Home एक्सक्लूसीव्ह उत्सवकाळातील एक खड्डा दोन हजारांना पडणार

उत्सवकाळातील एक खड्डा दोन हजारांना पडणार

1

गणेशोत्सवकाळात सार्वजनिक उत्सव मंडळाकडून रस्त्यांवर खोदलेले खड्डे न बुजवल्यास प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

मुंबई- गणेशोत्सवकाळात सार्वजनिक उत्सव मंडळाकडून रस्त्यांवर खोदलेले खड्डे न बुजवल्यास प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मुंबईतील सर्वच गणेशोत्सव मंडळांना हा नियम लागू असून मालमत्ताकरातून हा दंड वसूल केला जाईल, असे महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दंडाच्या रकमेची वसुली व परवानगीचा काहीएक संबंध नसून दंडामुळे गणेशोत्सवाची परवानगी नाकारली जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने नवसाची रांग व अन्य मंडपाच्या कामांसाठी रस्त्यांवर व विविध ठिकाणी खोदलेले खड्डे बुजवले नसल्याने त्यांना २३ लाख ५६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, आपण हे खड्डे खोदले नसल्याचा दावा करत या मंडळाने दंडाची रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांची परवानगी नाकारली जाईल, अशी उलटसुलट चर्चा रंगली असतानाच महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दंडाच्या रकमेची वसुली व परवानगी याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. लालबागच्या राजा मंडळाकडून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. ही रक्कम रोखून परवानगी नाकारणे योग्य ठरणार नसून ती रक्कम मालमत्ता करातून वसूल केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उत्सव साजरे करणा-या मंडळांना मंडप उभारण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी पालिकेतर्फे परवानगी दिली जात नाही. याकरता ड्रमचा किंवा कायमस्वरूपी खड्डा करून त्यात लोखंडी पाइप टाकून त्याला झाकण लावून बंद करण्याचे अन्य पर्याय पालिकेतर्फे सूचवण्यात आले आहेत. बरीच मंडळे रस्त्यांवर खड्डे खणून मंडप उभारतात. उत्सव संपल्यानंतरही ते बुजवत नाहीत. त्यामुळे अशा मंडळांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येक खड्ड्यांमागे दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय दरवर्षी घेतला जातो. यंदा हा नियम कडक करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

हा निर्णय सर्वच गणेशोत्सव मंडळांना लागू असून आजघडीला लालबागचा राजा मंडळाच्या दंडाची रक्कम माफ केली तर इतर मंडळांनाही तीच सवलत द्यावी लागेल. त्यामुळे दंडाची रक्कम वसूल केलीच जाईलच. – सीताराम कुंटे, आयुक्त, मुंबई महापालिका

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version