Home संपादकीय अग्रलेख प्रतीक्षा नव्या प्रबोधनपर्वाची!

प्रतीक्षा नव्या प्रबोधनपर्वाची!

1

महाराष्ट्र भक्ती आणि मराठीचे प्रेम ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्तात भिनवले त्या प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. २० नोव्हेंबर, १९७३ रोजी प्रबोधनकारांचे निधन झाले. त्यावेळी मुंबई-महाराष्ट्रात जी मराठी माणसाची स्थिती होती, अगदी तशीच स्थिती आज बाळासाहेबांच्या जाण्याने झालेली दिसत आहे.

शिवसेनाप्रमुखांना ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करायला झालेली अफाट गर्दी अक्षरश: आजवरचे सगळे रेकॉर्ड तोडणारी होती. तो लक्षावधी हातांचा, मुखांचा अजस्र् जनसागर आपल्या नेत्याच्या जाण्याने नुसताच दु:खी झालेला नव्हता तर त्याच्यात पोरकेपणाची, अगतिकतेची, हतबलतेची भावना दाटून आली होती. आज मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणूस गिरगाव-गिरणगावाच्या सीमेवरून हद्दपार होत आहे. तो नोकरीत तृतीय-चतुर्थश्रेणीत ढकलला जात आहे. आर्थिक-सामाजिक असुरक्षिततेच्या भावनेने मराठी मन गुदमरून गेले आहे. बाळासाहेबांच्या जाण्याने हा तमाम मराठी समाज खूप अस्वस्थ झाला आहे. म्हणून ‘बाळासाहेब परत या’ अशी आर्जवे करीत तो अंत्ययात्रेत जिवाच्या आकांताने उतरला, रडला, पोरकेपणाच्या भावनेने विकल होऊन एक-दोन खोल्यांच्या खोपटय़ात परतला. त्याच्या मनातील भाव-भावना जाणणारे नेतृत्व बाळासाहेबांच्या जाण्याने आज महाराष्ट्रभूमीत नाही. परंतु तसे नेतृत्व उदयाला येणे अशक्य नाही. जशी काळीकुट्ट रात्र तेजस्वी सूर्याला जन्म देते, तद्वत मराठी माणसांच्या मनातील अस्वस्थता, अगतिकता एका नव्या लखलखणा-या सूर्याला जन्म देईल. होय, आम्हाला तशी आशा आहे.

पित्याच्या पावलावर पाऊल टाकून मुलगा चालतो, असं म्हणतात. नुकतेच निधन पावलेले बाळासाहेब ठाकरे नावाचे वादळ या कसोटीला पुरेपूर उतरले होते. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत, ‘हा बाळ तुम्हाला मी देऊन टाकला’ असे सांगितले होते. अन् पुढे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करून बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. जबाबदारी कोणतीही असो, पण कोणताही पिता इतक्या सहजासहजी आपला पुत्र समाजाच्या हवाली करीत नाही, हेही तितकेच खरे आहे. परंतु ते धाडस प्रबोधनकारांनी केले होते. त्यावेळी त्यांचे वय होते ८१ वर्षे. साहजिकच या वयात प्रबोधनकारांनी हे धाडस का केले? त्यापाठीमागचे रहस्य काय होते? असे प्रश्न उपस्थित होणे हे ओघाने आलेच. परंतु त्याचे उत्तर त्यावेळच्या मुंबईतील सामाजिक परिस्थितीत दडले होते. त्या काळात मुंबईत परप्रांतीयांचा वरचष्मा होता. मुंबईत त्यांचीच दादागिरी चालायची. नोकरीतही मराठी माणसाला डावलले जायचे. साहजिकच परप्रांतीयांच्या मुस्कटदाबीमुळे मुंबईत राहणारा मराठी माणूस अत्यंत अस्वस्थ होता. तो आतल्या आत धुमसत होता. चरफडत होता. त्याला या परिस्थितीतून मार्ग काढून सन्मानाने जगायचे होते. त्यामुळेच परप्रांतीयांच्या ठसठसत्या जखमेवरचा उतारा म्हणून प्रबोधनकारांनी आपला बाळ मराठी समाजाच्या हवाली केला होता. प्रबोधनकार हे काळाच्या पुढे चार पावले होते. त्यामुळेच तेव्हा ते मुंबईच्या भविष्याचा वेध घेऊ शकले. अन् शिवसेनाप्रमुखांच्या रूपाने मराठी माणसाला आपले मन मोकळे करायला एक हक्काचे ठिकाण मिळाले. वास्तविक देशात भाषा हा घटक प्रमाणभूत मानून राज्यनिर्मिती झाली होती. मात्र दिल्लीश्वरांनी मराठी माणसाच्या भावना जाणून न घेता मराठीबहूल भाग महाराष्ट्रापासून तोडला होता. परिणामी संयुक्त महाराष्ट्रासाठी, मुंबईचा समावेश महाराष्ट्रात होण्यासाठी येथील जनतेला मोठा लढा द्यावा लागला होता. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे अशा विभूतींच्या मार्गदर्शनाखाली लढलेल्या लढय़ामुळे महाराष्ट्र राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले. परंतु एक निश्चित ध्येय पूर्ण झाल्यानंतर लढय़ात उतरलेले सगळे साथी विखुरले गेले. त्यानंतर ती पोकळी ख-या अर्थाने भरून काढण्याचे काम हे ठाकरे पितापुत्रांनी केले, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पुढे बाळासाहेब नावाचे एक युग निर्माण झाल्याचे आपण पाहिले. बाळासाहेबांनी मुंबईतील मराठी माणसाला स्वत:ची ओळख दिली. अस्मिता दिली. अभिमान दिला. बाळासाहेब अनंतात विलीन झाले असले तरी त्यांचे हे ऋण कधीही न फिटणारे असेच आहेत. शिवसेनेचा जन्म १९ जून, १९६६ चा. पण संघटनेला ‘शिवसेना’ हे नाव देण्याचे काम प्रबोधनकारांचेच. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला होता. त्या मेळाव्यात प्रबोधनकारांची तोफ धडाडली होती. त्यावेळी त्यांनी मराठी माणसाला खडसावून सांगितले होते की, ‘आपल्या भोवती वेगवेगळ्या भानगडींच्या, अडचणींच्या, निराशेच्या सीमा पडल्या आहेत. म्हणूनच पूर्वीसारखे नुसत्या गावाच्या सीमा ओलांडून आपल्याला चालणार नाही तर त्यासाठी महाराष्ट्रातील एकजात मराठ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि छत्रपतींची शपथ घेऊन मी महाराष्ट्राचा अभिमानी लेक आहे, असे ठणकावून सांगितले पाहिजे.’ प्रबोधनकारांच्या भाषेतल्या ‘मराठा’ या शब्दाचा अर्थच महाराष्ट्रात राहणारे सर्व जाती, पंथाचे लोक असा होता. हाच समाजकारणी वारसा पुढे बाळासाहेबांनीही आपल्या राजकीय जीवनात पाळला. त्यामुळेच राजकीयदृष्ट्या समर्थ नसलेले, जातीय गणितात मागे पडलेल्या, लोकसंख्येच्या दृष्टीने छोट्या असणा-या जाती-जमातींचे लोक आपण सत्तेच्या पाय-या चढताना पाहिले. प्रबोधनकारांनीच मराठी माणसाला महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा देश नसून ही वाघाची अवलाद असल्याचे ‘बाळ’कडूही पाजले. ‘मराठा’ म्हणून जो मंत्र आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे, हा मंत्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आमच्या देहातून काढून टाकणारा अजून जन्माला आलेला नाही, हे ठणकावून सांगायलाही प्रबोधनकारांनी कमी केले नव्हते. मराठी मुलुखात राहणारी लेकरे ही एकाच आईची आहेत, मराठीच्या नात्याने सख्खी भावंडे आहेत, याची जाणीवही प्रबोधनकारांनी करून दिली होती. महाराष्ट्र हा मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, हे ठणकावून सांगून मराठी मातीतली रग दाखवण्याची किमया ही प्रबोधनकारांचीच. प्रबोधनकारांचा अहिंसेवर विश्वास नव्हता. प्रबोधनकार म्हणायचे, ‘मराठी मुलखातला माणूस असा पाहिजे की, संकटात उडी घालणारा, अन्यायाचा फडशा पाडणारा, एखाद्याने धक्का मारला तर त्याच्या कानाखाली आवाज काढून मराठीपण दाखवणारा. तो रस्त्याने चालू लागला तर सगळ्यांनी टरकून बाजूला झाले पाहिजे.’ बाळासाहेबांनी आपल्या लेखणी, कुंचला, वाणीतून हेच असिधारा व्रत पुढे चालवल्याचे आपण अनुभवले. प्रबोधनकारांना स्त्रियांबाबत कमालीचा आदर होता. ते म्हणायचे, ‘नर नारी की खान, जिस खानीसे पैदा हुए राम, कृष्ण, हनुमान!’ त्यांनी मराठी माणसाला स्त्रियांचा सन्मान राखण्याचा धडा दिला होता. बाळासाहेबांच्या कालखंडातील शिवसेनेची महिला शाखा ही इतर पक्षांपेक्षा बलदंड होती, हे विरोधकांनाही मान्य करावेच लागेल. प्रबोधनकारांच्या वाणीत, कृतीत जरब होती. भलेभले त्यांना टरकून असायचे. बाळासाहेबांच्या बाबतीतही तेच होते. बाळासाहेबांनी आपल्याला जे योग्य वाटते, ते करायला कधीही मागेपुढे पाहिले नाही. शिवाय आपल्या कार्यात आडव्या येणाऱ्यांची पर्वाही केली नाही. बाळासाहेब बोलणार आहेत, म्हटल्यानंतर भलेभले देव पाण्यात बुडवून बसायचे. प्रबोधनकारांचा वारसा पुढे चालवताना बाळासाहेबांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला. ‘मुंबई महाराष्ट्राची, नाही कुणाच्या बापाची’ अशी गर्जना केली. पण या शब्दांनीच मराठी माणसातला स्वाभिमान जागा झाला, याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. बाळासाहेब सुरुवातीला ‘नवशक्ति’ दैनिकात कार्टून काढायचे. पुढे त्यांनी आपल्या काही परप्रांतीय सहका-यांच्या सहाय्याने ‘न्यूज डे’ हे विकली सुरू केले. परंतु कधी त्यांची संयुक्त महाराष्ट्राशी सुसंगत भूमिका तर कधी स. का. पाटील यांच्यासारख्या बलदंड नेत्यांवरची कार्टून्स आड येऊन त्यांना नोक-या सोडाव्या लागल्या. ठाकरे कुटुंबाने हेही घाव सोसले. पुढे प्रबोधनकारांनीच बाळासाहेबांना मराठी ‘मार्मिक’ काढण्याची प्रेरणा दिली. ‘मार्मिक’ हे नावही प्रबोधनकारांनीच दिले होते. साहजिकच बाळासाहेबांनी मराठी अभिमानाचे, अस्मितेचे जतन आयुष्यभर केले. त्यासाठी कुणाचा मुलाहिजा राखला नाही. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवतीर्थावर ‘अन्यायाला मी कधीही क्षमा करणार नाही, न्यायासाठी प्राण गेला तरी बेहत्तर, पण महाराष्ट्राचे नाव बद्दू करणार नाही,’ अशी मराठी माणसाला शपथ घ्यायला लावली होती. हे व्रत बाळासाहेबांनी आयुष्यभर पाळले. प्रबोधनकारांच्या निधनानंतर ३९ वर्षानी मराठी अस्मितेचा हा तारणहार पंचत्वात विलीन झाला आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. पुढे सगळे धुरकट दिसते आहे. अशा समयी प्रबोधनकारांचा हा वारसा प्रत्येक मराठी माणसानेच पुढे नेला पाहिजे, हीच काळाची गरज आहे.

[EPSB]

न्यायाची चावडी बंद झाली

नवरा-बायकोमधील किरकोळ वाद असो, नाही तर दोन मोठय़ा व्यावसायिकांमधील तंटा, नळावरील शेजा-यांचे भांडण असो नाही तर एका भूखंडासाठी दोन बिल्डरमध्ये झालेले मतभेद. पहिली फिर्याद यायची ती शिवसेनेच्या शाखेत. शिवसेनेची शाखा म्हणजे त्या त्या विभागाचे न्यायमंदिर होते. तिथे गेलेल्या वादावर तिथला शाखाप्रमुख दोन्ही बाजू ऐकून घेऊन न्याय देऊन टाकायचा. शाखेच्या पातळीवर मिटण्यासारखे प्रकरण नसले की ते […]

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version