Home कोलाज राखेतून उभं राहताना..

राखेतून उभं राहताना..

1

युद्ध आणि युद्धोत्तरच्या अस्थिर वातावरणामुळे जर्मन लोकांच्या आजच्या स्वभावात अजून एक गोष्ट रुजली आहे ती म्हणजे सुरक्षिततेचा शोध. जर्मन लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुरक्षितता हवी असते.

युद्ध आणि युद्धोत्तरच्या अस्थिर वातावरणामुळे जर्मन लोकांच्या आजच्या स्वभावात अजून एक गोष्ट रुजली आहे ती म्हणजे सुरक्षिततेचा शोध. जर्मन लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुरक्षितता हवी असते. सततचे बदल, अस्थिरता या गोष्टींना जर्मन लोक  त्यांच्या आयुष्यात फार स्थान देत नाहीत.

सुरक्षिततेसाठी आग्रही असण्याचे बीज देखील जर्मनीच्या भूतकाळात रुजले आहे. दुस-या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर केलेल्या बॉम्बहल्ल्यामुळे अनेक शहरं उद्ध्वस्त झाली होती. सर्वत्र पडझड झालेल्या इमारती, कारखाने, ऐतिहासिक स्मारकं, घरं केवळ राख होऊन उरले होते. पराभूत जर्मनीतील लोकांचे आयुष्यदेखील पडझड झालेल्या इमारतीपेक्षा वेगळे नव्हते.

दुस-या महायुद्धात हारल्यानंतर मित्र राष्ट्रांनी जर्मनीला त्यांच्या प्रशासनाखाली घेतले होते. एकाच वेळेला जर्मन जनता अनेक पातळ्यांवर संघर्ष करत होती. एका बाजूला युद्धात अतोनात पडझड, नुकसान झाले असतानाच दुस-या बाजूने जर्मनीने काबीज केलेल्या भूभागातून जर्मन निर्वासितांना जर्मनीत पाठविले जात होते.

जर्मन लोकांना पुरविण्यात येणारा धान्यपुरवठा मर्यादित होता. प्रत्येक माणसाला किती अन्नधान्य देण्यात यावे यावर मित्र राष्ट्रांकडून नियंत्रण ठेवण्यात येऊ लागले. त्यामुळे जर्मन लोकांची उपासमार सुरू झाली. त्यात दिवसेंदिवस वाढत जाणारा निर्वासित लोकांच्या लोंढय़ाने परिस्थिती बिकट होत गेली.

काळ्या बाजारातून अन्नधान्य विकले जाऊ लागले. एका अभ्यासानुसार, दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी १ राईशमार्कला मिळणारी १ किलो साखर १८० ते २५० राईशमार्कला विकण्यात येऊ लागली. १ किलो ब्रेड ०.३० राईशमार्कच्या ऐवजी ३० ते ६० राईशमार्कला मिळू लागला.

काळाबाजार करणारे व्यापारी सामान्य लोकांचे शोषण करून गलेलठ्ठ होऊ लागले. पण लोकांना त्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसल्याने व्यापा-यांचे फावत असे. या वस्तूंच्या किमतीदेखील वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या असत.

युद्धाअगोदर वापरण्यात येत असलेल्या ‘राईशमार्क’ या जर्मन चलनाला फार किंमत राहिली नाही. जर्मनीला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आणि सगळा व्यवहार ‘वस्तूविनिमय’ म्हणजेच ‘वस्तूंची अदलाबदल’ या स्वरूपात होऊ लागला. भारतात जुन्या काळात जसे गुरांच्या बदल्यात धनधान्याची देवाणघेवाण होत असे. तसाच प्रकार जर्मनीत घडू लागला. फक्त देवाणघेवाणीत वापरण्यात येणा-या वस्तूंचे स्वरूप वेगळे होते. महागडय़ा पोषाखाच्या बदल्यात जेवणासाठीचे जिन्नस मिळवले जात असे. लोणी, सिगारेट, बटाटे, दारू या सगळ्या वस्तू यासाठी वापरण्यात येत असत.

युद्धोत्तर जर्मनीत काही काळ सिगारेट हे अतिशय प्रसिद्ध चलन म्हणून वापरण्यात येत होते. सिगरेटच्या बदल्यात वस्तू विकत घेता येत असत. जर्मनीतील जवळपास ६० टक्केजनता सिगारेट ओढणारी असल्यामुळे हे चलन लोकांनी लगेच स्वीकारले. जर्मनीची केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे तर सगळी व्यवस्थाच कोलमडून पडली होती. कालांतराने जर्मनीत नवीन चलन आणण्यात आले.

आधीचे राईशमार्क (Reichmark) हे चलन संपुष्टात येऊन त्याची जागा डॉईचेमार्क (Deutsche Mark) ने घेतली.  लोकांची जगण्याची लढाई सुरू असतानाच स्त्रियांवर होणा-या अत्याचारात वाढ झाली. अनेक ठिकाणी बलात्कार, खून, मारामा-या असे सत्र सुरू होते.

जर्मनीतील नाझी विचारांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी पराभूत जर्मनीच्या पुनíनर्माणासाठी मित्र राष्ट्रांनी कुठलीही मदत करू नये असा ठराव करण्यात आला होता. तो पुढे बदलण्यात आला असला तरी तोवर जर्मनीत सगळीकडे जीवनावश्यक गोष्टींची कमतरता भासत होती. नाझी जर्मनीत औद्योगिकीकरणाला चालना मिळाली होती. भविष्यकाळात जर्मनीला युद्ध पुकारता येऊ नये म्हणून औद्योगिक क्षेत्रात कपात करण्यात आली.

या सगळ्या परिस्थितीतून पुढे जाणा-या जर्मन लोकांना सुरक्षितता हवी होती. कुठल्याही दिशेने आशादायी दिसावे असे वातावरण युद्ध संपल्यानंतर लगेच दिसत नव्हते. त्यामुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागल्यावर जर्मन लोकांनी आपल्या जीवनपद्धतीत सामावून घेतलेली गोष्ट म्हणजे ‘सुरक्षितता’.

स्वत:ला आणि कुटुंबाला असुरक्षित वातावरणापासून लांब ठेवण्यासाठी जर्मन लोकं सदैव जागरूक असतात. यातून त्यांनी कुठल्याही गोष्टीचे आयोजन आणि त्यात येऊ शकणा-या अडचणी यांचा विचार करायची सवय लावून घेतली आहे.

अगदी लहानात लहान गोष्ट असली तरी ती अतिशय योग्य रीतीने पार पाडण्यात जर्मन लोकांचा हात कोणीच धरू शकणार नाही. मी नव्यानेच राहायला आलेल्या घराची जमीन (फरशीऐवजी) लाकडाची आहे. हिवाळ्यात लाकूड जरा फुगले आणि खराब झाले होते. मी त्याकरिता ज्यांच्याकडून घर भाडय़ाने घेतले त्या हौसिंग कंपनीला फोन केला. रीतसर वेळ ठरवून त्यांच्याकडून एक माणूस पहिल्यांदा पाहणी करण्यास आला.

सोबत आणलेल्या कॅमे-याने फोटो काढून परत गेला. काही दिवसांनी त्या फोटोवर कंपनीचे काय मत आहे यासाठीचा फोन आला. फोनवर पुन्हा एकदा कामाची वेळ ठरविण्यात आली. त्यानंतर ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी येऊन तो दुरुस्ती करून गेला. जाताना दुरुस्तीच्या सा-या तपशिलाची त्याच्या लॅपटॉपमध्ये नोंद करून, त्यावर माझी सही घेऊन, त्याची एक कॉपी मला देऊन गेला.

दुरुस्तीसाठी आलेल्या माणसाकडे लॅपटॉप यावर तुम्ही क्षणभर थांबला असाल तर.. होय, इथे साध्या दुरुस्त्या करणा-या लोकांकडेदेखील लॅपटॉप असतो. त्याबद्दल परत कधीतरी. हाती आलेल्या कामाचे उत्तम नियोजन करणे, ते काम चोखपणे पार पाडणे हे आणि असे काही गुण जर्मन माणसांनी अंगीकारले आहेत. दुस-या महायुद्धानंतर जर्मनीतील इमारतींच्या पुनíनर्माणाचे काम अनेक र्वष चालले. त्यासोबतच जर्मन लोक त्यांचेदेखील पुनर्निर्माण करत होते. त्याविषयी वाचूया पुढच्या लेखात..

1 COMMENT

  1. जर्मनीतील स्थित्यंतरावर आपण प्रभावी भाष्य केले आहे.
    लेखन आवडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version