Home महामुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीत नालेसफाईच्या कामांना अखेर मुहूर्त

कल्याण डोंबिवलीत नालेसफाईच्या कामांना अखेर मुहूर्त

1

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात नालेसफाईची कामे अडकून राहिल्याने पावसाच्या तोंडावर कल्याण डोंबिवली शहरातील नालेसफाईच्या कामांची बोंबाबोंब सुरू झाली होती.

कल्याण- लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात नालेसफाईची कामे अडकून राहिल्याने पावसाच्या तोंडावर कल्याण डोंबिवली शहरातील नालेसफाईच्या कामांची बोंबाबोंब सुरू झाली होती. मात्र उशिरा का होईना पालिकेला नालेसफाईच्या कामास मुहूर्त मिळाला असून अखेर नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात एकूण १३ मोठे नाले आहेत. पालिका क्षेत्रातील एकूण सहा प्रभाग क्षेत्रांतर्गत नालेसफाईचे कंत्राट देण्यात आले असून, एका प्रभाग क्षेत्रात दोन कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. मोठय़ा नाल्यांमधील गाळ जेसीबी व पोकलनच्या साहाय्याने साफ के ले जाणार आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात नालेसफाईच्या कामास सुरुवात होऊन, ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण होतात. यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नालेसफाईच्या कामास विलंब झाला आहे.

मे महिन्यातील १५ दिवस उलटल्यानंतर नालेसफाईच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण होतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शहरातील अंतर्गत गटार सफाईच्या कामांची कंत्राटे १४ मजूर सोसायट्यांना दिली आहेत. त्या कामांचा आढावा आयुक्तांनी स्वत: घेऊन कामांची व्हीडिओ छायाचित्रीकरण करण्याचे आदेशही संबंधित विभागाला दिले आहेत. मोठय़ा नाल्यांच्या साफसफाईकडेही आयुक्तांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. पावसाच्या तोंडावर नालेसफाईची कामे व्यवस्थितपणे पार न पडल्यास पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कोणते नाले आहेत?

अंबिकानगर, शहाड, गणपती मंदिर, चिकणघर, मिलिंदनगर, रामबाग, उंबर्डे, वाडेघर, गोदरेज हिल, लोकउद्यान, आधारवाडी, जरीमरीनगर, कोळसेवाडी, खडेगोळवली, ओमकारनगर लोकवाटिका, नंदादीपनगर, शिवाजी कॉलनी, लोकधारा, कांचनगाव, जलाराम मंदिर, नांदिवली, वसंतवाडी, रामचंद्रनगर, घनश्याम गुप्ते, भरत भोईरनगर आदी नाल्यांचा यात समावेश आहे.

पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती

कल्याण शहरातील झुंजारराव मार्केट नाला, बैलबाजार लोक उद्यान नाला, कल्याण रेल्वे बसस्थानक नाला, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक शेजारील नाला, खडेगोळवली नाला, तिसगाव नाला, वालधुनी नाला, लोकग्राम नाला आदी नाल्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. पावसाच्या तोंडावर नालेसफाईची कामे व्यवस्थितपणे न पार पडल्यास पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version