Home किलबिल आमची माती, आमचे खेळ- चोरचिठ्ठी

आमची माती, आमचे खेळ- चोरचिठ्ठी

0

उन्हाळा म्हटलं की, आपल्याला घरी बसून बैठे खेळ खेळणं जास्त सोयीचं वाटतं. कारण, उन्हात धावपळीचे खेळ खेळून आपण थकून जातो. अशा वेळी चोरचिठ्ठी हा खेळ खेळायला छान आहे. या खेळाची आणखी एक गंमत म्हणजे, या खेळात कोणताही खेळाडू बाद होत नाही. या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलीस असे पाच जण असतात आणि प्रत्येकाला गुण असतात. म्हणजे राजाला पन्नास, राणीला चाळीस, प्रधानाला तीस, पोलिसांना वीस आणि चोराला दहा गुण.

या खेळाची सुरुवात करताना वहीचं एक कोरं पान घ्यायचं. त्या पानाच्या पाच चिठ्ठय़ा करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलीस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचं आणि त्या गोलात कोणी एका मुलाने या सगळ्या चिठ्ठय़ा एकत्र करून उडवायच्या. प्रत्येक मुलाने आपापली चिठ्ठी उचलायची. चिठ्ठी उघडून पाहिल्यावर त्या चिठ्ठीत जे नाव असेल, ते कोणालाही सांगायचं नाही. ज्या मुलाच्या हाती ‘पोलीस’ असं लिहिलेली चिठ्ठी येईल, त्याने मात्र ते सगळ्यांसमोर जाहीर करायचं. नंतर पोलीस असलेल्या खेळाडूने ‘चोर’ कोण आहे हे ओळखायचं.

चोर ओळखायला त्याला कोणीही मदत करायची नाही. प्रत्येक खेळाडूने इशारे न करता, गुपचूप बसून राहायचं. जर त्या खेळाडूने चोराला बरोबर ओळखलं, तर तो जिंकला आणि चुकीचा चोर ओळखला, तर तो हरला. तो जिंकला, तर त्याला चोर आणि स्वत:चे मिळून तीस गुण मिळतील आणि हरला तर शून्य आणि ते तीस गुण चोराला जातील.

या खेळाच्या अशा अनेक फे-या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. मग पुन्हा चिठ्ठय़ा उडवून खेळ सुरू करायचा. हा खेळ तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही खेळू शकता. खेळाच्या शेवटी सगळ्यांचे गुण मोजले जातात, ज्याला सगळ्यात जास्त गुण असतील, तो ‘चोरचिठ्ठी’ खेळाचा विजेता बनतो आणि या खेळात चिठ्ठय़ा एकदाच बनवायच्या आणि त्या जपून वापरायच्या. अशाने वह्यांची पानं खराब होत नाहीत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version