Home संपादकीय विशेष लेख कोकण सुरक्षितच, तरीही..!

कोकण सुरक्षितच, तरीही..!

0

भारतातील देवभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या केरळ राज्यामध्ये अति पावसामुळे काय घडू शकते? याचे दर्शन घडविले. लाखो लोक या प्रलयकारी पावसाने उद्ध्वस्त झाले आहेत. कोटय़वधी रुपयांची अपरिमित अशी हानी या पावसाने केली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्या आकलनाच्या पलीकडे जाऊन हा महाप्रलय आला. अति पडलेल्या पावसामुळे जी परिस्थिती उद्भवली, त्यावर आजच्या संगणकीय जगातील मानवही काही करू शकला नाही.

आपल्या डोळय़ांदेखत अनेक संसार उद्ध्वस्त होताना नातेवाइकांनी, शेजा-यांनी आणि केरळातील नागरिकांनी पाहिले. थोडय़ा वेळापूर्वी इथे काय होते, आता काय आहे? असे प्रश्न उपस्थित व्हावेत एवढी वाईट अवस्था केरळातील या पावसाने केली आहे. देश-परदेशातूनही मदतीचा ओघ सुरू झाला आहे. उद्ध्वस्त झालेले सर्व काही स्थिरस्थावर होण्यासाठी काही वर्षे जावी लागतात. हा आजवरचा इतिहास आहे.

केरळ राज्यातील नैसर्गिकता आणि कोकण या दोहोमध्ये बरेच साम्य आहे. तिथली भौगोलिक परिस्थिती आणि कोकणातील स्थिती हे साम्य सहज लक्षात येते. नद्या, नाले, ओहोळ, माडाचे बन, नारळी, पोफळीच्या बागा, विस्तीर्ण आमराई आणि निसर्गाने दिलेले सुंदर स्वप्न म्हणजे ‘मिनार’ येथील चहाचे मळे. सर्वत्र फिरल्यावर कोकणातील बंदरे आणि केरळ राज्यातील समुद्रकिनारे आणि बंदरे, यातही बरेच साम्य आहे. कोकणात दीडशे इंचापेक्षाही अधिक पाऊस प्रतिवर्षी कोसळतो. नदी, नाले तुडुंब भरून वाहतात. नदी, नाल्यांना पावसाने वाढलेले पाणी थेट समुद्रापर्यंत जाते. आजच्या घडीला तरी नदी, नाल्यांची असलेली विस्तीर्णता पाहता पाणी थेट समुद्रापर्यंत जायला वाव आहे. परंतु, काही शहरी भागातून विचार केल्यास गेल्या काही वर्षात नदीकिनारी भागामध्ये झालेल्या बांधकामांमुळे वाडी, वस्तीमध्ये शहरी भागातील नगरांमध्ये पाण्याची पातळी अनेकवेळा वाढलेली दिसते. महामार्गावरील काही गावांमध्ये पाच वर्षापूर्वी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाणी आले. एवढे पाणी येऊ शकते. याचा अंदाजही गावक-यांना करता आला नव्हता. ही स्थिती केव्हा, कशी येऊ शकेल याचा अंदाज आजच्या घडीला कोणालाच बांधता येणार नाही. मात्र ही स्थिती निर्माण होण्यासाठी आपणच जबाबदार असतो, याचे भान आणि जाणीव आपणा सर्वाना असण्याची आवश्यकता आहे.

नैसर्गिकरीत्या वाढणारे जे पाणी आहे त्याचा योग्यरीत्या, योग्य पद्धतीने निचरा होणे आवश्यक असते. पाणी वाहून जाण्यासाठीच्या जागा टोलेजंग इमारती बांधून बंद केल्यावर पाणी जाण्यासाठी दुस-या जागा आपोआप शोधल्या जातात आणि यातूनच मग प्रलयकारी स्थिती निर्माण होते. निसर्गावर मात करण्यासाठी मानव आपल्या बुद्धमत्तेचा वापर करून नेहमीच आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु, केरळसारख्या एखाद्या घटनेतून पुन्हा एकदा प्रत्येकाला पाय जमिनीवर ठेवण्यासाठी निसर्ग भाग पाडतो. वारंवार या अशा पद्धतीने निदर्शनास आणून देऊनही आपण त्याचा विचार केला नाही, तर जी भयंकर स्थिती निर्माण होते, त्याला आपणच जबाबदार असतो.

प्रलयकारी कोसळणा-या पावसाबद्दल निसर्गाचा कोप झाला म्हणून दोष देत बसण्यापेक्षा जे आपल्या हाती आहे त्यासंबंधाने आपण काही विचार केला तर ते अधिक योग्य ठरेल. कोकणामध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रतिवर्षी पाऊस पडतो. परंतु पाणी संचय करण्याची मानसिकता आपल्याकडे नाही. उन्हाळी हंगामातील ज्या दोन-तीन महिन्यांमध्ये पाण्याची टंचाई भासते. पाण्यासाठी वणवण करावी लागते. तेव्हा आपल्याला जाणीव होते; परंतु प्रयत्न होत नाही. चर्चा होते, कृती घडत नाही. कोकणातील पडणा-या पावसासंबंधीही देशातील जलपुरुष म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या डॉ. राजेंद्रसिंह यांनीही कोकणातील जनतेने पाणी मुरण्यासाठी गावपातळीवर प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कोकण सुरक्षितच आहे; परंतु आपल्यातील बेफिकीरपणा भविष्यात आपणाला त्रासदायक ठरू शकतो यासाठीच आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version