Home Uncategorized शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यावसायिक पर्याय

शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यावसायिक पर्याय

4

कुठल्याही प्रकारची शेती व्यवसाय म्हणून करताना त्या शेतीची परिपूर्ण माहिती करून घेतली तर तो व्यवसाय यशस्वी होणारच.

नांदगाव- कुठल्याही प्रकारची शेती व्यवसाय म्हणून करताना त्या शेतीची परिपूर्ण माहिती करून घेतली तर तो व्यवसाय यशस्वी होणारच. सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील राजेश परब हे याचे उत्तम उदाहरण ठरावे. त्यांनी फक्त २.५ गुंठे क्षेत्रात मत्स्यपालन सुरू केले.

आज देशाच्या कानाकोप-यात शोभिवंत माशांचा व्यवसाय ते करत आहेत. म्हणूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी सिंधुदुर्गातील अनेक शेतकरी पुढे सरसावले आहेत. हा व्यवसाय सुरू करताना दोन हजार माशांमागे जेमतेम १० हजार रुपये खर्च येतो. मात्र योग्य व्यवस्थापन केल्यास यामधून ३ लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
राजेश भास्कर परब या युवकाने केमिकल इंजिनीअरिंग ही पदवी प्राप्त केली. मात्र, आपण शेती व्यवसाय करायचा ही त्यांची आवड होती. मात्र गावी असलेल्या आंबा, नारळ बागेतील उत्पन्नातून मिळणा-या पैशामधून कामगारांसाठी खर्च मोठय़ा प्रमाणात होतो. त्याचबरोबर बागायती शेतीला बदलत्या हवामानाचा बसणारा फटका यामुळे मोठे नुकसान होत असल्याने परब यांनी कुठल्याही हवामानाचा परिणाम न होणा-या आणि एक माणूस सांभाळू शकेल, अशा मत्स्यपालनाची व्यावसायिक शेती करण्याचा विचार पक्का केला. या वेळी डॉ. नितीन सावंत यांचे त्यांना मोठे सहकार्य मिळाले.

परब यांनी थ्री ग्रेडचा प्रकल्प सुरू केला. प्रकल्प उभारणीसाठी १५ लाख एवढा खर्च आला. मात्र, या क्षेत्रात अधिक शेतकरी सहभागी झाल्यास इतर खर्चाच्या दृष्टीने किंवा ग्राहकाची असलेली मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने किंवा ग्राहकाची असलेली मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने इतर राज्यातील शेतक-यांसमोर आपण कमी पडू नये, यासाठी जिल्ह्यातील या प्रकल्पासाठी आवड असलेल्या शेतक-यांची टीम तयार केली आणि आपल्या जिल्ह्यात जवळजवळ नव्वद प्रकल्प सुरू झाले. कोकणातील माशाला टक्कर देणारा मासाच नाही.

आपल्या देशात अनेक ठिकाणी फिश टँकसाठी मासे येतात. जास्त मासे कोलकात्याहून येतात. मात्र, आपल्या जिल्ह्यातील वातावरण व येथील सॉफ्ट वॉटरमध्ये वाढलेल्या माशाला टक्कर देणारा मासाच अजून आपण पाहिलेला नाही. एक वेळ प्रदर्शनामध्ये भाग घेतला असता ऑस्ट्रेलियातील या क्षेत्रातील डेप्युटी डायरेक्टर ब्रॅन अँड्रय़ू यांनीही याबाबत पाहणी करून कौतुक केले. यामध्ये राजेश परब यांना चौथा क्रमांकही मिळाला होता.

राजेश परब म्हणाले की, फक्त मुंबईत या माशांची महिन्याला ३ लाख एवढी मागणी आहे. मात्र ही मागणी आपल्या राज्यातून पूर्ण होत नाही. यासाठी या ठिकाणच्या लोकांना इतर राज्यांतून मासे खरेदी करावे लागतात. मात्र, आपल्या जिल्ह्यातील वातावरणात व पाण्यात तयार झालेल्या माशांची सर व कणखरपणा त्यांच्यामध्ये नसतो. यासाठी जिल्ह्यातील होतकरू शेतक-यांनी या व्यवसायाकडे वळावे. आपण स्वत: त्यांना याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करू. शिवाय आपल्या राज्यात असणा-या माशांची गरज आपण भागवू शकू, असे ते म्हणाले.

मुळदे येथील मार्गदर्शन मोलाचे!

प्रशिक्षण शिबिराला जाणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे, असा आपला समज होता. मात्र, पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय यांच्या एका प्रशिक्षण शिबिराला आपण गेलो आणि तेथील शिबिरात जे मार्गदर्शन केले गेले ते एवढे दर्जेदार होते की, यापुढे या ठिकाणी असणारे एकही प्रशिक्षण शिबिर कधी चुकवावे, असे कधीच वाटले नाही. एवढे दर्जेदार मार्गदर्शन आपल्या जिल्ह्यात आपल्याला मिळते, हे येथील शेतक-यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. शिवाय जिल्ह्यातील इतर शेतक-यांनीही या ठिकाणी होणा-या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहून याचा लाभ घेतल्यास निश्चितच फायद्याची १०० टक्के हमी मिळू शकेल, असे परब यांनी सांगितले.
यापुढे आपण माशांच्या प्रजननासाठी आवश्यक असलेली व्यवस्था करून या ठिकाणी वेगवेगळय़ा माशांचे बीज तयार करण्यासाठी प्रयत्नशील असून येत्या काही दिवसांत हा प्रयोग यशस्वी करून याबाबत इतर शेतक-यांनाही माहिती देऊ आणि हा व्यवसाय प्रमाणात करण्यास प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
राजेश परब म्हणाले की, शेतक-यांसाठी बाजारपेठा आहेत. मात्र शेतक-याला तेवढा वेळ नसतो. इतर देशांत शेतक-यांचा माल जसा दारातून उचलला जातो, तशी पद्धत आपल्या देशात रुजल्यास या ठिकाणीही अनेक शेतकरी व्यावसायिक शेतीकडे वळतील. त्याचबरोबर विविध प्रकारचे संशोधन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या व्यवसायात येणा-या प्रत्येक शेतक-याला आपण मार्गदर्शन करू. आपल्यालाही
डॉ. नितीन सावंत यांचे नेहमीच सहकार्य मिळत असते.

हवाई वाहतुकीची गरज
वाहनातून मासे पाठवण्यासाठी खूप वेळ लागतो. शिवाय पॅकिंग केलेल्या पाण्यात ऑक्सिजनची क्षमता १७ तास असते. अशा वेळी गाडीत काही बिघाड झाल्यास किंवा रस्त्यात जास्त वेळ वाया गेल्यास हे धोकादायक ठरू शकते. यासाठी जिल्ह्यातून विमानसेवा सुरू झाली पाहिजे. त्यामुळे नियोजित ठिकाणी अतिशय कमी वेळात पोहोचता येईल आणि हा व्यवसाय अधिक वेगाने करता येईल, असे राजेश परब यांनी सांगितले.
माशांच्या विविध जाती
माशांच्या जवळपास ३०० जाती आहेत. त्यामधील राजेश परब यांच्याकडील मत्स्यालयात एंजल, मार्बल, स्कार, डायमंड, प्लॅटिनम, गोल्डन, टॅक्सीडो, डॉलर, ऑस्कर, सिवेराम, कॉनवॅट, येलो, चिकलेट, डिसकस, डॅनिओ, जबेरा अशा जातीतील मासे
उपलब्ध आहेत.

4 COMMENTS

  1. हेलो
    सर मी वसई ईथे राहतो व मला माझ्या शेती वर फिश फार्म सुरु करायचे आहे
    जर आपली थोड़ी फार मदत मिळाली तर खुप बर होईल.
    आपला मोबाइल नंबर किवा पत्ता मिळाला तर बर होईल. माझा मोबा. ८००७६०९९९० / ९९७५९९९०८४ हा आहे.

  2. सर मी प्रसाद धुरी मी मुंबई मध्ये काजूरमार्ग येथे राहतो. मला शोभिवंत माश्यांचा व्यवसाय करायचा आहे. कृपया मला तुमच्या मोबाईल क्रमांक तसेच तुमची कार्य शाळेबद्दल माहिती
    द्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version