Home महाराष्ट्र कोकण कोकण रेल्वेसाठी २०१३ ठरले विक्रमी वर्ष!

कोकण रेल्वेसाठी २०१३ ठरले विक्रमी वर्ष!

1

विशेष गाड्यांची संख्या असो की गेल्या वर्षीच्या तुलनेत गाडय़ांच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, कोकण रेल्वेने २०१३ मध्ये विविध विक्रम नोंदवले. 

संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी- विशेष गाड्यांची संख्या असो की गेल्या वर्षीच्या तुलनेत गाडय़ांच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, कोकण रेल्वेने २०१३ मध्ये विविध विक्रम नोंदवले. कोकण रेल्वेच्या इतिहासात प्रथमच कोकणातून शताब्दी एक्स्प्रेसही धावली. देशातील पसंतीच्या मार्गामध्ये आता कोकणातून जाणा-या रेल्वे मार्गाचाही समावेश झाला आहे. याचमुळे आगामी काळात भारतीय रेल्वेने कोकणातून गोव्यापर्यंत डबल डेकर सोडता येईल का, या दृष्टीने व्यवहार्यता तपासायला सुरुवात केली आहे.

कोकणात रेल्वे धावू लागल्याला जवळपास अडीच दशकांचा कालावधी लोटला. दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ तामिळनाडू या राज्यांना देशाच्या राजधानीशी जवळच्या अंतराने जोडणारा पर्याय उपलब्ध झाल्याने या मार्गाला प्रवाशांची पसंती वाढू लागली आहे. या मार्गावरून धावणा-या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या दर वर्षी वाढतच चालली आहे. मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊनच आता मार्गाचे दुपदरीकरण तसेच विद्युतीकरणाच्या हालचालींना गती देण्यात आली आहे. यापैकी विद्युतीकरणाच्या सर्वेक्षणाचे काम कोकण रेल्वेने स्वत:च हाती घेतले आहे.

कोकण रेल्वेने २०१३मध्ये सर्वाधिक विशेष गाडय़ा चालवण्याची नोंद केली. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, ख्रिसमस सणांसाठी विशेष गाडय़ा सोडल्या. कोकण रेल्वेने सरत्या वर्षात प्रथमच एटीटी-रत्नागिरी अशी दररोज सुटणारी विशेष गाडी होळी तसेच गणेशोत्सवादरम्यान चालवली.
याशिवाय लो. टिळक टर्मिनस-सावंतवाडी, मुंबई- पेडणे, सीएसटी-मडगाव आदी मार्गावर विशेष गाडय़ा सोडून कोकणात येणा-यांचा प्रवास सुकर बनवला. २०१२मध्ये कोकण रेल्वेने ५३७ विशेष गाडय़ा सोडल्या होत्या तर २०१३च्या डिसेंबरअखेर ही संख्या ८४४ इतकी आहे.

उत्पन्न तसेच जादा गाडय़ांचा आधीचा विक्रम मोडून कोकण रेल्वे आता नव्या विक्रमांसाठी सज्ज झाली आहे. २०१३ च्या हिवाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरून प्रथमच आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे गाडी धावली. भगत की कोठी (राजस्थान) ते एर्नाकुलम दरम्यान ही गाडी धावली. राजस्थानमधील जोधपूरनजीकचे भगत की कोठी हे स्थानक हे भारत-पाकिस्तानला जोडणारे स्थानक आहे. या स्थानकावरून दर शनिवारी कराचीकडे जाणारी थर एक्स्प्रेस धावते. याच भगत की कोठी या आंतरराष्ट्रीय स्थानकापर्यंत कोकण रेल्वेमार्गे गाडी धावली. याचबरोबर १५ डिसेंबर २०१३ ते १५ जानेवारी २०१४ दरम्यान प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर विशेष शताब्दी एक्स्प्रेस धावत आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी धावण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई-मडगाव या गर्दीच्या मार्गावर डबल डेकर ट्रेन चालवण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेची चाचणी घेण्याचा विचार सध्या सुरू आहे. ही डबल डेकर गाडी भोपाळहून मुंबईत दाखलही झाली आहे.

1 COMMENT

  1. कोकण रेल्वेने नेहमी कोकणी माणसाची चेष्टा केली आहे सुपरफास्ट च्या नवाखाली कोकणात केवळ चार ठिकाणी थांबे द्यायचे आणि ह्या गाड्यांना नेहमी वाट मोकळी करून द्यायाची यामुळे कोकणात धावणाऱ्या गाड्या नेहमी उशिरा धावतात याकडे कोण लक्ष्य देणार?
    कोकण कन्या, राज्यराणी, रत्नागिरी प्यासेंजर, दिवा सावंतवाडी, मांडवी या नेहमीच्या गाड्या १ ते २ तास नेहमी उशिरा धावतात.
    तसेच सध्याची नेहमीची गर्दी पाहता एक नवीन गाडी सुरु झाली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version