Home कोलाज शनिदेवाचे माहात्म्य

शनिदेवाचे माहात्म्य

1

नवग्रहांमध्ये शनीबद्दल माणसाच्या मनात भीतीची भावना आहे. हा ग्रह उग्र समजला जातो. तो एकूण साडेसात वर्षे प्रभाव गाजवत असल्याने त्याला सगळेच घाबरतात, परंतु तो मारक आहे, तसाच तारक आहे. म्हणूनच त्याचे माहात्म्य खगोलशास्त्रीय चौकटीतून समजून घेणे आवश्यक आहे.

रवी, सोम, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू व केतू हे तथाकथित नवग्रह ज्ञात-अज्ञात सृष्टीवर तसेच व्यक्तिगत मनुष्यजीवनावर प्रभाव गाजवतात, अशी श्रद्धा प्राचीन काळापासून रूढ आहे. यापैकी शनी हा एकमेव ग्रह असा आहे की, ज्याच्याबद्दल लोकमानसात भयाची भावना सर्वप्रथम निर्माण झाली. तारक व मारक अशा दुहेरी ओळखीचा हा देव आहे. त्याचे माहात्म्य समजून घेण्यासाठी नवग्रहांना खगोलशास्त्रीय चौकटीत पाहणे आवश्यक वाटते.

सूर्यमालिकेचा विचार करता सूर्य हा ग्रह म्हणून बाद होतो व त्याची जागा पृथ्वी घेते. ग्रह नऊच राहतात. त्यातल्या बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ यांना Inner (small) plannets म्हणतात. तर गुरू आणि शनी हे डOuter (giants) होत. युरेनस, नेपच्यून व प्लुटो हे फार दूरचे ग्रह दुर्बिणीने पाहावे लागतात. या सर्वाचे आकलन कसे होत गेले, ते खगोलशास्त्राचा इतिहास सांगतो. पण सत्तावीस नक्षत्रांचा शोध ही वैदिक आर्याची खास उपलब्धी होती. नक्षत्रे म्हणजे पृथ्वीवरून दिसणारे तारकापुंज. त्यातील ता-यांचा एकमेकांशी संबंध नाही, पण कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांना सामूहिक ओळख प्राप्त करून देणे, हे असामान्य प्रतिभेचे कार्य होते. सात ग्रह डोळ्यांना दिसणारे होते. पण राहू व केतू या अदृश्य बिंदूना ओळखून त्यांना नावे देणे, हीसुद्धा Protoscientific कामगिरी होती. चंद्राचा मार्ग क्रांतिवृत्ताशी म्हणजे सूर्याच्या भ्रमणमार्गाशी पाच अंशाचा व विषुववृत्ताशी अठरा अंशाचा कोन करतो. चंद्र फिरताना दोन वेळा सूर्याचा मार्ग पार करतो. ज्या बिंदूपासून तो क्रांतिवृत्ताच्या वर सरकतो तो राहू (Ascending node) व जिथून खाली सरकतो तो केतू (Descending node). हे दोघे आळीपाळीने सूर्य-चंद्रांना ग्रहण लावतात, याची जाण त्यात आहे.

नवग्रहांमध्ये शनीबद्दलच मानवाला भयाची भावना निर्माण होण्याचे कारण, त्याचे आकलन फार उशिरा झाले. तो बुचकळ्यात टाकणारा ग्रह होता. खगोलशास्त्रज्ञांची मतीसुद्धा त्याने गुंग केली. १६१० मध्ये गॅलिलिओने हा ग्रह दुर्बिणीतून पाहिला. शनीचा वेगळेपणा निरखून तोही थक्क झाला. डोळ्यांना फिकट पिवळा दिसणा-या शनीभोवती तीन वलये व दहा उपग्रह आहेत. म्हणजे तो सूर्याची छोटी प्रतिमाच आहे. अशा ग्रहाबद्दल असलेले, कुतूहल, भय, ज्ञान, अज्ञान दिव्यकथांमध्ये रेकॉर्ड झाले. तो मंदगतीने फिरणारा म्हणून त्याला शनैश्वर हे एक नाव मिळाले. (शनये क्रमतिस:)

शनी ग्रह सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास साधारण ३० वर्षे घेतो. या कालावधीत तो १२ राशींतून (Zodiac किंवा moon sign) पार होतो. म्हणजे एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतो. फलज्योतिषानुसार तो तुमच्या आधीच्या राशीत आला की, तुमच्यावर अडीच वर्षे, मग तुमच्या राशीत आल्यावर आणखी अडीच वर्षे व पुढच्या राशीत गेल्यावर तिसरी अडीच वर्षे अशी एकूण साडेसात वर्षे प्रभाव गाजवतो. हीच साडेसाती होय. ती नशिबी आल्यावर शनिदेव रावाचा रंक बनवू शकतो, पण तो जरा मारक आहे तसा तारकही आहे. सदाचारी, कर्ममार्गी माणसांचे कल्याण करतो, पण त्याला उपेक्षा केलेली अजिबात सहन होत नाही. टिंगलटवाळी करणारा माणूस एरवी कितीही थोर असला तरी हा देव त्याचे हालहाल करून सोडतो. म्हणून त्याची आराधना केली जाते. शनिदेवाची प्रतिमा, लीला, कौटुंबिक पार्श्वभूमी वगैरेंची माहिती पुराणे, फलज्योतिष व शनिमाहात्म्यासारख्या पोथ्या व श्रावणी शनिवारच्या कहाण्या यातून मिळते. त्यात एकवाक्यता नसते.

शनी हा सूर्याला छायेपासून झालेला मुलगा. यम हा त्याचा धाकटा भाऊ. आपल्या मातेला वडिलांनी उपेक्षेने वागवले, हे सहन न झाल्यामुळे त्याने युद्धात सूर्याचाच पराभव केला. त्याच्या उग्र प्रकृतीची ही ओळख. मंगळ, शनी, राहू, केतू हे पापग्रह आहेत. म्हणून ते नडतात. शनिदेवाची नावे अनेक आहेत. जसे कोणस्थ, पिंगळ, बभ्रू, कृष्ण, रौद्र, यम, सौरी, शनैश्वर आणि मंद. शनीचे वाहन घोडा आहे. पण घार, कबुतर असे पक्षीसुद्धा वाहने असल्याचे सांगतात. त्याचा जन्म सौराष्ट्रात झाला. तो चतुर्भूज असून, धनुष्यबाणांनी सिद्ध असतो. त्याला तेलाचा अभिषेक लागतो. लोखंड, काळे उडीद, म्हैस, काळे वस्त्र या गोष्टी त्याला प्रिय असतात. भाविकांमार्फत त्या पोहोचवल्या जातात. गेल्या शतकात या देवाची देवळे फारशी नव्हती. एकविसाव्या शतकात ती सपाटून वाढलेली दिसतात. असे असून हा देव प्राचीन नाही. त्याचा पहिला उल्लेख मरकडेय पुराणात येतो. हे पुराण उत्तरकालीन असून तिसरे ते पाचवे शतक यात सिद्ध झाले. नवग्रह पूजासुद्धा उत्तरकालीन अग्नी पुराणात येते. वैदिक संहितांत सोडा, पण रामायण-महाभारतातही शनीचा उल्लेख नाही.

शनीने रावणाचे राज्य घालवले, दशरथाला अभय दिले वगैरे आख्यायिका यानंतर सोयिस्करपणे पसरवलेल्या होत्या.

ग्रहांना मानवदेहधारी बनवल्यानंतर त्यांना चातुर्वण्र्याच्या प्रस्थापित व्यवस्थेत बसवणे क्रमप्राप्त होते. म्हणून सूर्य हा ब्राह्मण किंवा क्षत्रिय ठरवला होता. सोम वैश्य, मंगळ क्षत्रीय, बुध वैख, गुरू व शुक्र ब्राह्मण तर शनी-राहू-केतू हे शूद्र झाले. त्यातला शनी तेली व राहू-केतू मातंग. म्हणजे पापग्रह शूद्र वर्णाचे आहेत. शिवाय भक्ताची परीक्षा पाहण्यास येणारा कोणताही देव ब्राह्मणाच्या रूपाने येतो. हा सर्व ब्राह्मणी कावा होय, असा आरोप सहज करता येईल, पण प्रत्यक्षात येथे राजसत्ता व धर्मसत्ता यांची युती बहुजन समाजाला भयाच्या भावनेखाली ठेवून त्यांच्यावर सत्ता गाजवत असते. ब्राह्मण-क्षत्रिय युती ही त्याची भारतीय आवृत्ती होय.

शनिदेवाला संतुष्ट करण्याचे अनेक मार्ग धार्मिक ग्रंथांनी सांगितले आहेत. शनिमाहात्म्य पोथीत, नतमस्तक झालेल्या राजा विक्रमादित्याला शनी बजावतो, ‘‘जो कुणी माझी ही कथा पठण करील, श्रवण करील त्याला मी नाडणार नाही. पण जे या कथेचा अपमान करतील त्यांना छळल्याशिवाय राहणार नाही.’’ अन्य सोपे उपायही उपलब्ध करून दिलेले आहेत. उदाहरणार्थ,

सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

या मंत्राचे पठण करावे.

‘ओम शं शनैश्चर्यये नम:’ असे रोज १०८ वेळा म्हणावे. ‘ओम प्राम् प्रीम प्रुम स: शनैश्वराय नम:।’ हा तांत्रिक मंत्र जपावा.

हनुमान शनीचा उपकारकर्ता आहे. म्हणून ‘हनुमान चालिसा’ वाचल्याने व पंचमुखी हनुमानाची आराधना केल्याने शनीला प्रसन्न करता येते.

कालिमाता, विष्णू-कृष्ण यांची पूजासुद्धा शनीला प्रिय आहे. म्हणून ‘ओम नमो नरनारायणाय।’ व ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे’ हे मंत्र जपावे. शिवाय उपासतापास, दानधर्म आहेतच. त्यात शिवाला स्थान नाही, हे लक्षात येते. प्रभाव शाक्त-वैष्णवांचा आहे.

विजय तापस यांनी शनिमाहात्म्याचा चिकित्सक विचार केला आहे (आजचा चार्वाक, दिवाळी अंक १९९२). पोथीचा लेखक तात्याजी महिपती याचा काळ ज्ञात नाही. अंतर्गत पुराव्यांवरून पोथी तेरा ते सोळा या शतकांच्या दरम्यान सिद्ध झाली असावी, असे मत व्यक्त केले. कोणताही धर्मग्रंथ एका व्यक्तीने एका काळात लिहिलेला नसतो. त्यात भर पडत गेलेली असते. पण तापस यांच्यापुढे काळाचा मुद्दा दुय्यम होता. कथेला थेट भिडून तिच्या प्रचंड यशाचे रहस्य त्यांनी उलगडले. शनिमाहात्म्य हे मराठी भाषेतील पहिले पोथीनाट्य होय, असा मौलिक विचार मांडला. शनी हा नायक, पण लोकमानसात ‘लीजंडरी हीरो’ झालेल्या राजा विक्रमादित्याची उपनायकपदी निवड करणे, हे मोठय़ा कल्पकतेचे काम होते. पोथीची कथा येथे प्रस्तुत नाही. पण तिच्यात एकामागे एक धक्कादायक प्रसंग नव नवी पात्रे घेऊन अकल्पितपणे उभे राहतात. वाचकांच्या डोळ्यांसमोर साकारतात व अपेक्षित संदेश गळी उतरवून जातात, हे महत्त्वाचे. वेगळ्या शब्दांत, त्यांना सिनेमॅटोग्रॉफिक व्हॅल्यू आहे. छोटय़ा पडद्यावर सजीव झालेली शनिमाहात्म्याची कथा याची साक्ष देऊन गेली. फलज्योतिष संस्कृतीचा तो विजय होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version