Home टॉप स्टोरी कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

कौस्तुभ राणे यांना अखेरचा सलाम

0

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना मीरारोडच्या वैकुंठ भूमीस्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

मीरा रोड- हजारोंच्या शोकाकूल नागरिकांच्या उपस्थितीत शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना मीरारोडच्या वैकुंठ भूमीस्मशानभूमीत भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या आईने पुष्पचक्र अर्पण करून आपल्या लाडक्या कौस्तुभला सलाम करताच उपस्थितांनी ‘भारत माता की जय’च्या गगनभेदी घोषणा दिल्या आणि सर्वांचेच डोळे पाणावले.

मीरा रोडच्या शीतल नगरमध्ये राहणा-या मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई करताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी त्यांच्या हिरल सागर या इमारतीमधील निवासस्थानी आणण्यात आले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर साडेसात वाजता पार्थिव इमारतीच्या परिसरात नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. भारतमातेच्या या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी रांग लागली होती.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे यांनी कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. सकाळी साडेनऊच्या सुमारास शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे तिरंग्यात लपटलेले पार्थिव फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या वाहनात ठेवल्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली आणि नागरिकांनी ‘वंदे मातरम,’ ‘भारत माता की जय’च्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. अंत्ययात्रेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेंद्र महेता आदींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

तब्बल दीड तासानंतर शहीद मेजर कौस्तुभ राणे यांची अंत्ययात्रा मीरा रोडच्या वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. त्यावेळी फुलाने सजवलेल्या मंडपात पार्थिव ठेवण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी महेश कल्याणकर आणि सैन्याच्या तीनही दलातील अधिका-यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. लष्कराच्या वतीने कौस्तुभ यांना मानवंदना देऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास संपूर्ण लष्करी इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. कौस्तुभचे वडील प्रकाश राणे यांनी पार्थिवाला अग्नी दिला. लष्कराच्या जवानांनी तीनवेळा हवेत फैरी झाडून मानवंदना दिली.

उपस्थितांना अश्रू अनावर

कौस्तुभची आई ज्योती राणे यांनी पुष्पचक्र अर्पण करतात उपस्थितांच्या भावनेचा बांध फुटला आणि महिलांसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमले. सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना देताना पर्जन्यवर्षाव झाला आणि जणू निसर्गानेसुद्धा अश्रू ढाळले. अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत उभे राहायला जागा नव्हती, एवढी प्रचंड गर्दी झाली होती. शोकाकूल नागरिकांना आवरणे पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेल्यावर कौस्तुभच्या मामीने ध्वनिक्षेपकावरून लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version