Home महामुंबई ना ना म्हणत उद्धव शपथविधीसाठी पोहोचले

ना ना म्हणत उद्धव शपथविधीसाठी पोहोचले

1
Narendra Modi & Uddhav Thackeray

अमित शहा आणि त्यांच्या सहकार्याची तुलना ‘अफझल खानाची फौज’ अशी करणा-या शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधीला जाणार नाही, ही घोषणा मागे घेऊन पुन्हा तलवार म्यान करावी लागली.
मुंबई- अमित शहा आणि त्यांच्या सहकार्याची तुलना ‘अफझल खानाची फौज’ अशी करणा-या शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधीला जाणार नाही, ही घोषणा मागे घेऊन पुन्हा तलवार म्यान करावी लागली. शिवसेनेला भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे कारण पुढे करून सुरुवातीला शपथविधी सोहळयावर बहिष्कार टाकण्यात आला. मात्र, होणारा अपमान सहन करत नाईलाजाने उद्धव यांना शपथविधीसाठी हजर रहावे लागले. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दुरध्वनी वरून विनंती केल्यानंतर शपथविधीला हजर राहिल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

आधी युतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करताना आणि युती तुटल्यानंतर भाजपला क्रमांक एकचा शत्रू मानून टोकाची टीका करणा-या शिवसेनेला भाजपकडून कोणत्याच पद्धतीचा प्रतिसाद दिला जात नव्हता. तसेच शिवसेनेला भाजप नेते गणतीत ही पकडत नव्हते. सत्तेत सहभागी व्हायचे की नाही किंवा पाठींबा द्यायचा की नाही याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा, असे भाजप नेते सांगत होते. शिवाय शिवसेनेने केलेली मंत्री पदांची मागणीही ते धुडकावत होते. त्यामुळे शिवसेनेची पुरती कोंडी झाली होती. देऊ तेवढी मंत्रीपदे घ्या अटी घालू नका असे भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे शिवसेना दुखावली गेली होती. त्त्यामुळे विरोधीपक्षात बसण्याची तयारी शिवसेनेने चालवली होती. सन्मान होत नसेल तर त्या सत्तेत सहभागी होणार नाही असे शिवसेनेकडून सांगितले जात होते. तसेच शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणाही करण्यात आली. परंतु, ही घोषणा बोलाची कडी आणि बोलाचाच भात ठरली.

शपथविधाला नाही नाही म्हणता सर्वात शेवटी उद्धव ठाकरे उपस्थित राहीले. सत्ते शिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर देईल ते घेण्याची तयारी कदाचीत शिवसेना नेतृत्वाने दाखवली आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना आधी शपथविधीला जाणार नाही असे सांगणा-या उद्धव यांना अखेर शपथविधीला जावे लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा पूर्ण उतरला होता. ते बळजबरीने हसण्याचा प्रयत्न करत होते. शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केल्यानंतर उद्धव लागलीच निघून गेले. इतर मंत्र्यांचे अभिनंदन करण्याचेही त्यांनी टाळले. पंतप्रधानांबरोबरही जुजबी पण लांबून नमस्कारांची देवाण घेवाण झाली. त्यानंतर ते तिथून निघून गेले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version