Home कोलाज चक दे युवा इंडिया!.

चक दे युवा इंडिया!.

1
संग्रहित छायाचित्र

भारताच्या पुरुष ज्युनियर संघाने नुकतीच जोहोर-बाहरू (मलेशिया) येथे २१ वर्षाखालील जोहोर चषक स्पर्धा नुकतीच जिकंली. भारताच्या या युवा संघाचे विशेष कौतुक करावेसे वाटते. कारण भारतात डिसेंबरमध्ये होणा-या ज्युनियर हॉकी वर्ल्डकपसाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशाराच या युवा संघाने स्पर्धेत सहभागी होणा-या इतर संघांना दिला आहे.

सुवर्ण इतिहास असलेल्या भारतीय हॉकीसाठी गेले काही महिने चांगले ठरले आहेत. त्यात विशेषत: भारताच्या सीनियर संघापेक्षा ज्युनियर संघाने केलेली कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. भारताच्या ज्युनियर महिला संघाने ऑगस्टमध्ये ज्युनियर वर्ल्डकपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला होता. गेल्या आठवडयात भारताच्या सीनियर महिला संघानेही आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून हॉकीचा झेंडा फडकवत ठेवला. त्यापाठोपाठ भारताच्या हॉकीप्रेमींना खूशखबर मिळाली ती भारताच्या पुरुष ज्युनियर संघाने नुकतीच जोहोर-बाहरू (मलेशिया) येथे जिंकलेली २१ वर्षाखालील जोहोर चषक स्पर्धा. भारताच्या या युवा संघाचे विशेष करून कौतुक करावेसे वाटते कारण भारतात यावर्षी डिसेंबरमध्ये (नवी दिल्ली येथे ६ ते १५ डिसेंबर) ज्युनियर हॉकी वर्ल्डकप होत आहे. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा इशाराच या युवा संघाने स्पर्धेत सहभागी होणा-या १५ संघांना दिला आहे.

जोहोर चषकात भारताने एकही लढत गमावली नाही, हे आणखी एक चांगल्या कामगिरीचे द्योतक आहे. मलेशियाविरुद्धच्या शेवटच्या साखळी लढतीत त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली होती. मात्र त्या लढतीआधीच भारताने स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केल्याने त्या लढतीत भारताचे युवा हॉकीपटू निर्धास्त होते. मात्र अंतिम फेरीत भारताने यजमान मलेशियाला कोणतीही संधी दिली नाही. स्पर्धेत भारताने अर्जेटिना आणि पाकिस्तानसारख्या संघांविरुद्धही मोठे विजय मिळवले होते हे ध्यानात घ्यायला हवे. जोहोर चषक जिंकल्यानंतर हॉकी इंडियानेही संघातील प्रत्येकाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करत प्रोत्साहन दिले. कर्णधार मनप्रीत सिंग, सतबीर सिंग, कोठाजीत, अमित रोहिदास, मनदीप सिंग, प्रभदीप सिंग हे सीनियर संघातून खेळलेले हॉकीपटू ज्युनियर संघातून चमकले नसते तर नवल होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी कामगिरी उंचावली. उपकर्णधार अफान युसूफनेही गोलांचे दिलेले योगदान मोलाचे होते. त्यातच मलाक सिंग, एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मिकी, गुरमेल सिंग, पी. एल. थिमन्नो हे गुणवान हॉकीपटू राखीवमध्ये होते. त्यावरून भारताच्या ज्युनियर संघाच्या ताकदीचा अंदाज येतो. मिडफिल्डर हरजीत सिंगचे कौशल्यही या स्पर्धेतून विशेषकरून समोर आले. हॉकी इंडियानेही त्याला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख हॉकीपटू म्हणून अतिरिक्त एक लाख रुपयांचे बक्षीस देत त्याचा हुरूप वाढवला.

याठिकाणी युवा हॉकीपटूंचे कौतुक करावे तितके थोडे आहे. मात्र त्याचवेळेला हॉकी इंडियानेही ज्युनियर संघ घडवण्यात योगदान दिले आहे, हे नमूद करावेसे वाटते. हॉकी इंडियाने एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी प्रशिक्षक ग्रेग क्लार्क यांची भारताच्या पुरुष ज्युनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती भारतासाठी चांगलीच यशस्वी ठरली आहे. कारण दोन वर्षापूर्वी पहिल्यावहिल्या जोहोर चषकासाठी जेव्हा भारताचा संघ रवाना झाला होता तेव्हा त्याआधी सराव शिबीरही झाले नव्हते. त्याचा परिणाम भारताला भोगावा लागला. यंदा जोहोर चषकाला रवाना होण्यापूर्वी युवा हॉकीपटूंचे दहा दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुळात क्लार्क यांची नियुक्ती ही ज्युनियर हॉकी वर्ल्डकप समोर ठेवूनच करण्यात आली होती. क्लार्क यांच्या जोडीला अनुभवी बलजीत सिंग सैनी आहेतच. ‘‘यजमान देश म्हणून भारताने पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावलेच पाहिजे, हा उद्देश ठेवून क्लार्क यांना निवडले आहे,’’ असे त्यावेळी हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बात्रा यांनी सांगितले होते. ‘‘फक्त मानसिक आणि शारिरिक तंदुरुस्तीवर भर देणारा प्रशिक्षक आम्हाला नको असून महत्त्वाच्या स्पर्धेत खेळताना कोणत्याही दडपणाशिवाय कसे खेळायचे हे शिकवणारा प्रशिक्षक आम्हाला हवा आहे,’’ असे बात्रा म्हणाले होते. त्यातच क्लार्क यांना हॉकी इंडिया लीगमध्ये पहिल्या वर्षी रांची रायनोसला प्रशिक्षण देण्याचाही अनुभव होता. त्यानिमित्ताने त्यांची भारताशी जवळीक झाली होती. त्यातच क्लार्क यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य संघाचे सात वर्षे प्रशिक्षकपद भूषवले होते. स्वत: हॉकीपटू असलेले क्लार्क हे २५० हून जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. क्लार्क हे वयानेही फार मोठे नाहीत त्यामुळे त्यांना युवा संघाला समजून घेण्यात अडचणी येण्याचेही कारण नाही. भारताच्या सीनियर संघाचे परदेशी प्रशिक्षक नेहमीच टीकेचे लक्ष्य ठरत असताना क्लार्क यांना फक्त हॉकी इंडियानेच नाही तर युवा हॉकीपटूंनीही पसंत केले आहे. ‘‘क्लार्क यांची प्रशिक्षणाची पद्धत आम्हाला खूपच आवडली आहे. त्याचा आम्हाला दिवसेंदिवस फायदा होत आहे,’’ असे कर्णधार मनप्रीतने म्हटले होते.

क्लार्क यांच्या मार्गदर्शनाखालील या संघाला ज्युनियर हॉकी वर्ल्डकपमध्ये दुस-यांदा सुवर्णपदक (यापूर्वी २००१) जिंकण्याची संधी आहे. त्याशिवाय १९९७मध्ये रौप्यपदकही भारताने मिळवले होते. २००९ मधील वर्ल्डकपमध्ये भारताला नवव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. तर २००५च्या वर्ल्डकपमध्ये भारताचे कांस्यपदक हुकले होते. जर्मनी ज्युनियर हॉकी वर्ल्डकपमधील (पाचवेळा) सर्वात यशस्वी संघ असला तरी जोहोर चषकातील खेळ पाहता भारत बलाढय़ जर्मनीचेही आव्हान परतवून लावू शकेल, असा विश्वास वाटतो.

भारताच्या ज्युनियर मुलींपाठोपाठ आता वर्ल्डकपमध्ये नाव उंचावण्याची जबाबदारी भारताच्या मुलांवर आहे. कारण भारताचे हेच ज्युनियर भविष्यात सीनियर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास परत आणण्याची जबाबदारी आता या युवा हॉकीपटूंवरच आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version