Home महाराष्ट्र कोकण मेवा सिंधुदुर्गात कातळशिल्पांचा खजिना

सिंधुदुर्गात कातळशिल्पांचा खजिना

2

मालवणातील कुडोपीच्या माळावर असणा-या कातळशिल्पांमधील मातृदेवतेचे शिल्प हे भारतात एकमेव कातळशिल्प असल्याच्या मतापर्यंत संशोधक पोहोचले आहेत.

मालवणातील कुडोपीच्या माळावर असणा-या कातळशिल्पांमधील मातृदेवतेचे शिल्प हे भारतात एकमेव कातळशिल्प असल्याच्या मतापर्यंत संशोधक पोहोचले आहेत. सात हजार वर्षापूर्वीचा हा ठेवा आता संशोधकांसमोर आल्याने कोकणच्या कलावंतांचा इतिहास सर्वासमोर येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी (ता. मालवण) येथे सापडलेली कातळशिल्पे (रॉक आर्ट, पेट्रोगलिफ्स) ही अंदाजे इ. स. पूर्व चार ते सात हजार वर्षापूर्वी नवाश्मयुगातील आदिमानवाने केलेली अभिव्यक्ती आहे. या ठिकाणी असलेल्या ६० हून अधिक कातळशिल्पांमध्ये असलेले मातृदेवतेचे कातळशिल्प विशेष उल्लेखनीय आहे. संपूर्ण देशात एवढया मोठया प्रमाणात प्रथमच जगासमोर आलेला हा अनमोल खजिना सिंधुदुर्ग रॉक आर्टच्या जागतिक नकाशावर मानाचे स्थान पटकवणारा ठरला आहे.

हौशी रॉक आर्ट संशोधक व रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य सतीश लळीत यांनी सिंधुदुर्गच्या डोंगरदऱ्यांत असलेल्या कातळशिल्पांचे संशोधन करून हा ठेवा सर्वासमोर आणला आहे. ही कातळशिल्पे इ. स. पूर्व ४००० ते ७००० वर्षापूर्वीची असून अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली अशी कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. ती रॉक आर्ट म्हणून जगभरात ओळखली जातात. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे रॉक आर्टचाच एक प्रकार आहे.

कुडोपी या मालवण तालुक्यातील गावाजवळच्या डोंगरावरील जांभ्या दगडाच्या कातळावर (सडयावर) सुमारे साठ कातळशिल्पे खोदण्यात आली आहेत. यामध्ये मानवाकृती, मासे, विविध प्रकारची वर्तुळे, पक्षी, चित्रविचित्र आकृती मोठया प्रमाणात आहेत. एवढया मोठया संख्येने एकाच ठिकाणी अशी कातळशिल्पे आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या ठिकाणी आढळलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथील सडयावरही अशाच कातळशिल्पांचा शोध सतीश लळीत व त्यांचे बंधू प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी २००२ मध्ये लावला होता. गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी) अशा अनेक ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता लळीत यांनी व्यक्त केली आहे.

सतीश लळीत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी असून सध्या मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पुरातत्त्वीयदृष्टया खूप महत्त्वाची आणि या भागातील आदिम मानवी समूह व त्यांची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कुडोपी व हिवाळेसारखी अनेक ठिकाणे कोकण किनारपट्टीवर आहेत. मात्र, त्यांचे तज्ज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, पर्यटनदृष्टयाही हे स्थळ विकसित केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल.

कुडोपी, बुधवळे, पळसंब, त्रिबंक या गावांच्या माथ्यावर पसरलेल्या हजारो एकर काळथर दगडात ऐतिहासिक गुपिते लपली आहेत. येथील ‘बाहुल्यांचे टेंब’ या भागात दगडावर कोरलेली विविध आकारांची शिल्पे दिसून येत आहेत. सुमारे अर्धा एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर सपाट कातळावर कोरण्यात आलेल्या या शिल्पात गणपती, शंकराची पिंडी, लांब आकराच्या मनुष्याची कोरीव शिल्पे दुष्टीस पडतात. यात मोठया आकाराच्या पंजाचा आणि पावलाचा ठसाही दृष्टीस पडतो. पूर्वी ठसठशीत दिसणारी ही शिल्पे काळाच्या ओघात आणि दुर्लक्षितपणामुळे गवताने आणि कोरीव शिल्पात साचलेल्या गाळामुळे काही पुसट अस्पष्ट तर काही शिल्पे दृष्टीसच पडत नाहीत. येथे जाण्यासाठी पक्की सडक नसल्याने कुडोपी गावातून बाहुल्यांचे टेंब या भागात जाण्यासाठी दोन-तीन किलोमीटर दगडधोंडे तुडवीत कातळावरूनच मार्गक्रमण करावे लागते.

या शिल्पांपासून काही अंतरावर पक्की विहीरही दृष्टीस पडते. या विहिरीला लागूनच बारमाही पाणी असलेले व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले विस्तीर्ण तलाव दृष्टीस पडते. याबाबतच्या लोककथा अनेक असून सध्या हा तलाव गाळाने भरून गेला आहे. या शिवकालीन तलावाला खांब तळे असेही म्हणतात. यासंदर्भातील लोककथेविषयी कुडोपीतील पोलिस पाटील आनंद पडवळ सांगतात, पूर्वी कुडोपी त्रिंबक कातळी भाग एकमेकांना लागून असल्याने या गावाच्या सीमा ठरवण्यासाठी पूर्वीच्या लोकांनी गावाच्या तरंगांचा उपयोग करायचा ठरवला.

एकाच वेळी एका दिवशी दोन्ही गावांच्या तरंगांनी निघून जेवढा भूभाग पादाक्रांत करत समोरासमोर येतील त्या त्या गावच्या सीमा पण त्रिंबक गावच्या ग्रामस्थांनी ग्रामदेवांसह अगोदर येत या तलावापर्यंत आपली सीमा ठरवून परत मागे गेले. त्यानंतर आलेल्या कुडोपी गावाच्या अवसरांना या तलावाजवळ येताच त्रिंबकचे ग्रामस्थ आपल्या अगोदर येऊन गेल्याचे समजल्याने संतापलेल्या या गावातील ग्रामदेवतांनी खांबकाठीच या तलावात टाकल्याने या तलावास खांबतळे नाव पडले. लोक या क्षेत्रास पवित्र मानतात. त्यामुळे खांबतळे भागात दारू, मासे सेवन करून जाणे निषिद्ध मानतात. एखादी खाण्याची वस्तू पडली तरी ती आम्ही उचलत नसल्याचे पडवळ सांगतात. हा तलाव पूर्णत: चिरेबंदी पक्क्या दगडांनी बांधलेला आहे. यात उतरण्यासाठी दगडी पाय-याही बनवलेल्या दिसून येतात. अशा या ऐतिहासिक प्रदेशात जाण्यासाठी कुडोपी, पळसंब भागातून दगडधोंडे तुडवत वाट काढतच जावे लागत असल्याने इतिहासप्रेमींपासून हा भाग दुर्लक्षितच राहिला आहे.

2 COMMENTS

  1. आपण मला या विषयी आधी माहिती देवू शकाल का मी काताल्शिल्पा विषयी आभ्यास करी aahe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version