Home कोलाज देव नाही देव्हा-यात..

देव नाही देव्हा-यात..

1

धर्मकारण, अर्थकारण आणि राजकारण यांची नेहमीच एकमेकांत सरमिसळ झालेली दिसते. म्हणूनच असेल कदाचित, ज्यांनी आयुष्यभर फकिरीत आनंद मानला त्या साईबाबांना भक्तमंडळी सोन्याच्या आभूषणांनी मढवतात. पुट्टपुर्थीचे सत्यसाईबाबा मृत्यूनंतर कोटय़वधी रुपये मागे सोडून जातात. वर्षानुवर्षे बंद असलेल्या दक्षिणेतील पद्मनाभ मंदिरातील तळघरात अगणित संपत्तीचा साठा मिळतो. तिरुपती किंवा सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटय़ांमध्ये लाखो रुपये जमा होतात आणि या सा-या पैशाभोवती धर्मकारण आणि राजकारण भिरभिर फिरते. या दुष्टचक्रात सर्वसामान्य मात्र भरडून निघतो. धनाढय़ भक्त साजूक तुपातील चविष्ट पदार्थाची देवाच्या मूर्तीसमोर रोज आरास करतात, पण आपल्या अवतीभोवती पसरलेल्या दरिद्री बांधवांची भूक भागवणे त्यांना गरजेचे वाटत नाही. देवाला उंची वस्त्रे-आभूषणे, पण आमच्या लाखो गोरगरीब आया-बहिणींना लज्जारक्षणार्थ चांगले कपडे मिळत नाहीत. देवासाठी पायी चालणारे, तासन् तास रांगा लावणारे लोकशाहीतील मतदानाचे परमकर्तव्य बजावताना दिसत नाहीत. देशातील राजकारण्यांवर टीका करण्यासाठी हाच वर्ग पुढे असतो. जोवर हे असे दांभिक प्रकार थांबणार नाहीत, तोवर शिर्डीच्या साईबाबा संस्थानात, प्रत्येक देवळात अनागोंदी कारभार होत राहणार.

शिर्डीचे श्रीसाईबाबा हे देव नाहीत, म्हणून हिंदूंनी त्यांची पूजा करू नये, असे भन्नाट विधान करून द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. तसे पाहायला गेल्यास हे स्वरूपानंद महाराज अशा वादग्रस्त विधानांसाठी आणि कृतीसाठी ब-यापैकी चर्चेत असतात. मध्यंतरी एका पत्रकारावर हल्ला करून ते चांगलेच चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवत्व देणा-या ‘हर हर मोदी’ या घोषणेविरोधातही या शंकराचार्यानी उघड नाराजी व्यक्त केल्याने भाजपातील धर्ममरतडांची बरीच अडचण झाली होती. आता त्यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्यावर कारण नसताना आगपाखड केल्याने एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. स्वामी स्वरूपानंद आणि त्यांच्यासारख्या अनेक हिंदुत्ववादी धर्ममरतडांना शिर्डीतील साई मंदिरात दररोज वाढणारी गर्दी नेहमीच डोळ्यांत खुपत असते. साईबाबांसमोर पडणारा सोन्या-नाण्याचा आणि करोडो रुपयांचा खर्च या धर्ममरतडांची पोटदुखी वाढवत असतो, त्यामुळे साईबाबांचे मुस्लीम असणे, ही एकच गोष्ट पुढे करून हे लोक त्यांच्या विरोधात बोलत असतात. खरं सांगायचं तर शंकराचार्य व अन्य कोणत्याही धर्मगुरूंना साईबाबा किंवा तत्सम विषयावर बोलण्याचे सध्या काही कारण नाही. त्यांना जर समाजप्रबोधनच करायचे असेल, तर वाढत्या अंधश्रद्धेविरोधात, कर्मकांडांच्या वाढत्या अवडंबराविरोधात किंवा घातक रूढी-परंपराविरोधात ते सहजपणे बोलू शकतात.

दुर्दैवाने तसे काम करण्याऐवजी आमच्याकडील धर्मगुरूंना भ्रामक आणि भंपक गोष्टींमध्ये जास्त रस असल्याचे दिसून येते. या स्वरूपानंदांनी सुमारे वीस वर्षापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात उद्गार काढले होते. ते म्हणाले होते, ‘‘डॉ. आंबेडकरांचा जन्म दलित घराण्यात झाला होता, पण अस्पृशांच्या चळवळीत त्यांनी शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे आंबेडकरांना दलितांचे कैवारी म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे,’’ असे बुद्धीचे तारे स्वरूपानंदांनी तेव्हा तोडले होते, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती, परंतु स्वरूपानंदांना मात्र आपल्या विधानाचा कुठे पश्चात्ताप झालेला दिसला नव्हता. या वेळीसुद्धा साईबाबांविरोधात बेलगाम वक्तव्य केल्यानंतरही शंकराचार्याना अद्याप उपरती झालेली दिसत नाही. त्यांच्या विरोधात देशभरातील साईभक्त एकवटलेले आहेत.

आजवर कुठल्या शंकराचार्याचा झाला नसेल एवढा तीव्र निषेध स्वरूपानंदांच्वक्तव्याचा होत आहे. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळले गेले. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी पोलिस तक्रारी दाखल झाल्या आणि आता काही साईभक्त त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते. एकूणच काय तर एका धर्मगुरूविरोधात त्यांच्या धर्मातील लोक उभे राहिल्याचे चित्र आज दिसत आहे. अर्थात, या सगळ्याला शंकराचार्य महाशयांचा बोलभांडपणाच कारणीभूत आहे. त्यांनी कोणतेही कारण नसताना साईबाबांच्या देवत्वावर शंका घेतल्याने शंकराचार्यानी आपले संतत्व किती कच्चे आहे, हेसुद्धा सिद्ध केले आहे. त्यांनी जर शिर्डी, तिरुपती बालाजी किंवा सिद्धिविनायकासारख्या अनेक मंदिरांमध्ये साठवलेल्या संपत्तीचा विनियोग गोरगरिबांच्या उन्नतीसाठी व्हावा, असा आग्रह धरला असता तरीही संपूर्ण देशवासीयांनी त्यांचे आभार मानले असते. परंतु ज्या द्वारकापीठाचे ते शंकराचार्य आहेत, त्या त्यांच्या मठात ते चांदीच्या सिंहासनावर बसतात. त्यांना भेटण्यासाठी धनाढय़ मंडळींची रीघ लागलेली असते. ते कुठेही गेले तरी त्यांचा सारा थाटमाट एखाद्या राजा-महाराजासारखा असतो, मग अशा चैनीस्वामींना साईबाबांच्या विषयी काहीही बोलण्याचा अधिकारच उरत नाही. ते ज्या आद्य शंकराचार्याच्या पुण्याईवर आज मठाधीश बनले आहेत, त्या आद्य शंकराचार्यानी आपल्या आयुष्याच्या बत्तीस वर्षात अवघा देश पायाखाली घातला.

केरळमधील कालरी गावात जन्मलेल्या त्या विद्वान मुलाने आपल्या अलौकिक बुद्धी सामर्थ्यांच्या बळावर हिंदू तत्त्वज्ञानाची तर्कशुद्ध मांडणी केली होती. त्यांनी आठव्या शतकात केलेल्या शंकराचार्याच्या चार मठांमुळे हिंदू धर्माला पुन्हा ऊर्जितावस्था आली होती, कारण आद्य शंकराचार्यानी बादरायणाचे ब्रह्मसूत्र उपनिषदे आणि भगवद्गीतेचे नव्याने अध्ययन आणि सुक्ष्म चिंतन करून लोप पावत चाललेल्या भारतीय तत्त्वज्ञानाला वेगळीच झळाळी दिली. त्यांनी लिहिलेले ‘सौंदर्यलहरी’ किंवा ‘विवेकचुडामणी’ यांच्यासारखे ग्रंथ वाचल्यानंतर आद्य शंकराचार्याच्या प्रतिभाशक्तीने मन थक्क होते. विशेष म्हणजे, हा सारा खटाटोप करत असताना, आद्य शंकराचार्य परंपराप्रिय हिंदू तत्त्वचिंतक आणि गौतमाचा बुद्ध धर्म, वर्धमानाचा जैन धर्म तसेच नास्तिकतेचा पुरस्कार करणा-या चार्वाकाच्या लोकायन पंथाशी एकहाती वैचारिक लढाई करीत होते. स्वरूपानंद सरस्वतींनी आद्य शंकराचार्याच्या या वैचारिक क्षमतेची बरोबरी करावी, असा आमचा अजिबात आग्रह नाही, पण आद्य शंकराचार्याच्या गादीवर बसलेल्या या मठाधीपतींनी आपला मठ्ठपणा असा जगजाहीर करावा, हे वागणेसुद्धा बरे नाही.

आपल्या देशात ब-याच गावांमध्ये, शहरांमध्ये साईबाबांची मंदिरे आहेत. या दोन हजारहून अधिक मंदिरांमध्ये दररोज लक्षावधी भाविक साईंच्या दर्शनाला जात असतात. त्यांच्या या साईभक्तीमागे कोणते कारण असावे, हा साधा विचार जरी आमच्या शंकराचार्यानी केला असता तरी त्यांच्या बोलण्यामध्ये फरक झाला असता. साईबाबांचे अवघे आयुष्य साधेपणा, सच्चेपणा आणि चांगुलपणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी वाहिलेले दिसते. मुख्य म्हणजे साईबाबा ‘आधी केले आणि मग सांगितले’ या पठडीतले असल्यामुळे अल्पावधीत त्यांच्या शब्दांचा प्रभाव शिर्डीबाहेर पसरला. साधारणत: १८५८ मध्ये नगर जिलतील शिर्डी या आडवळणाच्या गावात साईबाबांचे आगमन झाले. एका लग्नाच्या वऱ्हाडासोबत शिर्डीत आलेल्या सोळा वर्षाच्या तरुणाला खंडोबा मंदिरातील पुजारी म्हाळसापती यांनी ‘‘आओ साई’’ अशी साद घालून बोलावले, तेव्हापासून साईबाबा हे नाव शिर्डीच्या नावाशी एकरूप झाले.

सुफी संप्रदायामध्ये पीर, फकिरांना साई नावाने संबोधण्याची परंपरा आहे. पण साईंच्या संपर्कात आलेल्या बहुतांश हिंदू भक्तांनी ‘साई’ या शब्दाची फोड ‘साक्षात ईश्वर’ अशी केली असावी, त्यामुळे साईतत्त्व ज्ञानाचा महिमा साधारणत: दीडशे वर्षापासून देशात आणि देशाबाहेर पसरताना दिसतोय. साईबाबांनी आपल्या संपूर्ण हयातीत निधर्मी एकेश्वरवादाचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांच्या भक्तगणांमध्ये हिंदू-मुस्लिमांसह, पारशी आणि ख्रिश्चनांचादेखील भरणा असे. प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्मानुसार वर्तन करायला सांगताना, ते ‘सबका मालिक एक है’ ही बाब आवर्जून सांगत.

आपल्या जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करण्यासाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असे साईबाबांचे सांगणे असायचे. त्यांच्या या विचारांना माणुसकीची जोड होती. ते स्वत: आजारी माणसांना बरं करण्यासाठी झटायचे. आपल्याकडे आलेल्या लोकांना स्वत:च्या हाताने जेवण करून द्यायचे आणि सगळ्यांनी मानवतेला धरून वागावं, असा सहजसोपा माणुसकीचा धर्म सांगायचे. म्हणून आजही जगभरातल्या लोकांना साईबाबा आपले वाटत असावेत. त्याउलट कर्मट हिंदू रूढी-परंपरा दिवसेंदिवस कालबाठरताना दिसताहेत. लोकांच्या आचार-विचारावर पाश्चात्त्य जीवनशैलीचा प्रभाव वाढतोय. हे सगळं थांबवायचं सोडून जर शंकराचार्य नको त्या गोष्टींना हात घालत असतील, तर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावेच लागणार.

वास्तविक पाहता शिर्डीतील सद्य:स्थिती हा खरा सामूहिक चिंतेचा विषय असला पाहिजे. देशात तिरुपतीच्या बरोबर सर्वाधिक आर्थिक कमाई असणारे शिर्डी ‘संस्थान’ हे कधी तरी, कुणी तरी खालसा करण्याची आवश्यकता आहे. विविध राजकीय पक्षांनी लोकांच्या देणग्यांतून जमा होणा-या निधीवर आपले ‘पहारेकरी’ बसवण्याची परंपरा निर्माण केल्यामुळे देवाच्या चरणी वाहिलेला पैसा क्वचितच कारणी लागताना दिसला. आज जर तुम्ही शिर्डीत गेलात, तर तिथे तुम्हाला प्रचंड विरोधाभासच दिसेल. ज्या शिर्डी संस्थानाचे १९२२ साली वार्षिक उत्पन्न अवघे २०० रुपये होते, त्या शिर्डी संस्थानाचे फक्त पाच-सहा वर्षातील उत्पन्न पाहिले तर आपले डोळे फिरतील. मागील पाच-सहा वर्षात शिर्डी संस्थानाला भाविकांनी साधारणत: १५०० कोटींहून अधिक देगण्या दिलेल्या दिसतात. दररोज साठ हजार लोक शिर्डीत दर्शनाला येतात.

शनिवार-रविवारीही दर्शनार्थीची संख्या एक लाखाहून अधिक असते. आणि सुट्टीच्या दिवसांत तर शिर्डी लाखो लोकांनी गजबजून गेलेले दिसते, पण तरीही या शहराच्या एकूण व्यवस्थेकडे कोणाचेच लक्ष नाही. दिवसेंदिवस शिर्डी बकाल आणि भकास होत चालली आहे. नगरविकासाच्या सा-या संकल्पना पायदळी तुडवल्या असल्यामुळे तेथील पायाभूत सुविधा पूर्ण कोलमडून गेलेल्या दिसतात. रस्ते जवळजवळ नसल्यासारखेच आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह किंवा शौचालयांची सर्वत्र दुरवस्था झालेली आहे. जगातील सगळ्या अनैतिक गोष्टींचा बाजार शिर्डीच्या रस्त्या-रस्त्यांवर मांडलेला असतो. दानपेटीवर नजर ठेवून बसलेल्या संस्थानाधिपतींना मात्र या मंदिराबाहेरील दुरवस्थेची चिंता नसते. ते सारे मग्न आहेत व्यावसायिकरणाच्या एककलमी कार्यक्रमात. जेवढे जास्त उत्पन्न मंदिराला मिळणार तेवढी पैसे खाण्याची संधी जास्त, अशा या विश्वस्त मंडळींचा विचार असेल, त्यामुळे लोकांना भुलवण्याच्या आणि पैसे कमावण्याच्या नवनवीन शक्कल लढवल्या जातात.

मध्यंतरी विश्वस्त मंडळाने साईबाबांसाठी बावीस कोटी रुपये खर्चून सोन्याचे सिंहासन तयार करण्याची घोषणा केली होती, त्या विरोधात सर्वसामान्य माणसांनी आवाज उठवल्यामुळे तो मुद्दा मागे पडला होता. त्यानंतर विश्वस्त मंडळाने रॉयल्टीचा एक नवाच वाद निर्माण केला होता. साईबाबा हे एक ‘प्रॉडक्ट’ आहे. त्याची मालकी आणि त्यांच्या मार्केटिंगचा अधिकार फक्त आमच्याकडे आहे, असे समजणा-या विश्वस्तांनी देशातील सुमारे दोन हजार आणि विदेशातील सुमारे दीडशे मंदिरांनी त्यांच्या दानपेटीत जमा होणा-या रकमेपैकी २५ टक्के रक्कम शिर्डी संस्थानाला द्यावी, अशी विचित्र मागणी केली गेली होती, पण त्यावरही टीकेची झोड उठल्यामुळे विश्वस्तांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. एकूणच काय तर खोटी प्रवास बिले सादर करण्यापासून तर शिर्डीतील विमानतळाला आर्थिक निधी देण्याच्या मुद्दयापर्यंत अनेक विषयांत शिर्डी संस्थानाचे ‘संस्थानिक’ वादग्रस्त ठरताना दिसताहेत. त्यांना सुधारण्याचे न्यायालयाचे प्रयत्नसुद्धा अयशस्वी ठरलेले दिसतात आणि म्हणूनच लोकांच्या पैशावर चालणा-या या सा-या मठ-मंदिरांतील कोटय़वधी रुपये समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांसाठी वापरले जावेत यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे.

शिर्डी ज्या नगर जिलत आहे, तेथील दुष्काळग्रस्त आदिवासी तालुके जरी डोळयासमोर आणले तरी आपल्याला साईबाबांचे नाव घेऊन पैसे जमवणा-या, या धंदेवाईक लोकांची स्वार्थी वृत्ती लक्षात येईल. ज्या साईबाबांनी आयुष्यभर फकिरी बाणा अंगीकारला होता, ज्यांचे दररोजचे जेवण भिक्षा मागून होत असे, त्या साईबाबांच्या मूर्तीसमोर आता चांदीच्या ताटात पंचपक्वान्नांचा नैवेद्य ठेवला जातो. पण लगतच्या गावांमधील गोरगरिबांच्या खपाटीला गेलेल्या पोटांमध्ये दोन-चार दाणे पडावेत, यासाठी मात्र कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही. नगर जिल्हा हा पाणीटंचाईसाठी ओळखला जातो. विशेषत: ग्रामीण भागांतील महिलांना पाण्यासाठी मैलोन् मैल भ्रमंती करावी लागते. त्यासाठी आजवर शिर्डी संस्थानाने एकही पाऊल उचललेले दिसत नाही. मग जर विश्वस्तांनाच साईबाबांच्या विचारांचा विसर पडला असेल, तर शिर्डीतील काळे धंदे करणा-या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आज साईबाबांनी सांगितलेली भूतदया सगळ्यांनी अंगीकारण्याची गरज आहे. आमच्या सर्वच संतांनी गरिबांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगितले. साईबाबाही आपल्याकडे येणा-या प्रत्येकाला तसाच उपदेश करीत. वारकरी संप्रदायाच्या मानवतावादी मुशीत घडलेल्या महाराष्ट्राला म्हणूनच साईबाबांचे हे विचार पटले असावेत. महाराष्ट्राने पंढरीच्या पांडुरंगाएवढाच विश्वास साईबाबांवर दाखवला. परिणामी शिर्डीसारख्या खेडयात अवतरलेला एक फकीर अल्पावधीत कोटय़वधी मराठी घरांत आसनस्थ झाला. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणते, तर पांडुरंगाबरोबर साईबाबांचेही नाव घ्यावे लागेल. साईबाबांचे चरित्र लिहिणा-या प्रख्यात संतकवी दासगणू यांनी एका अभंगात शिर्डीची तुलना पंढरपूरशी केलेली दिसते. ते म्हणतात –

शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर।
शुद्धभक्ती चंद्रभागा, भाव पुंडलिक जागा।।

पण काळानुरूप बदललेल्या शिर्डीतील सध्याची स्थिती आता वेगळी आहे. येथे पुंडलिकाचा भाव असलेला भक्त येताना दिसत नाही आणि बाजारूपणाच्या भाऊगर्दीत शिर्डीतील शुद्ध भक्तीची गंगा साफ आटून गेलेली दिसते. ती पुन्हा भावभक्तीने आणि माणुसकीच्या शक्तीने खळाळून वाहती व्हावी. तिच्या साहाय्याने शिर्डीच्या आसपासच्या तालुक्यांतील लोकांचे जगणे जरी सुजलाम-सुफलाम झाले तरी साईबाबांच्या विचारसरणीचा विजय झाला, असे म्हणता येईल.

1 COMMENT

  1. हा लेख अगदी सत्‍य मांडणारा आहे. खरच आज सर्वांनीच विचार करावयाची वेळ आली आहे. ज्‍या देवाला आपण सर्वश्रेष्‍ठ मानतो, सर्वशक्तिमान मानतो त्‍यालाच आपण काहीबाही देतो आणि त्‍याचे महानत्‍व कमी करतो. म्‍हणजे एक प्रकारे जसे कुठलेही काम करण्‍यासाठी आपण लाच देतो अगदी तोच प्रकार. ही मानसिकता समाजाने बदलायलाच हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version