Home कोलाज ..यादी वाढते आहे!

..यादी वाढते आहे!

1

जे समोर येईल ते वाचायचं अशी वाचनप्रवासाची माझी सुरुवात होती. अगदी वाण्याकडून वस्तूला बांधून आलेला कागदही जर चांदोबाचा वा आणखी कुठला वाचण्यासारखा असेल तर तोही मी नजरेखालून घालायचो. पुढे पुढे हे वाचनवेड वाढत गेलं. अभ्यासाची पुस्तकं बाजूला पडली आणि गोष्टीच्या पुस्तकांचा फडशा पडायला लागला.

त्यामुळे अर्थात व्हायचं तेच झालं. अभ्यासात मागे पडलो. घरी वडिलांनी त्यांच्या आवडीनुसार केलेल्या ग्रंथसंग्रहातील कितीतरी कवितासंग्रह, पुस्तकं त्या नकळत्या वयातच वाचून झाली. फार उत्तमोत्तम लेखकांची चांगली चांगली पुस्तकं मी ‘ढ’ तुकडीत असतानाच वाचत होतो. ग्रेस यांचं ‘चंद्रमाधवीच्या प्रदेशात’ तेव्हाच वाचलं होतं पहिल्यांदा. काहीही कळलं नाही. कळलं ते इतकंच की, हे जे काही लिहिलंय, आपण वाचतोय ते विलक्षण आहे. प्रतिमांचा जबरदस्त शब्दखेळ आहे. तशीच गोष्ट अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या अप्रतिम कादंबरीची. तिचा अनुवाद बाबांच्या संग्रहात होता. दि. बा. मोकाशी यांनी केलेला. मी कितीदातरी या कादंबरीची पारायणं केली. स्पॅनिश राज्यक्रांती, हेमिंग्वे अशा कशाचाही गंध नसताना आणि नंतर हीच कादंबरी आणखी पुस्तकं वाचायला पैसे हवेत म्हणून गुपचूप रद्दीत विकली आणि त्यातून पुन्हा दोन पुस्तकं घेतली. वाचनवेडापायी झालेला हा अपराध मला आयुष्यभर छळत रहाणार आहे.

एखादी पायरी पुढे सरकल्यावर वाचनकक्षा जराशी विस्तारली. ‘ललित’सारख्या मासिकांचा शोध लागला. ठणठणपाळचा काळ संपून अलाणे-फलाणेची पत्रं सुरू होण्याचा तो काळ असावा. ‘ललित’मध्ये वाचनीय पुस्तकांवर छापून येतं, पुस्तकांच्या जाहिराती येतात, परीक्षणं येतात, वाचनीय पुस्तकांची, वाचकांना आवडलेल्या पुस्तकांची निवडक यादी छापून येते, हे लक्षात आलं. मग यातली किती पुस्तकं आपण वाचली, आपल्याला वाचनालयात दिसतात-दिसली, वाचायला हवीत याचा धांडोळा सुरू झाला. याच पुस्तकांबद्दल इतरत्र काय छापून आलंय याचाही शोध सुरू झाला.

बहुतेक सर्वांच्याच वाचन प्रवासात वळण येतं तसं वळण घेऊन यथावकाश मराठी पुस्तकांकडून इंग्रजी बेस्टसेलर्सकडे वळलो. जी काही दोन-पाच नावं माहिती होती त्यांची पुस्तकं वाचतावाचता परिचित, प्रसिद्ध लेखकांकडून मला अपरिचित अशा लेखकांच्या पुस्तकांकडे वळलो. लायब्ररीत पुस्तक हाती आलं, कव्हरवरून बरं वाटलं तर त्याच्या मलपृष्ठावर वा आतल्या एक-दोन पानांवर कथानकाचा जो काही सारांश आलाय, तो वाचून ‘शितावरून भाताची परीक्षा’ सुरू केली. जी अनेकांना चुकीची वाटू शकेल पण त्यामुळे मला अनेकदा चांगले लेखक हाती लागले आणि त्याच त्या कथानकांची पुस्तकं टाळण्याचीही एक साधीसोपी युक्तीही मिळाली. याच काळात जितेंद्र चांदोरकर या माझ्या मित्राबरोबर वाचलेल्या आणि वाचायलाच हवीत अशा पुस्तकांची नावं लिहून ठेवण्याचा एक उद्योगही आम्ही दोघांनी काही काळ केला. वाचनीय पुस्तकांची अशी काही यादी असते, दरवर्षी प्रसिद्ध केली जाते, वाचकांची आवड विचारली जाते, आपण न वाचलेली चिक्कार पुस्तकं इतर वाचत असतात, त्याबद्दल आवर्जून लिहीत असतात, हे कळायला लागलं आणि मग या यादीतील दोन-पाच पुस्तकं जरी वाचली असतील तर एक वेगळाच आनंद वाटायला लागला. न वाचलेल्या पुस्तकांचा शोध घ्यायला लागलो. एखादं पुरस्कारविजेतं पुस्तक हाती लागलं तर ते एका बैठकीत संपवण्याचा अवर्णनीय अनुभव वारंवार यावा, अशी तहान लागू लागली.

थरारकथा, हेरकथा, विज्ञानकथा अशा पुस्तकांचा नाद लागल्यामुळे इंग्रजीप्रमाणेच इतर भाषांमधील लेखकही त्यांच्या अनुवादित पुस्तकांमधून हाती समोर आले. बेस्टसेलर्स वाचतानाच टॉप टेन, बेस्टसेलर अशा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणा-या याद्याही धुंडाळण्याचा छंद लागला. तेव्हा कधीतरी ‘द रोड’ हे कॉर्मक मॅकार्थीचं पुस्तक हाती आलं होतं. अगदी अवचितच. लायब्ररीत मलपृष्ठावरील कथांश वाचल्यावर त्याचं वेगळेपणं जाणवलं आणि घरी आणलं. वाचायला सुरुवात केल्यावर अक्षरश: दोन ते तीन दिवसांत ते झपाटल्यासारखं वाचलं होतं. पुस्तक बेफाटच आहे. हा मॅकार्थी म्हणजे ‘नो कंट्री फॉर ओल्ड मेन’, ‘ऑल द प्रेटी हॉर्सेस’, ‘ब्लड मेरिडियन’ या कादंब-यांचा लेखक. त्याच्या ‘नो कंट्री.’ वर चित्रपट बनला आणि बेस्ट पिक्चर, डिरेक्टरसह चार ऑस्कर पुरस्कार कोएन ब्रदर्स घेऊन गेले. ‘रोड’ही भन्नाट साहित्यकृती आहे. त्यातल्या पितापुत्रांचा प्रवास वाचताना आपलाही एका वेगळ्याच वाटेवरून प्रवास होत रहातो. पुस्तक वाचून झालं आणि थोड्या दिवसांनी या कादंबरीला २००७ चं पुलित्झर पारितोषिक जाहीर झालं.

ती बातमी वाचल्यावर माझ्या लक्षात आलं, या पुरस्कारासाठी चर्चेत असलेलं, बेस्टसेलर्सच्या यादीत असलेलं एक अफलातून पुस्तक माझं आधीच वाचून झालं होतं. खूपच वेगळं वाटलं. बेस्टसेलर्सची यादी, वाचनीय पुस्तकांची यादी कधीतरी नजरेखालून घातली तर अशी अनेक पुस्तकं कळत रहातात आणि खुणावतही राहातात. बेस्टसेलर्सची यादी तर वर्षभर वेगवेगळ्या नियतकालिकांमधून येतच असते. अशी नावं वाचली की वाचायच्या पुस्तकांची यादी वाढत रहाते. वर्षअखेर जवळ आली की सरत्या वर्षातील सर्वोत्तम पुस्तकांची, वाचनीय पुस्तकांची यादीही द वॉशिंग्टन पोस्ट, द न्यूयॉर्क टाईम्स बुक रिव्ह्यू, द गार्डियन, एनपीआर आणि अन्य महत्त्वाच्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होते. यंदाच्या अशा वर्षभरातील सर्वोत्तम पुस्तकांमध्ये ‘भारतीय’ म्हणता येतील अशा तीन पुस्तकांचा समावेश आहे. वाचकांनी आणि या नियतकालिकांच्या लेखकांनी वाचनीय, लक्षवेधी ठरवलेल्या लेखकांमध्ये बुकर पारितोषिक विजेती हिलरी मँटेल आहे, स्टीफन किंग आहे आणि अमेरिकेतील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. अतुल गवांदे
हेही आहेत.

गवांदे यांच्या पुस्तकाचे नाव आहे ‘बीईंग मॉर्टल – मेडिसिन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड’. मृत्यूशय्येवर असलेल्या वा मृत्यू समीप येत असलेल्या दुर्धर व्याधीशरण रुग्णांशी डॉक्टरांची वर्तणूक कशी असावी, याबद्दल मोलाचे शब्द सांगणारे हे पुस्तक आहे. डॉ. गवांदे यांचे आधीचे एक पुस्तक मराठीत अनुवादित झाले आहे. यंदाच्या मॅन बुकर पारितोषिकाची विजेती कादंबरी ‘द नॅरो रोड टू द डीप नॉर्थ’ ही रिचर्ड फ्लॅनॅगनची कादंबरीही पोस्टच्या यादीत आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात जपानने ऑस्ट्रेलियन युद्धकैदी आणि थायलंड-म्यानमारमधील मजुरांकडून थायलंड-म्यानमार ‘डेथ’ रेल्वेमार्ग बांधून घेतला होता. ३ लाख लोकांवर अनन्वित अत्याचार करत जपानने हा मार्ग पूर्ण केला. यातील एक फ्लॅनॅगनचे वडीलही होते. या सगळ्या कालखंडाविषयी युद्धकैदी आणि त्यांचा छळ करणारे जपानी आणि कोरियन सैनिक या दोघांच्याही नजरेतून लेखकाने भाष्य केले आहे. स्टीफन किंग यांचे ‘रिव्हायव्हल’, जॉन ग्रीश्ॉम यांचं ‘ग्रे माऊंटन’ ही पुस्तकंही बेस्टसेलर्सच्या यादीत आहेत.

हिलरी मँटेल यांच्या ‘वुल्फ हॉल’ने मॅन बुकर पारितोषिक मिळवले होते. त्यांचाच ‘द असॅसिनेशन ऑफ मार्गारेट थॅचर’ हा कथासंग्रह यंदा वाचकप्रिय ठरला आहे. संवेदनशील लेखक हारुकी मुराकामी याचं ‘कलरलेस सुकुरू ताझाकी अँड हिज इयर्स ऑफ पिलग्रिमेज’ हे पुस्तकही या यादीत आहे. ‘द न्यूयॉर्क टाईम्स बुक रिव्ह्यू’च्या संपादन मंडळानेही या पुस्तकांना त्यांच्या यादीत स्थान दिले आहे. याच यादीतील अन्य काही पुस्तके – द बॅलड ऑफ अ स्मॉल प्लेयर (लॉरेन्स ओसबोर्न), द बोन क्लॉक्स (डेव्हीड मिशेल). भारतात येऊन स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्याआधी दक्षिण आफ्रिकेत मोहनदास करमचंद गांधी यांच्या तत्त्वांची जडणघडण कशी होत होती, याविषयी मांडणी करणारे रामचंद्र गुहा यांचे ‘गांधी बिफोर इंडिया’, अखिल शर्मा यांच्या ‘फॅमिली लाईफ’ या पुस्तकांनीही संपादन मंडळाची पसंती मिळवली आहे. ब्रिटिश गुप्तचर संस्थेतील घरभेदी किम फिल्बी याच्यावर ‘अ स्पाय अमंग फ्रेण्डस्’ हे बेन मॅसीनटायर यांचे सत्याधारित पुस्तकही यादीत आहे.

‘द गार्डियन’ने वाचकांकडून त्यांच्या पसंतीच्या वाचनीय पुस्तकांची यादी मागवली होती. त्यातील टॉप टेन लेखकांमध्ये सारा वॉटर्सचं ‘द पेईंग गेस्ट्स’ आहे, फ्लॅनॅगनचं ‘द नॅरो रोड.’ आहे, ‘द बोन क्लॉक्स’वाला डेव्हिड मिशेल आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात नाझी फौजांनी फ्रान्स व्यापला त्या कालखंडातील कथा सांगणारं अँथनी डूअर यांचं ‘ऑल द लाइट वुई कॅनॉट सी’ ही कादंबरीही आहे.

‘गुडरीड्स’ या वाचकांच्या ऑनलाइन कट्टय़ावर रहस्यरंजन, अद्भुत, सायफाय, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या विभागांमधील वर्षभरातील सर्वोत्तम पुस्तकासाठी वाचकांची मते मागवण्यात आली होती. या पहाणीअंती स्टीफन किंग यांची ‘मि. मसिडिझ’ ही थरारकथा रहस्यरंजन विभागात सर्वोत्तम ठरली आहे. अँथनी डूअर यांची ‘ऑल द लाइट वुई कॅनॉट सी’ ही कादंबरी येथे ऐतिहासिक फिक्शन विभागात सर्वोत्तम ठरली आहे. सायफायमध्ये ‘द मार्शीयन’ ही अँडी वेइर यांची कादंबरी वाचकांना पसंत पडली आहे. मंगळावर मानवाचे पहिले पाऊल टाकल्याबद्दल भारावलेल्या अंतराळवीराला चुकून तिथेच ठेवून अवकाशयान पृथ्वीकडे निघून जाते आणि मंगळावर मरणारे पण आपणच पहिले ठरू या कल्पनेने त्याच्या पायाखालची मंगळावरील माती सरकते. (आणि पुढे) असे हे कथानक आहे.

‘अमेझॉन’ने या वर्षभरात सर्वाधिक खपलेल्या पुस्तकांची यादी नुकतीच जाहीर केली. त्यात, जॉन ग्रिश्ॉमचं ग्रे माऊंटन आहे, अँथनी डूअरचं ‘ऑल लाईट.’ इथे तिस-या क्रमांकावर आहे, ली चाईल्डच्या जॅक रिचर या कथानायकाचं ‘ट्वेंटी सेकंड्स अगो’, डेव्हिड बाल्डासीचं ‘द टार्गेट’, स्टीफन किंगचं ‘मि. मर्सिडिझ’ अशी काही पुस्तकं आहेत. रिचर्ड फ्लॅनॅगन, अँथनी डूअर, सारा वॉटर्स, हिलरी मँटेल, जॉन ग्रिशॅम यांची पुस्तकं बहुतेक वाचकांनी आणि नियतकालिकांनीही ‘उत्तम’ म्हणून वाखाणली आहेत. ‘अनलाइकली वॉरिअर्स : एलिफंट कंपनी’ हे पुस्तक या सगळ्यात गुणात्मक भर घालणारं आहे. त्याविषयी नंतर कधीतरी लिहिन.

ही सगळी पुस्तकं आता माझ्या वाचण्याच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. यादी वाढते आहे. नव्या वर्षाचा संकल्प हाच!

1 COMMENT

  1. सर्व आमदारांची मुले आणि नातवंडे आधी मराठी शाळांमध्ये जाऊ दे …मग घेत बसा दत्तक मराठी शाळा ..स्वतः च्या घरापासून सुरुवात करा..आपल्याच राज्यात , शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ..मराठी शाळांना ” दत्तक ” घेण्याची सूचना केली जाते…मराठी शाळा ” अनाथ ” होईपर्यंत आपली मराठी अस्मिता / अभिमान इंग्लिश शाळांच्या भरभरून वाहणाऱ्या तिजोरीत बंद करून ठेवला होता का ??…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version