Home टॉप स्टोरी ‘पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार!’

‘पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार!’

1

पत्रकारांवरील हल्ल्यांप्रकरणी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी भाईंदर येथे सांगितले.

भाईंदर- पत्रकारांवरील हल्ल्यांप्रकरणी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी बुधवारी भाईंदर येथे बोलताना सांगितले. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी हजारो कार्यकर्त्यांसह घरावर हल्ला केलेल्या पत्रकार वसंत माने यांची राणे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यानंतर ते बोलत होते. या भेटीत माने यांना धीर देत मी, माझा पक्ष आणि माझी संघटना तुमच्या पाठीशी आहेत, अशा शब्दांत त्यांनी माने यांना धीर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाईंदर येथील राजसत्ता साप्ताहिकाचे पत्रकार वसंत माने यांच्या घरावर शुक्रवारी रात्री भाजपाचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या हजारो समर्थकांनी हल्ला केला होता. यावेळी माने आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तसेच सोसायटीतील साहित्याची तोडफोड करत रस्ता रोकोही करण्यात आला होता. यानंतर भाजपाच्या दबावाखाली असलेल्या पोलिसांनी पत्रकारांच्या मोठ्या पाठपुराव्यानंतर सोमवारी रात्री मेहता यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार, तसेच ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी बुधवारी माने यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी ‘स्वाभिमान’चे जिल्हा संघटक संदीप राणे, समर्थ कामगार सेनेचे विश्वनाथ दळवी यांच्यासह काँग्रेस आणि ‘स्वाभिमान’चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. वसंत माने यांची विचारपूस करून त्यांना धीर दिल्यानंतर नितेश राणे यांनी भाजपावर टीका केली. भाजपाचे गुंडाराज चालले असून याचा मी निषेध करत आहे, याबाबत विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांना पत्र देऊन अधिवेशनात या घटनेबाबत, तसेच मंगळवारी दिघा येथे पत्रकारांवरील झालेल्या हल्ल्याबाबत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. तर नरेंद्र मेहता यांच्यावरही हल्लाबोल करत आमदार नरेंद्र मेहता यांनी महापालिकेत, तसेच शहरात अनेक घोटाळे केले असून त्यावर पांघरूण घालण्यासाठी पत्रकारांसह अनेकांवर दबावतंत्र वापरण्यात येत आहे. पत्रकारांच्या गुन्हा नोंदविण्याच्या मागणीला नकार देण्यासाठी पोलिसांनाही त्यांनी वेठीस धरले होते, असे ते म्हणाले. पोलीस हे जनतेसाठी असून भाजपासाठी नाहीत याचा विसर पोलिसांना पडला आहे, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे, असे म्हणत राणे यांनी भाईंदर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवरही तोफ डागली.

पत्रकारांनी योग्य वेळी जागा दाखवून द्या!

यावेळी पत्रकारांशी बोलताना वसंत माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकारांनी विसर पडू देऊ नका, तसेच योग्य वेळी मेहता आणि भाजपाला त्यांची जागा दाखवून द्या, असे नितेश राणे म्हणाले. माने यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राणे यांना अक्षरश: वेढा घातला होता. माने यांची भेट घेणारे नितेश राणे हे पहिलेच नेते आहेत. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना, आमदार नरेंद्र मेहता यांच्या टीडीआर घोटाळ्याबाबत अनेक पुरावे असल्याचे सांगत नगररचनाकार दिलीप घेवारे यांची नियुक्ती कशी झाली हे सांगून बिल्डरला अटक झाली, पण घेवारेला अटक होईपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचे राणे म्हणाले. आमदार नरेंद्र मेहता यांच्या भीतीने मीरा-भाईंदर, तसेच शेजारील ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही नेत्याने किंवा लोकप्रतिनिधीने पत्रकाराना पाठिंबा दिला नाही. पण आमदार नितेश राणे यांनी भाईंदरला येऊन माने यांची भेट घेतली आणि पत्रकारांना पाठबळ दिले, याचे शहरातील पत्रकार आणि नागरिकांनी कौतुक केले.

1 COMMENT

  1. Saamna वर बंदीचे शब्दबंबाळ, NDTV वर बंदीचेही शब्दबंबाळच् , व्यंगचित्रावर (बाळासाहेबांनी रेखाटलेले नव्हे) व ते छापणा-यांवर हल्ला? शाब्बास! Kuthe neoon thevlai Maharashtra आणि भारत Maajha? ‘पत्रकारांवरील हल्ल्याप्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार!’
    पत्रकारांवरील हल्ल्यांप्रकरणी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी भाईंदर येथे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version