Home टॉप स्टोरी अल्पवयीन मुलीवर हृदयप्रत्यारोपण

अल्पवयीन मुलीवर हृदयप्रत्यारोपण

1

मुंबईत आतापर्यंत पाच हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, प्रथमच एका अल्पवयीन मुलीवर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून तिला जीवदान देण्यात आले आहे.

मुंबई- मुंबईत आतापर्यंत पाच हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र, आता प्रथमच एका अल्पवयीन मुलीवर हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून तिला जीवदान देण्यात आले आहे. इंदूर ते मुंबई असा प्रवास अवघ्या तासाभरात पूर्ण केल्यानंतर मुंबईत हृदय आणून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे, नववर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात लहान मुलीचे प्राण वाचविण्यात रुग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. मुंबईतील ही सहावी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

२०१५ या वर्षात झालेली पहिल्या हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर अवयवदानाच्या मोहिमेला ख-या अर्थाने सुरुवात झाली होती. मागील वर्षी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांना अवयव मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले होते. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विक्रोळी येथील १७ वर्षीय मुलीला हृदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्यामुळे तिच्यावर फोर्टिस रुग्णालयातील बालरोग विभागात उपचार सुरू होते. मात्र, हृदयाची क्रिया खूपच मंदावल्याने प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. मात्र, रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण रखडले होते. पण इंदूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २० वर्षीय मुलीचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या मुलीचा रक्तगट या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीशी जुळत होता. त्यामुळे मृत रुग्णाच्या नातेवाईकांशी अवयवदानाबाबत विचारणा करण्यात आली. एका मुलीला जीवदान मिळू शकले या विचाराने रुग्णाच्या नातेवाईकाने हृदय व यकृत दान करण्यास परवानगी दिली.

इंदूरहून मुंबईत हृदय आणून अल्पवयीन मुलीवर प्रत्यारोपण करणे ही अवघड प्रक्रिया होती. पण फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारले. यात त्यांना वाहतूक पोलीस व विमानतळ प्रशासनाची मोलाची साथ लाभली. इंदूरहून मुंबईत १ तास ५८ मिनिटांत हे हृदय आणण्यात आले. रविवारी ८ वाजून ४९ मिनिटांत हृदय मुंबई विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर उतरल्यानंतर विमानतळ क्रमांक ८ वरून मिलिस्ट्री रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, ईस्टन एक्स्प्रेस हायवे आणि ऐरोली जंक्शनवरून फोर्टिस रुग्णालयात हे हृदय आणून लहान मुलीवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

रुग्णालयातील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे व बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.

रुग्णालयात आतापर्यंत पाच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र, लहान मुलीचे हृदयप्रत्यारोपण करण्याची ही पहिली वेळ आहे. सध्या या मुलीला ७२ तास देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे, असे बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version