासूनचा हा रस्ता पूर्णपणे घळीमधून जातो. त्यामुळे या वळणावर तीव्र चढ आणि उतार लागतात. बाजूची खोल दरीही आपली सोबत करते. साधारणपणे तीन तासात हा थरार संपवता येतो. पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक होतो, परंतु आजूबाजूचं आल्हाददायक वातावरण बघून आपल्या मनातील भीती पळून जाते. या भागात पाऊसही खूप पडतो. पाऊस संपल्यावर आणि हिवाळ्यात मात्र या मार्गावरून जाणं हा सुखद अनुभव असतो.

आहुपे घाट हा काही गड किंवा किल्ला नाही. त्यामुळे घाटात कोणतेही विशेष अवशेष सापडत नाहीत. तरीही आहुपे गाव मात्र बघण्यासारखं आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात पोहोचल्यावर थकवा क्षणात नाहीसा होतो. आहुपे घाटावरून आजूबाजूचं विहंगम दृश्य दिसतं. जवळच असलेला गोरखगड आणि मिच्छद्रगडाचा सुळका तर नजरच खिळवून ठेवतो. त्याच्या बाजूला सिद्धगड आहे. तसंच कल्याण-मुरबाड आणि माळशेज घाटाचा परिसरही न्याहाळता येतो. आहुपे गावामध्ये जेवण, नाश्ता आणि चहा-पाण्याची सोय होऊ शकते. हा घाट भीमाशंकरच्या जवळ असल्याने इथे दाट जंगल आहे.

पुण्यावरून चाकण-मंचर-घोडेगाव-डिभे धरण या मार्गाने स्वत:च्या गाडीने अथवा एस.टी.ने आहुपे गावामध्ये जाता येतं. खोपिवली गावामधून गिर्यारोहण करत आहुपे घाट बघणं अधिक चांगलं. आडवाटेवरच्या या ठिकाणी जास्त गर्दी नसते. त्यामुळे निसर्गरम्य वातावरण आणि शांतता अनुभवायला नक्कीच आहुपे घाट बघितला पाहिजे.

जेवणाची सोय खोपिवली आणि आहुपे गाव या दोन्ही ठिकाणी होते, पण थोडेसे कष्ट सोसून जरा जास्त साहित्य सोबत नेल्यास आपल्या स्वत:ची जेवणाची उत्तम सोय करता येते. धो धो पडणा-या पावसाबरोबर विहंगम दृश्य बघत मॅगी बनवून खाणं, हा केवळ अप्रतिम अनुभव. दळणवळणाच्या सोयी वाढल्यामुळे पुणे, मुंबई, नाशिकजवळील गडकिल्ल्यांवर जाणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. नेहमीचीच ट्रेकिंगची ठिकाणं बघून कंटाळा आलेल्यांनी थोडी वाट वाकडी करून आहुपे घाटाचं दर्शन नक्कीच घेतलं पाहिजे.

आहुपे घाटातून आपल्याला भीमाशंकर इथेही जाता येतं. थोडा वेळ जास्त असल्यास पावसाळ्यात भीमाशंकपर्यंत जाऊन ट्रेकिंगची मजा लुटता येईल. हा भाग अजून मुख्य प्रवाहात आला नसल्यामुळे इथे फारशा सोयीसुविधा मिळणार नाहीत, पण भटकंती करण्याचं स्वातंत्र्य मात्र नक्की मिळेल. तसंच दुर्गम भाग असल्यामुळे इतर अतिउत्साही पर्यटकांचा त्रासही होणार नाही.

मुंबई-पुण्यापासून फारसं लांब नसलेलं तरीही शहरी भागाच्या सान्निध्यात न आलेला भाग हेच या आहुपे घाटभागाचं वैशिष्टय़ म्हणता येईल. आहुपे गावातील लोक तसे अबोल आहेत, पण एकदा त्यांच्याशी मैत्री झाली की, ते आपल्याशी मनमोकळेपणाने संवाद साधतात. या घाटाची साधारण उंची ३,८५५ फूट एवढी आहे. राहण्याची सोय खोपिवली आणि आहुपे गाव या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये थोडी वाट वाकडी करून या जागेला अवश्य भेट द्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version