Home महामुंबई धूळवड खेळा, पण पाण्याविना!

धूळवड खेळा, पण पाण्याविना!

1

एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊ आणि यंदा ‘धूलिवंदन’च्या दिवशी पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय घेऊ. ‘प्रहार प्रबोधन’च्या माध्यमातून आपल्याला ‘धूळवड खेळा पण पाण्याविना’ असे आवाहन करत आहोत.

धूळवड म्हणजे रंगांचा सण! या उत्साही सणाच्या दिवशी मुंबईतील अवघी तरुणाई रंगजल्लोषात न्हाऊन निघेल. पण, सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आहे. पाण्याअभावी दुष्काळग्रस्त भागातील जनता हवालदिल झाली आहे. अशावेळी आपण पाण्याचा अपव्यय करणे कितपत योग्य ठरेल. जलव्यवस्थापन करणे ही आता महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे चला, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊ आणि यंदा ‘धूलिवंदन’च्या दिवशी पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय घेऊ. ‘प्रहार प्रबोधन’च्या माध्यमातून आपल्याला ‘धूळवड खेळा पण पाण्याविना’ असे आवाहन करत आहोत. चला, ‘प्रहार’च्या या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा!

पाण्याअभावी महाराष्ट्रात दुष्काळाचे वातावरण आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आपण स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी उचलून ही पाण्याची समस्या टाळली पाहिजे. आपण एक थेंब पाणी वाचवल्यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबाच्या एका घरात पाणी पोहोचेल, या भावनेने होळीच्या सणात सामील होत या रंगपंचमीला पाणी वापरणे टाळावे. – नितेश राणे, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमान संघटना

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरडा दुष्काळ पडला आहे. राज्यातील ही दुष्काळाची परिस्थिती पाहता, येणारी होळी मुंबईकरांनी कोरडय़ा रंगांनी खेळावी. पाण्याचा जास्त वापर करू नये. रंगपंचमीत रासायनिक रंगाचाही वापर करू नये, जेणेकरून तो रंग काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होणार नाही, त्याशिवाय आरोग्याचीही समस्या उद्भवणार नाही. – सुनील प्रभू, महापौर, मुंबई महापालिका.

होळी म्हणजे धमाल मस्ती, अशी माझी दरवर्षीची कल्पना होती. मात्र यामध्ये आपण पाण्याचा किती अपव्यय करतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. होळीत पाणी वापरले नाही तर होळीची मजा कमी होणार का? शेवटी होळीचा खरा आनंद हा एकमेकांबरोबर मजेत वेळ घालवण्यात आहे. एकमेकांबरोबर आनंद व्यक्त करताना इतर माध्यमांची आवश्यकता तशी कमीच आहे. त्यामुळे या वर्षी पाण्याचा अपव्यय न करता, कोरडया रंगात ही होळी खेळावी, असे माझे मत आहे. त्यातही हे रंग जर कोणाला त्रास न होणारे असतील तर आणखीनच आनंददायी होईल. खा, प्या मजा करा, धमाल नाचा पण पाणी वाया घालवू नका.
– प्रियंका चोप्रा, अभिनेत्री

निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना आपण पाण्याचा अपव्यय करणे योग्य ठरेल का? दरवर्षी आपण दुष्काळाला सामोरे जातो. पण त्यातून धडा घेण्याऐवजी, पाण्याची उधळपट्टी सुरूच असते. आठवडयाभराने होळी आणि रंगपंचमी येतेय. वाईट सवयी, कृत्यांचा त्याग होळीच्या निमित्ताने केला जातो. यंदाच्या होळीचे निमित्त साधून आपण ‘प्रहार प्रबोधना’त सहभागी होऊ या आणि संकल्प सोडू या, पाणीबचतीचा, जलव्यवस्थापनाचा व यापुढील रंगपंचमी पाण्याचा वापर न करता नैसर्गिक रंगांनी खेळण्याचा.
– वल्सा नायर-सिंग, सचिव, पर्यावरण विभाग

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version