Home मध्यंतर सुखदा मूर्तिकलेत समरसलेल्या ‘ज्योती’

मूर्तिकलेत समरसलेल्या ‘ज्योती’

0

गृहिणी म्हणून वावरतानाच, गिरगाव, नाना चौक येथील ज्योती पाटकर यांनी गणेशमूर्ती साकारण्याची कला आत्मसात केली. गेली ३० वष्रे ज्योती या गणेशमूर्ती साकारण्यात समरसून गेल्या आहेत. गणेशमूर्तिकार म्हणून असलेली त्यांची ओळख आजच्या महिलांसमोर आदर्शवत मानावी लागेल.

एखादी कला आत्मसात करण्यासाठी ती कला उपजत असावी लागते, असं म्हणतात. कधी कधी आनुवंशिकरीत्याही ती कला अंगभूत असते किंवा घराण्याच्या रूपाने कलेचा वारसा आपसुकच त्या घरातील माणसांना मिळतो आणि ती कला वृद्धिंगत होते, कलेला वाव मिळतो. मात्र कलेचा कोणताही स्त्रोत नसताना, विवाहानंतर एक गृहिणी म्हणून वावरताना आपल्या पतीच्या कलेला आणि व्यवसायाला मदत म्हणून ती कला शिकण्याची ऊर्मी बाळगून आज ती कला आत्मसात करून नावारूपास आणली आहे, गिरगाव, नाना चौक येथील गणेशमूर्तिकार सौ. ज्योती पाटकर यांनी.

पती अविनाश पाटकर यांच्या साथीने ज्योती गेली सलग ३० वष्रे गणेशमूर्ती बनविण्यात कार्यरत आहेत. त्यांनी ही कला आत्मसात करून, आजच्या महिला वर्गापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.

गृहिणी म्हणून वावरताना, गणेशमूर्ती तयार करण्याची कला शिकण्यासाठी साधारण दोन ते तीन र्वष मेहनत घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला शाडूच्या गणेशमूर्ती, तर त्यानंतर आता नवा बदल म्हणून इकोफ्रेंडली गणेशमूर्तीना असलेली ग्राहकांची पसंती पाहता, इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्याकडे आपला कल असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि वजनाला हलकी असलेली इकोफ्रेंडली गणेशमूर्ती सुबक, मनात भरणारी असल्याने ग्राहकांचीही पसंती दिसून येते. पर्यावरणपुरक आणि विविध संस्था, सार्वजनिक मंडळे किंवा घरगुती गणेशमूर्ती म्हणून या गणेशमूर्तीना भक्तांची पसंती दिसून येत असल्यामुळे, अशा गणेशमूर्ती साकारल्या जातात. याकामी ज्योती यांच्यासोबत त्यांची मुलगी गौतमी हिची देखील मदत मिळते. त्याचप्रमाणे दीर, जाऊ यांचाही सहभाग महत्त्वपूर्ण असतो.

आज हर एक क्षेत्रात महिला कार्यरत राहताना दिसतात. आपणही एखादी कला आत्मसात करावी, असं वाटतं. अशा महिलांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत मूर्तिकलेचं प्रशिक्षण दिलं जातं. शाडूची गणेशमूर्ती, पेपर लगद्यापासून कशी साकारावी याचं प्रशिक्षण आज महिला-मुली घेत आहेत. अनेकजणींनी या क्षेत्रात आपलं पाऊल रोवलं आहे. एसएनडीटी कॉलेजच्या मुली, तसेच महिलांना आर अ‍ॅण्ड डी., टीडी सेंटरमार्फत प्रशिक्षण दिलं जातं. स्वत: अविनाश पाटकर हे प्रशिक्षण देतात. यामध्ये शाडू, पेपर लगद्यापासून गणेशमूर्ती कशी साकारावी याचं प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेटही महिलांना मिळून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात. स्वावलंबनाचं क्षेत्र महिलांसाठी खुलं असून, अनेक महिला या कोर्समुळे मूर्तिकलेच्या क्षेत्रात पुढे येऊ शकतात. त्याचप्रमाणे दादर येथे वर्कशॉपमधून मतिमंद मुलांनाही मातीकलेचं प्रशिक्षण दिलं जातं. मूर्तिकला शिकण्यासाठी अहमदाबाद, दिल्लीपासून महिला प्रशिक्षण घेण्यासाठी येत असल्याचे ज्योती पाटकर यांनी सांगितले.

आज पर्यावरणाच्या दृष्टीने खरं तर शाडूचे गणपती किंवा इकोफ्रेंडली गणेशमूर्ती योग्य असे म्हटले तरी अनेक ठिकाणी पाहिलं तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीलाच अधिक पसंती दिली जात असल्याचे निदर्शनास येते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, शहर, ग्रामीण भागातही आज प्लास्टरच्याच गणेशमूर्ती वजनाला हलक्या आणि त्याच्या किमती काही प्रमाणात कमी असल्यामुळे या मूर्तीना अधिक पसंती मिळत असल्याचे दिसते. इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची किंमत थोडी जास्त, तसेच शाडूच्या गणेशमूर्ती वजनाला जड, किमती असल्यामुळे जरी ग्राहकांना या मूर्ती घ्याव्याशा वाटल्या, तरी प्लास्टरच्या मूर्तीना पसंती मिळताना दिसते.

शाडूच्या गणपतीपेक्षा इकोफ्रेंडली गणेशमूर्ती साकारण्यासाठी जरा जास्तच मेहनत घ्यावी लागत असल्याचे ज्योती म्हणाल्या. यासाठी पेपर रद्दी, मोल्ड, बाभळीचा गोंद, व्हाइटिंग पावडर आदी साहित्य लागत असून सुरुवातीला पेपरचे तुकडे करून लगदा मिक्सरमध्ये वाटून घेऊन गोंद, व्हाइटिंग पावडर मिक्स करून लगदा मोल्डमध्ये प्रेस करून जॉइंट करून दोन दिवसांनी वाळल्यानंतर त्यावर फिनिशिंग केले जाते.

शाडूचे गणपती हेवी असतात, मात्र लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्ती या वजनापेक्षा हलक्या आणि पाण्यात लवकर विरघळणा-या असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हितावहच मानल्या जातात. या गणेशमूर्ती आज १ फुटापासून १२ फुटांपर्यंत साकारल्या जात असल्याचे ज्योती यांनी सांगितले.

गणेशमूर्ती साकारण्यासाठी साच्या महत्त्वाचा असतो. लगद्याच्या गणेशमूर्ती या हाताने साकारता येत नाहीत. शाडूच्या गणेशमूर्तीप्रमाणे हाती मूर्ती साकारणे अवघड असते. यासाठी रबर मोल्ड, फायबर मोल्ड, प्लास्टर साचा आदींचा वापर केला जातो. यानंतर पेंटिंग व्हाईट वॉश, बॉडी कलर, शेड्स आदी गोष्टी पूर्वीपेक्षा आता मशीनरी असल्याने कामाला वेग येतो.

ज्योती या विवाहानंतर कलेच्या क्षेत्रात कार्यरत राहिल्या आहेत. गेली ३० वर्षे त्या या क्षेत्रात सहजरीत्या कलेचा आविष्कार घडविताना दिसत आहेत. त्यांची मुलगी, जाऊ यांचाही सहभाग आहे. गणेशमूर्ती बनविण्यापासून तिचे रंगकाम करण्यापर्यंत आदी गोष्टी त्या करतात. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करता येत नाही. त्यासाठी मेहनतही घ्यावी लागतेच. आज अनेक महिला अशा असतात की, घरबसल्या काय करावं हा त्यांच्यासमोर पेच असतो. अशा महिलांनी प्रशिक्षण घेऊन एकत्ररीत्या किंवा स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी जिद्द बाळगली पाहिजे. त्यामुळे कलेचं क्षेत्रही विस्तृत होईल आणि आपली कलाही विकसित होऊ शकेल. यासाठी महिलांनी कलेच्या माध्यमातूनही पुढे येणं गरजेचं असल्याचं ज्योती पाटकर यांनी सांगितलं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version