Home संपादकीय तात्पर्य उथळ पाण्याला खळखळाट फार

उथळ पाण्याला खळखळाट फार

1

महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येक नागरिकाने अगदी लहानपणापासूनच उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण ऐकली आहे. याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा टीव्ही माध्यमांच्या उथळपणामुळे समोर येतो आहे.

गत महिनाभरापासून महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील सर्वच दृकश्राव्य माध्यमांना प्रत्येक गोष्टीची शहानिशा न करताच नुसते ‘पळा पळा कोण पुढ पळे तो’ अशी घाई झालेली दिसते. मागच्या महिन्यात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदावर बसले. त्यानंतर माध्यमांनी नेहमीप्रमाणेच योगींच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्यासाठी जवळपास ३०० ते ४०० प्रतिनिधींचा ताफा योगींच्या दारात तैनात ठेवला होता. त्यातून मग योगींच्या घराचे सुशोभिकरण, वस्तू पवित्र करण्याचा सोहळा, त्याकरिता आलेले पुरोहित यांच्यापासून ते योगींनी दर दिवशी दर तासाला काय काय केले हे सांगताना कोणतीही कसर ठेवली नाही. हा अतिरेक कमी होता म्हणून की काय योगी आपले डोक्यावरचे केस कोठे कापतात, किती दिवसांनी कापतात, ते कापतो कोण, त्याचे कुल काय, अशा अनेक बाबींची चर्चा टीव्हीवरून घरबसल्या पाहायला मिळाली. असे अतिरेकी अनुभव देशातील जनतेला देण्याचे पुण्यकर्म नेहमीच घडत असते.

मागच्या आठवडय़ात रंगलेले ‘मोगली गर्ल’प्रकरण हा एक कहरच म्हणावा लागेल. एकतर ती निष्पाप मुलगी मतिमंद असावी हे प्रथमदर्शनी कळत होते. त्यात हा प्रकार जिथे घडला तो उत्तर प्रदेश म्हणजे आणखी अजब राज्य. नुकत्याच या राज्यात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांची परीक्षा घेतली, तीही अचानक. या परीक्षेत शिक्षकांना काही सोपी वाक्ये लिहायला सांगितली, तर या शिक्षकांनी ती हमखास चुकीची लिहिली. यावर कडी म्हणजे ‘हमको थोडी तैयारी करनी पडेगी’ अशी मल्लिनाथी करायलाही हे शिक्षक मागे राहिले नाहीत. तर अशा या देशातल्या सर्वात मोठय़ा राज्याच्या शिक्षकांची अवस्था मात्र अपवाद वगळता कोणत्याही चॅनेलला जगासमोर आणावी आणि या घटनेवर चर्चा करावी असे वाटले नाही. नव्हे हा विषयच अनेकांनी बातमीच्या रूपातही दाखवला नाही.

याच राज्यात दोन वर्षांपूर्वी एक मुलगी गायब होते. मात्र तिचा शोध घेतला जात नाही आणि अचानक पोलीस गस्तीच्या वेळी एक १० वर्षाची मुलगी माकडांच्या टोळक्यात सापडते. मुळातच मतिमंद असणारी ती मुलगी शहाण्यासारखी कशी वागेल? पण सगळ्यात आधी आमच्याकडे ‘ब्रेकिंग न्यूज’ कशी येईल याच्या शोधात आणि स्पर्धेत असणा-या झाडून सर्व टीव्ही माध्यमांनी या मुलीला ‘मोगली गर्ल’चा किताब देऊनही टाकला आणि चक्क दोन दिवस ही बातमी चालवली. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना ही आपलीच हरवलेली मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना आणि नंतर माध्यमांना भेटून याचा खुलासा केला आणि त्यानंतर ही बातमी पूर्ण थांबली. कारण तिच्यातला टीआरपी संपला होता. असे नेहमीच होते.

मध्यंतरी संघर्ष यात्रेचे खोडसाळ चित्र रंगविल्याने एका चॅनेलवर हल्लाबोल करण्यात आला होता. सोशल मीडिआयच्या माध्यमातून हे वॉर रंगल्यानंतर आमचे पेज लाईक केले का अशा जाहिराती करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. पण चौकातून धडे घेण्याचे सोडून नवे काही करतील तर ते शहाणे ठरतील या भीतीने सुधारायचेच नाही, असे काहीसे देशभरातल्या दृकश्राव्य माध्यमांनी ठरवल्याचे दिसते आहे. अमुक एक नेता अमुक एका पक्षात जातो किंवा नाही या सरळ घटनेला हाइप करीत साप साप भुई धोपट असे म्हणत गोंधळ घालण्याची गरज काय? असो, शेवटी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा आणि धोरणाचा भाग आहे, असे मानले तरी सलमान खानचे वडील, प्रसिद्ध संवाद लेखक सलीम खान यांनी माध्यमांच्या या बदलत्या परिस्थितीबद्दल, ‘आज कलमसे, कागजसे मै दंगा करनेवाला हॅूं, मीडिया की सच्चाई को मै नंगा करनेवाला हूँ..’ ही एक मार्मिक कविता केली आहे. ती अनेक घटनांवर आणि वास्तवतेवर प्रकाश टाकणारी आहे असे वाटते. उथळ पाण्याला फार खळखळाट असतो हे सुज्ञ जनता जाणतेच आहे. मात्र त्याचा अतिरेक झाला तर जनतेचा माध्यमांवरचा विश्वास उडत जातोय त्याचाही विचार व्हायला हवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version