Home शिकू आनंदे दहावीनंतरचे करिअर पर्याय

दहावीनंतरचे करिअर पर्याय

1

तुम्ही दहावीच्या निकालाची वाट पाहत असाल. दहावीचं हे अतिशय महत्त्वाचं वर्ष. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला, करिअरला कलाटणी देणारं असं हे वर्ष. या निकालानंतर तुम्हाला तुमच्या करिअरचा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. तुमच्या करिअरची दिशा ठरवायची आहे. कदाचित तुम्ही ती ठरवली असेल किंवा नसेलही. अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा करिअरची दिशा ठरवताना गोंधळ होतो. तुमचाही असाच गोंधळ होऊ नये, यासाठीचा विशेष हा लेख-
काळ बदलतो तसं आपलं जगणंही बदलत जातं. आपलं शिक्षण, नोकरी व्यवसाय यांचं स्वरूपही बदलत जात आहे. आता तर शिक्षणाचे कितीतरी पर्याय आपल्यासमोर आहेत. फक्त ते कसे निवडायचे, कशी पद्धतीने त्यांचा विचार करायचा हे महत्त्वाचं आहे.

आवड

त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे तुमची आवड. तुम्हाला काय आवडतं किंवा काय व्हावंसं वाटतं? काहींना लहानपणापासून काही विशिष्ट लक्ष्यानं झपाटलेलं असतं. कोणाला लहान असताना सचिन तेंडुलकरसारखं क्रिकेटर व्हावंसं वाटतं, पुढे जाऊन त्याच मुलाला असं वाटतं की, वाचन आणि अभ्यास हा माझा आवडीचा भाग आहे. आणि क्रिकेट मागे पडतं. असं काही तुमच्या बाबतीत आहे का? अनेकदा तुमचा छंद हेच तुमचं करिअर होतं आणि तेच अधिक योग्य आहे. असं म्हणतात, की करिअर असं असावं जे तुम्हाला आवडतं. ब-याचदा चाकोरीबद्ध जगताना माणसं पैसे कमावतात पण त्यांच्या आयुष्याला काही अर्थ उरत नाही. म्हणूनच तुमच्या आवडीच्या गोष्टी काय आहेत त्यांचा आधी विचार करा.

व्यावहारिकता

दुसरी गोष्ट म्हणजे, तुमचं करिअर व्यावहारिक आहे का? व्यावहारिकतेचा अर्थ ते करिअर तुम्हाला जमणार आहे का, आणि दुसरं म्हणजे आíथकदृष्टय़ा ते किती योग्य आहे. याचा अर्थ हा नव्हे की, प्रत्येक करिअरचा निर्णय किती पैसे मिळतील हे पाहूनच करावा, नाहीतर सगळेच डॉक्टर होतील. पण तुमच्या आवडीला बाजारात किती मागणी आहे हेही पाहणं गरजेचं आहे. उदा. तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर तुम्ही त्यात करिअर करू शकता, मात्र तुम्हाला हे समजणं आवश्यक आहे की यात तुम्हाला कमी पैसे मिळतील. तुमच्या घरच्या आíथक परिस्थितीचा विचार करणंही गरजेचं आहे. तसंच स्वत:च्या शारीरिक क्षमतांचा विचार करणही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला जहाजावर काम करायचं असेल तर महिनोन् महिने तुम्हाला घरापासून दूर राहायचं आहे याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. तुम्हाला सन्यात जायचं असेल तर ब-याच सुख-सुविधांचा त्याग करण्याची तुमची तयारी पाहिजे.

उद्दिष्ट

तुमचं उद्दिष्ट काय, याच्यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून आहे. उदाहरणार्थ, पैसा हे तुमचं उद्दिष्ट असेल तर तुम्हाला लवकर करिअर करणा-या आणि अल्पावधीत जास्त पगाराची नोकरी देणा-या करिअरचा विचार करावा लागेल. उदा. इंजिनीअरिंग, एमबीए, पर्यटन यासारखे करिअर पर्याय तुम्ही निवडू शकता. तुम्हाला समाजासाठी वेळ द्यायचा असेल तर पत्रकारिता आणि सोशल वर्क यासारखे अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. तुम्हाला व्यक्त होणं आवडत असेल किंवा संवाद साधणं आवडत असेल तर तुम्ही पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क या क्षेत्रात तुमचं करिअर घडवू शकता.

नावीन्य

तुम्हाला नावीन्याची हौस किती आहे यावरही तुमचा करिअरचा निर्णय अवलंबून असतो. इतर करतात त्यापेक्षा नवीन, काहीतरी जगावेगळं करण्याचा विचार जर तुम्हीकरत असाल तर नॅनो तंत्रज्ञान, बायो तंत्रज्ञान, पुरातत्त्वशास्त्र यासारखे करिअरचे पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत.

पालक

ब-याचदा पालक आपली आवड मुलांवर लादतात. तुमच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्हाला हे पालकांना पटवून देणं गरजेचं आहे. मुळात तुम्हाला तेच करिअर का करायचं आहे याबाबतीत तुम्ही स्वत: ठाम असणं गरजेचं आहे.
एखाद्या विद्यार्थ्यांची रुची कळावी, त्याला करिअर निवडण्यास मदत व्हावी यासाठीसुद्धा आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता. ती म्हणजे एखाद्या नामवंत संस्थेमार्फत अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट करून घेणं.

अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट

बरेच विद्यार्थी आपली आवड, कल समजण्यासाठी चाचणी करतात. त्यानंतर तुमच्या बुद्धय़ांकाप्रमाणे योग्य निर्णय घेणं तुम्हाला सोपं जातं. त्यासाठी एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाची मदत तुम्ही घेऊ शकता. अनेक शाळांमध्येसुद्धा ही सेवा उपलब्ध करून दिली जाते. तुम्हाला योग्य वाटत असेल तर अशी टेस्ट तुम्ही शकता.
मात्र वर नमूद केल्याप्रमाणे तुमचे निर्णय तुमच्या बुद्धय़ांकावर अवलंबून असतीलच असे नाही. याबरोबर तुमची आवड तुमचे करिअर ठरवण्याच्या कामात अधिक हातभार लावते.

आता तुम्हाला जे करिअर निवडायचं आहे त्याची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी वर्तमानपत्रात येणारी कात्रणं, इंटरनेटवरील माहिती, पुस्तकं यांचा आधार तुम्ही घेऊ शकता. त्याद्वारे सर्वोच्च शिक्षण, विविध नोकरीच्या/व्यवसायाच्या संधी कुठे आणि किती उपलब्ध आहेत हे तुम्हाला कळतं.
आता दहावीनंतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा आपण विचार करू –
साधारणत: तीन पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. तुम्हाला इंजिनीअरिंग करायचं असेल तर बारावी सायन्स न करता, दहावीनंतर डिप्लोमा करून इंजिनीअरिंग करणं अधिक योग्य असतं. ब-याचदा बारावी नंतर सीईटी देऊन मुलं इंजिनीअरिंगला जातात. त्यात तुमच्या समोरची स्पर्धा वाढते. त्यापेक्षा डिप्लोमा हा योग्य पर्याय असतो.

आर्ट्स

कला शाखा ही माणसांच्या मनाशी, माणुसकीशी, त्यांची जडणघडण त्यांचे विचार यांच्याशी जवळीक साधणारी अशी शाखा आहे. तुम्ही आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बारावी आणि त्यानंतर विशिष्ट विषयात पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अशा पद्धतीने शिक्षण पूर्ण करू शकता.

आर्ट्समधील विविध शाखांचा आपण विचार करू

इतिहास : माणसाला आपल्या इतिहासाची उत्सुकता असते. माणसाचा इतिहास हा अतिशय रंजकतापूर्ण आणि अनेक न उलगडलेल्या घटनांनी भरलेला आहे. त्यामुळे इतिहास या क्षेत्रात एक अतिशय रंजक आणि आव्हानात्मक करिअर लपलं आहे. विविध पुराव्यांच्या आधारे इतिहास शोधणा-यांसाठी पुरातत्त्व हे अजून एक करिअर आहे. तसंच म्युझिअममध्ये वस्तूंचं संगोपन कसं करावं हे शिकवणारं म्युझिऑलॉजी हे अजून एक चांगलं करिअर आहे.
यासाठी इतिहासात पदवी घेऊन पदव्युत्तर पदवी करता येईल. त्यानंतर नेट-सेट करून किंवा पीएचडी करून प्राध्यापक-संशोधक होता येतं किंवा शासकीय संस्थांमध्ये काम करता येतं.

अर्थशास्त्र : अर्थशास्त्र हे माणसं, व्यापार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असलेलं एक अतिशय आव्हानात्मक क्षेत्र आहे. अर्थशास्त्रात खूप मोठय़ा संधी उपलब्ध असतात. पदव्युत्तर पदवीनंतर प्राध्यापक, संशोधक होण्याबरोबरच भारतीय अर्थ व सांख्य सेवेत जाऊन देशाच्या सेवेत जाता येते.

मानसशास्त्र : माणसाच्या मनाशी संबंध असणारं हे क्षेत्र. यात अनेक उपशाखा आहेत आणि यात करिअरची मोठी संधी उपलब्ध आहे. जर तुम्हाला दुस-याला समजून घेणं, त्याच्या भावनांना जपणं आवडत असेल तर हे क्षेत्र तुमचं आहे.

राज्यशास्त्र : देश व विदेशातील राजकारणाशी संबंध असलेलं हे फार मोठं क्षेत्र आहे. यात अनेक कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून करिअर करता येते, याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संशोधन करता येतं.

कॉमर्स

व्यवसाय आणि आíथक क्षेत्राशी संबंधित ही शाखा आहे. यात पुढील काही विषयांतून तुम्हाला पदवी घेता येते.

अकाउंट : कॉमर्समधील मोठं क्षेत्र म्हणजे अकाउंट. विविध व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक संस्थांना आपल्या उत्पन्न-खर्चाचा ताळेबंद ठेवावा लागतो. यासाठी अकाउंटंटची गरज असते. कॉमर्समध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी करून हे क्षेत्र करिअर म्हणून निवडता येतं. यात अधिक पुढे जायचे असेल तर चार्टर्ड अकाउंटंट हा कोर्स करता येतो. बारावीनंतर सीएप्रमाणे कंपनी कायद्यातील आणि इतर व्यावसायिक कायद्यातील अभ्यासासाठी सीएस हा कोर्स उपलब्ध होतो. तीन र्वष अभ्यास आणि दीड र्वष ट्रेिनग असं या कोर्सचं स्वरूप असतं. दोन्ही कोस्रेससाठी चांगल्या संस्था उपलब्ध आहेत.

विज्ञान

विज्ञान हे क्षेत्र फार विस्तीर्ण आहे. त्याचप्रमाणे याच्या प्रत्येक उपशाखांमध्येसुद्धा अनेक क्षेत्रं आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ही तीन महत्त्वाची क्षेत्रं
आहेत.

नॅनो तंत्रज्ञान : एका अणूचं अनेक भागांत विभाजन करून त्याचे परिणाम शोधण्याचं क्षेत्र म्हणजे नॅनो तंत्रज्ञान. हे क्षेत्र येणा-या काळात विस्तारणार आहे.

अंतराळशास्त्र : आपल्या देशाने अंतराळशास्त्रात फार मोठी प्रगती केली आहे. आपण अवकाशात चांद्रयान आणि मंगलयान पाठवून, त्याद्वारे आपण विकसित देशांच्या बरोबरीत आहोत हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात फार मोठी संधी आहे. हे क्षेत्र निवडल्यास विक्रम साराभाई अंतराळ संशोधन, आयुका या भारतीय आणि नासासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तुम्हाला काम करता येईल.

बायोटेक्नाोलॉजी : बायोलॉजी आणि तंत्रज्ञान याचा मेळ होऊन जैवतंत्रज्ञान विकसित झालं आहे. हे क्षेत्रसुद्धा येणा-या काळात फार मोठं होईल.

इंजिनीअरिंग : बारावीनंतर इंजिनीअरिंग जरी करता येणार असलं तरी बारावी विज्ञान न करता वर नमूद केल्याप्रमाणे डिप्लोमा करणं अधिक योग्य आहे.

व्यवस्थापन : व्यवसाय व्यवस्थापन हे फार मोठं क्षेत्र पदवीनंतर करता येतं. बारावीनंतर बीएमएस हा कोर्स करून नंतर एमबीए करता येतं. यातसुद्धा सर्वसाधारण व्यवस्थापन, आíथक व्यवस्थापन अशा अनेक शाखा उपलब्ध आहेत.

प्रवेश परीक्षा : मेडिकल, इंजिनीअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्य शासनाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. या परीक्षेची तयारी बारावीबरोबरच करावी लागते. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात जाण्याचा विचार करत असाल तर प्रवेश परीक्षेचीसुद्धा माहिती काढून घ्या.
तर मग मित्रांनो, तुमच्यासमोर आता आयुष्याचा महासागर उभा राहणार आहे. त्याच्या तयारीला लागा. तुम्हाला दहावीच्या निकालासाठी मनापासून शुभेच्छा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version