Home मजेत मस्त तंदुरुस्त भाद्रपदातील औषधी पालेभाज्या

भाद्रपदातील औषधी पालेभाज्या

1

पावसाळ्यात जशा पालेभाज्या उगवतात तशा अनेक ‘औषधी पालेभाज्या’ही उगवतात. पुनर्नवा, गोरखमुंडी, नागरमोथा, आघाडा, गोकर्ण, दूर्वा, भुईआवळा, कुरडू, तवस, मुसळी, विदारीकंद, क्षीरविदारी, िशगाडे, कसेरू, धोत्रा, इंद्रवण, गोखरू, भुईरिंगणी, कमळ, हळद, टाकळा अशा कितीतरी वनस्पती त्यांच्या असित्वाने पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा समतोल साधतात. 

आषाढ किंवा जून-जुलै या महिन्यांसारखा मुसळधार पाऊस भाद्रपदात किंवा ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान बदलत जातो. म्हणजे श्रावण-भाद्रपदात पावसाचा जोर कमी होतो. मोकळय़ा माळरानावर मोठी मोठी झाडं उगवतात. उंच उंच गवत वाढतं. या गवतात अनेक औषधी वनस्पती सापडतात. पावसाळ्यात जशा पालेभाज्या उगवतात तशा या औषधी पालेभाज्याही उगवतात. या पालेभाज्यांत वसू, नागरमोथा, गोरखमुंडी, आघाडा यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. 

वसू
ग्रीष्म ऋतूत ही वनस्पती पूर्णपणे वाळून जाते आणि वर्षा ऋतूत पुन्हा उगवते, म्हणून हिला ‘पुनर्नवा’ असं म्हणतात. आयुर्वेदानेही या वनस्पतीला ‘पुनर्नवा’ म्हटलं आहे. पावसाळ्यात उगवते म्हणून हिला ‘वर्षाभू’ असंही म्हणतात. ही वनस्पती जमिनीवर पसरणारी असल्याने हिला लॅटीनमधे diffusa म्हणतात. शोध लावणा-या शास्त्रज्ञावरून boerhavia असं नाव आहे. त्यामुळे लॅटीनमध्ये हिला boerhavia diffusa असं म्हणतात. भारतात ही वनस्पती सर्वत्र सापडते. आयुर्वेदिय ग्रंथांमध्ये हीचा उल्लेख असल्यामुळे फार प्राचीन काळापासून ही वनस्पती भारतीयांना माहीत होती. वनस्पतीच्या तीन जातींची माहिती होती. पांढरी, तांबडी आणि निळी. ‘राजनिघण्टू’ या आयुर्वेदिय ग्रंथात निळ्या पुनर्नवेचा उल्लेख असला तरी आज पांढरी आणि लाल अशा दोनच पुनर्नवा सापडतात. तांबडय़ा पुनर्नवाची पानं, फुलं आणि देठ तांबूस असतात. पांढरी पुनर्नवा वात, पित्त आणि कफ यांच्यामुळे असमतोलामुळे ज्या व्याधी निर्माण होतात त्यांचा नाश करते.
गुणधर्म : हिच्या पानांची भाजी करतात. अंगावर कोणत्याही कारणाने सूज येत असल्यास ही वनस्पती आहारात तसंच औषधात वापरल्याने फायदा होतो. पोटात पाणी झाल्यावरही हिचा वापर करतात. ही वनस्पती हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे. या वनस्पतीमुळे लघवीच्या दर्जात आणि प्रमाणात सुधारणा होते. सूज येणं, पोटात पाणी होणं (जलोदर) यांसारखे विकार कमी होतात. रक्तातील पाणी कमी करून रक्तदाबाचा धोका या भाजीमुळे कमी होतो. संधिवातासारख्या सुजेतही भाजीचा उपयोग होतो. 
आयुर्वेदानुसार रसधातूच्या विकृतीने होणारा विकार म्हणजे ‘पंडुरोग’. या विकारात रक्तरसातील पाणी वाढल्याने रक्तकण (लालपेशी) आणि रसरंजक द्रव्यं (हिमोग्लोबिन) यांचं प्रमाण तुलनात्मक कमी होते. त्यामुळे रक्ताला पातळपणा येतो. हा वाढलेला द्रवांश काढून टाकण्याचं कार्य पुनर्नवा करते. 
पुनर्नवाच्या पंचांगांचा (पान, फूल, फळ, खोड आणि मूळ ही पंचांग) विशेषत: मुळांचा औषधात समावेश केला जातो. बहुगुणी असल्याने अनेक औषधांमध्ये पुनर्नवा या वनस्पतीचा समावेश केलेला असतो. पुनर्नवाष्टक काढा, पुनर्नवासव, पुनर्नवामंडुरासारखी औषधं आजही बाजारात उपलब्ध आहेत.
टीप : तांबडी पुनर्नवा वातप्रकोपक आहे. म्हणून वाताच्या विकारावर उपचार करताना हिचा उपयोग करू नये.

गोरखमुंडी
श्रावण महिन्यात उगवते म्हणून हिला श्रावणी असे म्हणतात. भाताची कापणी झाल्यावर श्रावणी शेतात उगवते. हेमंत ऋतूत तिला किरमिजी रंगाची फुलं गुच्छाने येतात. नंतर गोल आकाराची फळं धरतात. हिला लॅटीन मधे spheranthus molis असं म्हणतात. औषधात गोरखगुंडीच्या पंचांगाचा उपयोग केला जातो. काही लोक फक्त फळांचा वापर करतात. ‘दिल्लीची मुंडी’ या नावाने गोरखमुंडीच्या फळांपासून बनवलेलं औषध मिळतं.
गुणधर्म : गोरखमुंडीच्या औषधामुळे लघवीचे त्रास कमी होतात. मूत्रमार्गाने पू वाहत असेल, तसंच पुरुषांत अष्ठीला ग्रंथीची वाढ prastete enlargement झाली असल्यास मुंडीचा वापर करतात.
वारंवार गळवं होणं, मानेभोवती असलेल्या लिम्फाटिक ग्रंथी (lympathic gland) वाढल्या असतील तर गोरखमुंडीचा उपयोग लाभदायी होतो. 


नागरमोथा
भारतातल्या सर्व पाणथळ भागात निर्माण होणारी ही वनस्पती. संस्कृतमध्ये याला ‘मुस्तक’ म्हणतात. पाणी किंवा पावसाळी ढगांची सर्व नावं या वनस्पतीला पर्याय म्हणून दिलेली आहेत. लॅटीनमध्ये या वनस्पतीला cyperus  scariosusase म्हणतात. या वनस्पतीचा दांडा भरीव त्रिकोणी असून पेररहित असतो. दांडय़ांच्या टोकाला लहान तीन लांब बारीक पानं असतात. दांडय़ांच्या टोकाशी लहान हिरव्या फुलांचे गुच्छ असतात. दांडय़ाच्या मुळाशी जमिनीत काळ्या रंगाचा कंद असतो. हाच कंद मुस्ता किंवा नागरमोथा म्हणून बाजारात मिळतो. 
गुणधर्म : नारमोथ्याच्या कंदात एक प्रकारचं सुगंधी तेल असतं. हे तेल त्वचेवर लावलं की, घामाची दरुगधी कमी होते. हल्ली बाजारात नागरमोथ्याची पावडरही मिळू लागली आहे. खाकेत किंवा अंगावर लावली की, घामाची दरुगधी कमी होते. त्वचाविकारनाशक म्हणून खाज येणं, खरूज, दाद-गजकर्णासारख्या विकारातही नागरमोथ्याच्या पावडरीचा उपयोग केला जातो. 
नागरमोथाचं औषध पचनसंस्थेवर एक उत्तम समजलं जातं. तोंडाला चव नसणं, उलटय़ा होणं, भूक न लागणं,अतिसार, जंत होणं या विकारांवर नागरमोथा उपयुक्त असतो. अनेकदा लहान मुलांना खाल्लेलं पचत नाही, अशावेळी बालसंजीवनचूर्ण दिलं जातं. या बालसंजीवन चुर्णात अतिविषा आणि काकडिशगीबरोबर नागरमोथ्याचाही उपयोग केला जातो. पचनसंस्थेच्या कार्यात बिघाडा झाला तर श्वास तसंच कफासारखे विकार होतात, तेव्हा नागरमोथा फारच फायदेशीर ठरतो.
कधी कधी तापाचं कारण लक्षात येत नाही. अशावेळी नागरमोथा आणि पित्तपापडय़ाचा चहा करून देऊन ताप आटोक्यात आणायला उपयोगी ठरतो. बाजारात बालचतुभद्र, बालसंजीवनी, मुस्तादी काढा, षड्गोदक हे नागरमोथ्यापासून बनवलेले काढे मिळतात.

आघाडा
संस्कृतात आघाडय़ाला ‘अपामार्ग’ म्हणतात. तर लॅटीन भाषेत या वनस्पतीला archyranthes aspera  असं म्हणतात. पांढरा आणि लाल अशा दोन जाती आहेत. आघाडा सर्वत्र होतो. हरितालिका तसंच गौरीच्या फोटोच्या मागे आघाडा आणि तेरडा ठेवतात. आघाडय़ाचं बी तांदळासारखं असतं. ऋषिपंचमीच्या दिवशी आघाडय़ाच्या पानांची भाजी केली जाते. 
गुणधर्म : आघाडय़ाचं पंचांग जाळून राख करतात. त्या राखेतून क्षार काढतात. त्यालाच ‘अपामार्गक्षार’ असे म्हणतात. हा क्षार रक्तात लगेच मिसळतो. रक्ताचा क्षारधर्म वाढतो. या क्षारामुळे लघवीचा दर्जा सुधारतो. या वनस्पतीत खास करून मुळांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’चं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे रातांधळेपणाचा त्रास असणाऱ्यांना आघाडय़ाच्या मुळाचं चूर्ण दिलं जातं. कधी कधी कानातील मळ सुकल्यावर भरपूर त्रास होतो. अशावेळी आघाडय़ाच्या क्षाराने सिद्ध केलेलं तेल कानात टाकण्याचा सल्ला वैद्य देतात.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version