Home मध्यंतर शोध - बोध जगावर महासंकट येईल?

जगावर महासंकट येईल?

1

भूकंप, महापूर, चक्रीवादळं, उल्कापात अशा अनेक संकटांनी अनेकवार या जगाला हादरा दिलेला आहे. याशिवाय मानवजातीचं अपरिमित नुकसान करणा-या अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती आहेत. त्यांची तीव्रता वाढल्यास पृथ्वीतलावर हाहाकार माजू शकतो.

खूप वर्षापूर्वी प्लेग, कॉलरा इ. भयानक रोगांच्या साथींनी लाखो माणसांचा बळी घेतला. अर्थात त्याकाळी या रोगांवर योग्य ते उपचारही सापडलेले नव्हते. हा झाला अगदी जुना काळ, परंतु आधुनिक युगातही इबोलासारख्या विषाणूंनी कितीतरी बळी घेतले. शारीरिक रोग हेच केवळ मनुष्यजातीसाठी नुकसानदायक ठरतात असं नाही तर अनेक नैसर्गिक आपत्तींनीदेखील लाखो जणांचे बळी घेतलेले आहेत.

गेल्याच महिन्यात नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेली हानी आपल्या सर्वानाच माहीत आहे. पृथ्वीवर अशी संकटे हजारो वेळा आलेली आहेत. यातील हिमवर्षाव, उल्कापात, त्सुनामी अशासारख्या काही घटनांनी जगाचा नकाशाच बदललेला आहे. निसर्गावर राज्य गाजवू पाहणा-या माणसाला नेहमीची दहशत वाटत आलेली आहे. निसर्ग नावाच्या शक्तीकडून नष्ट केले जाण्याच्या भितीतूनच त्याने स्वत:च्या अस्तित्वाचाही थांग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्याला हजारो प्रश्न नेहमी पडत आले. आपण पृथ्वीवर एकटे आहोत काय? जगाचा अंत कसा होईल? आधुनिक मानवाच्याही आधीचे प्राणी, मानव कसे दिसत होते? त्सुनामीसारख्या संकटांनी जगाचा नाश होईल का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा मानवाने त्याच्या बुद्धीच्या व काही अवशेषांच्या पुराव्यांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्नही केला. आपण राहतो ती पृथ्वी व हे जग कधी नष्ट होईल काय, असा प्रश्नच नव्हे तर भीती देखील त्याला कायम वाटत आलेली आहे.

या जगात आजपावेतो माणसांनी अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना तोंड दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे जगाचा भरपूर विनाशही झालेला आहे. आता यापुढेही अशी विनाशकारी महासंकटे येतच राहतील. असा इशारा आता शास्त्रज्ञ देत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सटिीच्या ‘फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी इन्स्टिटय़ूट अँड द ग्लोबल चॅलेंजेस फाऊंडेशन’च्या काही संशोधकांनी या दृष्टीने केलेला अभ्यास जगासमोर मांडला आहे. काही संकटांची प्राथमिक उदाहरणं त्यांनी दिली आहेत. ज्यासाठी आपण सावध राहिले पाहिजे. यातील बरीचशी संकटं ही निसर्गाच्या अवकृपेतून उद्भवू शकतात.

जागतिक तापमान वाढ

ही आपल्याला आत्ताच्या काळातही जाणवणारी समस्या आहे. या समस्येची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेच आहे. आज पर्यावरण वाचवा अशी ओरड होते आहे ती मानवाच्या भविष्यासाठीच. जगातील अनेक ठिकाणी हवामानात अनपेक्षित बदल घडत आहेत. आज या तापमानवाढीमुळे झालेल्या बदलांमुळे कित्येक माणसांचे व पशुप्राण्यांचेही बळी गेलेले आहेत. ही दुर्लक्षित करता येण्यासारखी समस्या नाही. त्यामुळे दुष्काळ, रोगराई, समुद्राची पातळी खालावणं व वाढणं, जैवविविधतेची हानी, असे कित्येक दुष्परिणाम आपल्यासमोर येत आहेत. अशा तऱ्हेने हळूहळू पृथ्वीचा नाश होऊ शकतो.

उल्कापात

अशनिघात किंवा उल्कापात म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात येऊन अडकणारा बाहेरील अवकाशातील ग्रहांच्या दगडमातीचा कचरा. आजपर्यंत छोटय़ा छोटय़ा उल्कापातांनी जगात कितीतरी ठिकाणी खोल मोठी विवरं बनली आहेत. त्यामुळे त्या परिसरातील जंगलं देखील नष्ट झालेली आहेत. १९०८ साली सायबेरियातील ७७० चौरस मैलांचं जंगल असंच नष्ट झालं होतं. आज अवकाशात ग्रहांचे तुकडे मोठय़ा प्रमाणावर फिरत आहेत. ग्रहांचे हे तुकडे किती मोठे असू शकतात याची वैज्ञानिकांनाही कल्पना नाही आणि असाच एखादा तुकडा पृथ्वीच्या वाटेत येऊ शकतो किंवा वातावरणातून थेट जमिनीवर देखील आदळू शकतो. ज्यामुळे पृथ्वीचं मोठं नुकसान होऊ शकतं.

महाकाय ज्वालामुखी

भूगर्भातील हालचालींचा अंदाज घेणं हे शास्त्रज्ञांसाठी एक मोठं आव्हानच आहे. अत्याधुनिक उपकरणं मदतीला असली तरीही एखाद्या ठिकाणाहून ज्वालामुखीचा कधी उद्रेक होईल ते सांगता येत नाही. ज्वालामुखी खूपच जास्त मोठा असेल तर आसपासचा परिसर नष्ट होऊ शकतो, शिवाय त्याची राख वातावरणातून इतरत्र: पसरल्यामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. आता जगात जे ज्वालामुखी अस्तित्वात आहेत, ते सर्वसाधारण स्तरावरील आहेत मात्र त्यांच्यापेक्षा अधिक मोठा ज्वालामुखी सर्वाधिक मोठं संकट बनू शकतो.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आधुनिक काळातल्या माणसाचा एक क्षणही यांत्रिक उपकरणं वापरल्याशिवाय जात नाही. पूर्वी ही स्थिती वेगळी होती. माणूस यंत्रांच्या आहारी गेलेला नव्हता. आज जगात लाखो रोबो काम करत आहेत. तसंच रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित विविध यांत्रिक उपकरणंही कार्यरत आहेत. या मशिन्समध्ये माणसाने स्वत:ची बुद्धिमत्ता भरलेली आहे आणि त्यांना स्वयंचलित केलेले आहे. आता ही यंत्र स्वत:चे निर्णय स्वत: घेऊनच काम करतात; परंतु एक वेळ अशीही येऊ शकते जेव्हा ही सारी मशिन्स आपल्याला तुल्यबळ ठरतील. आज तसंही आपण यांत्रिक बुद्धिमत्तेच्या आहारी गेलेलोच आहोत, ज्यामुळे आपल्या मेंदूवर व मनावर परिणाम होत आहे. उद्याच्या काळात अतियांत्रिकीकरणामुळे होणा-या परिणामांची समस्या अतितीव्र स्वरूप धारण करू शकते.

साथीचे रोग

इबोलाच्या विषाणूंनी गेल्या काही वर्षात आफ्रिका खंडात दाणादाण उडवून दिली आहे. आजही कर्करोग, एड्स, फ्लूसारखे रोग अस्तित्वात आहेत, ज्यामुळे लाखोंचे बळी जात आहेत. प्रदूषण व वातावरण बदलांमुळे नवनवीन विषाणू व रोग जन्माला येत आहेत. अशाच एखाद्या रोगातून मानवजातीची मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरणाचा विनाश

या संकटाची तीव्रता अजूनही काही माणसांना कळलेली नाही. मात्र याचे परिणाम सर्वत्र दिसत आहेत आणि मनुष्य पर्यावरणाच्या हानीमुळे उद्भवणा-या समस्यांच्या मुळाशी न जाता वरवरचे उपाय करत आहे. प्राणी-पशू यांच्या असंख्य प्रजाती एकाचवेळी नामशेष यापूर्वी देखील झालेल्या आहेत. त्या त्या वेळी आमूलाग्र पर्यावरणीय बदल झालेले दिसले आहेत. आजही आपण सहाव्या मास एक्स्टिक्शंनच्या उंबरठय़ावर उभे आहोत, असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे, त्यामुळे या कालखंडातही अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. एक काळ असा येईल जेव्हा मनुष्यजात देखील पर्यावरणच न उरल्यामुळे नष्ट होऊ शकेल. अशी संभावना शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

अणुयुद्ध

दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यापासून जगावर हे संकट घिरटय़ा घालत आहे. हे मानवनिर्मित संकट आहे. यातून आपली सुटका होणं कठीण आहे कारण अणुशक्तीचा वापर करणं किंवा न करणं हे सर्वस्वी राज्यकर्त्यांवर अवलबूंन आहे. मात्र आण्विक शस्त्र किती भयानकरीत्या संहारक आहे हे जपानमधील हिरोशिमा व नागासाकी शहरांच्या अमेरिकेने केलेल्या विनाशात आपण पाहिलेच आहे.

ओझोन स्तर

पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनचा कमी होत जाणारा स्तर ही गोष्ट सर्वात जास्त चिंतादायक आहे. वैज्ञानिक यावर उपाय शोधत आहेत. मात्र प्रदूषणामुळेच हा स्तर घटतो आहे त्यामुळे या संकटाचाही निर्माता मानवच आहे. ओझोन हा पृथ्वीच्या वातावरणाचा संरक्षक स्तर आहे, त्यामुळे तो नाहीसा झाल्यास कठीण परिस्थिती ओढवू शकते. पृथ्वीवर संकट आल्यास काय करायचं याची अनेकदा आपण विज्ञान कथा-कादंब-या व चित्रपटातून उजळणी केलेली आहे. मानवजातीवर व एकूणच पृथ्वीवर काही संकट येऊन जग नष्ट होतंय अशी विज्ञान कथांमधील कल्पना आजवर सर्वानाच मजेशीर वाटत आलीय. असं काही होणं शक्य नाही असाच बहुतेकांचा सूर असतो. अर्थात परग्रहवासीयांचे आक्रमण वगरे कल्पना या खरोखरीच कल्पनाच आहेत, त्यात अजून तरी तथ्य आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आलेली नाही पण आधुनिक काळात माणसाने नसíगक आपत्तींखेरीज कित्येक समस्या या स्वत:च्याच हाताने स्वत:वर ओढवून घेतलेल्या आहेत. जसं की प्रदूषण, कचरा, रोगराई, अनियंत्रित जीवनशैलीचे परिणाम इत्यादी.

त्याखेरीज देखील काही समस्या अतितीव्र स्वरूप धारण करू शकतात याची आपण तयारी ठेवली पाहिजे. भविष्यात अशी काही संकटं ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व समस्यांपेक्षा अजूनही काही मानवी बुद्धीच्या व नजरेच्या टप्प्यात न आलेली संकटे असू शकतात. ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. संशोधन व विज्ञान क्षेत्रात अमाप प्रगती होत आहे. मात्र ही प्रगती नेहमीच फायदेशीर असेल असं म्हणता येणार नाही. फायद्यांसोबतच त्यांचे तोटेही माणसाला स्वीकारावे लागत आहेत. पुढील समस्या किंवा संकटं हे त्यांचेच परिपाक आहेत. आपण प्रगती करण्याबरोबरच येणा-या संकटांकडेही वेळीच लक्ष दिलं पाहिजे, असा इशारा संशोधक व वैज्ञानिक देत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version