Home महामुंबई २६३४ गिरणी कामगारांना म्हाडाची घर लॉटरी अक्षय्य तृतीया पावली

२६३४ गिरणी कामगारांना म्हाडाची घर लॉटरी अक्षय्य तृतीया पावली

1

डॉल्बी म्युझिकच्या तालावर व्यासपीठावर लावलेल्या भव्य पडद्यावर फिरत्या कॅसिनोव्हीलचे अ‍ॅनिमेशन, मग दहा.. नऊ.. दोन.. एक असे काऊंटडाऊन चालवत म्हाडाद्वारे सोडतीतील विजेत्या गिरणी कामगारांची नावे जाहीर केली गेली.

मुंबई- डॉल्बी म्युझिकच्या तालावर व्यासपीठावर लावलेल्या भव्य पडद्यावर फिरत्या कॅसिनोव्हीलचे अ‍ॅनिमेशन, मग दहा.. नऊ.. दोन.. एक असे काऊंटडाऊन चालवत म्हाडाद्वारे सोडतीतील विजेत्या गिरणी कामगारांची नावे जाहीर केली गेली.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणा-या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोडत काढल्याने आपले गृहस्वप्न पूर्ण झालेल्या कामगारांचा आनंद त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांतून दिसून येत होता.

ढोल-ताशांच्या गजरात कामगारांची उत्कंठा शिगेला पोहोचवत सोमवारी म्हाडाद्वारे दुस-या टप्प्यातील २ हजार ६३४ घरांची सोडत काढण्यात आली. सोडतीसाठी १८ हजारांहून अधिक कामगारांनी आपले नशीब अजमावले होते.

२०१२मध्ये म्हाडाद्वारे कामगारांसाठी पहिली सोडत काढली होती. दुस-या टप्प्यातील सोडतीचा मुहूर्त थेट चार वर्षानी ठरला. भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान ज्युबली मिल या सहा गिरण्यांच्या जागांवरील घरांची सोडत काढण्यात आली.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी १० वाजता सोडत प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याआधी सकाळी ७.३० वाजल्यापासूनच कामगारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सभागृहात, बाहेर मंडपात, रस्त्यावर गिरणी कामगार, वारसदार मोठया आशेने उभे होते. मंडपात एलसीडी लावून कामगारांसाठी लाईव्ह निकालाची सोय करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग, म्हाडा उपाध्यक्ष एस. एस. झेंडे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, सहमुख्य अधिकारी चंद्रकांत डांगे यांच्यासह म्हाडा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सेंच्युरी मिलद्वारे सोडतीची प्रक्रिया सुरू झाली. व्यासपीठावर लावलेल्या भव्य पडद्यावर आपले नाव येते का? याची धाकधूक प्रत्येक कामगाराच्या चेह-यावर दिसत होती, प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढत होती. पहिल्याच सत्रात अरुण पवार, अनिल शिंदे, रघुनाथ कुंभार या विजेत्यांची नावे जाहीर झाली.

‘येस्स.. मला घर लागले’ असा आनंद प्रत्येक कामगाराच्या तोंडून ऐकायला मिळत होता. विजेत्यांना व्यासपीठावर बोलावून पुष्पगुच्छ आणि म्हाडाची ट्रॉफी देत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विजेत्या आणि प्रतीक्षा यादीवरील कामगारांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून ही यादी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयातही लावण्यात येणार आहे.

गिरणी कामगारांच्या घरांसाठीचे ठोस धोरण बनवेपर्यंत कामगारांना घरांचा ताबा देऊ नका, असे आदेश गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते. याबाबत प्रकाश मेहता यांना विचारले असता, योग्य निर्णय घेण्यात येणार असून कामगारांना वेळेतत घरांचा ताबा दिला जाणार असल्याचे सांगीतले गेले मात्र स्पष्टोक्ती देण्यात आली नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version