Home महाराष्ट्र कोकण पेण तालुक्यात विकासाची गंगा!

पेण तालुक्यात विकासाची गंगा!

3

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातील सिंचनासाठी असलेल्या जलसाठय़ापैकी डाव्या तीर कालव्यातून १४ गावांसाठी पाहिल्या टप्प्यातील १८ किमीपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. 

पेण- तालुक्यातील हेटवणे धरणातील सिंचनासाठी असलेल्या जलसाठय़ापैकी डाव्या तीर कालव्यातून १४ गावांसाठी पाहिल्या टप्प्यातील १८ किमीपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे.

रविवारी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते हेटवणे धरण (नाजेगाव) येथे कालव्याचे पाणी सोडण्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. एप्रिल अखेर कालव्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यास उजव्या कालव्याद्वारे पाणी पेण खारेपाटातील शेतीसाठी सोडण्यात येईल. या कालव्याच्या पाण्यामुळे ५२ गावांतील हजारो हेक्टर भातशेती दुबार पिकासाठी सिंचनाखाली येणार असल्याचे तटकरे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. डाव्या कालव्याचे २० किलोमीटपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून पानेड, नायगाव, कुरमुराची, आधाटणे, बोरगाव, कसबे, पेण, वडगाव, महाडिक वाडी, रोठे, कामरतीरे, मळेधर आदी गावातील शेतक-यांना व परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. सुमारे ३२५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या हेटवणे धरणातील पाण्याचा लाभ स्थानिक शेतक-यांना होत नव्हता.

मात्र आता कालव्याची कामे टप्प्याटप्प्यात पूर्ण करण्याची सुरुवात म्हणून रविवारी प्रथमच डाव्यातीर कालव्याद्वारे १९ ते २० किमीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील जवळपास ३०० ते ३५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उजव्या तीर कालव्याच्या रखडलेल्या कामासाठी ८ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास हा कालवा ११ ते १७ या टप्प्यातील खारेपाटातील जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. या पाण्यामुळे नगदी पिके घेण्यास मोठय़ा प्रमाणात मदत होणार आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा परिसरातील शेतक-यांनी घेण्याचे आवाहन तटकरे यांनी स्थानिक शेतक-यांना बोलताना केले.

सध्या संयुक्त कालव्यातून डाव्यातीर कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. तालुक्यातील १३,१०० हेक्टर जमिनीपैकी उजवा व डाव्या कालव्यांची कामे पूर्ण झाल्यास भविष्यात ५,४७५ हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. मात्र अपूु-या निधीमुळे कालव्यांची कामे रखडल्याने अडचणी येत असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version