Home संपादकीय अग्रलेख कोकणातला शेतकरीसुद्धा..

कोकणातला शेतकरीसुद्धा..

1

कोकणचा आंबा बागायतदार शेतकरी पांडुरंग कोले या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली त्याला आता ७२ तास उलटून गेले. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशनंतर आता कोकणात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. 

कोकणचा आंबा बागायतदार शेतकरी पांडुरंग कोले या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली त्याला आता ७२ तास उलटून गेले. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशनंतर आता कोकणात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर गेल्या ५५ वर्षात कोकणातल्या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे केलेली ही पहिली आत्महत्या आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना या घटनेनंतरही कोले यांच्या कुटुंबीयांना भेटावे, सांत्वन करावे, असे वाटले नाही. याला निगरगट्टपणा म्हणतात. मंगळवार, ५ मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोकणात झालेल्या आत्महत्येबद्दल मंत्रिमंडळाला माहिती देणे, हे महसूल खात्याचे काम होते. कोकण आयुक्तांकडून त्याचा अहवाल महसूल मंत्र्यांकडे जाणे आवश्यक होते. महसूलमंत्र्यांनी याबाबतचा सगळा तपशील मंत्रिमंडळाला सांगणे गरजेचे होते.

मंत्रिमंडळ बैठकीला महसूलमंत्री खडसे हेच गैरहजर राहिले. त्यामुळे कोकणातल्या आंबा बागायतदाराने आत्महत्या केली आहे, याची माहिती ना महसूल विभागाने कळवली ना मंत्रिमंडळाने त्याची माहिती करून घेतली. विदर्भ, मराठवाडय़ात या वर्षभरात ४४७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. महसूलमंत्री खडसे ज्या विभागातून निवडून येतात, त्या खान्देशमधल्या २३ शेतक-यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. कोकण हा तसा म्हटला तर सुपीक विभाग. भरपूर पाऊस पडणारा विभाग. एकही टँकर चालू नसलेला विभाग. पाण्याची विपुलता. कधीही दुष्काळ नाही. भाताचे एक पीक हमखास.

त्याशिवाय हिरव्यागार भाज्या. उत्तम आंबा. असा सगळा शेतीच्या दृष्टीने समृद्धीचा विभाग म्हणून कोकणची महत्ता सर्वानाच माहिती आहे. नारायण राणे या विभागातून मंत्री झाल्यानंतर त्यांनी आणलेल्या अनेक प्रकल्पांमुळे या विभागाचा कायापालट झाला. पूर्वी मनिऑर्डरवर जगणारा हा विभाग दरडोई उत्पन्नामध्ये क्रमांक पाचवर येऊन पोहोचला. दहा साखर कारखाने असलेल्या सांगली जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा आज दरडोई उत्पन्नात मागे नाही.

असे असतानाही या विभागातल्या एका बागायदार शेतक-याला कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची पाळी येते आणि ही आत्महत्या सरकार दरबारी बेदखल असते, ही संतापजनक गोष्ट आहे. या विभागाचे आमदार नितेश राणे आत्महत्या झाल्याचे कळताच कुटुंबीयांच्या सांत्वनाला धावतात. आपल्या परीने एक लाख रुपयांची मदत देतात; पण ना सरकारचा कोणी प्रतिनिधी येत, ना पालकमंत्र्यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भेटायला सवड होत. साधी माणुसकीची सभ्यतासुद्धा पाळली जात नाही. त्यामुळे हे सरकार निर्ढावलेले आहे, असे म्हटले तर त्यात काहीच गैर नाही.

पांडुरंग कोले हा आंबा बागायतदार शेतकरी मूळचा कोकणातला नाही. तो पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात आलेला होता. गगनबावडय़ाचा घाट उतरला की, कोकण सुरू आणि गगनबावडय़ाचा घाट चढून गेले की, पश्चिम महाराष्ट्र सुरू. त्या पश्चिम महाराष्ट्रातून हे पांडुरंग कोले आंब्याची बाग करण्यासाठी १० वर्षापूर्वी कोकणात आले आणि त्यांनी आंब्याची एक बाग घेतली; पण लांबून हा व्यवसाय जेवढा फायद्याचा वाटतो तेवढा प्रत्यक्षात तसा तो नाही. हा व्यवसाय कटकटीचा आहे. शिवाय हे पीक नाशवंत आहे. ऊस आठ दिवस सुकत नाही. त्याचा उतारा कमी होत नाही; पण आंबा आठ दिवसांत विकला गेला नाही तर सगळेच आर्थिक गणित कोलमडते;

पण गेल्या काही वर्षात कोकणात आंबा बागायतदारही संकटात आले. आंब्याचे पीक हुकमी राहिलेले नाही. अवकाळी पावसाने आंब्याची कळाच गेली. आंब्याचे व्यापारशास्त्र असे आहे की, एकदा पाऊस पडला की, आंब्याची चव संपली, असे गिऱ्हाईकाला वाटते आणि आंबा बाजारात उठेनासा होतो. अशा अनेक कारणांनी गेल्या काही वर्षात आंब्याचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे. जे पांडुरंग कोले घाटावरून कोकणात व्यवसाय करण्याकरिता आले त्यांना गेली चार-पाच वर्षे वाढत्या किमतीने कर्जबाजारी केले. कारण रायवळ आंबा जसा बिनखताचा, बिनफवारणीचा तसा हापूस आंबा नाही.

आंब्याच्या कलमाला औषध फवारणी लागते आणि खतेही लागतात. खताचा आणि औषध फवारणीचा खर्च बेसुमार वाढला. शिवाय झाडावरून आंबा उतरवल्यानंतर आठ दिवसांत जर आंबा विक्री होऊन पैसा हातात आला नाही तर हा नाशवंत माल समजला जातो. त्यामुळे उत्पादन होईपर्यंतचा खर्च, शिवाय दलाल आंब्याचा भाव पाडूनच खरेदी करतात. त्यामुळे मिळणारे कमी उत्पन्न, याचा मेळ कुठेच बसत नाही. परिणामी सातत्याने आर्थिक नुकसान सोसावा लागणारा आंब्याचा बागायतदार कमालीचा अडचणीत येतो. कोले यांचे तसेच झाले.

ते कमालीचे अडचणीत आले. खर्चाची तोंडमिळवणी होईना. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे लगडलेला आंबा मातीमोल झाला. २४ तासांत काळे डाग पडून आंब्याचे पीक डोळय़ासमोर वाया जाताना दिसत होते. कोले यांची स्थिती तशीच झाली. सतत पाच वर्षे ते कर्जफेडीत अपयशी ठरले. उत्पन्नच नाही तर कर्ज फेडणार कुठून? बँकेचे व्याज वाढत चालले. नोटिसांवर नोटिसा आल्या. कोकणी माणसाची प्रवृत्ती सहसा बँकेकडून कर्ज घेण्याची नाही. तसे पाहिले तर कोणत्याच शेतक-याला कर्ज बुडवावे, असे कधीच वाटत नाही.

गेल्या वर्षभरात ४००पेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. कर्ज फेडू न शकल्यामुळे अपराधी भावनेने केलेल्या त्या आत्महत्या आहेत. महाराष्ट्राचा समग्र विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पिकाला कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी संरक्षण मिळते. कारण सर्वच पक्षातल्या साखर कारखानदारांचे साखर धंद्याशी हितसंबध निगडीत आहेत आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-याला मदतीचा हात द्यायला कोणतेही सरकार तत्पर असते.

त्यात अवाजवी काही नाही. कारण ग्रामीण भागात ऊस पिकवणा-या शेतक-यांमुळेच सहकार क्षेत्र फुलले आहे आणि रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. शिवाय प्रक्रिया उद्योगही मोठय़ा प्रमाणावर आहेत. कोकणामध्ये अजून प्रक्रिया उद्योगाला फार मोठी सुरुवात झालेली नाही. उलट आंबा बागायतदार शेतकरी आंब्याच्या दलालांकडून पैशांची उचल करतो आणि ही उचल घेतलेल्या रकमेवर १८ टक्के व्याजाने दिली जाते. हे १८ टक्के व्याज म्हणजे पठाणी व्याज आहे.

आंब्याचे उत्पादन हातात येण्यापूर्वी घेतलेले कर्ज फेडताना त्याची दमछाक होते आणि आंबा विक्रीत नुकसान झाले तर हातात येणारी रक्कम तुटपुंजी असल्यामुळे हा बागायतदार निकालातच निघतो. कोले यांचे तसेच झाले आणि त्यातून निराशेपोटी त्यांनी आत्महत्या केली. कोकणातल्या शेतक-यांवर ही वेळ यायची नसेल तर सरकारने गांभीर्याने हा विषय हाताळला पाहिजे.

1 COMMENT

  1. Aaila aapan aashya deshat rahto jithe Doodha peksha minaral waterchi kimat jasta aahe.
    minaral waterchi sadi bottle rs 20-22 rupies paryant bhette aani shetkarya kadun doodh 16-17 rupies ne kharedi kela jato yaar kiti hassyaspad aahe he sarv manje aata gavakadil lokani pravasat pani kharidnya peksha doodhch ghevun pravas karne parvdel nahi ka????
    shetkaryanchya aatmahatyevar(suside) var charchya jordar chalu aastat pan sadha vichar sudha he talu shakto ek te dedh varsha mage haach dar 22-24 rupies hota aani vikri sealing rate 40 rs hota aaj kharedi rate 16-17 aahe aani saleing rate same manje kai shetkaryanchi aani comman manchich marnar ka tumi???
    Kontari engraj Bharat sodun jatana bolala ho ta ki ya deshat paani sudda kharedi karave lagel. pan yaar tu thoda kami padlas ya deshat pani doodha peksha mahag ghava lagel bolayla hava hotas bhai tu aanles ha acche din aani hech aache din astil tar shetkaryala aajun vicharach karayla nako barobar na????
    Plz mazya eka que. cha ans dya ka karu naye shetkaryane aatmhatya???? kapus tutpunjya bhavat jato aani tyache kapde banlya nantar shetkari nusta tyacha bhavch baghto kanda oniyan kadhi comman manla radavto tar kadhi shetkaryala madhe sheticha vikas hota yava yasathi jod dhanda manun doodh dhanda chalu zala aani aaj jeva shtkaryane 1 lakh te 1.5 lakhchi loans kadun doodh vyavsay chalu kela tar doodhala rate nahi aaha loan kadlelya shetkaryane kai karaycha?????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version