Home किलबिल खरी नक्कल

खरी नक्कल

0

भोजराजाकडे एक बहुरूपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोडय़ाच वेळात हुबेहूब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरूपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खूश झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.

भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरूप्याने तो रत्नहार तर स्वीकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढेच नव्हे, तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखाने आला, तशाच तऱ्हेने निघून जाऊ लागला.

दरबारी मंडळींना त्या बहुरूप्याचा हा उद्धटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरूप्याला पकडून, आपल्यापुढे हजर करण्याचा हुकूम सोडला.

त्या बहुरूप्याला पकडून समोर आणताच, राजा त्याला म्हणाला, अरे उद्धटा! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजरा करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.

बहुरूपी म्हणाला, महाराज! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्वीकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहूब आपल्याप्रमाणे वागलो.

बहुरूप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहुणा म्हणून ठेवून घेतला आणि त्याला तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहरा इनाम म्हणून दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version