Home Uncategorized कमी कष्टात कोंबडी देते पैसा

कमी कष्टात कोंबडी देते पैसा

6

कुक्कुटपालनामध्ये कोंबडया पाळताना आपण कशा पाळतो यालाही महत्त्व आहे. विशेष म्हणजे कुक्कुटपालनामध्ये कोंबडयांची घरे कशी बांधली जातात, यावर त्यांचे उत्पादनही अवलंबून आहे. कुक्कुटपालनातून छोटा-मोठा रोजगार सांभाळणारी अनेक कुटुंबे आहेत. ग्रामीण भागात घराघरात केले जाणारे कुक्कुटपालन हे चालता-बोलता पैसे देणारे आहे.

वडेसागुतीची लज्जत वाढवणा-या या व्यवसायात अलीकडे ब्रॉयलर कोंबडीची चलती वाढली आहे. पण गावठी कोंबडयांना असलेली मागणी आणि जिल्हाभरातून होणारा पुरवठा हे गणित अजूनही व्यस्तच आहे. या पार्श्वभूमीवर कुक्कुटपालन अधिकाधिक कसे करता येऊ शकेल याचा घेतलेला हा वेध..

कोंबडयांच्या घराची रचना व बांधणी

घरातील लांबी कितीही ठेवली तरी चालते, परंतु रुंदीकरणावर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त ३० ते ३५ फूट रुंदी असलेल्या घरात योग्य थंडावा, वायुवीजन व प्रकाश राहू शकतो. घराचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो.

कोंबडीच्या घरातील जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा किमान १ फूट उंचीवर असल्यास घरात ओल येत नाही. तसेच जमीन काँक्रिट अगर फरशा घालून पक्की केल्यास तिच्यात उंदीर, घुशी बिळे करू शकत नाहीत. जुने पक्षी गेल्यानंतर ती धुवून स्वच्छ करता येते.

घरांना रुंदीचे बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत ६ फूट उंचीचे दरवाजे व बाजूला खिडक्या ठेवाव्या लागतात. घराच्या लांबीचे बाजूंना २ फूट उंचीच्या विटांच्या भिंती असतात. त्यावर हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान ६ ते ८ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारलेली असते. घरांना लांबीच्या दोन्ही बाजूस अंतरा अंतराने ८ फूट उंचीचे लोखंडी किंवा काँक्रिटचे खांबे उभे केले जातात. त्यावर कैच्या चढवल्या जातात.

दोन कैचीतील अंतर १० फूट असते.

कैच्यांवर दुपाकी छप्पर इतर लोखंडी अँगल्सच्या आधाराने बसवले जाते. दोन्ही बाजूस ते ४ फूट पुढे काढल्याने कोंबडीघरात तिरका आडवा येणारा पाऊस जमिनीवर पडून लीटर ओले करीत नाही. घराची मधली उंची १२ ते १५ फूट व बाजूची उंची ७ ते ८ फूट ठेवल्याने छपरास योग्य टाळ मिळून पावसाचे पाणी झटकून ओघळून जाते. संपूर्ण घरात लाकडाऐवजी लोखंडाचा वापर केल्याने घर ब्लो लॅम्पने झाडून स्वच्छ व र्निजतूक करता येते. अशा घरात ढेकूण, गोचीड वगैरे कीटकांचा त्रास होत नाही.

घराभोवतीच्या आवारात स्वच्छता टिकवण्याच्या दृष्टीने घरे जवळजवळ बांधू नयेत. दोन घरांमध्ये ६० ते ८० फूट मोकळी जागा असावी. घराजवळ उंच झाडे नसावीत.

कोंबडया वाढवण्याच्या पद्धती

सध्या कोंबडया पाळण्याच्या दोन रूढ पद्धती आहेत. एक, डीप लीटर पद्धत, दुसरी, पिंजरा पद्धत. डीप लीटर पद्धतीमध्ये कोंबडीच्या घरात जमिनीवर ४ इंच जातीचा भाताचा तूस, शेंगाची टरफले अगर भुसा टाकून सर्व जमीन आच्छादित केली जाते. या तयार केलेल्या आच्छादनाच्या गादीस लीटर असे म्हणतात. त्यावरच खाद्यपाण्याची भांडी, अंडी घालण्याची कपाटे वगैरे उपकरणे ठेवून जमिनीवर कोंबडया सर्वकाळ वाढवल्या जातात. कोंबडीची विष्ठा जमिनीवरील लीटरमध्येच पडत असल्याने ते सतत हलवून कोरडे ठेवावे लागते.

लीटर थंडीच्या दिवसात ऊबदार व उन्हाळयात थंड राहात असल्याने पक्ष्यांना त्यावर स्वास्थ्य व आराम मिळतो. लीटर ओले राहत गेल्यास त्यामध्ये रोगजंतू निर्माण होतात. मुरलेल्या जुन्या लीटरचा खत म्हणून उत्तम उपयोग होतो.

पिंजरा पद्धतीत पक्षी जमिनीवर अगद पत्र्यावर पडत राहते. पिंजरा पद्धतीत एकेका कप्प्यात ठरावीक पिल्ले, पक्षी ठेवले जातात. पिंज-यापुढे खाद्य-पाण्याची स्वतंत्र भांडी, पन्हाळयापुढे जोडलेल्या असतात. पिंज-याचे एका रांगेत सारख्या मापाचे अनेक कप्पे असतात. लहान पिल्ले जोपासण्यासाठी ब्रुडर केज मध्यम आकाराचे ग्रोअर केज व अंडयावरील कोंबडयासाठी लेअर केज असे तीन प्रकारचे पिंजरे बनवले जातात. पिंजरे लोखंडी स्टँडवर उभे करून तारेने बांधलेले असतात.

पिंजरा पद्धतीचे फायदे
»   थोडया जागेत बरेच पक्षी ठेवता येतात.
»   कोंबडयांना स्वतंत्र कप्पे असल्याचे स्वच्छ खाद्य, पाणी मुबलक मिळू शकते.
»   कोंबडयांमध्ये आजाराचे प्रमाण कमी होते.
»   मनुष्यबळ कमी लागते.
»    सर्व कोंबडयांचे सहज निरीक्षण करता येत असल्याने आजारी कोंबडी समजते.
»   अंडी स्वच्छ व बिनडागाळलेली मिळतात.
»    खाद्याची नासधूस टळते.
»    लीटर घालण्याचा व ते हलवून कोरडे ठेवण्याचा त्रास वाचतो.

उपकरणे व अवजारे

कोंबडीपालन व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर मालकाला येणा-या पिलांच्या जोपासनेसाठी त्यांना लागणारी सर्व उपकरणे, इतर संकीर्ण अवजारे, खरेदी करून तयार ठेवावी लागतात. यासाठी सुरुवातीस त्याचा मोठा भांडवली खर्च होतो. परंतु दूरदृष्टीने विचार न करता स्वस्त घरे व उपकरणे तयार केली आणि त्यात जर काही राहून गेले तर कोंबडी पाळणा-यास ते आयुष्यभर जाचक ठरतात. कारण पुढे ती पक्ष्यांना व त्याची जोपासना करणा-या कर्मचा-यांना सतत गैरसोयीची वाटू लागतात.

पक्ष्यांना निरनिराळया प्रकारची व आकाराची उपकरणे लागतात. उदा. खाद्य खाण्यासाठी भांडी, पाण्याची भांडी, अंडी घालण्याच्या पेटया, कपाटे वगैरे ही उपकरणे अशा मापांची वापरता यावीत. तसेच ती रोजच्या वापरासाठी व स्वच्छ करण्यास सोपी व साधी असावीत. त्याप्रमाणे ती टिकाऊ, मजबूत, न गंजणारी व न गळणारी असावीत.

» खाद्याची भांडी (फीडर्स) : पक्ष्यांना खाद्य घालण्यासाठी दोन प्रकारची भांडी मिळतात.
»  गोल, उभी व टांगता येण्यासारखी भांडी (टय़ूब फीडर).
» लांबट, जमिनीवर आडवी ठेवता येण्यासारखी.

घरात ठेवण्यात येणा-या पक्ष्यांच्या वयानुसार व आकारानुसार त्यांना सहजपणे खाद्य खाण्यास किती जागा लागेल हे ठरवता येते. त्यावरून घरातील सर्व पक्ष्यांना खाद्यपात्राची एकूण लांबी अगर व्यास किती फूट असावा हे काढता येते. प्रतिपक्ष्यास तेवढी खाद्यपात्राची जागा दिली तर एकाच वेळी बहुतेक सर्व पक्षी घातलेले खाद्य आरामशीरपणे खाऊ शकतात.

घरातील पक्षी संख्येनुसार भांडी ठेवली नाहीत तर त्याचा पक्ष्यांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. खाद्यासाठी आपसात झुंबड होऊन चढाओढ लागल्याने सशक्त पक्षी आपल्या ताकदीच्या जोरावर पटापट खाऊन घेतात. अशक्त पक्ष्यांना खाद्य कमी मिळाल्याने ते मागास वाढीचे व दुबळे होत जातात. तसेच त्यामुळे ते रोगट, बुजरे व अनुत्पादक होतात. लांबट आडव्या भांडयात खाद्य संपताच ते लगेच १/३ एवढे एवढे भरावे लागते.

अंडी घालण्याची कपाटे : घरटी डीप लीटर पद्धतीमध्ये पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी ठरावीक आकाराच्या पेटया ठेवण्यात येतात. त्याची मोजमापे एका वेळी एकच पक्षी आत जाऊ शकेल येवढी असतात. त्या घरटयात पक्ष्याला अंड घालणे सोयीस्कर व सुरक्षित वाटते.

अंडयाची कपाटे एक मजली, दुमजलीसुद्धा बनवता येतात. एका मजल्यावर दोन ते पाच कप्पे केले जातात. त्यामुळे थोडया जागेत जास्त पक्ष्यांची सोय होते. पक्षी अंडयावर येण्यापूर्वी दोन आठवडे कपाटे ठेवल्याने पक्ष्यांना त्यांची सवय होते. पाच कोंबडयामागे एक पेटी पुरते. पेटया स्वच्छ ठेवत गेल्यास अंडी डागाळत नाहीत.

घरात लागणारी संकीर्ण अवजारे व उपकरणे पूर्वी वापरात आलेली काही उपकरणे आता कालबाहय़ ठरू लागलेली आहेत. नवीन पद्धतीची उपकरणे व अवजारे नंतरच्या काळी किफायतशीर ठरू लागतात. त्यामुळे श्रमही वाचतात व मजुरीचा खर्च बराच कमी होतो.

ब्रुडिंगसाठी लागणारी उपकरणे : पूर्वी पिल्ले वाढवण्यासाठी स्वतंत्र बंदिस्त घरे बांधण्याची पद्धत होती. परंतु लेअर फार्ममध्ये सध्या ब्रुडिंग व ग्रोईंगसाठी एक घर व अंडयाच्या पक्ष्यांसाठी वेगळे घर बांधण्याची पद्धत रूढ झालेली आहे. पिल्लांना उष्णता व ऊब देण्यासाठी
सर्वत्र बांबू-ब्रुडरमधील विजेच्या बल्बचाच उपयोग होतो.

काही लोक उष्णतेसाठी इलेक्ट्रिक हिटिंग कॉईल अगर हीट बल्बचा वापर करतात. परंतु तेवढी उष्णता कडक थंडीच्या काळात पुरू शकत नाही. तेव्हा खोलीतील एकूण तापमान वाढवण्यासाठी रॉकेलचे कंदील, बत्त्या, भूशाच्या शेगडया, कोळशाच्या शेगडया यांचाही ब्रुडर हाऊसमध्ये काही वेळा वापर केला जातो. शिवाय मधूनमधून वीज जाण्याचीही शक्यता असते.

बांबू-ब्रुडर-पहिल्या आठवडयातील तान्ही पिल्ले उबेसाठी दूर जाऊ नयेत म्हणून चिकगार्ड म्हणजेच पत्र्याच्या अगर हार्डबोर्डच्या एक फूट उंचीचे पट्टीचे कडे, गोलाकार पद्धतीने ब्रुडरपासून १६ ते २४ इंच अंतरावर लावले जाते. ब्रुडरखाली पाण्याची गोलाकार भांडी व थाळया ठेवल्या जातात.
खाद्याचीही भांडी बाजूला मांडली जातात.

पहिले दोन दिवस पिल्लांना भरडलेला बारीक मका, चिक बॉक्सच्या पुठ्ठयाच्या झाकणातच घालून ठेवण्याची पद्धत असते. नंतर पिल्ले थोडी मोठी झाल्यावर पिल्लांना मोठी जागा देऊन चिकगार्ड, झाकणे काढून टाकली जातात .

डी बिकिंग- सर्व वयातील पक्ष्यांना एकमेकांस टोचून घायाळ करण्याची वाईट खोड असते. त्याला इंग्रजीत कॅनिबॅलिझम किंवा पेकिंग असे म्हणतात. त्यावर एकमेव उपाय म्हणजे पक्ष्यांच्या चोची एकजात कापणे. चोची कापण्यासाठी डीबीकर नावाचे एक मशीन प्रत्येक फॉर्ममध्ये आवश्यक आहे. त्या यंत्रामुळे पक्ष्यांना किमान त्रास स्ट्रेस होतो.

एकदा चांगली कापून बोथट केलेली चोच फारशी वाढत नाही. या विजेवर चालणा-या यंत्रात एक तापून लाल भडक होणारे धारदार पाते असते. त्या पात्याने वरची व खालची चोच स्वतंत्रपणे कापली जाते. कापलेल्या चोचीस डाग मिळाल्याने रक्तस्रव होत नाही व काम झटपट होते.

वरची जाड चोच अर्धी व खालची पातळ चोच एक तृतीयांश कापल्याने दोन्ही चोची असमान व व्ही या आकाराच्या होतात. चोची कापल्याने पक्ष्यातील एकमेकांना टोचणे बंद होते. तसेच दाणे न टिपता संपूर्ण खाद्य खाणे पक्ष्यांना भाग पडते. पक्ष्यांचे संतुलित खाद्याने आरोग्य सुधारते.
डबिंग : कोंबडीच्या पिल्लांचा तुरा कापण्याच्या क्रियेला इंग्रजीत डबिंग असे म्हणतात.

विशेषत: नर पिल्ले सहा दिवसांची असताना त्यांचा तुरा एका विशिष्ट कात्रीने पुढून मागे मुळालगत कापला जातो. त्यामुळे पुढे सदर पैदाशीचा नर मोठा झाल्यावर आपसातील लढाईमुळे त्याचे तु-यास इजा होत नाही. आखूड तु-यामुळे दृष्टी चौफेर राहू शकते. काही ठिकाणी मादी पिल्लांमध्येसुद्धा हे छोटे ऑपरेशन केले जाते.

इतर आनुषंगिक उपकरणे

लाईट टाईमिंग डिव्हाईस : गजराचे घडयाळ तसे लावून ठेवल्यावर ठरावीक वेळेला गजर घंटा करते तसेच ठरावीक वेळेला फार्मचे दिवे लावण्याचे व बंद करण्याचे स्वयंचलित यंत्र बाजारात मिळते त्यात संगणकाचाही वापर केला जातो.

 शेलाग्रेट हॉपर :

अंडयावरील कोंबडयांना शिंपला खडे चुनखडी खाण्यास व त्यांना योग्य प्रमाणात कॅल्शियम हे खनिज देण्यासाठी पात्र ठेवावे लागते. असे स्वतंत्र ग्रिट ठेवण्यासाठी वेगळी भांडी मिळतात.

वेइंग मशीन :

खाद्य, औषधे, पक्ष्यांचे वजन, अंडयाचे वजन वगैरे गोष्टींसाठी बरोबर वजन करणारी लहान-मोठी उपकरणे फार्ममध्ये आवश्यक असतात. अशी लहानमोठी वजने बिनचूक सांगणारे तराजू व उपकरणे बाजारात मागणीनुसार मिळतात.

पक्षी पकडण्यासाठी सुविधा :

कळपातून नेमके पक्षी लांबून पकडण्यासाठी खास आकडया ठेवाव्या लागतात. कळपातील पक्ष्यांना आकारमानानुसार वेगळे करण्यासाठी जाळीच्या विभाजक भिंती तात्पुरत्या उभ्या कराव्या लागतात.

शीतपेटया :

लसी, औषधे थंड ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर, सोललेले पक्षी टिकवण्यासाठी डीप फ्रीजर मशीन व शीतगृहात अंडी सुरक्षित दर्जेदार ठेवण्यासाठी एग रूम कलर्स वगैरे मशीन मोठया फार्ममध्ये ठेवतात.

घरे थंड ठेवण्यासाठी आयुधे :

उन्हाळयात कोंबडयाची घरे थंड राहावी म्हणून फॉगर्स स्प्रिंकलर नावाची पाण्याचे तुषार फवारणारी आयुधे, एक्सॉस्ट फॅन वगैरे यंत्र उपयोगात आणली जातात.

पाणी पिण्याची आयुधे : मोठया फार्ममध्ये पक्ष्यांना पाणी पुरवण्यासाठी प्लास्टिक निपल्स, कॅप्स, ऑटोमॅटिक ड्रिंकर्स वगैरे स्वयंचलित भांडी ठरावीक अंतरावर टांगली जातात. इन्सीनरेटर-मेलेले पक्षी, सोललेल्या पक्ष्यांची पिसे जाळण्यासाठी फार्ममध्ये ही सुविधा आवश्यक ठरते.

होतकरू व्यावसायिकाने विचार करण्याजोग्या बाबी

होतकरू व्यावसायिकाला त्याचा विचारमंथनातून त्याच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल आणि तो आपल्या परिस्थितीशी अनुकूल असा निर्णय न सांगता घेऊ शकेल. त्याच्याकडून तेच अपेक्षित आहे. कारण दुस-याच्या सल्ल्यानुसार त्याचे अंधानुकरण केल्याने कदाचित व्यावसायिकाला नंतर पश्चात्ताप होण्याचीही शक्यता असते.

अर्थात या सर्व चिंता मध्यमवर्गीय माणसाच्या वाटयाला येतात. कारण श्रीमंतांना पैशाची दादात नसते. ते पैसा कोठूनही जमा करू शकतात आणि सल्ला व कामकाजासाठी नोकरही नेमू शकतात. परंतु सामान्यांना अनेक बाजूने व अनेक अंगाने विचार करावा लागतो.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक तरतूद कोणीही होतकरू व्यावसायिकाला धंद्यासाठी कर्ज हे द्यावेच लागते. मग कर्ज मिळाले की त्याचे पाठोपाठ व्याज व मुद्दलाची परतफेड सुरूच होते. म्हणून उसनवारी मिळवलेल्या पैशाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करून घेता येईल हे पाहिले पाहिजे.

आजच्या परिस्थिती टिकाऊ स्वरूपाच्या पोल्ट्री शेड्स, भांडीकुडी, उपकरणे, वीज-पाणी व्यवस्था यासाठी सुरुवातीस प्रतिपक्षी रु. ७० ते ७५ एवढा खर्च होतो. मग आपण नियोजित भांडवलात जास्तीत जास्त किती लेअर अगर ब्रॉयलर पक्षी करू शकतो याचे गणित मांडून नंतर वस्तूच्या अग्रक्रमानुसार किमान खरेदीस सुरुवात करणे योग्य ठरते.

खरेदी करताना आपल्या मूळ गरजा, परिसर, वातावरण, तापमान, पाऊस काळ याचेही भान ठेवावे लागते. स्थानिक परिस्थितीचा फारसा विचार न करता कित्येक फार्ममध्ये मजबुतीच्या नावाखाली इमारतींवर व उपकरणांवर अवाढव्य अनावश्यक खर्च केलेला दिसून येत आहे. त्यांना नंतर पक्षी संगोपनासाठी खेळते भांडवल अपुरे पडते आणि मग पक्ष्यांची आबाळ सुरू होते.

आपल्याकडे पक्षी मुख्यत: डीप लीटर पद्धतीने अगर पिंजरा पद्धतीनेच पाळले जातात. डीप लीटर पद्धतीत बांधकामासाठी व उपकरणे बनवण्यासाठी स्थानिक कारागिरांना बराच वाव असल्याने भांडवली खर्चाचे प्रमाण बरेचसे आटोक्यात राहू शकते.

परंतु पिंजरा पद्धतीत पक्षी वाढवू इच्छिणा-या व्यावसायिकाला शहरी उद्योजकांवरच अवलंबून राहावे लागते. कारण स्थानिक कारागीर योग्य यंत्रसामग्री, ज्ञान व अनुभव नसल्यामुळे घर व पिंजराबांधणीचे काम सुबकपणे हाताळू शकत नाहीत.
(संपर्क : ९३२३६९९८८७)

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version