Home वाचकांचे व्यासपीठ सचिनचा वारसदार कोण?

सचिनचा वारसदार कोण?

1

सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी मोर प्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि ओजस्वी, आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रसिद्धी मिळूनही तो कधीही वादग्रस्त ठरताना दिसला नाही.

सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटप्रेमही अगदी मोर प्रेमासारखे मनस्वी, यशस्वी आणि ओजस्वी, आणि म्हणूनच असेल कदाचित सचिनच्या संपूर्ण कारकिर्दीत प्रसिद्धी मिळूनही तो कधीही वादग्रस्त ठरताना दिसला नाही. क्रिकेट म्हणजे सत्ता, स्पर्धा, वादविवाद परंतु सचिनचा त्यात कुठेही समावेश दिसून आला नाही. क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंग आणि बेटींगमध्ये गुंतले जात असतानाही सचिन मात्र उजळ माथ्याने आपल्या बॅटीचा लखलखट करताना दिसत होता. त्यामुळे सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नये, असे त्याच्या चाहत्यांचा वाटत होते. परंतु प्रत्येक क्षेत्रात काम करताना काही मर्यादांचे पालन करावे लागते. आता सचिनसारखा महान क्रिकेटरने क्रिकेट जगातून संन्यास घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघातील सचिनचा खरा वारसदार कोण ..


सचिन हा एकमेवच!

गेल्या चोवीस वर्षापासून सातत्याने खेळणारा सचिन शनिवारी क्रिकेट सामन्यातून निवृत्त झाला. अखेरच्या दिवसापर्यंत आपल्या संयमी वृत्तीचे दर्शन घडवणा-या सचिनची जागा भारतीय क्रिकेट जगतात घ्यायला आताच्या क्रिकेटपटूंना मोठा पल्ला गाठावा लागेल. सचिनमधील आक्रमकता, खेळीची शैली गाठण्यासाठी आताच्या क्रिकेटपटूंना किमान दहा वर्षाचा काळ लागेल, असे वाचकांनी स्पष्ट केले. मात्र हे क्रिकेटपटू सचिनचा वारसदार होऊ शकणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. मात्र सचिनचा वारसदार हा ख-या अर्थाने अर्जुन सचिन तेंडुलकर होईल, अशी आशा काही वाचकांनी व्यक्त केली. त्यासाठी खुद्द सचिनने अर्जुनला तयार करावे, अशी अपेक्षाही वाचकांनी व्यक्त केली.


सचिनसारखे कोणी नाही

क्रिकेटचा बादशहा सचिन निवृत्त झाला. आता क्रिकेटच्या विश्वातून सामान्य माणसेही बाहेर पडतील असे वाटते. समाजात असे अनेक लोक आहेत की जे केवळ सचिनसाठी क्रिकेट पाहायचे. काही तरुण केवळ सचिनसारखा क्रिकेटपटू व्हायचे आहे म्हणून क्रिकेट पाहतात. मात्र सचिनच आता क्रिकेटमधून बाहेर पडल्याने क्रिकेटचा श्वासच हरपतोय की काय, अशी शंका आहे. सचिनचा वारसदार कोण असेल हे सांगणे खूपच कठीण आहे. त्यामुळे यावर भाष्य न करणेच उचित ठरेल. – रुपेश उतेकर, शीव


सचिनने निर्णय घ्यावा

आता सचिनशिवाय क्रिकेट पाहावे लागणार ही कल्पनाच त्रासदायक आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी विक्रमवीर होणे हे आता तरी शक्य नाही. मात्र सचिनचा मुलगा अर्जुन हा सचिनच्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल असे वाटते. सचिनबाबत बोलण्यासाठी हा जन्म अपुरा आहे. सचिन केवळ एक महान क्रिकेटपटूच नसून आयुष्यातील प्रत्येक नाते त्याने मनापासून सांभाळले आहे. त्यामुळे दुसरा सचिन आपल्या घरीदेखील जन्माला यावा, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न आहे. त्याच्या निवृत्तीबाबत लिहिताना जेवढा त्रास होतो तेवढाच त्रास त्याच्या वारसदाराबाबत वक्तव्य करण्याबाबत होत आहे. आज एखाद्याचे नाव घेतले तरीही तो आपल्या कामगिरीचे सातत्य टिकवून ठेवेल, याबाबत शंका आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटपटू विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांच्याकडून भारतीय क्रिकेट जगताला अपेक्षा आहेत. पण हे दोन्ही क्रिकेटपटू सचिनची जागा घेऊ शकत नाहीत, वारसा चालवणे तर दूरची गोष्ट. – तुषार लोखंडे, शीव


क्रिकेटचा श्वास हरपला

सचिनबद्दल काय बोलू अन् काय लिहू. भारतीय क्रिकेटविश्वातल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास. आजवर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महान खेळाडू झालेत, नाही असे नाही, पण सचिनने मैदानात आणि मैदानाबाहेरची आपली प्रतिमा उंचावण्याएवढे महान कार्य केले आहे. आता सचिन दिसणार नाही तर क्रिकेट पाहण्यातही अर्थ उरणार नाही. सचिनचा वारसदार हा अर्जुनच होऊ शकतो. त्याचे वय तसेच सचिनची निवृत्ती पाहता सचिनने अर्जुनची खेळी विकसित करावी, जेणेकरून आम्हाला दुसरा सचिन मिळेल. – परेश निखार्गे, चेंबूर


क्रिकेटच्या खेळाला पडलेलं सुंदर स्वप्न!

सचिन आता क्रिकेटच्या खेळातून निवृत्त झाला. क्रिकेट जगतातून त्याने स्वत:हून संन्यास घेतला. मला व त्याच्यावर प्रेम करणा-या असंख्य चाहत्यांना तो निवृत्त होऊ नये असे वाटत होते. लतादीदी म्हणाला होत्या, ‘‘सचिन तू खेळत राहा! तुझ्या खेळामुळे आम्हाला आनंद मिळतो.’’ सचिन हा सुसंस्कृत व नीतिमान खेळाडू आहे. कुठल्याही खेळात घराणेशाही व वारसदार नसतो. डॉन ब्रॅडमननंतर ओनीलच्या नावाची चर्चा होत होती. विक्स, वॉरेल, वॉलकॉट- थ्री डब्ल्यू (स)च्या नंतर सोबर्सची चर्चा झाली. पण ते कुणाचेच वारसदार ठरले नाहीत. त्यांची खेळण्याची शैली स्वतंत्र होती. डॉन ब्रॅडमन म्हणाले होते, ‘सचिन माझ्यासारखा खेळतो.’ हे सचिनला त्यांनी दिलेले प्रशस्तीपत्र आहे. सर्वात मोठा पुरस्कार त्यांनी दिला. सचिनचा वारसदार ठरवणे योग्य होणार नाही. सचिनपासून प्रेरणा घेणारे, स्फूर्ती घेणारे व सुसंस्कृत, नीतिमान खेळाडूच त्याचे वारसदार ठरतील. – एस. बी. पोकलेकर, नवा नागपाडा


चिनचा खरा वारसदार विराटच!

सचिन तेंडुलकर विक्रमांचा बादशाह. त्याने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर २००वी कसोटी खेळून सन्मानाने निवृत्ती स्वीकारली. आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात त्याच्याइतका महान विक्रमवीर खेळाडू झाला नाही. कप्तान असताना सचिनच्या खेळावर परिणाम व्हावयास लागला म्हणून त्याने स्वत:हून कप्तानपदाचा त्याग केला व त्यानंतरच त्याचा खेळ बहरत गेला. अंपायरने दिलेला निर्णय, मग तो चुकीचा असला तरी तो मानण्यातच मोठेपणा हे त्याने इतर खेळाडूंना दाखवून दिले. खेळाच्या मैदानावर व बाहेर खेळाडूने कशा प्रकारे वागावे हे त्याच्याकडून इतर खेळाडूंनी शिकावे. म्हणूनच अशा गुणी व विक्रमी खेळाडूची जागा भरून येणे अशक्य वाटते. तरीही सध्याच्या घडीला विराट कोहलीच सचिनचा खरा वारसदार असल्याचे दिसत आहे. त्याची खेळाची नजाकत, फटकेबाजी, चौकार-षटकारांची आतषबाजी बघण्यालायक आहे. विराट सचिनच्या विक्रमांचा पाठलाग करणारा एकमेव खेळाडू असावा. कोहलीचीही शतके बरीच झळकलेली आहेत, म्हणूनच सचिनच्या शतकांची बरोबरी करण्याच्या आसपास तो नक्कीच पोहोचेल. – लक्ष्मण टिकार, मालाड


क्रिकेट रसिकांच्या हृदयातील सचिन पुन्हा होणे अशक्य

सा-या जगभर भारतीय क्रिकेटची विजयी पताका आपल्या कर्तृत्वाने फडकती ठेवणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीने कोटय़वधी क्रिकेट रसिक हळहळले. सचिनशिवाय भारतीय क्रिकेट संघ ही कल्पनाच क्रिकेट रसिकांना सहन होत नाही. परंतु काळानुसार नव्या बदलांना सामोरे जाणे हा मानवी जीवनाचा धर्म आहे. त्याच्या निवृत्तीमुळे क्रिकेट रसिकांमध्ये सळसळते चैतन्य निर्माण करणार सचिन तेंडुलकर नावाचे वादळ पाहायला आणि त्याच्या खेळाचा अनुभव घ्यायला मिळणार नाही. अनेक पुरस्कार भूषवताना आपल्या विनम्र वागणुकीने भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये सचिनने अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सचिनने स्वत:च्या आचरणाने निर्माण केलेला आदर्श सर्व तरुणाईला प्रेरणादायी आहे. आज भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने विचार करता सध्या सचिनची जागा भरून काढू शकतील असे विराट कोहली, रोहित शर्मासारखे गुणवान व दर्जेदार फलंदाज आहेत. सचिनची जागा घेणे कठीण असले तरी सचिनच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास भारताचे युवा फलंदाज सक्षम आहेत. त्यासाठी काही काळ जाईल. आज सचिनंतर पुढे काय, असा प्रश्न क्रिकेट रसिकांच्या मनात निर्माण होतो. हेच सचिनची महानता दर्शवत आहे. – शिवदास शिरोडकर, लालबाग


वारसदाराचा मुद्दा अनाठायी

गेली दोन तपे सचिन तेंडुलकरची बॅट तळपतेय. या दरम्यान सचिनला ९४ नवे साथीदार लाभले. त्याच्याबरोबर कसोटी पदार्पण करणारे तर कधीच निवृत्त झाले. अलौकिक प्रतिभेला खडतर परिश्रम, संयम आणि कर्तृत्वाची जोड देत सचिनने अद्वितीय कारकीर्द साकारली. गेली २४ वर्षे ‘सचिन’ नावाचे हे वादळ क्रिकेट जगतावर घोंगावत राहिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने चांगले खेळणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी खेळावर अविचल निष्ठा असावी लागते, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्टय़ाही स्वत:ला कायम तंदुरुस्त ठेवावे लागते. त्यासाठी सचिनला शंभरपैकी शंभर गुण द्यावेच लागतील. सचिन आपली पहिली कसोटी खेळला तेव्हा विराट कोहलीचे वय फक्त एक वर्षाचे होते, ही एकच गोष्ट सचिनची कारकीर्द किती ‘मोठी’, ‘महान’ आहे हे सांगून जाते. या लांबलचक कारकिर्दीमध्ये सचिन कधीही थकलेला, दमलेला, कंटाळलेला, उदास वाटला नाही. या सचिनच्या गुणांचा तरुण क्रिकेटियर्सनी अभ्यास करून ते अंगीकारणे महत्त्वाचे वाटते. सचिनसारखा प्रतिभासंपन्न क्रिकेटपटू आपला खेळ करत गेला आणि विक्रम त्याच्या पाठीमागे येत राहिले. आता तो अशा स्थानावर पोहोचला आहे, जे स्थान काबीज करणे कोणालाच शक्य होणार नाही. एका अर्थाने तो क्रिकेटच्या विश्वातला ‘ध्रुव तारा’ बनला आहे. तेव्हा सचिनचा वारसदार कोण, हा प्रश्नच अनाठायी वाटतो. कारण सचिनइतका सर्वगुणसंपन्न इंडिया टीममध्ये आज तरी कोणीच दिसत नाही. – दिलीप अक्षेकर, माहीम


भारतीय क्रिकेटचा कोच म्हणून सचिनने नवीन इनिंग चालू करावी

मुंबई कसोटीनंतर सर्वाचा लाडका आणि क्रिकेटचा देव मुंबईचा सचिन तेंडुलकर पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नाही. २००व्या कसोटीनिमित्ताने त्याची २४ वर्षाची झळाळती कारकीर्द वानखेडेवर थांबली. तब्बल दोन तपे सचिनची बॅट तलवारीप्रमाणे चमकली. या बॅटच्या जोरावर त्याने अनेक विक्रम मोडले, अनेक विक्रम रचले. २०० कसोटी सामने, कसोटी व वनडे मिळून १०० शतके आदी विक्रम मोडले जाणे निव्वळ अशक्य आहे. सचिनने भारतीय क्रिकेटला योगदान दिले ते लाजवाब आहे. असेच योगदान त्याने भारतीय कोच होऊन पुन्हा आपली नविन विनिंग चालू करून द्यावे. – शिवाजी चौगुले, कोल्हापूर


सचिनच सर्वगुणसंपन्न!

सचिनचा वारसदार कोण, म्हटले तर कोणीच नाही. कारण सर्वगुणसंपन्न असलेला फक्त आमचा सचिन तेंडुलकरच आहे. त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. भारतीय संघ पाकिस्तानी दौ-यावर असताना जागतिक कीर्तीचा लेगस्पीनर अब्दुल कादीर या गोलंदाजाला अवघ्या षोडशीच्या सचिनने केली फटकेबाजी पाहिली तेव्हाच ‘हा पठ्ठय़ा लंबी रेस का घोडा है’ हे भविष्य क्रिकेट समीक्षकांनी वर्तवले. १६ ते ४० वर्षापर्यंत खेळणारा असा हा महामानव खेळाडू नेहमीच तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट जगलाय. प्रेक्षकांच्या मते, सचिनची उणीव विराट कोहली किंवा रोहित शर्मा हे भरून काढतील. पण सचिनवेडे क्रिकेट रसिक त्यांना सचिनचे स्थान देऊ शकणार नाही. सचिनचे चौकार-षटकार पाहता चोवीस वर्षे कशी निघून गेली हे कळलेच नाही. म्हणूनच मी म्हणतो, सचिन तेंडुलकरचा वारसदार कोणीच नसणार. – रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव


सचिनचा वारसदार येणारा काळच ठरवेल

सचिनचा वारसदार कोण, या प्रश्नाबाबत आताच बोलणे उचित होणार नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर इतकी वर्षे क्रिकेटमध्ये टिकून राहणे एवढे सोपे नाही. सचिनने आपल्या लाघवी बोलण्याने प्रतिस्पध्र्याचीही मने जिंकली. यशाच्या शिखरावर असूनही पाय आजतागायत जमिनीवर घट्ट रोवून राहणारा हा एकमेव खेळाडू आहे. हे विधान निश्चितच अतिशयोक्तीचे नाही. आपल्या यशाचे श्रेय तो शेवटपर्यंत आप्तस्वकियांना, त्याला घडवण्यात मोलाची भूमिका बजावणा-या प्रत्येकाला देत होता. हा आमचा सचिन आहे. निखळ हास्याने सर्वाची मने जिंकणारा. आजतागायत तो कोणत्याही फंदात तो अडकला नाही. विरोधकांना उत्तर देण्यासाठी त्याची बॅटच पुरेशी. सचिन होणे तितके सोपे नाही. त्यासाठी सचिनचा प्रत्येक स्वभावगुण त्या क्रिकेटपटूला आत्मसात करायला हवा जो त्याचा वारसा पुढे चालवू इच्छितो. आपली संस्कृती मनोभावे जपणा-या या क्रिकेटसूर्याला मानाचा मुजरा. – विजय पवार, लोअर परळ


दुसरा सचिन होणे अशक्य

सचिन तेंडुलकरचे क्रिकेटवरील प्रेम अवर्णनीय आहे. जसे आई-मुलाचे असते, तसे अतूट नाते त्याचे क्रिकेट या खेळाशी असल्याने त्याने या खेळाला सर्वस्वी वाहून घेतल्यानेच इतके सामने खेळून डोंगराएवढय़ा धावा केल्या. शांत स्वभाव व मितभाषी असल्याने तो वादग्रस्तही ठरला नाही. अशा प्रकारचा क्रिकेटपटू सध्या भारतीय संघात नाही, त्यामुळे त्याचा वारसदार असा कोणी असण्याची किंवा निर्माण होण्याची कल्पनाच धूसर वाटते. प्रत्येकाचा आपापला खेळाचा वेगळा ढाचा असतो, परंतु सचिनसारखा संयमी, मेहनती, मनमिळावू व दुस-यांचा आदर राखणारा खेळाडू असेल तरच तो असंख्य चाहते निर्माण करून क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनून लोकप्रियता मिळवू शकतो. एरव्ही दुसरा सचिन तेंडुलकर होणे अशक्य! – नरेश नाकती, बोरिवली


भारताचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकर

क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट हे समीकरण गेली २४ वर्षे बनले आहे. सचिनशिवाय क्रिकेटची कल्पनाच करणे शक्य नाही, जणू क्रिकेटसाठीच पृथ्वीतलावर या देवाचा जन्म झाला आहे. २०० कसोटी खेळणे ही महान गोष्ट आहे. शतकांचे शतक करणा-या या महान फलंदाजाला त्रिवार सलाम! २४ वर्षे क्रिकेट रसिकांना क्रिकेटची अनोखी मेजवानी सचिनने दिली आहे. सचिनच्या वारसदाराबाबत बरीच चर्चा चालू आहे. सुदैवाने आपल्याकडे गुणवान खेळाडूंची कमतरता नाही, परंतु दुसरा सचिन पाहायला मिळणे हे शक्य नाही. २०० कसोटी खेळून असंख्य उच्चांक करून निवृत्त झालेल्या सचिनची जागा घेता येणे कोणालाच शक्य नाही. – दिनेश तुरे


अर्जुन हाच वारसदार!

सध्याच्या क्रिकेटपटूंचा विचार करता सचिनची जागा घेणारे क्रिकेटपटू नाहीत, असे खेदाने सांगावेसे वाटते. विराट कोहली किंवा रोहित शर्माकडून अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. मात्र सचिनचा वारसदार म्हणून त्यांचा नामोल्लेख करणे सचिनप्रेमी क्रिकेटपटूंना शक्य नाही. विराटने स्वभावात तारतम्य न बाळगता काही वेळा त्याचा पारा चढल्याचे आढळले आहे. अशा वेळी सचिनचा संयमी स्वभाव त्याला आत्मसात करणे जमेल, असे वाटत नाही. कारण मेहनती वृत्तीसोबतच क्रिकेट खेळात संयमही महत्त्वाचा. त्यामुळे सचिनचा वारसदार म्हणून लहानग्या अर्जुन तेंडुलकरचे नाव घेणे योग्य राहील. अमाप पैसा लोळत असतानाही तेंडुलकर कुटुंबीय अजूनही त्याच अदबीने सगळ्यांची विचारपूस करतात. अर्जुनही सचिनच्या पावलावर पाऊल टाकून वडिलांप्रमाणे आपले नाव उंचावेल, यात शंका नाही. त्यामुळे सचिनचा खरा वारसदार हा अर्जुनच असल्याचे सांगावेसे वाटते. – स्वप्नाली नार्वेकर, खारघर


सचिनसारखा खेळाडू क्रिकेट जगतात पुन्हा होणे नाही. सचिन आता थांबतोय ही कल्पनाच मुळात पटत नाही. कारण प्रत्येक वेळी सचिनला फलंदाजी करताना बघण्याची सवय झाली होती. आता तो पुन्हा त्या ठिकाणी दिसणार नाही याचे सर्वात मोठे दु:ख आहे. मात्र भारतातला सर्वात महत्त्वाचा म्हणून ओळखला जाणारा ‘भारतरत्न पुरस्कार’ त्याला मिळणार असल्याने आनंददेखील होत आहे. -सौरभ गुजर (दादर)

सचिन तेंडूलकर हा आता क्रिकेटमधून जरी निवृत्त होत असला तरी संघातील त्याची जागा कोणी घेऊ शकणार नाही. त्याने दिलेले आतापर्यंतचे योगदान हे भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिण्याजोगे आहे. क्रिकेट जगतातील सचिनची खेळी ही खरेच वाखणण्याजोगी आहे. मात्र माझे त्याच्या बाबतीत एकच मत आहे. ‘कभी अलविदा ना कहना’– राहुल सिंग (लालबाग)


क्रिकेटसारख्या खेळावर २४ वर्षे ज्याने अधिराज्य गाजवले त्या खेळाडूच्या निवृत्तीने मोठे दु:ख होत आहे. सतत खेळपट्टीवरील त्याची कारकीर्द पाहता सचिन आणखी काही वर्षे खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र तरीही सचिनने भारतीय संघाला दिलेले योगदान हे अमूल्य आहे. मात्र त्याची कमतरता, त्याचा खेळ याची चर्चा क्रिकेट जगतात सदैव होत राहील. – श्रेयस तांडेल (वडाळा)

क्रिकेटच्या खेळातील देवाच्या निवृत्तीची गोष्ट ही मनाला दु:ख देणारी आहे. खेळातील त्याचे अचूक फटके, विनम्रता पुन्हा पाहावयास मिळणार नाही याचेच मोठे दु:ख आहे. मात्र या विक्रमादित्याची खेळी संपूर्ण विश्व कधीही विसरू शकणार नाही. हा तेजोमय सूर्य आकाशात सदैव प्रकाश देत राहील याची खात्री आहे. -राजू सामला (दिवा)


मी काही वर्षापूर्वी नेट प्रॅक्टिसला जायचो, मात्र ३ ते ४ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर मी बंद केले. माझेही सचिनसारखे व्हायचे स्वप्न होते, मात्र मला ते जमले नाही. सचिनला क्रिकेट खेळताना पाहूनच मलाही क्रिकेट क्षेत्रात मोठे व्हावे असे वाटत होते, पण ते माझ्यासाठी शक्य नव्हते. सचिनसारखे होणे ही गोष्ट केवळ कल्पनाच राहू शकते. सचिनसारखे होता येणे कदापि शक्य नाही. केवळ सचिन क्रिकेटमध्ये होता म्हणूनच आम्ही मॅच बघायचो. सचिनने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आमचेही डोळे पाणावले होते. मात्र त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची इच्छा आहे. सचिनला ‘भारतरत्न’ मिळाला ही गोष्ट संपूर्ण भारताला आणि आमच्यासारख्या तरुणांसाठी गौरवास्पद आहे. – शशिकांत निकाळजे, क्रिकेटपटू

सचिनशिवाय क्रिकेट अपूर्ण असेल असे वाटते. क्रिकेट क्षेत्रात सचिनने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला इतिहासाचे पान म्हणावे लागेल. सचिनची ही ओळख कायम राहील, त्याच्यासारखा महान व्यक्ती अनेक दशके ओळखला जाईल. सचिन ज्याप्रमाणे खेळला त्यावरून त्याला कोणीही स्पर्धक नाही. क्रीडा क्षेत्रात कोणालाही ‘भारतरत्न’ हा सन्मान मिळाला नाही. सचिनला ‘भारतरत्न’ जाहीर झाला ही खूप सुखद गोष्ट आहे. त्याच्यामुळे भारताचे नाव मोठे झाले. त्याचप्रमाणे हा सन्मान घेणारा भारतीय असल्याचा अभिमान आहेच, पण मराठी असल्याचा महाराष्ट्रातील असल्याचा आनंद अधिक आहे. – अजिंक्य नाईक


क्रिकेट खेळणे हे मुले आणि तरुणांसाठी आनंदाची गोष्ट असते. प्रत्येक मूल, तरुण क्रिकेटसाठी उत्सुक असतो. अनेकांना सचिनसारखे व्हायचेही असते, मात्र प्रत्येकाला सचिनसारखे होणे कदापि शक्य नाही. सचिनने क्रिकेट क्षेत्रात केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारतासाठी खूप मोठी आहे. मात्र त्याने आता क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही क्रिकेटपासून वेगळे व्हावे असे वाटत नाही. क्रिकेट सचिनशिवाय अपूर्ण आहे, असे म्हटले तरी चालेल. आम्ही केवळ सचिनसाठीच क्रिकेट पाहायचो. माझ्यासारख्या आणि किती तरी क्रिकेट खेळणा-यांचा आदर्श सचिन असेल. त्याला ‘भारतरत्न’ जाहीर झालाा ही खरेच खूप आनंदाची गोष्ट आहे. – उमेश लोखंडे, क्रिकेटप्रेमी

ज्या वेळी सचिननने मुलाखतीत आपण निवृत्त होणार आहे, असे सांगितले त्या वेळी त्याच्याही डोळ्यात पाणी उभे राहिले होते. आपले क्षेत्र सोडताना कोणाच्याही डोळय़ात पाणी येणे साहजिकच आहे. सचिन ज्या पॅशनने क्रिकेट खेळला त्यावरून त्याने क्रिकेट सोडू नये, असे सगळ्यांनाच वाटत होते. त्याने क्रिकेटला अलविदा बोलावे हे फार कठीण आहे. मात्र क्रिकेट खेळणारे नेहमी क्रिकेटच्या अ‍ॅक्टिव्हिटीशी जोडलेले असतात. त्याप्रमाणे सचिनही क्रिकेटपासून जोडलेला राहील. तो सतत क्रिकेटबद्दल काही ना काही करत राहील असे वाटते. ‘भारतरत्न’सारखा एवढा मोठा सन्मान सचिनला जाहीर होणे ही फार मोठी गोष्ट आहे. सचिनला ‘भारतरत्न’ मिळणे हे क्रिकेट रसिकांना हवे होते, मात्र हा सन्मान त्याला खूप आधी मिळायला हवा होता. ही खूपच गौरवास्पद गोष्ट आहे, सचिनसाठी आणि आमच्यासारख्या खेळाडूंसाठीही. याबाबत आम्ही खूप खूश आहोत. -विनायक सामंत, क्रिकेटपटू


कॅम्पा कोलाचे होणार तरी काय?

सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा तात्पुरती स्थगिती मिळाल्यामुळे कॅम्पा कोलातील रहिवाशांना थोडासा दिलासा मिळाला. पण, अजूनही कॅम्पा कोलावर कारवाईची लटकती तलवार कायम आहे. कॅम्पा कोलाचे अनधिकृत मजले तोडले जाणार की वाचणार? या आधी सर्वोच्च न्यायालयाकडून अनधिकृत बांधकामे तोडण्याचा आदेश मिळूनही प्रशासनाकडून कारवाईला दिरंगाई झाल्यासारखे वाटते का? झोपड्या व उच्चभ्र वस्तीतील अनधिकृत बांधकामांबाबत गरीब-श्रीमंत असा भेदभाव होत असल्याचे जाणवते का? प्रसारमाध्यमांच्या बाबतीत कॅम्पा कोलातील रहिवाशांनी दाखवलेली ‘गरज सरो वैद्य मरो’ ही भूमिका योग्य वाटते का?.. 

याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा: १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.

आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.

प्रहार,

वन इंडियाबुल्स सेंटर,नववा मजला,

ज्युपिटर मिल्स कंपाउंड,

लोअर परळ,

मुंबई – ४०००१३, 

फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६

‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन पत्र लिहा

vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version