Home कोलाज गावाकडचा गावरान पाऊस

गावाकडचा गावरान पाऊस

1

प्रत्येकाला आपलं गाव आवडतं. कारण तेथे आपलं बालपण गेलेलं असतं. आपले लहानपणीचे सवंगडी, आपली बालपणीची शाळा या दिवसातल्या अनेक कडू-गोड आठवणी आपल्याला येतात. मग आपल्याला वाटतं की, आपल्या गावासारखं दुसरं गाव नाही.

प्रत्येकाला आपलं गाव आवडतं. कारण तेथे आपलं बालपण गेलेलं असतं. आपले लहानपणीचे सवंगडी, आपली बालपणीची शाळा या दिवसातल्या अनेक कडू-गोड आठवणी आपल्याला येतात. मग आपल्याला वाटतं की, आपल्या गावासारखं दुसरं गाव नाही. मग बहुतेक जणांना उन्हाळयाच्या सुट्टीचं निमित्त करून वर्षातून एकदा आपल्या गावाला भेट दिल्याशिवाय चैन पडत नाही. माझासुद्धा गावी जाताना ऊर भरून येतो आणि मनात भावनांचा कल्लोळ होतो.

जसजसे गाव जवळ येते तसतसे वाटेत शैशव भेटते. गावाच्या हद्दीवर स्मृतींचा पाऊस पडतो. मग लहानपणीच्या आठवणीतलं ते लाल चिंचेचं झाड अजून उभं असताना दिसते. परंतु जेथे आपण सूर मारला तो, पाण्याचा डोह उजाड झालेला दिसतो. गावाचा पाठिराखा जांभळा डोंगरही मग वृद्ध झाल्यासारखा वाटतो. परंतु त्या डोंगराची माया अजूनही गावावर आहे. आता गावात बदल झालाय. डोंगरावर टी.व्ही.चा मनोरा दिसतो. गावातली कौलारू घरं तेवढीच आपुलकीनं आपल्याला कुशीत घेतात. पण गावातली नवीन घरं उपरी वाटतात.

आपली शाळा आपल्याला फार आवडते. पण ती आता उनाड झाल्याची पाहून वाईट वाटते. गावी जाताना वाटते, ओळखीची झाडं आपल्या फांद्या उंचावून आपलं स्वागत करतात. गाव जवळ येताच लांबूनच देवळाचा कळस दिसताच आपला भक्तिभाव जागृत होतो. वाटेतच लागलेला हिरवा-पिवळा माळ पाहून पुन्हा त्यावर भटकावेसे वाटते. आता पूर्वीचा गाव राहिला नसला तरी आपली गावाची ओढ कमी होत नाही. आपण गावाकडे जास्त ओढले जातो. आपल्याला आपलं गाव जसं आवडतं, तसाच आपल्याला गावाकडचा पाऊस आवडतो. निदान मला तरी शहरापेक्षा गावाकडचा गावरान पाऊस जास्त आवडतो.

गावाकडचा पाऊस मला आवडतो; कारण तो मला जवळचा वाटतो. तो आला की मला गावाकडचा नातलग भेटल्यासारखा वाटतो आणि तो माझ्याशी जणू काय गावातील सुख-दु:खाच्या गोष्टी करतो. कसं काय चाललंय असं विचारतो. तेव्हा माझा शेतकरी बांधव त्याला म्हणतो,
‘काय राव औंदा फारच उशिरा येणं केलं. एवढा येळ कुठं अडकला व्हता? माती वाट बघून कटाळली आता. पेरण्या खोळंबल्यात राव.’ मग पाऊस गडगडाट केल्यासारखा हसतो आणि मनापासून खेद व्यक्त करत घरादारावर कोसळतो. मग सारेच जण सुखावले जातात. मग पहिल्याच पावसाने सुखावलेली गावातील सासुरवाशीण म्हणते,

‘आला पहिला पाऊस
माझी भिजली गं हौस
कशी पावसात जाऊ
माझी भरली गं कूस!
कारण
गेला भिजूनिया चिंब
दारी एकटाच निंब
धनी घराचा गं बाई
गेला लढाईला लांब!

हा गावकडचा पाऊस तिला जणू काय लढाईवर गेलेल्या आपल्या धन्याचा निरोप घेऊन आल्यासारखा वाटतो. या गावच्या पावसात मृगाच्या मस्तीत वासरू उधळते तर सुखाच्या तृप्तीत पाखरू न्हाऊन जाते. मग पेरणी करणारे बैल मातीला हुंगत डुरकतात तर मातीतील बिजे नवी नाती जोडायला हरकतात. असा जिवाभावाचा पाऊस रानारानात पडल्यावर गावाचं चित्रच बदलतं. पावसाचं वातावरण असं आल्हाददायक होतं की, आपल्याला माळावर भटकत पावसाचा आनंद घ्यावासा वाटतो.

पावसाचं आगमन होणार असं पावश्यानं सांगितल्यावर गावकरी पावसकरांच्या स्वागताच्या तयारीला लागतात. त्याआधीच भर उन्हाळयात जमिनीची मशागत करून ठेवतात. देशावर नांगरणी, कुळपणी होते तर कोकणात भाजणी होते. परंतु नुसता शेतकरीच नाही तर गावकरीही आपली कौलारू घरं शाकारून घेतात. जुनाट घराची डागडुजी करतात. बायका घराच्या छप्परावर वाळत घातलेल्या कुरडया, पापड, शेवया भिजू नयेत म्हणून पावसकर यायच्या आतच डबे भरून ठेवतात. नदी-ओढय़ांच्या डोहात धुतलेल्या गोधडया व चादरी बायका घडी घालून ठेवतात आणि जणू काय पाहुण्याची वाट बघावी तसे पावसाची वाट बघत असतात; कारण पाऊस आला की त्यांना वाटतं,

पाऊस पाहुणा
आला माझ्या दारी
घेऊनि घागरी
अमृताच्या।

आणि तो अमृताच्या घागरी घेऊन येताना त्याचं स्वागतही गावकरी आणि पशुपक्षी मनापासून करतात. उद पेटवावा तसं धूसर वातावरण तयार होतं. पश्चिमेकडून गार वारा पावसाचा निरोप घेऊन येतो. धुळीच्या वावटळी गोल-गोल फिरत गावात धुळींचा गुलाल उधळतात. तोपर्यंत झाडे वाकून फांद्यांनी हात उंचावून त्याचं स्वागत करीत असताना निळया-जांभळया डोंगरावरून सावळया ढगांचा लवाजमा खाली उतरत माळावरच्या वेशीजवळ थांबत-थांबत पावसाचे टपोरे थेंब छपरावर ताशा वाजवतात. तर सावळया आकाशातून ढोलांच्या आवाजात पर्जन्यराजे गावावर जळाचा वर्षाव करतात आणि गाव मातीबरोबर सुखावून जाते आणि गावातल्या पोरी पावसात भिजतात तेव्हा पावसाचे गाणे ओठावर येते.
सरीवर सरी आल्या गं। पोरी भिजून गेल्या गं॥

गावाकडे मी माळावरती भटकायला जातो. तिथे मला पाऊस बालपणीचा सखा भेटावा तसा भेटतो आणि बालपणीच्या सा-या आठवणी ओल्या होतात. या रिमझिम पावसात भिजण्याची मजा काही औरच असते. पण शेतक-याला असं बुरंगाट म्हणजे वरवरचा पाऊस आवडत नाही. त्याला खोलवर मातीत मुरेल असा दमदार पाऊस पाहिजे असतो. एकदा का दमदार पाऊस चार-आठ दिवस संततधार होऊन पडला की, मग ती पेरणीची तयारी करतो. मग वापसा आला की, सगळी पेर धरतात.

दहा-पंधरा दिवसात मातीतून हिरवे अंकुर डोकावू लागतात. आणि सा-या वातावरणात बदल होतो. सारं रान हिरवंगार दिसू लागतं. पाऊस जणू काय पिवळया माळावर हिरवीगार शाल पांघरतो. तर फकिरासारख्या राखी डोंगरावर हिरवीगार चादर घालतो. अशा वेळी धूप जळावा तसे पांढरेशुभ्र धुके डोंगरावर रेंगाळते. तर पायथ्याला लाल कौलारू घरांवरच्या छपरातून शुभ्र धुराची जांभई-वलये घराचा आळस घालवतात व घर-घर प्रसन्न दिसते. पुढे श्रावणात तर गावाचं चित्र अधिकच हिरवंगार होतं. शेतीची कामे झाल्याने शेतकरी व गावातल्या गृहिणी श्रावणातले सणवार साजरे करायला मोकळया होतात. अधूनमधून श्रावणाच्या सरी त्यांच्यावर अभिषेक करीत असतात. मग नागपंचमीच्या सणाला सासुरवाशिणी माहेरी येतात. परंतु एखादीला माहेरी यायला जमत नाही, तेव्हा ती म्हणते-

‘फांद्यावरी बांधले गं मुलींनी हिंदोळे।
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले।’

मला वाटतं नागपंचमीला नागाचा व वटसावित्रीला वडाचा छळ करण्यापेक्षा पंचमीला आणि वटसावित्रीला स्त्रियांनी झाडाचं एकेक रोप घराजवळ लावलं तर त्यांना सणाऐवजी अधिक पुण्य मिळेल व ख-या अर्थानं पर्यावरण पंचमी साजरी होईल व गावाकडचा पाऊस समाधानाने पडेल.
गावाकडच्या पावसाचं आणि शेतक-यांचं एक वेगळंच नातं आहे. हे नातं जगावेगळं आणि ज्ञानाशी संबंध जोडणारं आहे. याचं आपल्याला नवल वाटल्यावाचून राहणार नाही. खगोलशास्त्राप्रमाणे आकाशात सत्तावीस नक्षत्रे आहेत. या सत्तावीस नक्षत्रांपैकी भारतीय पंचांगानुसार बारा नक्षत्रं पावसाची नक्षत्रं मानली आहेत. या बारा नक्षत्रांनुसार भारतात पाऊस पडतो, असं सांगतात.

विशेष म्हणजे ही बारा नक्षत्रं शेतक-यांना माहिती असून कोणतं नक्षत्र निघाल्यावर कोणता पाऊस पडतो, हे शेतक-याला ठाऊक असते. त्यामुळे शेतीची कामे तो या बारा नक्षत्रांनुसार करतो. पावसाच्या स्वभावानुरूप आणि त्याच्या कमी-अधिक पडण्यावरून शेतक-यांनी गावाकडच्या पावसाला वेगवेगळी नावं दिली आहेत.

अशा रितीने अडाणी वाटणा-या शेतक-यांनी नक्षत्रांनुसार पावसाला नावं दिली आहेत. उदाहरणार्थ मोसमातील प्रत्येक बारा नक्षत्रांतल्या पावसाला त्यांनी तरणा, म्हातारा, सासूचा, सुनेचा, हत्तीचा पाऊस अशी नावे दिली आहेत. मृग, रोहिणी, आद्र्रा या नक्षत्रांत पाऊस पडतो तर कधी पडत नाही. त्यामुळे या बेहिशेबी पावसाला नावे दिली नाहीत; कारण कधी तो पडतो तर कधी रुसतो. म्हणजे कधी हसतो तर कधी रडवतो. म्हणून या नक्षत्रांना वगळून ही नावे दिली आहेत. म्हणजे पुनर्वसू नक्षत्रात पाऊस जोरदार पडतो. म्हणून त्याला तरणा, तर पुष्य नक्षत्रात पाऊस रिमझिम म्हणजे मंदावतो म्हणून त्याला म्हातारा म्हणतात; कारण तो जोरदार नसतो. तर मघा नक्षत्रातला पाऊस वादळ-विजांचा, कडकडणारा असतो. म्हणून त्याला सासूचा पाऊस म्हणतात, तर फाल्गुनी नक्षत्रातला पाऊस शांत व शेतीला उपयोगी असतो म्हणून त्याला सुनेचा पाऊस असं म्हणतात.. तर हस्त नक्षत्रातील भरघोस पावसाला हत्तीचा पाऊस म्हणतात. ‘पडेल हस्त शेती मस्त किंवा पडतील स्वाती तर पिकतील मोती’ या पावसाच्या उपयुक्ततेवरून म्हणी पडल्या आहेत. म्हणून शेतकरी म्हणतो सत्ताविसातील बारा तर नक्षत्रे कोरडी गेली तर सारा दुष्काळच नशिबी येतो.

पण पावसाच्या नावावरून तरणा एखाद्या तरुणीला का रस्त्यात भिजवतो व म्हातारा पाऊस बाईला बघून नुसताच रिपरिप करतो तर सासूचा पाऊस विजेसारखा कडाडतो तर सून शेताला उपयोगी का पडते हे कळते. आता पर्यावरणात बदल झाल्याने हवामानात बदल झालाय. त्यामुळे पाऊसही बदलला आहे. त्याला आधुनिकतेचं वारं लागलंय, तेव्हा गावाकडचा पाऊस आता मनासारखा पडत नाही. आता शेतक-याची घोंगडीची खोळ किंवा इरली जाऊन त्या जागी छत्र्या, रेनकोट व गमबूट आलेत. त्यामुळे पावसाचा व ओल्या मातीचा स्पर्श कमीच होतो. आता सणावारातही बदल झाल्याने श्रावणातल्या हिरव्या साडया जाऊन तेथे ड्रेस दिसतात. त्यामुळे शेतातही ड्रेस घालून काम करणा-या बायकांच्या हिरव्या साडीचं मोल कमी झाल्याने ग्रामीण किंवा गावरान सौंदर्य पूर्वीसारखं पाहिलं नाही. तरीही गावाकडच्या आठवणी अजूनही हिरव्या आहेत. अजूनही तीच गावाची ओढ आहे आणि त्याच ओळी ओठावर येतात-

‘श्रावणातल्या एका दिवशी
इर्कलीत गं तुला पाहिली
जास्वंदीचा पदर तांबडा
शुभ्र पांढरी जुईची चोळी!
आणि अशी मराठमोळी पोर शेतातल्या बांधावर चालताना पहिली की वाटते-
चालतेस जणू मखमालीवर
कशी वर्णावी तुझी गं थोरी
जन्मा येऊनि परि बघावी
चाल तुझी गं पाठमोरी।
तर गावरान पावसातच नव्हे तर आयुष्यभर ही चालतच राहावी. मला गावकडच्या गावरान पावसाची आवड का आहे, हे तुम्हाला कळले असेलच; कारण :
पाऊस घरी येतो अन् जीव खुळा होतो
जणू बालपणीचा सखा
भेटतो मनासारखा!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version