Home आनंदमंत्र मोबाईलची स्मार्ट खरेदी

मोबाईलची स्मार्ट खरेदी

2

आपल्यासारखा सामान्य माणूस हे फोन घेताना मोजक्याच चार-पाच गोष्टी बघतो. एक म्हणजे मोबाईल कंपनी, त्याची किंमत, कॅमेरा आणि आणखी एक-दोन फीचर्स. त्यापलीकडे मोबाईलच्या माहितीमध्ये जे काही दिलं असतं ते साधारण आपल्या डोक्यावरून जातं. मोबाईल विक्रेते जे काही सांगतील त्यांच्या सांगण्यावर बरेच जण आपली निवड ठरवतात. पण फोनसारख्या गोष्टीवर पैसे खर्च करताना काही गोष्टींची माहिती आपल्याला असलेली बरी.

भारतातलं मोबाईलचं मार्केट खूप मोठं आहे. कारण ग्राहकांची संख्या इथे जास्त आहे. या बाजारपेठेत असलेल्या मोठ मोठया कंपन्यांची आपला ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर महिन्याला नव नवीन फोन या बाजारात लाँच होत असतात.

टीव्हीवर जाहिराती सुरू झाल्या की त्या मोबाईची बॉडी, कॅमेरा, डिझाईन आणि किंमत अशा चार-पाच गोष्टी दाखवल्या जातात. या जाहिरातीतल्या या नवनव्या मोबाईलची भुरळ पडून आपण तो विकतही घ्यायला बघतो. पण एखादा फोन घेताना ती कंपनी, त्याची किंमत, कॅमेरा आणि त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती, इतक्याच गोष्टी महत्त्वाच्या नसतात. त्यापलीकडेही जाऊन मोबाईल घेताना काही गोष्टी बघाव्या लागतात.

एखादा मोबाईल विकत घेताना आपण त्यात कमीत कमी दहा ते पंधरा हजारांच्यावर पैसे गुंतवत असतो. एकदा का एवढी रक्कम त्यात घातली की किमान दोन वर्षे तरी आपण नवीन मोबाईल घेण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे हा मोबाईल घेताना काळाची गरज आणि नवीन तंत्रज्ञान काय आहे या सगळ्या गोष्टींचा देखील विचार करावा लागतो.

दुकानात गेल्यानंतर मोबाईलचे शेकडो पर्याय पाहिले की कोणता घ्यावा आणि कोणता नाही असं होतं. त्यातून आपण एकमेकांचं ऐकून एखादा मोबाईल घ्यायला जातो; पण तिथे गेल्यावर मोबाईल विक्रेता आपल्या मनात तिसरीच गोष्ट भरतो. प्रत्येक दुकानदार काहीतरी वेगवेगळं सांगत असतो असा अनुभव अनेकांना येतो. मोबाईल विक्रेत्याचं बरोबर की आपल्या मनाचं बरोबर असा संभ्रम पडतो. त्यामुळे आजच्या काळात मोबाईल घेताना काही गोष्टी बघून घेणं तितकंच गरजेचं असतं.

अँड्रॉईड व्हर्जन

अनेक जण अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम असलेले फोन वापरतात. सध्या अँड्रॉईडमध्ये लॉलीपॉप ५.० या व्हर्जनची चलती आहे. त्यामुळे फोन घेताना हे व्हर्जन आहे का हे पाहूनच फोन घ्या. किटकॅट व्हर्जनमधल्या काही त्रुटी यात भरून काढल्या आहेत आणि हा अधिक युजर फ्रेंडली देखील आहे.

प्रोसेसर

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल, टॅबमधला प्रोसेसर. तुमचा मोबाईल किंवा टॅब व्यवस्थितरित्या काम करण्यासाठी प्रोसेसर गरजेचा असतो. तुमचा प्रोसेसर जितका चांगला तितकंच तुमच्या मोबाईलमधले फंक्शन अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात.

आतापर्यंत सिंगल कोअर, डय़ुएल कोअर, क्वाड कोअर आणि ऑक्टा कोअर असे चार प्रकारचे प्रोसेसर वापरून मोबाईल काम करत असतो. त्यातला सिंगल आणि डय़ुएल कोअर प्रोसेसर हा जुना झाला. सध्या मोबाईलमध्ये क्वाड किंवा ऑक्टा कोअर प्रोसेसर वापरला जातो. त्यातला ऑक्टा कोअर हा नवीन प्रोसेसर आहे. या प्रोसेसरमुळे तुमचा मोबाईल अत्यंत कमी प्रमाणात हँग होतो. आजकाल आपण आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे अ‍ॅप्स किंवा गेमिंग अ‍ॅप्स टाकतो.

काही जणांना मोबाईलवर तासन् तास गेम्स खेळायची सवय असते. त्यामुळे तुम्हाला जर गेम्स किंवा वेगवेगळ्या अ‍ॅप्स वापरायला मोबाईल हवा असेल तर ऑक्टा कोअर प्रोसेसर असलेला मोबाईल निवडा. कारण यामुळे मोबाईल हँग होण्याचं प्रमाण इतर प्रोसेसरच्या तुलनेत खूपच कमी असतं. पण यासाठी तुम्हाला तुमचं बजेट मात्र थोडं वाढवावं लागेल.

जर तुम्ही मोबाईलचा वापर फक्त फोन कॉल्स आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप पुरता मर्यादित ठेवत असाल तर कमी किमतीत मिळणारा क्वॉड कोअर प्रोसेसर असलेला मोबाईल देखील घेऊ शकता. ऑक्टा कोअर प्रोसेसरच्या तुलनेत क्वाड कोअर प्रोसेसर मोबाईलची हँग होण्याची शक्यता जास्त असते.

उर्वरित दोन प्रोसेसर हे मात्र जुने आहेत, त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये हा प्रोसेसर असेल तर अनेक वेळा मोबाईल हँग होताना तुम्ही ऐकलं असेल.

बॅटरी लाईफ

पूर्वी मोबाईलची बॅटरी किती तासांपर्यंत काम करू शकते हे तासांत दिलं जायचं. पण आजकाल त्याजागी एमएएच हा शब्द दिला जातो. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. तर ज्या मोबाईलची बॅटरी ३००० एमएएचपेक्षा अधिक असेल तर त्या मोबाईलची बॅटरी अधिक जास्त वेळ काम करेल. म्हणजे साधारण सात ते आठ तास बॅटरी चालेल. पण तरीही बॅटरी पटकन उतरणं हे पूर्णपणे मोबाईचा तुम्ही कसा वापर करता यावर अवलंबून आहे.

यूएसबी-ओटीजी

मोबाईलमध्ये यूएसबी ओटीजी फंक्शन आहे का ते पाहून घ्या. आतापर्यंत तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पेनड्राईव्हमधली गाणी घ्यायची असतील तर तुम्ही तो मोबाईल यूएसबीद्वारे कॉम्प्युटरला कनेक्ट करणार, त्यानंतर पेनड्राईव्हमधून डाटा फोनमध्ये ट्रान्सफर करणार अशी भानगड होती.

पण यूएसबी-ओटीजी फंक्शनमुळे तुम्ही तुमचा पेनड्राईव्ह मोबाईलला कनेक्ट करू शकता. म्हणजे यासाठी तुम्हाला अनेक खटाटोपी कराव्या लागणार नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही की-बोर्ड किंवा माऊस देखील मोबाईल आणि टॅबला कनेक्ट करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला ओटीजी अ‍ॅडाप्टर लागेल.

रॅम आणि इंटरनल स्टोअरेज

साधारण दीड जीबीच्यावर रॅम असलेले फोन बघावे. हल्ली बाजारात आलेल्या नवीन फोनमध्ये २ जीबीचा रॅम हा असतोच. त्याचप्रमाणे त्या फोनची इंटरनल स्टोअरेज कॅपेसिटी ही कमीत कमी ८ जीबीच्या वर असणं गरजेचं आहे.

कॅमेरा आणि डिस्प्ले फॅक्टर

प्रत्येक जण मोबाईलमध्ये किती मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे हे देखील पाहतो. हल्ली प्रत्येक कंपन्या ८ ते १३ मेगापिक्सेलच्या वर कॅमेरा देतात. तसंच सेल्फी काढण्यासाठी तुम्ही ५ मेगापिक्सेल किंवा त्यापेक्षा जास्त मेगापिक्सेल असणारा फ्रंट कॅमेरा घ्या.

सध्या एमोलेड, सुपर एमोलेड, आयपीएस, एलसीडी डिस्प्ले असलेले मोबाईल फोन बाजारात आले आहेत. या डिस्प्लेमुळे तुमच्या फोनमध्ये अधिक क्लिअर एमेज किंवा व्हीडिओ तुम्ही पाहू शकता. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याचा पीपीआय हा जास्त असेल. पीपीआय म्हणजे पिक्सेल पर इंच. त्यामुळे अधिक चांगल्या डिस्प्लेसाठी पीपीआय २००पेक्षा अधिक असणं गरजेचं आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version