Home संपादकीय अग्रलेख कोण अणे? हा माणूस छटाकभर, खरे खलनायक फडणवीस!

कोण अणे? हा माणूस छटाकभर, खरे खलनायक फडणवीस!

1

महाराष्ट्राचे अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांना या पदावर आता एकही क्षण ठेवता कामा नये. महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेले अणे यांची मुजोरी वाढत चालली आहे.

७ डिसेंबर २०१५ रोजी विधानसभेचे नागपूर अधिवेशन सुरू होणार होते. त्याच दिवशी त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली आणि तो विषय त्यांना त्या दिवशी सुचला म्हणून त्यांनी ती मागणी केली नाही. हे कटकारस्थान मुख्यमंत्र्यांच्या संमतीने चालले आहे. या पदावर श्रीहरी अणे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम नागपूरहून आणले आहे. यांचे पिताश्री महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव होते आणि यांचे आजोबा लोकनायक बापूजी अणे हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते. पण बापूजी बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केलेली नव्हती. राज्यपाल पदावरून दूर झाल्यानंतर बापूजी नागपुरात आले आणि त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करायला सुरुवात केली. त्या मागणीला लोकांचा पाठिंबा अजिबात नव्हता. बापूजींसारखे मोठे व्यक्तिमत्त्व, लोकमान्यांसोबत काम केलेला स्वातंत्र्य चळवळीतील नेता, त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेला आदरही जनमानसांत स्वतंत्र विदर्भाचे वातावरण निर्माण करू शकला नाही. जे बापूजींना जमले नाही आणि त्यानंतर विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंना जमले नाही, ते या पचक्या श्रीहरीला काय जमणार आहे? आणि त्याला विचारतो कोण? स्वतंत्र विदर्भ नव्हे, तर आता या अण्याला स्वतंत्र मराठवाडय़ाचं राज्य हवं आहे. नशीब त्याने कोकणचं आणखी एक राज्य आणि मुंबई स्वतंत्र करावी, अशी मागणी केली नाही. ती केली असती तर महाराष्ट्रात रस्त्यावर श्रीहरी नावाचा माणूस फिरू शकला नसता.

प्रश्न श्रीहरी अणे काय बोलतो हा अजिबात नाही. या माणसाला विदर्भात कसलीही किंमत नाही. याच्या मागे लोक नाहीत. शिवाय श्रीहरी अणे नावाचा माणूस काय बोलतो? याची दखल घेण्याचं कारणही नाही. विधानमंडळात दोन्ही सभागृहांत तीव्र संताप व्यक्त झाला आणि सभागृहाचे कामकाज बंद पाडले गेले, त्याचं कारण अणे काय बोलले यासाठी नाही, महाराष्ट्र राज्याचा अ‍ॅडव्होकेट जनरल या पदावर बसून अशी बेताल वक्तव्यं करतात, याला मुख्य आक्षेप आहे. अखंड महाराष्ट्राचा महाअधिवक्ता (अ‍ॅडव्होकेट जनरल) ज्याला त्या पदाची शपथ घेऊन पद ग्रहण करावं लागतं, त्या माणसाला महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे वक्तव्य करता येणार नाही. त्या पदाचा राजीनामा देऊन त्याला काय बडबड करायची आहे ती करू द्या! मग त्याला कुत्रं विचारणार नाही. पण महाअधिवक्ता या पदावर बसून श्रीहरी अणे नावाचा माणूस अशी भूमिका घेत असेल, तर केवळ सभागृह बंद पाडून आता हा विषय संपेल असे नाही. या सर्व कारस्थानाच्या मागे एक खलनायक दडलेला आहे आणि त्या खलनायकाचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. मुख्यमंत्री झाल्यावर याच फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे, आमच्या पक्षाची ती भूमिका आहे, असे सांगितले नव्हते का? त्यावर टीकाही झाली. म्हणून आता अणेंना पुढे करून फडणवीस यांच्या मनातील विषय मांडले जात आहेत.

‘जिथपर्यंत महाअधिवक्ता पदावरून श्रीहरी अणेला फडणवीस बाजूला करत नाही, तिथपर्यंत हे सभागृह चालू देणार नाही’ अशी ठाम भूमिका घ्या. पडेल ती किंमत द्या. सर्व विरोधी पक्षाला निलंबित करू द्या हवे तर! फडणवीसांचा जन्म झाला नव्हता तेव्हा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात १०६ हुतात्म्यांनी बलिदान केले आहे. या नादान सरकारला त्या बलिदानाचे काही घेणे-देणे नसेल, तर यांपैकी एकाही मंत्र्याला फिरू देऊ नका. काय लाठीमार, गोळीबार करायचा ते करू द्या! त्याची मस्ती उतरवण्याची गरज आहे. अखंड महाराष्ट्राशी जो कोणी खेळेल, त्याला फिरणं मुश्कील केलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा अंगार काय होता, याची या मुख्यमंत्र्यांना कल्पना असणार नाही. या महाराष्ट्राच्या एकात्मतेशी खेळ केला तर याद राखून ठेवा! आणि म्हणून श्रीहरी अणे हा छटाकभर विषय आहे. त्याचा बोलवता धनी मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना याची किंमत द्यावी लागेल. सत्ता मिळाली म्हणून इतकी मुजोरी करू नका. ज्यादिवशी सत्ता जाईल त्या दिवशी कुत्रं विचारणार नाही तुम्हाला! आजचे गाडय़ा-घोडे-सलाम सगळे सत्तेचे आहेत. ते अखंड महाराष्ट्राच्या पैशावर तुम्हाला पोसत आहेत. तुम्ही अखंड महाराष्ट्राची शपथ घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला आहात, हे सगळे भान ठेवून वागा. सहनशीलतेच्या पलीकडे विषय चाललेला आहे. कोण दीडदमडीचा श्रीहरी अणे? एकदा बोलला.. दोनदा बोलला, तुमची फुस असल्याशिवाय बोलणार नाही आणि म्हणून या देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी व्हायला हवी. दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्री जोपर्यंत याबद्दल माफी मागत नाही तोपर्यंत सभागृह चालू देऊ नका. विरोधी पक्षाची आता कसोटी आहे. महाराष्ट्राच्या हितावर निखारे ठेवणारे जे कोणी असतील त्यांना त्या निखा-याची दाहकता समजू द्या!

श्रीहरी अणे याचा जन्म झाला नव्हता तेव्हा अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली. फडणवीस तेव्हा जन्माला आले नव्हते. नागपूर कराराने विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. पण मराठवाडा विनाअट सामील झालेला आहे. निजामाच्या राजवटीत पोळलेला मराठवाडा मराठी माणसांचे राज्य होताना कसलीही अट त्या विभागाने घातली नाही. ते उद्धवराव पाटील असतील, गोविंदराव श्रॉफ असतील, अनंत भालेराव असतील, व्ही. एन. देशपांडे असतील, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील हे बिनीचे सेनापती होते. या सर्व नेत्यांनी विनाअट महाराष्ट्रात मराठवाडा सामील व्हायला पाठिंबा दिला. त्या मराठवाडय़ातील जनतेचा अपमान करण्याचा अधिकार या दीडदमडीच्या अणेला दिला कोणी? ‘मराठवाडा स्वतंत्र करा’ हे अणे जालन्यात जाऊन कसा बोलू शकतो? येथून पुढे अणेला महाराष्ट्रात फिरू देऊ नका. जनतेचा तीव्र संताप व्यक्त झाल्याशिवाय अणे सरळ होणार नाहीत. अखंड महाराष्ट्रातील मराठी माणसांचा बडगा यांना दाखवण्याची गरज आहे. अणे हा चिल्लर विषय आहे. आता फांद्या तोडत बसू नका! खरा खलनायक मुख्यमंत्री आहे, म्हणून घाव घालायचा तो मुळावर घाला. एवढेच त्यानिमित्ताने सांगणे आणि जर या अणेची वटवट चालू राहिली तर ‘या अण्यांचे सुट्टे पैसे कसे करायचे’! हे मराठी जनतेला चांगलंच कळतंय. पोरकटपणा बंद करा.. महाराष्ट्राच्या एकात्मतेशी खेळू नका. मुख्यमंत्र्यांना एवढेच सांगणे आहे. हसण्यावारी घेऊ नका, पश्चाताप होईल. स्पष्ट सांगायचे तर मराठी माणसाशी खेळू नका. तुमची राजवट हा मराठी माणूस भस्मसात करेल!

1 COMMENT

  1. कोणीही स्वताच्या प्रसिद्धीसाठी काही पण बोलेल आणि प्रत्येक वेळा मुख्यमंत्री जबाबदार आहे हे म्हणणे चुकीचे आहे
    मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे अत्यंत जबाबदार,इमानदार आणि हुशार व्यक्ती आहे त्याच्या राजवटीत महाराष्ट् हा अखंडच राहील आणि विकासाच्या बाबतीतही खूप पुढे रहील यात तील मात्र शंका नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version