Home महामुंबई बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देणार

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देणार

1

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानात बनवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना सरकारकडून प्राप्त झाले आहे.

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानात बनवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना सरकारकडून प्राप्त झाले आहे.

त्यामुळे आता लवकरच याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मांडला जाईल. मात्र, महापौर निवासात हे स्मारक बनवताना महापौरांच्या निवासस्थानासाठी पर्यायी जागेचाही शोध घेतला जाईल. हे दोन्ही प्रस्ताव एकाच वेळी सादर करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्पष्ट केले.

महापौर निवासस्थानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु ही घोषणा केल्यानंतर याबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी पत्र पाठवण्यात आले नव्हते. परंतु आता हे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आता स्मारकाची जागा हस्तांतरित करण्याची पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले.

महापौर निवासाची जागा कशा प्रकारे मिळेल याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही करतच आहोत. सरकारकडून पत्र प्राप्त झाल्यामुळे स्मारकाची जागा हस्तांतरित करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रस्तावाचा मसुदा बनवून तो सुधार समितीपुढे मंजुरीला ठेवला जाईल.

स्मारकामुळे महापौर निवासस्थानासाठी पर्यायी जागेचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. काही जागा प्रशासनाच्या डोळ्यासमोर आहेत. काही आम्हीही शोधलेल्या आहेत. पण याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे. स्मारक बांधण्यापूर्वी महापौरांच्या निवासस्थानाची पर्यायी व्यवस्था अत्यंत चांगल्या जागेत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्मारक आणि महापौर निवासाची जागा बदलण्याची प्रक्रिया एकाच वेळी केली जाईल, असे ते म्हणाले.

स्मारकासाठी १ कोटी रुपयांची तरतूद

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी प्रशासनाने निधीची तरतूद केली नाही याबाबतची जी वृत्ते येतात ती खोटी आहेत. अर्थसंकल्पातील पान क्रमांक ३५०वर या स्मारकासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे नमूद केले आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जर सत्तेत बसून आम्ही तरतूद करू शकत नाही, तर आम्हाला इथे बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आयुक्तांना ही खोटी माहिती कोणत्या अधिका-याने दिली. त्या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत. ही तरतूद प्रशासनाने केलेली असून स्थायी समितीत जेव्हा हा अर्थसंकल्प मंजूर होईल त्यात आम्हीही निधीची वाढ करून देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील रुग्णांना महापालिका रुग्णालयात मोफत सेवा

मुंबई हद्दीबाहेरील तब्बल ४५ टक्के रुग्ण हे महापालिका रुग्णालय व दवाखान्यांमध्ये उपचारांसाठी येत असतात. त्या सर्वाना रुग्णालयांवर उपचारासाठी जास्त शुल्क आकारण्याचे महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केले आहे. याचा विरोध स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केला आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून राज्यातील प्रत्येकाचा मुंबईवर अधिकार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यांना वगळले जाईल. परंतु आपल्या राज्याबाहेरून जे रुग्ण मुंबईत उपचारांसाठी येतात, त्यांच्या उपचाराचा भार संबंधित राज्यांकडून वसूल करण्यात यावा.

पण रुग्णांवर कोणताही भार टाकू नये. गोवा, झारखंड, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये अशा प्रकारे रुग्णांचा भार तेथील सरकार उचलते. त्याच धर्तीवर इतर राज्यांना अशा प्रकारे रुग्णांचा खर्च करण्यास भाग पाडायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version